IND vs AUS 1st Test Match : आयुष्याच्या सारीपाटावर सुख,दु:ख, आशा-निराशेचा खेळ सुरुच असतो. रात्रीनंतर दिवस आणि दिवसानंतर रात्र हा सृष्टीचा नियम आहे. आशा-निराशेचा हाच खेळ क्रिकेटच्या मैदानात आपण सध्या अनुभवतोय. न्यूझीलंडविरुद्धची (NZ vs IND) मायदेशातली कसोटी मालिका 0-3 ने गमावली, तेव्हा सारा अंधार दाटला असंच वाटलं. त्यात ऑसी भूमीवर आपली डाळ कशी शिजणार अशी धाकधूकही होऊ लागली. पहिलीच कसोटी ऑसींची वेगवान खेळपट्टी पर्थवर. अग्निपर्थच होता तो. पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्मा खेळत नव्हता.
संकटाने वेढा घातला होता. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत कॅप्टन बुमराने टॉस जिंकला आणि फलंदाजी घेतली. हा गट्सी डिसिजन होता. पण, पुढे आपण दीडशेत ऑलआऊट झालो. इथून पुढे सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत 295 धावांनी विजयी. हा प्रवास आयुष्यातल्या चढउतारांसारखाच आहे. म्हणजे कांगारुंच्या भूमीवर पर्थच्या खेळपट्टीवर आपण दीडशेत ऑलआऊट झाल्यावर ज्या शानदारपणे आपण मॅच जिंकली त्याला तोड नाही. एकतर बॅटिंगची आघाडीची फळी कोसळत असतानाही मधल्या फळीने शस्त्रं टाकली नाहीत. कोहलीसारखा दिग्गज स्वस्तात बाद झाल्यावर पंत-रेड़्डीच्या सातव्या विकेटसाठीच्या 48 धावांच्या भागीदारीला सोन्याचं मोल होतं. तर, या कामगिरीत नवी जान भरली कॅप्टन बुमराने. तो भारतीय माऱ्याचं प्रमुख अस्त्र होऊन आता जमाना लोटलाय. पण, तो अत्यंत हुशार क्रिकेटर आहे. अभ्यासू आहे. चेतेश्वर पुजारा कॉमेंट्री म्हणाला, विराट आणि रोहित कॅप्टन असतानाही स्वत:च्या गोलंदाजीवेळी बुमराच कॅप्टन असायचा. याचा अर्थ असा की, क्षेत्ररचना काय असणार, त्याची लाईन ऑफ बॉलिंग काय असणार या साऱ्या मुद्यावर त्याने सखोल विचार केलेला असतो आणि तो त्या विचारांना प्रत्यक्षात उतरवतो.इथेही तेच झालं, पहिल्या चेंडूपासून त्याची दिशा आणि टप्पा अप्रतिम होता. खेळपट्टी नावाच्या निखाऱ्यावर त्याने पेटवलेल्या आगीत ऑसी फलंदाजी होरपळली. किंबहुना बुमरासह भारतीय गोलंदाजांच्याच दिशा आणि टप्प्याचं अक्रमने भरभरून कौतुक केलं. सिराजची उत्तम साथ बुमराला लाभली. तर,नवख्या हर्षित राणानेही नवखेपणा अजिबात न दाखवता तिसऱ्या सीमरची भूमिका चोख बजावली. त्याने ट्रेव्हिस हेडला केलेला क्लीन बोल्ड कमाल होता. नेहमीप्रमाणेच बुमराची लाईन अँड लेंथ स्वप्नवत होती.
नागासारखा फणा काढून दंश करणारा त्याचा आत येणारा चेंडू ज्याने आधी नवोदित मॅक्सविनी आणि नंतर स्टीव्ह स्मिथला पायचीत केलं. स्मिथची स्टम्पसमोर शफल होण्याची सवय त्याला अनेकदा एलबीडब्ल्यू विकेटकडे घेऊन जाते. इथेही तेच झालं. पंतने दोन्ही डावात काही उत्तम कॅचेस घेतले. त्यातही लाबूशेनचा कॅच जर स्लीपमध्ये आपल्याकडून सुटला नसता तर त्यांना 104 ही दिसले नसते. ऑसी खेळपट्ट्यांवर स्लीप फिल्डर्ससाठीही आव्हान असतं. चेंडूला मिळणारा बाऊन्स, त्याचा वेग या साऱ्यांशी अॅडजस्ट व्हायचं असतं. आपण 104 वर त्यांना रोखलं. कमबॅकचा दरवाजा उघडला. पण, पुढे आपल्या फलंदाजांनी हा दरवाजा उखडून टाकला. खास करुन आपल्या सलामीवीरांनी. खेळपट्टी एव्हाना ठणठणीत झाली होती. राहुलने जैस्वालच्या साथीने केलेल्या भागीदारीत जैस्वाल कधी मेन हिरो झाला ते कळलंही नाही. यावेळी राहुलने परिपक्व सहनायकाची भूमिका घेतल्याने सलामीचा सिनेमा द्विशतकी हिट झाला.
जैस्वालला कारकीर्दीच्या सुरुवातीलाच मोठी शतकं ठोकायची सवय लागलीय हे सुखावह आहे. त्याच्या 15-16 कसोटी सामन्यांमध्ये दीडशेपारची चार मोठी शतकं आहेत. याही मॅचमध्ये त्याने 432 मिनिटं म्हणजे जवळपास 7 तासांहून अधिक काळ फलंदाजी केली. राहुलने 295 मिनिटे म्हणजे सुमारे पाच तास तर कोहलीने 221 मिनिटे म्हणजेच चार तास खेळपट्टीवर ठाण मांडलं. कोहलीने 30 व्यांदा कसोटी शतकाची वेस ओलांडल्यावर बुमराने अखेरच्या तासात कांगारुंना बॅटिंगला उतरवलं. थकलेले ऑसी आणि उत्साह संचारलेली बुमरा अँड कंपनी असा विरोधाभास असलेला सामना तिसऱ्या दिवशी अखेरच्या तासात पाहायला मिळाला. बुमराने पुन्हा मॅक्सविनी आणि लाबूशेनला या आता... म्हणत घरी पाठवलं. तर, सिराजने कमिन्सला टाकलेला चेंडू त्याच्या बॅटला स्पर्श करुन कधी कोहलीच्या हाती विसावला हे कुणालाच कळलं नाही. ऑस्ट्रेलिया - तीन बाद 12. इथेच त्यांचं पॅकअप निश्चित झालं होतं. पाचव्या दिवशी हेड आणि मार्शने केलेल्या प्रतिकारामुळे हा पराभव लांबला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किवींविरुद्धच्या फ्लॉप शोनंतर आपल्या कसोटी क्रिकेटच्या नभांगणात दाटलेला अंधार आता कुठल्या कुठे पळून गेलाय. ऊर्जेचा, सकारात्मकतेचा नवा सूर्य उगवलाय, जो उरलेल्या चारही कसोटीत असाच तेजोमय कामगिरीने तळपत राहील अशी अपेक्षा करुया.