गंगटोक, काठगोदाम आणि मॉलिनाँग या तीन स्थळांमध्ये काही साम्य आहे म्हटलं तर नवल वाटेल. गंगटोक सिक्कीममधलं प्रसिद्ध ‘हिलस्टेशन’, काठगोदाम उत्तराखंडमध्ये फिरण्यासाठी जायचं तर शेवटचं रेल्वेस्टेशन आणि मॉलिनाँग हे पार मेघालयातलं एक अगदी लहानगं खेडं! यांच्यातलं साम्य आहे स्वच्छता!




गंगटोक भारतातलं सर्वात स्वच्छ हिलस्टेशन म्हणून ओळखलं जातं. काठगोदामचं रेल्वेस्टेशन हेही देशातलं सर्वात स्वच्छ रेल्वेस्टेशन असल्याचा पुरस्कार मिरवताना दिसतं आणि मावलीनांग तर भारताबाहेरचाही सन्मान मिळवून अवघ्या आशिया खंडातलं सर्वांत स्वच्छ गाव ठरलं आहे.



काठगोदामला मी पोहोचले, तेव्हा पहाट व्हायची होती आणि पुढच्या प्रवासाची उत्सुकता असल्याने उजाडायची वाट न पाहता लगेच पहाडांच्या हाका ऐकत निघाले. परत येताना मात्र दरम्यानच्या दिवसांत उत्तराखंडमध्ये नैसर्गिक प्रकोप झाल्याने रस्ते नीट मोकळे झाले असतील की नाही, कोसळलेल्या दरडींची माती –दगड बाजूला काढले गेले असतील की नाही याची धाकधूक असल्याने दोनेक तास आधीच निघाले होते. त्यामुळे काठगोदामला पोहोचून एका हॉटेलात जेवून स्टेशनवर आले आणि इतकं स्वच्छ व देखणं स्टेशन पाहून चकित झाले. वेटिंगरुममध्ये न बसता चक्क तासभर या टोकापासून त्या टोकापर्यंत फेऱ्या मारल्या निवांत. गजबज होतीच, पण गलका-गोंधळ नाही. पर्यटक देखील अशा जागी ओशाळून शहाण्यासारखे वागू लागतात; त्यामुळे कुणी इकडेतिकडे कचरा टाकत नव्हतं. चुकून कुठे कचरा पडलाच, तर लगेच स्वच्छ केला जात होता. स्वच्छता कर्मचारीही छान गणवेशात, हातमोजे घालून हसतमुखाने काम करत होते.

गंगटोकला हेलिकॉपटरचा पर्याय आहे, पण तो फारतर परतीच्या प्रवासात निवडावा. तिस्ता नदीच्या काठाकाठाने जाणाऱ्या रस्त्यावरून बसमधून प्रवास करणं जास्त छान; कारण बसच्या उंचीमुळे कारमधून गेल्यावर दिसणाऱ्या दृश्यांहून वेगळ्या पातळीवरून दृश्यं दिसतात आणि अधिक मजा येते. गंगटोकचा मुख्य रस्ता इथून तिथवर रेंगाळत, दुकानं बघत फिरलं तरी तासाभरात संपेल इतका लहान, जेमतेम एक किलोमीटरचा. पण आपण निवांत असू तर तीन-चार तासही तिथं छान जाऊ शकतात. आजूबाजूची सर्वच दुकानं एकाच हिरव्या रंगाची असतात. भर बाजारचा मुख्य रस्ता गर्दीच्या वेळेतही स्वच्छ असतो आणि रस्त्यावर खरेदीने थकलात तर बसायला बाकं असतात आणि अधूनमधून चक्क कारंजांमधून पाणी नाचत-खेळत- उडत असतं. पावसात ओले झालेले रस्तेही चिखलाने बरबटलेले दिसत नाहीत हे आश्चर्यच. पाऊस पडून गेल्यावर रात्री गंगटोकच्या रस्त्यावरून फिरावं. ओल्या रस्त्यावर प्रतिबिंबांमध्ये दिव्यांच्या रंगांची होळी दिसते. या रस्त्यावर फक्त ‘पायां’ना परवानगी आहे, चाकांना नाही; त्यामुळे वाहनांचे आवाज, धूर नसतात. कुठंही बसावं, थांबावं, मान वर करून पाहिलं की कांचनगंगा दिसतंच. काकाकुवा पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिला तो इथंच. प्रत्येक ठिकाणी लोककथांचं भांडार असतंच, त्याला सिक्कीम अपवाद नाहीच. रूमटेक मोनास्ट्रीत अशीच एक गमतीची कथा ऐकायला मिळाली. इथले जे पहिले कर्मापा होते, त्यांनी तप सुरू केलं. सुमारे वर्षभर तप केल्यानंतर त्यांना काही पऱ्या भेटायला आल्या... थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल दहा हजार पऱ्या. त्यांनी कर्मापांना शुभेच्छा देत आपला एकेक केस भेट म्हणून दिला. या केसांपासून त्यांनी एक Hat बनवली. ती परंपरेने पुढच्या कर्मापांना मिळते. त्यांना ती डोक्यावर घालायची नसेल, तेव्हा एका पेटीत नीट बंद करून ठेवतात... पऱ्यांच्या केसांपासून बनवलेली असल्याने ती कर्मापांच्या डोक्यावर असताना नीट राहते, पण कुठेही काढून ठेवली तर उडून जाऊन गायब होऊ शकते असा समज आहे.

स्वच्छ गावं, घरं, सार्वजनिक स्थळं; स्वच्छ शौचालयं; स्वच्छ पाणवठे हे दुर्मिळ बनलेले आहेत, अशा तक्रारी आपण कायम करतो; पण जोडीनेच स्वच्छता राखणे हे सरकारचं काम आहे असंही म्हणतो. आपला हा दुटप्पीपणा उघडकीस आणतं ते मेघालयातलं मॉलिनाँग (Mawlynnong) हे खेडं. इथल्या कुटुंबांची संख्या आहे ९९ आणि गावाची एकूण लोकसंख्या आहे ५००. पाॅलीथीनवर इथं पूर्ण बंदी आहे. थुंकण्यावर प्रतिबंध आहे. या लहानशा गावात फिरताना लोक आपापल्या कामांमध्ये मग्न दिसतात. फिजूल गप्पांसाठी कुणाला वेळ नसतो.



वाट लहान असो वा मोठी, दोन्ही कडांना सुंदर फुलझाडं लावलेली दिसतात. इथल्या कचराकुंड्या देखील इतक्या सुंदर आहेत... वेतापासून विणलेल्या आणि रस्त्यांच्या बाजूने जागोजाग डकवलेल्या. काॅलरावर मात करायची ठरवून लोकांनी स्वच्छतेचं व्रत घेतलं आणि लहानमोठे सारेच हे आपल्या आरोग्यरक्षणासाठी, आपले अपमृत्यू टाळण्यासाठी करायचं असलेलं घराची व गावाची स्वच्छता हे जीवनावश्यक दैनंदिन काम समजून चिकाटी व सातत्याने प्रयत्न करत राहिले... त्यातून त्यांनी आपलं ध्येय साध्य केलं. गावात येण्या-जाण्यासाठी श्रमदानातून रस्ता बांधला.



गावाजवळच्या उंच झाडावर बनवलेल्या मचाणावरून आपण एका नजरेत या स्वच्छ, सुंदर, नेटक्या गावाचं निरीक्षण करू शकतो. इथूनच पुढे मेघालयातले सुप्रसिद्ध जिवंत मुळांचे पूल पाहण्यासाठी जाऊ शकतो.



स्वच्छ खेडं कसं असतं हे पाहायला जाणारे पर्यटक आता गावातल्या लोकांची डोकेदुखी ठरताहेत आणि अशा कचराकरू लोकांपायी आता त्यांना सफाई कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नेमणूक नाईलाजाने करावी लागली आहे. अस्वच्छतेसोबतच आवाज, गलके, गोंधळ हेही पर्यटकांना अविभाज्य वाटतं; या ध्वनी प्रदूषणाने देखील गावकरी त्रासले आहेत आणि पर्यटकांसाठी नियम बनवण्याचा विचार करताहेत. पाहून काही शिकण्याऐवजी आपण चांगलं ते बिघडवण्याच्या उन्मादात आनंद मानतो आहोत. स्वच्छतेची सुरुवात मनं आणि बुद्धीपासून सुरू करण्याची वेळ आपली वाट पाहत थांबलेली आहे.

संबंधित बातम्या:

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!


घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…


घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस


घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा


घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो


घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय


घुमक्कडी (25): साकाचं बेट


घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ


घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय


घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!


घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई