डाव्या कुशीला झोपू की उजव्या?, आत्ता कूस बदलली तर कोरोना जाईल शरीरातून. किंवा नकोच, आत्ता वळता येत नाहिये. जितकी अगम्य ही वाक्य आहेत, तितकेच अगम्य हे विचार आहेत. तितकीच अस्वस्थ झोपही होती. कारण कूस बदलली, शरीरातून कोरोना बाहेर गेला आणि झोपेतून खाडकन जाग आली.


संध्याकाळचे 6 वाजले असतील.. म्हणजे 20 मिनिटांची झोप घ्यायच्या नादात जगभराचं ओझं घेऊन जाग आली. आता ही परिस्थिती काही फक्त माझी नाही. माझ्या मते कोरोना संबंधित काम करणार्‍या, त्याच्या बातम्या देणार्‍या, त्यातून जाणार्‍या आणि हताश होऊन त्याकडे बघणार्‍या प्रत्येकाची ही स्थिती झालेली आहे. कोणीतरी सातासमुद्रापार एकटं, एका खोलीत चौकटीत बसून तुम्हाला बघत असतं, वाट पहात असतं, किंवा तुम्ही तरी चौकट आखून घेतलेली असते. आनंद नाडकर्णी फार छान म्हणाले, "आपल्याला चौकटही बोचणारी नकोय, पण प्रवाही आयुष्य पण पाहिजे". तर हे वाक्य आत्ता कोरोना काळात तुम्हा आम्हाला फार संबंधीत आहे.

एका देशात पसरणारा एक विषाणू ते, "तुला पण झालाय का गं?" , असं चिंतेने आपल्याच शेजाऱ्याला विचारायची वेळ येईपर्यंतचा काळ फक्त काही दिवसांचा होता. आपण आपल्या माजात, मस्तीमध्ये असतो. समोरचा आपल्याहून शहाणा नाही, अशा विचारांनी superiority race मध्ये धावत असतो. मुंबई, पुण्यासारख्या शहरात गावातून येऊन आपलं जग, अस्तित्व, इमेज तयार करण्यामागे धावत असतो. मोठ्या वाड्यात जोरजोरात पळताना अचानक उंबरठा यावा आणि जोरात तोंडावर पडावं, असं काहीसं कोरोनानी आपलं केलं आहे. वेगात धावणार्‍या आपल्याला कोणीतरी पायरीच दाखवली.

पण आता प्रश्न आहे, कधीना कधी तर हे पचवावं लागेल, की वाडा आपला असूनही अडनिड्या ठिकाणी उंबरठा आपणच बांधला होता. कधी ना कधी हे पहावं लागेल, की असा उंबरठा कसा काढता येईल? उंबरठा काढून टाकायचा तर आपल्याला मदत घ्यावी लागेल, एकमेकांना करावी लागेल. उंबरठा काढल्यानंतर दिसणारी खरडलेली जमीन पुन्हा छान दिसण्यासाठी संयम ठेऊन वाट पहावी लागेल. थेट वेगात पायरीच दिसल्यामुळे आपण खरंतर क्षुल्लकच आहोत ही जाणीव व्हायला लागेल. तर आपल्या आयुष्यातून काहीतरी कायमचंच बदललं जाण्याचा हा काळ आहे. एकोणीशे कितीतरी साली जन्मलेल्या आपल्याला आता आपला भूतकाळ सांगताना 2 टप्प्यात सांगायला लावणारा हा काळ आहे. म्हणजे 1991 पासून आत्तापर्यंतची मी, आणि 2020 पासून पुढची मी, इतका माझ्यामध्ये बदल करणारा हा काळ आहे..

आपण ज्या profession मध्ये आहोत, त्या सगळ्याच क्षेत्राला आतून बाहेरून बदलणारा क्रांतिकारी काळ वाटतो हा मला.. म्हणजे आत्ता जन्मलेली मूलं पुढच्या 20 वर्षांनी या स्थित्यंतरामुळे अधिक माणुसकी शिकलेली असतील अशी आशा आपण करुयात का? दुसर्‍या महायुद्धानंतर झालेल्या जखमा पुसत जर्मन नागरिकांनी जसं हिटलरचं नाव घेणं सोडलं, किंवा हिरोशिमा नागासाकीच्या विध्वंसाच्या खुणा पिढ्यानपिढ्या दिसल्या, तसं कोरोनानंतर एकमेकांबद्दल काळजीपोटी वाटू लागलेली ओढ, आस्था अशीच पिढ्यानपिढ्या पुढे जाईल का..? ही फक्त स्वतःला उंबरठ्यातून वाचवायची धडपड नाहीये, लढाई तर त्याहून नाहीये. कारण लढाई म्हणलं की दोन्ही बाजूंनी सत्तेसाठी भांडण आहे. लढाई म्हणलं की पुन्हा superior race आहे. त्यामुळे ही लढाई नाही. लोकांना जागं करायला हे शब्द ठीक आहेत. ही फक्त जीवतोड धडपड आहे. स्वतःला वाचवायची. नाक बंद केल्यावर श्रेष्ठता मिळवण्यासाठी मरमर नसते, आधी फक्त श्वास शरीरात जावा त्यासाठी झालेली हालचाल असते.

गावच्या गाव मारतात, हजारो माणसं मारतात तेव्हा त्रास होतोय ना? मग राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम या संकल्पनांचे अर्थ पुन्हा शोधूया. देशांच्या सीमाही जिथे फिक्या पडतील अशी आखली गेलेली ही गडद रेष खोडायला वेळ लागेल. पण निसर्गाने आपल्याला आपली जागा दाखवून दिल्यानंतर पुन्हा नव्या विचारांनी, बुरसटलेल्या जाणीवा बाजूला सारून उठता आलं तरी कोरोना खूप काही देऊन गेला असं वाटेल.