पारंपरिक पोशाखात सजून धजून निघणं, मर्दानी खेळ, काही सामाजिक आशयांचे चित्ररथ, उत्साहाने फसफसलेली तरुणाई.  रांगोळ्यांच्या रंगांपेक्षा वैविध्यपूर्ण रंगाचे पोशाख करुन निघालेली युवा पिढी. त्यासोबतच ज्येष्ठांचीही वर्दळ. गणपती बाप्पांचं स्मरण. गेल्या काही वर्षातलं खास करुन मुंबईतल्या गिरगाव, डोंबिवलीसारख्या अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रेत हमखास दिसणारं हे दृश्य. अपवाद 2020 आणि आता 2021. दोन्हीसाठी कारण एकच. कोरोना.


कोरोनाच्या जीवघेण्या साखळीने गुढीपाडवा साजरी करण्याची मालिका खंडित केली. सलग दुसरं वर्ष गुढीपाडवा शांततेत साजरा करावा लागतोय. घरोघरी गुढी पूजन मग ते प्रत्यक्ष किंवा प्रतिकात्मक करु, त्यावेळी संकल्प करुया.


आरोग्याची गुढी उभारण्याचा, मानवतेची गुढी उभारण्याचा.


या दोन्ही वाक्यांचा अर्थ जरा नीट समजून घेऊया. आरोग्याची गुढी म्हणजे सर्वांच्या आरोग्यासाठी. ती फक्त एकटा-दुकटा नाही उभारु शकत. याचा सरळ अर्थ असा की, सध्याच्या कोरोना काळातील नियमांचं पालन एकट्या-दुकट्याने करुन चालणार नाही. मी मास्क लावेन, पण, समोरचे चार जण लावणार नसतील आणि त्यामुळे जर संसर्ग वाढून माझ्यासह इतरांना त्रास झाला तर, त्याची जबाबदारी कोणाची?


म्हणून मी इतरांच्या आरोग्यासाठीही जबाबदारी वागेन, मास्क लावेन, गर्दी टाळेन आणि सतत हात धूत राहिन ही त्रिसूत्री पाळण्याचं वचन स्वत:च स्वत:ला देऊया आणि तसं वागूया. हा थॉट अनेकांना खूप बेसिक वाटेल. पण, काही बेसिक गोष्टींमध्येच सध्या घोळ होतोय आणि कोरोना वाढतोय.


जसं देश पातळीवर किंवा राज्य पातळीवर आरोग्य खात्याचं महत्त्व अधोरेखित झालं, तसं कौटुंबिक पातळीवरही आरोग्याच्या खर्चासाठी आपण काही तरतूद केलीय का? या प्रश्नाचं उत्तर चाचपून पाहावं लागेल. तेव्हा ही तरतूद केली नसेल तर ती यापुढे करावी लागेल. आपापल्या ऐपतीप्रमाणे.


दुसरी गुढी आपण उभारु शकतो ती मानवतेची, समाजभानाची. येणाऱ्या काळामधले आपल्या आयुष्यातले महोत्सवी क्षण आपण साधेपणाने साजरे केले तर.. म्हणजे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस असे सोहळे, साधेपणाने करुन तो खर्च जर सामाजिक उपक्रमाकडे वळवला तर.


आपल्या आजूबाजूला असे अनेक जण पाहायला मिळतील, ज्यांनी सकाळी काम केलं तर त्यांच्या घरी संध्याकाळी चूल पेटते. त्यांची या कोरोना काळाने दैना केलीय.


कोरोनाच्या संकटाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, त्यात या महिन्यात कोरोना पुन्हा वाढल्याने आणखी काही जण नोकरी- व्यवसायाच्या बाबतीत धास्तावलेल्या मनोवस्थेत आहेत. अशा वेळी जर आपण फक्त आपल्या आनंदाचा विचार न करता दुसऱ्याच्या वेदनेचा केला तर.. म्हणजे आनंद जसा दुसऱ्याला दिल्याने वाढतो, तसं दुसऱ्याची वेदना, दु:ख आपण वाटून घेतल्याने ते पूर्ण जाणार नाही कदाचित, पण त्यांचा भार तरी थोडा हलका तरी होईल.


त्यामुळे आपल्या आयुष्यातील या उत्सवी क्षणांच्या दिवशी रक्तदान करणं, किंवा आपल्या आर्थिक कुवतीनुसार, एखादी रक्कम ठरवून त्या रकमेतून एखाद्या गरजूला आपल्या परीने मदत करणं, असे उपक्रम करुया का? इतकं तर आपण नक्की करु शकतो. इथे रक्कम मॅटर नाही करत, आपला हेतू फार महत्त्वाचा आहे. दुसऱ्याच्या होरपळीची धग आपल्या मनाला जाणवलीय, तसंच ज्यांचे आप्तजन, मित्र जीवाला मुकलेत. त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीचं भान आपल्याला आहे, हे दाखवण्याची ही वेळ आहे.


आपल्या संयमाचा, समाजभानाचा दिवा अनेकांची आयुष्य प्रकाशमान करु शकेल. याआधीही, मग कधी 25 जुलैचा पाऊस असेल किंवा अन्य आपत्ती. आपण, एकमेकांच्या साथीनेच उभं राहिलोय. माणुसकीचं दर्शन घडवत आलोय. तोच मानवतेचा दीप आपल्यात अजूनही तेवतोय, हे आता दाखवूया. एव्हाना काहींनी ते घडवलंय देखील.


सध्याचा काळ सगळ्यांच्याच दृष्टीने कसोटीचा आहे. कोरोनाने आपली शारीरिक, मानसिक घुसळण केलीय. आपलं आयुष्यच  ढवळून निघालंय.


तुमच्यासमोर हे मांडताना माझाही खारीचा वाटा मी उचलेन, हा विचार माझ्याही मनात आहे. असा विचार माझ्यासकट आपण सर्वच करुया. कोरोनाच्या अंध:कारातून बाहेर येताना सकारात्मकतेचा उजेड सगळीकडे पसरवूया. सण साजरे करण्यासोबतच आता जबाबदार, संवेदनशील माणूस असणं, माणूसपण साजरं करुया.


सर्वांना गुढीपाडव्याच्या, नववर्षाच्या आरोग्यदायी शुभेच्छा.


अश्विन बापट