Blog : गुरुचे पूजन ही भारतीय परंपरा आहे. ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचा मान भारतीय संस्कृतीने गुरूला दिला आहे. ज्ञान देणाऱ्या गुरूला देऊ शकतो असा दृष्टांत तिन्ही लोकांत नाही. 'गुरु हा संत कुळीचा राजा' या विषयावर व्यक्त होताना, संत कोणाला म्हणावे? संतांचे कार्य , संत कुळालाही गुरुची आवश्यकता का भासते? याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
जो जाणेल भगवंत l
तया नाव बोलिजे संत ll
ज्याने भगवंताला जाणले त्याला संत म्हणावे. संतांनी तर संपूर्ण चराचरात भगवंत पाहिला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे माणुसकी हाच मुख्य धर्म मानणाऱ्या संतांनी माणूस म्हणून जगताना जात-पात, पंथ, धर्म वगैरे पेक्षाही माणुसकीची जोपासना करण्याचे आवाहन केले. संतांनी महाराष्ट्रात विखुरलेल्या मराठी माणसाला भक्तीच्या धाग्याने एकत्र बांधले. स्वाभिमान अस्मिता गमावून बसलेल्या आणि आपल्याच प्रदेशात गुलामाचे जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाच्या मनात स्वतेजाचे, स्वराज्याचे स्फुल्लिंग संतांनी फुलवले.
महाराष्ट्राचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे संतपंचक म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम आणि समर्थ रामदास. वारकरी संप्रदायाचा वैचारिक पाया संत ज्ञानेश्वरांनी तयार केला. नामदेव, एकनाथ यांनी त्यात भर घातली. आणि यावर कामगिरीचा कळस संत तुकारामांनी चढवला.समाजाला एक विचार देणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या कालखंडाविषयी आणि कार्याविषयी संत बहिणाबाईंचा हा अभंग महत्त्वाचा ठरतो,
संत कृपा झाली, इमारत फळा आली l
ज्ञानदेवे रचिला पाया,उभारले देवालया l
नामा त्याचा किंकर, तेने केला हा विस्तार l
जनार्दन एकनाथ ध्वज उभारिला भागवत l
भजन करा सावकाश, तुका झालासे कळस ll
समर्थ रामदास हे वारकरी संप्रदायाचे संत नाहीत. त्यांनी वारकरी संप्रदायाहून फारशा वेगळ्या नसणाऱ्या समर्थ संप्रदायाचा मोठा प्रचार आणि प्रसार केला. इतर संत आणि रामदास यांच्यात फारसा फरक नसला तरी त्यांच्या विचारांच्या मांडणीत फरक होता. ध्येय एक असले तरी मार्ग वेगळे होते
मराठा तितुका मेळवावा l
महाराष्ट्र धर्म वाढवावा ll
हा संदेश त्यांनी दिला. बलोपासना, सामर्थ्य, शक्ती याला समर्थ रामदासांनी महत्व दिले.
तर भक्ती हा संतकार्याचा गाभा. त्याचबरोबर लोकप्रबोधन करणे हा उद्देश आहे. महाराष्ट्राचे पंचप्राण म्हणून ओळखले जाणारे सर्व संत हे कवी होते. बंडखोर कवी होते. संतांची बंडखोरी मुठभर मंडळींच्या पचनी पडणारी नव्हती. तरी संतांनी नवनवीन विचार मांडले. अनेक छळवाद झाले पण संत डगमगले नाहीत. संत महामानव होते म्हणूनच त्यांनी स्वतःबरोबरच इतरांनाही 'माणूस' बनवण्याचा प्रयत्न केला. या समाज कळवळ्यापोटी संतांनी समाज प्रबोधनासाठी लोकमाध्यमे निवडली. अभंग, पोवाडे, भारुडे , लोकगीते अशा माध्यमातून समाजमन घडवू लागले.
एकनाथांच्या एका भारुडाचे इथे उदाहरण देऊ इच्छिते, एका भारुडात ते म्हणतात,
विंचू चावला वृश्चिक चावला l काम क्रोध विंचू चावला l
तम घाम अंगाशी आला ll
या प्रकारचा विंचू चावला तर तो उतरायचा कसा याच्या उपायाबाबत ते म्हणतात, या विंचवाला उतारा l
तमोगुण मागे सारा l
सत्वगुण लावा अंगारा l
विंचू इंगळी उतरे झरझरा ll
या भाषेत सांगितले तर सर्वसामान्य माणसाला पटकन कळत होते आणि संतांचा हेतू साध्य होत होता. लोकरंजनातून लोकशिक्षण करणाऱ्या या संतांना लोकशिक्षक मानले पाहिजे. आजच्या अनेक सामाजिक दुखण्यांवर 'संत साहित्य' हे उपयुक्त औषध आहे.
या संतांनी गुरुचे महत्व मान्य केले आहे. आणि म्हणूनच 'गुरु' का असावा हे सांगताना ते म्हणतात,
वाचता ही आध्यात्म l
जाणता ही अर्थ l
गुरुविण व्यर्थ l सर्वकाही ll
गुरुमंत्र घेतल्याशिवाय संत होता येत नाही. याची जाणीव एका संत मेळाव्यात भक्तश्रेष्ठ नामदेवाला करून देण्यात आली. याची कथा अशी सांगितली जाते, आळंदीला जमलेल्या एका संत मेळाव्यात भक्तश्रेष्ठ नामदेव 'निगुरा' म्हणजे गुरुहीन असल्याने कच्चा ठरला. या घटनेने नामदेव अत्यंत खिन्न झाले. त्यांना योग्य मार्गदर्शन करून विसोबा खेचराकडे जायला सांगितलं. विसोबा नागनाथाच्या मंदिरात आहे असे समजल्यावर नामदेव तिथे गेले. तर विसोबांनी शिवलिंगावर पादत्राणांसह पाय ठेवले होते. नामदेवांना ते खटकले त्यांनी विसोबाला हटकले. यावर विठोबा म्हणाले मी आता वयाने थकलो आहे. मला माझे पाय उचलत नाहीत, तेव्हा तूच माझे पाय उचल आणि जिथे शिव नाही तिथे ठेव. नामदेव विसोबाचे पाय उचलून अन्यत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना सर्वत्र शिवलिंग दिसू लागते. विसोबा खेचराच्या भेटीत नामदेवाच्या भक्तीला ज्ञानाचे डोळे प्राप्त झाले आणि सगुण साकाराच्या अतीत जाऊन परमेश्वराचे सर्वव्यापक स्वरूप अनुभवू शकला हे मात्र खरे.
संत ज्ञानेश्वरांनी गुरुचे महात्म्य वर्णन करताना म्हटले आहे,
गुरु हा सुखाचा सागर l
गुरु हा प्रेमाचा आगर l
गुरु हा धैर्याचा डोंगरु l
कधी काळी डळमळेना ll
गुरु या शब्दाचा अर्थ 'भारी पडणे' असा होतो. अर्थात जो आपल्या ज्ञानाने, कर्माने इतरांवर भारी पडतो, ज्ञान प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जो पार पाडतो, अशा समर्थ विभूतीला गुरु म्हटले आहे. हा गुरु प्रेमाचे आगार तर असावाच पण संकटकाळात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा धैर्याचा पहाड असावा. जो कुठल्याच परिस्थितीत डळमळत नाही.
जे का रंजले गांजले l
त्यासी म्हणे जो आपले l
तोचि साधू ओळखावा l
देव तेथेची जाणावा ll
अशी संतांची ओळख तुकारामांनी सांगितले आहे. आणि प्रत्यक्ष देवाचा दर्जा त्यांना दिला आहे. अशा संतांनाही गुरु शिवाय तरणोपाय नाही आणि म्हणूनच म्हटले आहे,
गुरु हा संत कुळीचा राजा l
गुरु हा प्राण विसावा माझा l गुरुविण देव दुजा l
पाहता नाही तिन्ही लोकी ll