वनडे (One Day Cricket) आणि टी-ट्वेन्टी (T20 Cricket) क्रिकेटचा मनमुराद आस्वाद अलिकडेच क्रिकेटरसिकांनी घेतला. किवींविरुद्ध तसंच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) मायभूमीवर खणखणीत कामगिरी केली. आता वेळ झालीय, पारंपरिक कसोटी क्रिकेटची.


कमिन्सच्या (Pat Cummins) ऑसी टीमशी आता दोन हात करायचेत. तेही आपल्याच भूमीवर. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मैदानात भिडताना पाहण्याची रंगत काही औरच असते. अर्थात ऑस्ट्रेलियन संघ कोणत्याच फॉरमॅटमध्ये सोपा पेपर नसतो. कसोटीत तर हा संघ इंचभरही जमीन प्रतिस्पर्ध्यांना मिळू देत नाही. त्यात भारताच्या गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण त्यांच्याच मातीत त्यांना लोळवून आलोय. त्या दोन भळभळत्या जखमा त्यांच्या मनावर आहेतच. त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांचे हात नक्की शिवशिवत असणार. त्यामुळे ही मालिका आपल्या मायदेशात होत असली तरी सोपी नसेल.


दोन्ही टीम्समध्ये काही दर्जेदार अनुभवी तर, काही प्रतिभावान युवा खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाची प्रमुख ताकद ही वॉर्नर, स्मिथ, लबूशेनच्या रुपात फलंदाजीत आहे तर, कॅप्टन कमिन्स वेगवान आक्रमणाचा भार वाहिल आणि लायन फिरकीची धुरा सांभाळेल. या पाच जणांच्या परफॉर्मन्सवर मालिकेचा निकाल बऱ्यापैकी अवलंबून राहील, असं सध्या तरी दिसतंय. अर्थात ख्वाजासारखा फलंदाजही कमाल दाखवू शकतो.


वॉर्नर, स्मिथ हे दोघे किती धोकादायक ठरु शकतात, हे आपण पाहिलंय. हे दोघंही मोठी खेळी करण्याची क्षमता राखून आहेत. त्याशिवाय वॉर्नर पहिल्यापासूनच आक्रमक खेळत प्रतिस्पर्ध्याला बॅकफूटवर पाठवू शकतो. तेव्हा वॉर्नरची गाडी सुसाट सुटायच्या आतच त्याला ब्रेक लावणं गरजेचं आहे. स्टीव्ह स्मिथसारखा जागतिक दर्जाचा फलंदाजही आपला करिश्मा दाखवण्यासाठी उत्सुक असेल. लबूशेनसारखा युवा खेळाडू ज्याने कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच कसोटी क्रिकेटमध्ये छाप पाडलीय. 33 कसोटी सामन्यांमध्ये 59.43 च्या सरासरीने 3150 रन्स. 10 शतकं, 14 अर्धशतकं ही कामगिरी त्याला महानतेकडे नेण्याचा जिना ठरु शकते. मधल्या फळीत स्मिथ-लबूशेन जोडी टीम इंडियाची दमछाक करु शकते.


ऑस्ट्रेलियाकडे अव्वल सात फलंदाजांमध्ये वॉर्नर, ख्वाजा, हेड आणि कॅरी हे चार डावखुरे आहेत. ही बाब लक्षात घेऊनच टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन ठरेल हे नक्की. त्यात नागपूरची खेळपट्टी काय रंग दाखवते, यावरही बरंच काही अवलंबून आहे.


फिरकीला पोषक खेळपट्टी असल्यास तिथे लायनही भारतीय फलंदाजीची परीक्षा घेणार हे निश्चित. 115 कसोटीत 460 विकेट्स ही कामगिरी त्याच्यातल्या उच्च दर्जाच्या ऑफ स्पिनरची साक्ष देणारी आहे. याशिवाय अश्विनसारख्या धोकादायक स्पिनरचा सामना करण्याआधी ऑस्ट्रेलियन टीमने नेट्समध्ये त्याच्यासारखी गोलंदाजी करणाऱ्या स्थानिक गोलंदाजासमोर सराव केलाय. यावरुन ऑसी टीम मालिकेबद्दल, त्यातही अश्विन आणि फिरकी गोलंदाजीला सामोरं जाण्याबाबत किती गांभीर्याने तयारीत आहे हे दिसून येतंय.


अर्थात फिरकीमध्ये अश्विन आपलं ट्रम्प कार्ड असणार हे नक्की. जर अश्विनचा अभ्यास करुन ऑस्ट्रेलियन फलंदाज उतरत असतील तर, तोही काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. सरप्राईज वेपन आपल्या भात्यात समाविष्ट करुन तोही गोलंदाजीला उतरेल यात शंका नाही.


अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल असा फिरकीचा उत्तम संगम भारताकडे आहे. चायनामन गोलंदाजी करणारा कुलदीप आणि अक्षर हे दोघेही डावखुरे गोलंदाज असले तरीही दोघांच्या गोलंदाजी शैलीत वैविध्य आहे. कुलदीपकडे चांगला टर्न आहे. तर, अक्षरला असलेल्या उंचीमुळेही त्याला चांगला बाऊन्स मिळू शकतो, हे दोघेही ऑस्ट्रेलियन टीमसाठी चॅलेंज ठरु शकतात.


गेल्या काही वर्षात भारताची कसोटी मालिकेतली ताकद वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे आपलं वेगवान आक्रमण. याही मालिकेत आपल्याकडे सिराज, शमीसारखे भेदक मारा करणारे बॉलर्स आहेत. जे तिखट गोलंदाजीने ऑसी टीमच्या डोळ्यात पाणी आणू शकतात.


फलंदाजी ही आपली खरी ताकद असं वर्षानुवर्षे म्हटलं जात होतं. गेल्या काही कसोटी मालिकांमध्ये आपल्या फलंदाजांचा परफॉर्मन्स मात्र सीसॉ टाईप राहिलाय. रोहित शर्मा, विराट कोहली,पुजारा, सूर्यकुमार आणि आता गिल ही लाईनअप कुणालाही धडकी भरवणारी अशीच आहे. तरीही फलंदाजांची सातत्यपूर्ण कामगिरी हा फॅक्टर गेल्या काही कसोटी सामन्यात मिसिंग राहिलाय. भारताला अनेकदा मधल्या आणि तळाच्या फळीच्या झुंजार वृत्तीने तारलंय. अगदी ऑस्ट्रेलियातील दोन यादगार कसोटी मालिका विजयातही वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर यांनी मोक्याच्या क्षणी सहाव्या सातव्या नंबरवर खेळताना बॅटचं पाणी दाखवलं होतं. हनुमा विहारी, अश्विननेही अंगावर वार झेलत संघाचा बचाव केला होता.


मायभूमीत होत असलेल्या या मालिकेत किंग कोहली खरंच किंगसारखा खेळावा अशी क्रिकेटरसिकांची मनापासून अपेक्षा आहे. 2019 पासून कोहलीने कसोटी मालिकेत तीन आकडी वेस ओलांडलेली नाही. ही बाब कोहलीला जशी लक्षात आहे, तशी ऑस्ट्रेलियन टीमलाही लक्षात असेल. त्यामुळे हे क्रिकेटयुद्ध पाहण्याची मजा औरच असेल.


शुभमन गिलची बॅट सध्या धबधब्यासारखी वाहतेय. हा प्रवाह याही मालिकेत कायम राहावा, अशीच इच्छा आहे. पुजाराच्या रुपात भक्कम खांब टीम इंडियासाठी लाभलाय. त्याच्याभोवती आक्रमक फलंदाजांनी इनिंग बांधावी आणि नौका पार करावी, हीच इच्छा आहे. कागदावर दोन्ही टीम्सचा विचार केल्यास भारतीय संघ अधिक समतोल वाटत असला तरीही ऑस्ट्रेलियन टीमच्या बाबतीत एखादा गाफिलपणाही तुम्हाला मोठी किंमत मोजायला लावू शकतो. वन टू वन मालिकेचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने गेल्या पाचपैकी चार मालिका जिंकल्यात, तर तीन मालिका सलग खिशात घातल्यात. यातल्या गेल्या दोन मालिका ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेल्या होत्या. हा सारा इतिहास जरी भारताच्या बाजूने असला तरी कांगारुंशी दोन हात करताना सावध राहत पण, आक्रमक होतच खेळणं गरजेचं आहे.