गुढी चैतन्याची... गुढी समृद्धीची... गुढी  चैत्र पाडव्याची... यंदाही मोठ्या उत्साहात हा गुढीपाडव्याचा दिवस साजरा झाला. त्यातही गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये जागोजागी निघणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रांनी वातावरण भारलेलं असतं. काळानुरुप तरुणाईचा वाढता प्रतिसाद, त्यात त्यांच्या आवडीनुरुप सेल्फी, रील्स, फोटोंच्या स्पर्धांची त्यात झालेली एन्ट्री याने यात्रेला वेगळं वलय प्राप्त झालंय. गिरगावसारख्या चाळसंस्कृती, सणसंस्कृती जपणाऱ्या भागात आता अनेक टोलेजंग टॉवररुपी घरांच्या गुढ्या उभारल्या जातायत. अनेक ठिकाणी उभारल्या गेल्यात. त्याच वेळी गिरगाव आणि परिसरातली अनेक मंडळी जी काही कारणास्तव गिरगावातून उपनगरात वास्तव्याला गेलीत. तरीही ती मनाने गिरगावशी असलेली नाळ घट्ट जोडून आहेत. कोणत्याही सणाचा दिवस असो, ही मंडळी आवर्जून गिरगावात येतात ते इथल्या सणांचं सेलिब्रेशन भरभरुन जगायला. गणेशोत्सवासह विविध सण दिमाखात साजरे होणाऱ्या कुडाळदेशकर निवासात राहणारे प्रदीप देसाई हे असेच कट्टर गिरगावकर. पंचाहात्तरीजवळ पोहोचलेले रीटायर्ड बँकर. निवृत्तीनंतर कला संस्कृती जोपासण्यासाठी कायम तत्पर. विविध कलाकार किंवा गाण्यांच्या संकल्पनेवर आधारित ऑक्रेस्ट्राचं निवेदन, गायन दोन्हीत उत्साहाने आघाडीवर. प्रचंड वाचन, विविध क्षेत्रातील लोकांशी दांडगा संपर्क. माहिती संकलन करत राहणं, ही ऊर्जा त्यांनी सत्तरी पारही जपलीय आणि जोपासलीय. मंगळवारी सकाळी गुढीपाडवा स्वागत यात्रेत फेरफटका मारताना ते भेटले. मग, संध्याकाळी कुडाळदेशकर वाडीत माझी आणि त्यांची चाळीच्या गॅलरीतून जाता जाता पुन्हा भेट झाली. तेव्हा ते घरी आले आणि आठवणींचा पटच त्यांनी उलगडला. त्यांना भेटायला त्यांचे 76 वर्षांचे परांजपे नावाचे गिरगावकर मित्र आले होते. तेही मग घरी आले, आणि आईबाबांसोबत या दोघांनीही गप्पांचा फड रंगवला. या पाडव्याच्या यात्रेत पूर्वी मी आपल्या कुडाळदेशकर वाडीतील बाप्पाची मूर्ती घेऊन जात असे, उत्सवप्रेमी देसाई काकांनी आठवणींचा श्रीगणेशा केला.  त्यांच्याकडे कला क्षेत्रातील असंख्य किश्श्यांची खाण आहे. पुलं, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडेंच्या किश्श्यांपासून ते संगीतप्रेमी मिठाईवाल्यांच्या आठवणीपर्यंत.


देसाई काकांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, त्यावेळी भारतमाता थिएटरजवळ फणसे यांचं मिठाईचं दुकान होतं. ते संगीताचे सच्चे रसिक होते. त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात साधारण 30 ते 35 लोक बसण्याएवढी जागा होती. त्यांच्या घरी कुमार गंधर्वांसारखे ज्येष्ठ गायक गायला येत असत. अशा मैफलींच्या वेळी घर संगीतचाहत्यांनी भरलेलं असे. मीही तेव्हा गॅलरीत उभं राहून त्यांचं गाणं ऐकलंय. त्या मैफलीला येणाऱ्याला फणसे मिठाईचा बॉक्स भेट म्हणून देत असत. संगीताचं माधुर्य सांगताना माणसांमधल्या गोडव्याची प्रचीती देणारंच हे उदाहरण. ज्येष्ठ कलावंत भालचंद्र पेंढारकर यांच्या वक्तशीरपणाचीही एक आठवण यावेळी निघाली. वेळेबाबतीत अण्णा पेंढारकर अत्यंत काटेकोर.


कार्यक्रम सुरु करण्यासाठी ते कोणासाठीही थांबत नसत. ठरल्या वेळी म्हणजे ठरल्या वेळीच हाच त्यांचा नियम होता.


गिरगावात एका ठिकाणी राज कपूर यांचं काही काळ वास्तव्य असल्याची आठवण देखील बोलण्याच्या ओघात निघाली.


कलाकारांच्या आठवणींसोबत सणांबद्दल बोलताना हल्लीच्या लग्नसोहळ्यांचा विषयही निघाला. तेव्हा प्री-वेडिंग, संगीत, मेहंदी, लग्न असं लग्नाचं सध्याचं वाढत जाणारं सेलिब्रेशनचं स्वरुप यावरही संवाद झाला. उत्तरेतून आलेली ही परंपरा आपल्या मराठी लग्नांमध्येही दिवसेंदिवस वाढत चाललीय, यावरही या ज्येष्ठांमध्ये गप्पा झाल्या. मंगलाष्टकांचा संदर्भ निघाला तेव्हा बाबूजी अर्थात सुधीर फडकेंच्या लग्नात मोहम्मद रफींनी मंगलाष्टक गायल्याची आठवण साहजिकच समोर आली. तर, आताच्या काळात वैभव मंडलिक नावाच्या कलाकाराचा मंगलाष्टकांचा खास कार्यक्रम आहे, अशी एक इंटरेस्टिंग माहिती देसाई काकांकडून मला कळली.  तबला, पेटी कलाकारांसोबत ते मंगलाष्टकांचा संगीतमय कार्यक्रम सादर करतात असं सांगत तात्काळ देसाई काकांनी त्यांच्या कार्यक्रमाची एक यू-ट्यूब लिंक शेअर केली. गप्पांच्या मध्ये आजूबाजूच्या मराठी शाळांबद्दलही बोलणं झालं. आर्यन शाळेचे माजी विद्यार्थी सी.डी.देशमुख यांच्याबद्दल एक आठवण कळली. त्यावेळी एका मुद्यावरुन देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरुंकडे आपला राजीनामा सोपवला होता. केंद्रीय मंत्री, रिझर्व्ह बँक माजी गव्हर्नर अशी मोठी पदं देशमुख यांनी भूषवलीत. इतकी जाणकार आणि तज्ज्ञ व्यक्ती असलेले देशमुख हे आमच्या आर्यन शाळेचे माजी विद्यार्थी, हाही संदर्भ त्यावेळी चर्चेत आला.


या गप्पांमध्ये तास-दीड तास कसा गेला ते कळलंच नाही. दिवस सणाचाच होता, त्यामुळे ही सत्तरी पार चार ज्येष्ठ मंडळी आठवणरुपी काही खास क्षणांची जणू रांगोळी घालत होती, एकमेकांच्या किश्श्यात, आठवणीत आपल्या पोतडीतल्या माहितीचे रंग ही मंडळी भरत होती.  


गप्पांची सांगता करताना पाडव्याच्या दिवशी महत्त्व असलेल्या कडुलिंबाच्या पाल्याची आईची स्पेशल रेसिपी असलेली चटणी देसाई काकांसह मीही चाखली. चव कडू असली तरी त्या काळातले खास क्षण रीवाईंड झाल्याने तीही गोड वाटत होती.


लँडलाईन ते मोबाईल, टाईपरायटर ते कम्प्युटर, पत्र ते ई-मेल असा बदलणाऱ्या समाजजीवनाचा प्रवास करणारी आणि ते बदल जवळून पाहणारी आई-बाबा, देसाई काका, परांजपे काकांची ही अनुभवसंपन्न पिढी कोणत्याही अपेक्षेविना आठवणींच्या मोहरा भरभरुन उधळत होती. आमच्या पिढीने आमच्या झोळीत त्या मोहरा कशा सामावून घ्यायच्या हे आमचं आम्ही ठरवायचं. माझ्या परीने मी या मोहरा शब्दरुपाने जपण्याचा प्रयत्न केला.


त्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्वागत यात्रेमध्ये साहसी खेळ, लोककला, सामाजिक संदेशाचे चित्ररथ आदींचं दर्शन घडलं. तर, संध्याकाळच्या या आठवणींच्या यात्रेत मला संगीत, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक अशा क्षेत्रांमधील व्यक्तींच्या भावभावनांचे, किश्श्यांचे पदर उलगडले गेले. देसाई काका आणि त्यांचे मित्र तास-दीड तासाने घरातून निघाले. मीही आईबाबांकडून निघालो. तो दिवस सरला, बुधवारचा दिवस उजाडला, दुपारच्या सुमारास आईबाबांकडे पुन्हा गेलो, सूर्य पूर्ण क्षमतेने तळपत होता, त्याच वेळी आदल्या दिवशीची प्रत्येक आठवण मनाच्या आकाशात लख्खपणे चकाकत होती.


चैत्र पाडव्याच्या दिवशी उभारलेल्या गुढ्या एव्हाना सगळीकडेच आवरुन सावरुन ठेवण्यात आल्या होत्या. पण, माझ्या मनात या ज्येष्ठ मंडळींनी उभारलेली आठवणींची गुढी अजूनही फडकत राहिलीय.