BLOG : आज सकाळी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली आणि तेव्हा हरियाणात काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र दिसत होते. सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेसलाच हरियाणाची सत्ता देण्यात आली होती. त्यामुळे एक्झिट पोल खरे ठरतायत असे वाटत होते, पण तासा-दीड तासातच चित्र बदलले आणि काँग्रेसच्या तोंडात पडणारा विजयाचा घास भाजपने काढून घेतला. 90 जागांच्या हरियाणा विधानसभेसाठी भाजने 49 जागा जिंकून स्वबळावर तिसऱ्यांदा हरियाणाची सत्ता काबिज केली. हरियाणाच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा कोणत्याही पक्षाने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळवले नव्हते ते भाजपने करून दाखवले.


खरे तर भाजपसाठी हरियाणाची निवडणूक सोपी नव्हती. काँग्रेसने विविध मुद्द्यांवर भाजपला पुरेपूर घेरले होते. शेतकऱ्यांचे आंदोलन तर गेल्या दी़ड वर्षापासून सुरु आहे. त्यातच काँग्रेसने अग्निवीरांचा मुद्दाही उपस्थित केला होता. हरियाणात बेरोजगारीचीही समस्या होती, काँग्रेसने बेरोजगारीवरही प्रचारात भर दिला होता. हरियाणात जवळपास 94 लाख तरुण मतदार आहेत. काँग्रेसच्या बेरोजगारीला भाजपने नोकरी देण्याचे आश्वासन देऊन शह दिला, त्यामुळे काँग्रेसचा बेरोजगारीचा वार वाया गेला.


हरियाणात दलित मतदारांची संख्याही जवळपास 21 टक्क्यांच्या आसपास आहे. काँग्रेसने कुमारी सैलजा यांना नाराज केले, त्यातच राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याचेही वक्तव्य केले आणि भाजपने याचा पुरेपूर फायदा उचलला काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा आणि सैलजा यांच्यातील मतेभद मिटवण्याचे प्रयत्न केले, पण त्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आले नाही. त्यातच काँग्रेसकडून कुमारी सैलजा, भूपिंदर सिंह हुड्डा आणि रणजीत सुरजेवाला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून समोर येत होते. 


दलितांना आपलेसे करण्यात भाजपने कोणतीही कसर सोडली नाही. याचे कारण म्हणजे सत्तेवर यायचे असेल तर मोठ्या संख्येने असलेला दलित मतदार आपल्या बाजूने वळवणे आवश्यक होते आणि भाजपने यावर प्रखरपणे लक्ष दिले आणि राहुल गांधीच्या आरक्षण वक्तव्याचा आणि सैलजा यांच्या नाराजीचा फायदा घेत दलित मतदार आपल्याकडे वळवले. हरियाणात 17 जागा दलित समुदायासाठी राखीव आहेत. दुष्यंत चौटाला यांची जननायक जनता पार्टी नेहमीच दलित मतदारसंघात यशस्वी होत आली आहे. यावेळी मात्र चौटाला यांच्या जजपाला एकही सीट मिळाली नाही तर भाजपने मात्र गेल्या वेळचे तुलनेत या 17 जागांमध्ये दुप्पट यश मिळवले.


खरे तर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला शेतकरी आंदोलनाचा फटका बसणार असे दिसत होते. पण भाजपने शेतकऱ्यांना खूश करण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. एमएसपी देण्याचे जाहीर करीत भाजपने शेतकऱ्यांना गोंजारले. यासोबतच हरियाणामध्ये जाट आणि गैर जाटांमधील मतांचा फरक भाजपने लक्षात घेऊन त्यानुसार प्रचाराची रणनीती आखली. 


काँग्रेसने जाट असलेल्या भूपिंदर सिंह हुड्डा यांना पुढे केले, एवढेच नव्हे तर त्यांना सर्वाधिकारही दिले. हुड्डा यांनी त्यांच्या आवडीच्या 72 जणांना निवडणुकीचे तिकीट दिले. काँग्रेसला आपणच सत्तेवर येऊ असा आत्मविश्वास निर्माण झाला होता. भाजपने ही बाब लक्षात धेत जाटांसोबहच यादव, ब्राह्मण आणि पंजाबीसह अन्य समुदायांना आपल्याकडे वळवले. घरोघरी जाऊन प्रचार केला, त्याचा चांगलाच फायदा भाजपला झाला आणि एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत भाजपने यश मिळवले.


या विजयात भाजपचा आणखी एक महत्वाचा मुद्दा जो ठरला तो मनोहर खट्टर यांचा. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाकरी फिरवत मनोहर खट्टर यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले आणि नायब सिंह सैनी यांच्यावर मुख्यमंत्र्यांची निवड केली. एक नवा आणि तरुण चेहरा भाजपने दिला आणि नायब सिंह सैनी यांच्यावर विश्वासही टाकला. सैनी यांनी भाजप नेतृत्वाच्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही.


भाजपला हरियाणात 39.90 टक्के मते मिळाली तर काँग्रेसला 39.07 टक्के मते मिळाली. खरे तर निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेस यांची युती होणार होती, पण जागावाटपामुळे युती तुटली आणि आपने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. आपला या निवडणुकीत 1.79 टक्के मते मिळाली. जर आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर ही मते काँग्रेसला मिळाली असती आणि त्यांच्या जागांमध्येही वाढ झाली असती. याचा एक अर्थ असा की, आपने काँग्रेसची मते खाल्ली आणि त्याचा भाजपला फायदा झाला.


भाजपच्या हरियाणातील या विजयाचे परिणाम नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीवर दिसून येण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारीमध्ये दिल्लीतही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीतही भाजपला फायदा होण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचा खोटारडेपणा, आरक्षण रद्द करणे, संविधान बदलणे या काँग्रेसच्या प्रचाराला मतदारांनी महत्व दिले नाही. त्यामुळे महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीमध्येही काँग्रेसचे हे मुद्दे यशस्वी होणार नाहीत असे या निकालावरून दिसत आहे.