ICC World Cup 2023, AUS vs AFG: मुंबईतल्या प्रदूषित हवेचा (Mumbai Air Pollution) प्रश्न सध्या चर्चेत आलाय. मंगळवारी मात्र वानखेडे स्टेडियमसह (Wankhede Stadium) अवघ्या क्रिकेटविश्वात मॅक्सवेल (Glenn Maxwell) नामक वादळाची हवाच पाहायला मिळाली. ज्या हवेमध्ये अफगाणिस्तानी गोलंदाजांचा (Afghanistan Bowlers) धुरळा उडाला.


अफगाणिस्तानचा संघ तुलनेने नवखा असला तरी ऑसी टीमचा त्यांनी चांगलाच घामटा काढलेला. विश्वचषकातील या मॅचमध्ये 292 चा पाठलाग करताना कांगारु सात बाद 91 अशा गटांगळ्या खात होते. आणखी एक विकेट गेली की, त्यांचं जहाज बुडणार असं वाटत होतं. अफगाणिस्तानच्या वेगवान तसंच फिरकी गोलंदाजीने ऑसी टीम नामोहरम झाली होती. आघाडीची तसंच मधली फळी कोसळल्याने ही ऑसी फलंदाजी मृत्यूशय्येवर होती. आणखी एक विकेट गेल्यावर पराभवाची चिता पेटणार असं वाटत होतं. त्याच वेळी मॅक्सवेलच्या बॅटिंगने जिद्दीची वात पेटवली. ज्यात कमिन्सने संयमाचं, विश्वासाचं इंधन घातलं आणि पाहता पाहता या वातीने रौद्र ज्वाळेचं रुप धारण करत अख्ख्या अफगाणी गोलंदाजीला वेढा घातला. पराभवाच्या गर्तेत हेलकावे खाणाऱ्या ऑसी टीमला मॅक्सवेलने केवळ बाहेरच काढलं नाही, विजयाचा किनारा गाठत झेंडाही फडकवला. अफगाणिस्तानने याआधीच इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका संघांना धक्के दिले होते. आता आणखी एक झटका ते देणार असं वाटत असतानाच मॅक्सवेल एक अविश्वसनीय खेळी खेळून गेला. अर्थात त्याला सुटलेल्या कॅचेसची लाईफलाईन मिळाली होती. त्याचा फायदा उठवत त्याने पराभवाच्या जबड्यातून मॅच खेचून आणली. 


128 चेंडूंत नाबाद 201, 21 चौकार, 10 षटकार ही आकडेवारी स्तब्ध करुन टाकणारी आहे. वानखेडेचा असा कोणताही कोपरा त्याने शिल्लक ठेवला नाही की, जिथे त्याचा फटका पोहोचला नसेल. एका पायावर उभं राहत फ्लिक काय, रिव्हर्स बॅटने थर्डमॅनला मारलेली सिक्स काय, मॅक्सवेल दिवाळीआधीच फटक्यांची दिवाळी साजरी करत होता आणि वानखेडेचा कानाकोपरा त्याच्या फटक्यांच्या दिवाळीने उजळून निघत होता. मुंबईतल्या प्रदूषणामुळे सायंकाळी सात ते दहा हीच वेळ मोठ्या फटाक्यांच्या आतषबाजीसाठी देण्यात आलीय. मॅक्सवेलनेही हा नियम पाळला. याच वेळेत आतषबाजी केली आणि दहा, साडेदहाच्या सुमारास फटके थांबवले, मॅचही संपवली. दिवाळीनिमित्ताने वानखेडेच्या हिरवळीवर जणू त्याने फटक्यांची रांगोळीच घातली आणि अफगाणिस्तानच्या विजयाच्या मनसुब्यांची राख झाली.


या खेळीदरम्यान त्याला क्रॅम्प्सनी सतावलं. इनिंगच्या पुढच्या टप्प्यात धड धावताही येत नव्हतं. धावता धावता रन पूर्ण करुन एकदा तर त्याने चक्क जमिनीवर लोटांगण घातलं. पण, ते काही क्षणापुरतं. नंतर त्याच्या झंझावातापुढे अफगाणी गोलंदाजांना लोटांगण घालावं लागलं. पहिल्या काही चेंडूंनंतर त्याच्या बॅटची कुऱ्हाड झाली होती. ज्याने तो अफगाणी गोलंदाजीवर घाव घालत कत्तल करत सुटला. त्याआधी अफगाणिस्तानच्या टीमने दाखवलेल्या चिवट आणि जिद्दी खेळाने त्यांना 291 चा पल्ला गाठून दिला. त्यांच्याकडे चार फिरकीपटू आहेत. ज्यामध्ये एक राशिद खानसारखा अव्वल लेग स्पिनर आहे. इथे तर त्यांच्या वेगवान माऱ्यानेच ऑसी टीमची आघाडीची फळी कापून काढलेली. आता फक्त मॅक्सवेल आणि तळाचे गोलंदाज उरले होते. गोष्टी प्रतिकूल घडत होत्या. पण, टिपिकल ऑसी फायटिंग स्पिरीट दाखवत मॅक्सवेलने अशक्यप्राय विजय खेचून आणला. जिथे वॉर्नर, लाबूशेनसारखे महारथी कोसळले. तिथे मॅक्सवेलने कमिन्सच्या साथीने द्विशतकी भागीदारी करत ऑसी टीमची नैया पार केली आणि सेमी फायनलचे दरवाजे उघडे करुन दिले. वैयक्तिक कारकीर्दीत कदाचित सर्वोत्तम आणि क्रिकेट इतिहासात सर्वोत्तमपैकी एक अशी खेळी तो करुन गेला. अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची ऑस्ट्रेलियन वृत्ती जिंकली आणि अनुभवाची कमतरता तिच्यासमोर नतमस्तक झाली. तरीही अफगाणिस्तानने ऑसी टीमच्या तोंडाला फेस आणला त्याचं कौतुक करावंच लागेल. क्रिकेटच्या अनिश्चिततेचा पुन्हा प्रत्यय आला. काही षटकात खेळाचं पारडं कसं दुसरीकडे झुकू शकतं तेही पुन्हा एकदा दिसून आलं. वानखेडेवरच्या मोजक्याच प्रेक्षकांनी मॅक्सवेलच्या फटक्यांचा फराळ चांगलाच एन्जॉय केला असेल. वनडे सामन्यांचे सारे रंग दाखवणाऱ्या या मॅचमध्ये मॅक्सवेलसह ऑस्ट्रेलिया जिंकली आणि क्रिकेटही.