ICC World Cup 2023 Final, IND vs AUS: झुंजार, जिद्दी, मानसिक कणखरता नसानसात भरलेल्या कांगारुंनी सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर (World Cup 2023) नाव कोरलं आणि रोहितसेनेसह (Rohit Sharma) कोट्यवधी चाहत्यांचा स्वप्नभंग केला. सलग 10 विजयांसह रोहित शर्माची भारतीय टीम (Team India) फायनलमध्ये दिमाखात दाखल झालेली. इथे मात्र अंतिम फेरी गाठण्याची आणि अंतिम फेरीत सातत्याने जिंकण्याची सवय असलेल्या कांगारुंनी बाजी पलटवली. आधी 240 वर भारताला रोखलं आणि मग तीन बाद 47 वरुन त्यांनी फिनिशिंग लाईन पार केली. तीही या पूर्ण स्पर्धेत फॉर्मात असणाऱ्या भारतीय गोलंदाजांसमोर. यावेळचा हीरो होता ट्रेव्हिस हेड जो दुखापतीमुळे पहिले काही सामने खेळू शकला नव्हता. त्याने कमबॅक मॅचमध्ये किवींविरुद्ध ठोकलेलं शतक तसंच नॉक आऊटच्या दोन्ही सामन्यात त्याने मॅचविनिंग खेळी केल्या. सेमी फायनलमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्यांने अत्यंत ट्रिकी खेळपट्टीवर 62 धावांची आक्रमक इनिंग करत त्यांच्या आव्हानातली हवाच काढून टाकलेली तर, दोन विकेट्सही त्याने घेतलेल्या.


त्याच हेडने आज वॉर्नर, मार्श आणि स्मिथसारखे खंदे फलंदाज बाद झाल्यावर ड्रायव्हिंग सीट आपल्याकडे घेतली आणि ती शेवटपर्यंत आपल्याकडे ठेवली. काहीशी आक्रमक सुरुवात केल्यावर समोरुन तीन विकेट्स झटपट गेल्यावर हेडनेही आपलं हेड शांत ठेवलं, चौकार, षटकारास्त्र म्यान करुन एकेरी-दुहेरी धावांची नखं बाहेर काढली आणि भारतीय गोलंदाजीवर ओरखडे काढले. समोरुन त्याला संयमी लाबूशेनकडून तितकीच समर्थ साथ लाभली. मग मॅच टप्प्यात आल्यावर हेडने चौकार, षटकारांचे टोलेजंग मजले बांधले.


टॉस जिंकून फलंदाजीसाठी आमंत्रित करणाऱ्या भारताला ऑस्ट्रेलियाने सामन्यावर पकड मिळवूच दिली नाही. खरं रोहित शर्माने 31 चेंडूंत 47 ची झंझावाती इनिंग करत मोठ्या स्कोरचा पाया रचलेला. तो आणि कोहली खेळत असताना सामन्याचा ताबा आपण हिसकावून घेणार असंच वाटलेलं. पण, इथेच ऑस्ट्रेलियन माईंड सेटची प्रचीती आली.  जेव्हा काहीही आपल्या बाजूने घडत नसतं, तेव्हा एखादा अफलातून कॅच किंवा रनआऊट करत ते कमबॅक करतात. असाच रोहितचा अफलातून कॅच हेडने पकडला आणि भारतीय स्कोरला ब्रेक लावला. 9.3 ओव्हर्समध्ये एक बाद 76 वरुन मग ठराविक अंतराने त्यांनी विकेट्स काढल्या. त्याच वेळी पाचव्या गोलंदाजाचा कोटा भारतावर दबाव असताना कमिन्सने झटपट संपवून घेतला. म्हणजेच अखेरच्या षटकात मुख्य गोलंदाजांचे स्पेल्स त्यांनी बाकी ठेवले आणि भारताला हाणामारीच्या षटकांमध्ये आक्रमक गीयर टाकू दिला नाही. पर्यायाने भारत 250 पार जाणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. आज पहिल्यापासून जाणवलेली लक्षणीय बाब म्हणजे भारताने मारलेल्या फटक्यांवर कांगारु चित्त्याच्या वेगाने झडप घालत चेंडू रोखत होते, या चपळाईने त्यांनी किमान 20 ते 25 धावा वाचवल्या. हा सामना कांगारुंच्या बाजूने जाण्यामध्ये हाही घटक महत्त्वाचा ठरला. त्यांची कधीही हार न मानण्याची वृत्ती आणि नॉक आऊट सामन्यांमध्ये खेळ कमालीचा उंचावण्याचं त्यांचं कौशल्य याबद्दल त्यांची पाठ थोपटावीच लागेल. या स्पर्धेत त्यांनी साखळीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठे पराभव पत्करले होते. त्याच दोन टीम्सना त्यांनी नॉकआऊट मॅचेसमध्ये धूळ चारली. या स्पर्धेत त्यांनी मिळवलेले विजयांपैकी सर्वच विजय काही सफाईदार किंवा टिपिकल ऑस्ट्रेलियन डॉमिनेटिंग स्टाईल नव्हते. पण, ते दरवेळी विजयाचा दरवाजा उघडून पुढे गेले. किवींविरुद्ध अखेरच्या ओव्हरमध्ये त्यांनी अफलातून फिल्डिंगने मैदान मारलं तर नवख्या अफगाणी टीमसोबतची लढाई सात बाद 92 वरुन मॅक्सवेलच्या तुफानी द्विशतकामुळे जिंकली. खिंडीत अडकले तरी तिथून निसटायचं कसं, याचं कसब ते अंगी बाणवून आहेत. टी-ट्वेन्टी वर्ल्डकप, कसोटी अजिंक्यपद आणि आता वनडे वर्ल्डकपचा आणखी एक तुरा. लागोपाठच्या विजेतेपदांचा मान मिळवणाऱ्या कांगारुंना हॅट्स ऑफ.


ऑसींचं कौतुक करत असतानाच केवळ एका पराभवाने भारताची कामगिरी कमी मोलाची ठरत नाही. सलग 10 सामने जिंकणं, प्रत्येक सामन्यात कामगिरी उंचावत नेणं, पांड्याच्या दुखापतीनंतर सहा फलंदाज-पाच गोलंदाज या कॉम्बिनेशनने खेळणं हे सोपं नव्हतं. ते आपण लीलया करुन दाखवलं. संघातील दोन ज्येष्ठ खेळाडूंनी दबावाच्या निखाऱ्यावर चालायचं ठरवलं. रोहितने नव्या चेंडूवर आक्रमण करायचं आणि कोहलीने 50 षटकांपर्यंत थांबून खेळायचं. आजूबाजूला गिल, अय्यर, राहुलने टोलेजंग फटकेबाजी करायची. प्लॅनिंग आणि त्याचं सादरीकरण खूप छान झालेलं. अपवाद आजचा सामना. अकराच्या अकरा जण लयीत खेळणं ही नेहमी होणारी बाब नाही. आपले पाच गोलंदाजही कमाल फॉर्मात होते. बुमराची अचूकता, चार सामन्यानंतर संघात आलेल्या शमीचे आग ओकणारे स्पेल्स, गुणवत्तावान सिराजची कामगिरी, जाडेजा-कुलदीपच्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांना लावलेला ब्रेक, सारं काही विश्वविजयाचं एकेक पान लिहिणारं होतं. अंतिम फेरीच्या आजच्या लढतीत मात्र रोहित शर्मा आऊट झाल्यावर ऑसींनी हा सामना कंट्रोल केला आणि सामन्यासह विजेतेपदही खिशात टाकलं. या स्पर्धेनंतर एका डोळ्यात भारतीय खेळाडूंच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा अभिमान आहे तर दुसऱ्या डोळ्यात शिखराच्या पायरीपर्यंत पोहोचून कळसाला हात न घातल्याची चुटपूट, रुखरुखही आहे. हा विश्वचषक आम्ही क्रिकेटरसिकही रोहितसेनेसोबत जगलो होतो. आपल्याला इतकं वाईट वाटतंय, तर रोहित आणि टीमला किती वाटत असेल. त्यांच्या या स्पर्धेतील सातत्यपूर्ण खेळाचं आपल्याला नक्कीच कौतुक आहे. तेव्हा विजेतेपद जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचं अभिनंदन आणि पहिल्या 10 सामन्यांमधले अविस्मरणीय क्षण अनुभवायला दिल्याबद्दल रोहितच्या टीमलाही कौतुकाची थाप. आज एका डोळ्यातून पराभवाबद्दल अश्रू वाहतायत, तर दुसऱ्या डोळ्यात सलग १० विजयांच्या आठवणींचे क्षण रुंजी घालतायत, नवी आशा दाखवतायत. आशाच माणसाला नवी उंची गाठण्याची प्रेरणा देते, यशाचा उंबरा ओलांडायला पावलात बळ देते, नाही का?