30 डिसेंबर 2022. एक भयावह अपघात होतो. ज्यात ऋषभ पंत नावाच्या मॅच विनिंग क्रिकेटरला जीवघेण्या दुखापती होतात. पाठीला, पायाला, डोक्याला.. अशा जखमा होतात, तेव्हा त्या नुसत्या शरीरावर होत नाहीत, तर मनावर आघात करतात. पंतच्या कारचा जसा चक्काचूर झालेला तसाच आत्मविश्वासाचाही चक्काचूर असे अपघात करु शकतात. इथे तुमच्या मानसिक कणखरतेची, तुमच्या कुटुंबियांची सपोर्ट टीमची, तुम्हाला मिळणाऱ्या वैद्यकीय उपचारांची साऱ्यांचीच साथ लागते आणि ती मिळाली तरीही तुमच्यातलं फायटिंग स्पिरीट परमोच्च दर्जाचं लागतं. तुमच्यात विलक्षण लढाऊ वृत्ती असावी लागते. उत्तम उपचारांसोबतच पोलादी मनाने त्याला सामोरं जावं लागतं. पंतचा हा अपघात झाला आणि या अपघाताच्या वेळेपासूनच सुरु झाली, एका जिद्दीची, संघर्षाची कहाणी.


असं म्हणतात, की प्रतिकूल परिस्थिती तुमच्यात जिद्दीची वात पेटवते. इथे ऋषभ पंतला झालेला अपघातही असाच आयुष्याचा संघर्ष उभा करणारा होता. तो आपल्या पायावर चालू तरी शकेल का, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. असं असलं तरीही ऋषभने हार मानली नाही. त्याच्यातही ती मनोनिग्रहाची वात पेटली. डॉक्टरांनी दीड वर्षांचा काळ दिलेला असताना ऋषभने 16 महिन्यांमध्येच मैदानावर पाऊल ठेवलं.


ऋषभच्या दुखापतीवर उपचार करणाऱ्या डॉ. दिनशॉ पारदीवालांनी सांगितलं, आमच्या मते त्याला कमबॅकसाठी दीड वर्ष लागणार होतं, तर त्याने 12 महिन्यात परतण्याचा चंग बांधला होता. स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये 15-16 महिन्यांत पुनरागमन करणं हे चमत्कारापेक्षा कमी नाही. म्हणून पंतला 'मिरॅकल मॅन' असंही म्हटलं जातं.


पंतने आता सुरू असलेल्या आयपीएलच्या मैदानात पाऊल टाकलं आणि चौकार, षटकारांचा पाऊस सुरु केला आणि आता तर थेट टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचं दार त्याच्यासाठी उघडलं. ऋषभ पंत हा निव्वळ बॅट्समन म्हणून विचारात घेतला तर कोणत्याही गोलंदाजीच्या चिंधड्या उडवून त्याची लक्तरं वेशीवर टांगण्याची किमया त्याच्यात आहे. अपघाताला सामोरं जाताना जसा संघर्ष त्याने केलाय, तसा आव्हानात्मक परिस्थितीच्या निखाऱ्यातून तो चाललाय आणि संघाच्या विजयाची पताका त्याने फडकवलीय.
 
ऑस्ट्रेलियातला ब्रिस्बेनमधील 328 धावांचा पाठलाग आठवा. आजही घरातल्या घरात बसून आपण आपली कॉलर टाईट करतो. ऑस्ट्रेलियातील 2021 च्या कसोटी मालिकेत पंतने अखेरच्या दिवशी भारताला 328 चं भलं मोठं लक्ष्य गाठून दिलेलं. 138 चेंडूंत नाबाद 89 ची तडाखेबाज खेळी केली. ज्यात नवख्या वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने मोक्याच्या क्षणी केलेल्या 53 धावांच्या भागीदारीचा समावेश होता. समोर होतं स्टार्क, हेझलवूड, कमिन्स आणि लायन असं तिखट आक्रमण. तरीही पंतच्या बॅटच्या तिखट प्रतिकाराने ऑसी गोलंदाजीची जीभ पोळली. भारताने मॅचही जिंकली आणि मालिकाही.


अशा आणखीही काही इनिंग्ज त्याने केल्यात. कसोटीत 43, वन-डेत 34 आणि टी-ट्वेन्टीत 22 ही सरासरी डोळ्यात भरण्यासारखी नसली तरी, जेव्हा तो खेळतो, तेव्हा त्याची बॅटिंग स्टाईल ही मात्र डोळे दिपवणारी असते. अॅप्रोचच्या बाबतीत पंत  गिलख्रिस्ट स्कूल ऑफ बॅटिंगचा विद्यार्थी वाटतो. म्हणजे पाहा ना, गिलख्रिस्ट सलामीला मैदानात उतरुन जशा गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवत असे, तसाच पंतही चौफेर टोलेबाजी करुन सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्येही 30 एप्रिलपर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये त्याने 44 च्या सरासरीने 398 धावांचा रतीब घातलाय. ज्यात स्ट्राईक रेट आहे, 158.56 चा.


याच पंतने 2019 मध्ये आयपीएलच्या मैदानात दिल्लीकडून खेळताना 162.66 च्या स्ट्राईक रेटने 488 धावांचा पाऊस पाडला होता. तशाच शैलीने पंत खेळतो. अगदी कसोटी क्रिकेटमध्येही त्याचा स्ट्राईक रेट 33 सामन्यांमध्ये 73.63 इतका आहे.


आयपीएलचा हा फॉर्म त्याला टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये मोलाचा नक्की ठरेल. खास करुन जेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करतोय, तेव्हा तर नक्कीच. सध्याचा जाहीर झालेला संघ पाहता प्लेईंग इलेव्हनमध्ये पंतला स्थान मिळेल, असं नक्की वाटतंय. आयपीएलच्या रणांगणातून आंतरराष्ट्रीय  मैदानात उतरून बॅटीची तलवार आणि विकेटकिपिंगची ढाल करत पंत नावाचा सैनिक प्रतिस्पर्ध्यावर चालून जाईल, तो विजेतेपदाचा किल्ला सर करण्यासाठीच. अशी शुभेच्छा ऋषभसह रोहितसेनेला देऊया.