जगभरात मानानं मिरवणाऱ्या भारतीय सिंगल माल्टचे अर्थात ‘अमृत सिंगल माल्ट’चे प्रणेते नीळकंठराव जगदाळे यांचं बंगळुरूमध्ये निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर बंगळुरूच्या HCG रुग्णालयात उपचार सुरू होते.


नीळकंठराव जगदाळे हे जलतरणपटू म्हणूनही बंगळुरूकरांना परिचित होते. ते बसवनगुडी अक्वॅटिक सेंटरचे अध्यक्ष होते. सरकारी आणि खासगी शाळांमध्ये जाऊन त्यांनी मुलांना पोहण्यासाठी प्रेरणा दिली.

पण जगभरात त्यांचं नाव होतं ते भारतीय सिंगल माल्टचे प्रणेते म्हणून.

नीळकंठराव जगदाळेंची ओळख

नीळकंठराव जगदाळे यांचे पूर्वज मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिवाशी. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांच्यासोबत नीळकंठरावांचे पूर्वज लढाईसाठी दक्षिणेत गेले. त्यानंतर काही मराठी कुटुंब बंगळुरू आणि परिसरात स्थायिक झाली. त्यात नीळकंठरावांचे पूर्वजही होते.

1948 साली नीळकंठराव जगदाळे यांचे वडील राधाकृष्ण जगदाळे यांनी बंगळुरूत अमृत डिस्टिलरीज नावानं कंपनी स्थापन केली. मद्य व्यवसायाला थोडी प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर जगदाळे कुटुंबानं पूर्णपणे या व्यवसायात स्वत:ला झोकून दिलं.

त्यानंतर 1949 मध्ये सिल्वर कप नावानं पहिली ब्रँडी अमृत डिस्टिलरीनं बाजारात आणली. लष्कराच्या कँटिनला ब्रँडी पुरवण्याचं कंत्राटही त्यावेळी अमृत डिस्टिलरीकडे होतं.

1972 मध्ये नीळकंठराव जगदाळे आपल्या वडिलांच्या व्यवसायात सक्रिय झाले. 1976 मध्ये जेव्हा राधाकृष्ण जगदाळे यांचं निधन झालं, तेव्हा कंपनीची सूत्रं नीळकंठराव यांच्याकडे आली. आणि त्यांनी मद्यनिर्मितीच्या व्यवसायात नवे प्रयोग करायला सुरूवात केली.

 VIDEO | संग्रहित मराठी बिग बॉस नॅशनल स्पेशल | 'अमृत सिंगल माल्ट'चे नीळकंठ जगदाळे | एबीपी माझा 



अमृत सिंगल माल्टच्या निर्मितीची गोष्ट

1982 मध्ये नीळकंठरावांनी बार्ली म्हणजे सातूपासून सिंगल माल्ट व्हिस्की बनवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाचं मद्यविश्वात फारसं स्वागत झालं नाही. कारण सिंगल माल्ट बनवण्याची मक्तेदारी ही स्कॉटलंड आणि विशेषत: युरोपातील देशांकडे असल्याचा समज होता.

पण देशी बार्ली (सातू) आणि मोलॅसिसचा वापर करून नीळकंठरावांनी पहिली अमृत सिंगल माल्ट बाजारात आणली. 1986 साली ती लष्कराच्या कँटिनमध्ये पोहोचली. सिंगल माल्ट व्हिस्कीची पहिली बॅच फक्त 18 महिन्यात तयार झाली.

पण भारतातल्या उष्म वातावरणामुळे युरोप आणि स्कॉटलंडच्या तुलनेत भारतीय व्हिस्की लवकर तयार किंवा मॅच्युअर होत असल्याचं लक्षात आलं. भारतात जी व्हिस्की 1 वर्षात मॅच्युअर व्हायची तिला स्कॉटलंड किंवा युरोपात तीन वर्ष लागायची.

विशेष म्हणजे स्थानिक जमिनीतून मिळालेली बार्ली आणि पाणी यामुळे स्कॉटलंडच्या सिंगल माल्टपेक्षा अमृतची चवही भन्नाट असल्याचं  समोर आलं.

आणि मग नीळकंठरावांनी ‘अमृत सिंगल माल्ट’ युरोपात लाँच करायचं ठरवलं.

युरोपात कशी पोहोचली अमृत सिंगल माल्ट?

2001 मध्ये नीळकंठरावांचा मुलगा रक्षित न्यूकॅसलमध्ये MBAचं शिक्षण घेत होता. त्याला एक मार्केटिंग प्रोजेक्ट करायचा होता. तेव्हा नीळकंठरावांनी त्याला अमृतचंच मार्केटिंग प्रोजेक्ट का करत नाहीस? असं विचारलं. आणि तिथून अमृतचा प्रवास सुरू झाला.

अमृतच्या मार्केटिंगसाठी टॅटलॉक अँड थॉमसन कंपनीला पाचारण करण्यात आलं. पण एरव्ही अमृत असं कुठं सिंगल माल्टचं नाव असतं का? इथंपासून सुरूवात झाली. नीळकंठरावांना काहींनी ‘अमृत सिंगल माल्ट’ हे नाव बदलण्याचा सल्लाही दिला. पण सिंलग माल्ट विकायची तर आपल्याच म्हणजे ‘अमृत’च्या ब्रँडखालीच हा त्यांचा निर्धार होता.

मग ऑगस्ट 2004 मध्ये अमृत युरोपातल्या बाजारात पोहोचली. तिथल्या काही बड्या हॉटेल आणि कॅफेमध्ये अमृत टेस्टसाठी ठेवण्यात आली. व्हिस्कीप्रेमींना अमृतची चव चाखण्याची विनंती केली जायची.

हळूहळू अमृतची चव व्हिस्कीप्रेमींच्या जीभेला चटावू लागली. जिम मरेच्या व्हिस्की बायबलमध्ये अमृतनं तिसरं स्थान पटकावलं. आणि भारतीय माती-पाण्यातून जन्मलेली ‘अमृत’चक्क युरोपवासियांच्या मनात बसली.

सध्या अमृतच्या प्रिमियम सिंगल माल्टची 21 देशात विक्री होते.

महाराष्ट्राच्या मातीशी नातं असलेल्या नीळकंठरावांना मराठी मात्र तोडकंमोडकं यायचं. त्यांच्या पत्नी मात्र उत्तम मराठी बोलतात. आता नीळकंठरावांची दुसरी पिढी अमृतचा व्याप वाढवतेय.

त्यांना सुरेंदर थत्तू या अचाट ‘ब्लेंडर’ची साथ आहे. अमृतच्या दारापर्यंत जातांना बंगळुरूचं ट्राफिक आणि धूळ तुम्हाला वैताग आणते. पण आत गेल्यानंतरचा माहौल तुमचं मन खूश करून टाकतं. टापटीप, स्वच्छता आणि कामाप्रती असलेली निष्ठा इथं पदोपदी दिसते

अमृतचा व्याप वाढला तसा अनेकांना रोजगार मिळाला. बॉटलिंग आणि पॅकिंगचं काम महिला करतात. रस्त्यावरून जाताना अगदी साधी दिसणारी इमारत आत गेल्यानंतर जगाच्या बाजारातला सर्वात मोठ्या खजिना असल्याचं कळतं.

तुम्ही व्हिस्कीप्रेमी असाल तर एकदा ‘अमृत’ची चव नक्की चाखून बघा. हीच नीळकंठरावांना श्रद्धांजली असेल.