नदी वाहते. तो तिचा स्वभाव आहे. उगमापासून ते संगमापर्यंत तिचा प्रवास सुरुच असतो. यात कुठे तरी तिची गती शांत होते. लोकांना वाटतं ती थांबली, साचली, बुरसटली, शेवाळली, मग मागून एक मोठा प्रवाह येतो आणि सर्व साचलंपण पुढे घेऊन जातो. कधी कधी या प्रवाहाचं रौध्ररुप पाहायला मिळतं. तो तळाशी साचलेल्या गाळमातीसोबतच काठावर आसपास दिसेल त्याला आपल्यात खेचतो. नदीला आलेला पूर समुद्रातल्या त्सुनामीपेक्षा भयंकर असतो. वाटेत जे काही मिळेल त्याला घेऊन ती पुढे सरकते. हा तिच्या प्रवाहीपणाचाच एक भाग आहे. मग अश्यावेळी एक प्रश्न उभा राहतो जर नदीच्या उगमाशी एखादं फुल सोडलं तर ते संगमापर्यंत पोचेल का? 


जगभरातली सर्व मानवी वस्ती नदी किनारीच वसली.  एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती पुढे सरकली. त्याला संस्कृती असं नाव देण्यात आलं. परंपरा तयार झाली, त्यात पिढी दर पिढी बदल झाला, जुनं मागं पडलं नवीन घडत गेलं, नदी तीच राहिली.काठावरची माणसं बदलत राहिली. एका पिढीकडून दुसरी पिढीकडे हा प्रवास सुरु झाला.  उगमाच्या ठिकाणी टाकलेलं फुल संगमापर्यंत पोचेल का हा प्रश्न जसा आहे त्याचप्रमाणे एका पिढी कडून सुरु झालेली परंपरा दुसऱ्या पिढीकडे तशीच जाईल का? हा प्रश्न ही तेव्हढाच महत्त्वाचा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न दिग्दर्शक निखिल महाजननं आपल्या गोदावरी 2021 या सिनेमातून केलाय. व्हँक्युआर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसहित इतर फिल्म फेस्टिवल गाजवल्यानंतर आता इफ्फी 2021च्या इंडियन पॅनारोमात गोदावरीची वर्णी लागलेय. 


गोदावरीचा काठ आणि इथले घाट मृत्यूनंतरच्या विधीशी जोडले गेलेत. इथं पिंडदाना सोबतच अस्थिविसर्जनाचे कर्मकांड होत असतात. केस कापले जातात, पिंडं ठेवले जातात. आपल्या माणसांच्या नावाने असंख्य दिवे द्रोणातून प्रवाहात सोडले जातात. ही प्रक्रिया जितकी आध्यात्मिक त्यापेक्षा जास्त मानसिक आहे. कारण इथं जुन्याच्या अस्तित्वाला मार्गी लावण्याचा भाव आहे. अध्यात्म ही नैसर्गिक भावना नाही तर ते परंपरेच्या जोखडातून तयार झालेलं भावविश्व आहे. हे असं असताना निसर्गाला साक्षी मानून आधुनिकतेची कास धरण्याची वृत्ती अगदी अनादी अनंत काळापासूनची आहे. याची प्रचिती गोदावरी पाहताना येते. 


नदीच्या काठावरचे मानवी संबंध मग ते कौटुंबिक असोत किंवा भवतालातले, गोदावरीच्या काठावर मृत्यू हा संवादाचा माध्यम आहे. मृत्यू जेव्हा संवादमाध्यम होतो तेव्हा त्याआधी त्याचा मार्ग हा सहजच आलेल्या एंग्झायटी अर्थात चिंता, भिती किंवा मग कळकळ या भावनेतून सुरु होतो. हा संवाद करणारा अस्वस्थ मानसिकतेतून जात असतो. तो भवतालात आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतो. जिथं तो स्व:तालाच मिसफिट मानायला लोगतो. जरी भिती किंवा चिंतेतून ही प्रक्रिया सुरु झाली असली तरी ती पूर्णत्वाकडे नेणारी आहे आणि हा प्रवास नदीच्या प्रवाहासारखाच निरंतर आणि निखळ आहे हे गोदावरीतून जाणवतं. 


नदी किनारी लोक वसले, वस्ती झाली, वाढली, एकाचे दोन, दोनाचे तीन, तीनाचे चार अशी वस्तीतली घरं वाढत गेली. त्या घरांमध्ये वाढत जाणारी कुटुंब ही अनेकदा विभक्त झाली. जी कुटुंब कित्येक वर्षे एकत्र राहिली ती परिपूर्ण आहेत का ? याचं उत्तर सर्वच पातळीवर होय असं देता येणार नाही. कारण कुटुंब एकत्र असली तरी तिथं अनेकदा संवाद असेलच असं नाही. त्यात विसंवादही असू शकतो. त्यातून होणारे कलह न टाळता येणारे असतात. मग एका क्षणाला असं काही घडतं की आधी कधीतरी थांबलेली संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरु होते. गोदावरी सिनेमातल्या देशमुख कुटुंबाच्या बाबतीत असंच घडतं. 


सिनेमाचा नायक निशिकांत असा का आहे? हे जाणून घेण्यासाठी कुटुंबाची इको सिस्टम, किंवा भवतालाकडे त्रयस्त नजरेनं पाहण्याची गरज असते. तो दृष्टीकोन सिनेमातलं कासव हे पात्र देतं. कासव या सर्व परिस्थितीकडे अलीप्त भावनेतून पाहतोय. तो कुटुंबाचा भाग नाही पण गोदावरी नदी आणि तिच्या भवतालचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळं संपूर्ण स्थितीला बर्ड आय व्ह्यू देण्याचं काम कासव हे पात्र करतं. अलिप्त राहणाऱ्या किंवा एकमेकांपासून पलायन करणाऱ्या इथल्या लोकांना एकत्र आणून नदीकडे एक कुटुंब म्हणून पाहण्याचा मार्ग कासव सुकर करुन देतो. इथून नदी सर्वांना दिसेल अशी सोय तो करतो. 


गोदावरी सिनेमाचं कथानक नदीच्या स्वभावाप्रमाणेच  कधी अथांग शांत तर कधी खळाळणारं आणि कधी कधी साचलेलं आहे. त्याला प्रवाही बनवण्यासाठी निखिल महाजननं जो तत्वज्ञानाचा आधार घेतलाय आणि ज्या पध्दतीनं तो सहज आणि सोपा करुन सांगितलाय हे फारच कौतुकास्पद आहे. 


इफ्फी पाठोपाठ सिनेमाच्या रिलिजची प्रक्रिया सुरु झालीय. गोदावरी लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येकानं त्यात डुंबायला हरकत नाही.


हे लेख देखील वाचा-


BLOG : सर्व काही सिनेमाच आहे.....


 BLOG : 'ॲनेट (2021)' - एका अनायकाचा सिनेमा...'