दुष्काळाने सर्वत्र रखरखाट झाला होता. या भूमीवर चुकून ढग आलेच, तर ते इतके उंचावर असत की त्यांना ही भूमी दिसायचीच नाही आणि ते आपल्याच नादात पुढे सरकत दूर निघून जायचे. पाऊस नाही म्हणजे पाणी नाही, पाणी नाही म्हणजे अन्नही नाही. भूकतहानेने सारे व्याकूळ होऊन मरायला टेकले. सगळ्या प्रार्थना व्यर्थ जाऊ लागल्या. सगळ्या उपाययोजना थकल्या. काय करावं हे काही कुणाला सुचेनासं झालं. अशात एक नवल घडलं.
एक पुष्ट, मस्तवाल आणि पाण्यानं गच्च भरलेला काळा मेघ आकाशातून जाताना जोराचे वारे वाहू लागल्याने गडबडून उंचावरून थोडा खाली आला. इथंही उष्ण वारे होतेच, पण त्या लहान झुळुका होत्या. त्यातली एक झुळूक विलक्षण वेगळा गंध घेऊन आली होती. मेघ त्या गंधाने अगदी वेडावून गेला. त्यानं त्या झुळुकीला विचारलं, “जीव कासावीस करणारा हा कसला गंध आहे, ते मला सांगशील का?”
इतका मस्तवाल मेघ नम्रपणे विचारतोय म्हणून झुळूक खुशालली. ती म्हणाली, “अजून थोडा खाली जा आणि धरतीवर नीट वाकून पहा. तिथं तुला सावुरी नावाची तरुणी दिसेल, हा तिचाच देहगंध आहे.”
मेघ हलकेच खाली आला. त्याला पृथ्वीकन्या सावुरी दिसली. तिची काळी कांती एखाद्या चमकदार ओलेत्या कणखर खडकासारखी घट्टमुट्ट दिसत होती. तिचे कुरुळे केस दवबिंदू ल्यालेल्या तुतीच्या फळांसारखे दिसत होते. या दुष्काळी औदासीन्यात देखील ती ताठ कण्याने आणि आत्मविश्वासाने आकाशाकडे बघत उभी होती. मेघानं पृथ्वीवर आयुष्यात कधी इतकं देखणं काही पाहिलं नव्हतं. तो तिच्या प्रेमात वेडावून अजून अजून खाली खाली उतरत आला, तसतसा तिचा देहगंध त्याला अधिक तीव्रतेने जाणवू लागला. मग एकाएकी त्याला भान आलं की, तो असाच धरतीवर उतरला तर पाणी होऊन नष्ट होईल. मग त्यानं एका बैलाचं रूप धारण केलं आणि विजेचा दोरखंड करून तो उतरू लागला. आपले चारी पाय धरतीवर टेकवून, पायांत वीज भरून तो सावुरीच्या दिशेने निघाला.
मेघ खाली येताना सूर्य झाकोळला आणि वातावरण काळोखं बनलं. विजांच्या कडकडाटाने धरती कापू लागली. सगळे प्राणीपक्षी आपापल्या गुहांमध्ये, बिळात, ढोलीत, घरट्यांत दडले. माणसं आपापल्या झोपड्यांमध्ये शिरली. पाऊस येणार याचा आनंद वाटतोय की भय वाटतेय, हेच काही कुणाला कळेनासं झालं. सावुरीही आपल्या झोपडीत गेली आणि एकाएकी तिला गाढ झोपेनं घेरलं. बैलरूपी मेघ सावुरीच्या झोपडीजवळ येऊन थबकला. त्यानं खिडकीतून डोकावून पाहिलं, तर एवढ्या वाऱ्यावावदानात, विजांच्या धिंगाण्यात देखील सावुरी शांत झोपून गेलेली दिसली. धावून आलेल्या मेघाच्या नि:श्वासांनी, तो इतक्या जवळ आल्यानं, धरती दवाने ओली झाली. मृदगंध दरवळू लागला; त्याने जादू झाली. मातीच्या सुगंधाने सावुरीची झोपडी भरून गेली आणि सावुरी जागी झाली.
सावुरीनं पाहिलं की, एक काळभोर देखणा बैल आपल्या झोपडीच्या दारात उभा आहे. त्यानं शरणागतासारखे कान पाडलेत, उंचावलेली गोंडेदार शेपटी तो खाली घेतोय आणि पुढचे दोन्ही पाय गुडघ्यांवर टेकवून तिच्यासमोर खाली बसतोय.
तिनं मऊ केसाळ कातडीपासून बनवलेलं, धाग्यांनी सुंदर रेशीमकाम केलेलं ‘कारोस’ अंगाभोवती घट्ट लपेटून घेतलं. तरी बैलाच्या घामाचा गंध तिच्या नाकात घुसलाच. ती वश झालेली पाहून बैलाने धरतीवर आपले खूर जोरानं आपटले आणि दमदार मेघगर्जनेचा हुंकार भरला. त्यांच्या काळ्याभोर डोळ्यांत, सावुरीला आपल्यासोबत घेऊन जाण्याच्या इच्छेची वीज नाचत होती. सावुरीला कळलं की, बैलाचा आकार आणि पुरुषाचं मन यांच्यात मेघ दडलेला आहे. पाऊसपाण्यानं गच्च दाटून भरलेला काळाभोर मेघ! त्याचा गंधच सांगतोय हे सारं!!
तिला आपल्या परिसरातला इतक्या वर्षांचा दुष्काळ आठवला. अन्नपाण्यासाठी व्याकूळ झालेले, पावसासाठी आसावलेले सगळे जीव आठवले. त्यांच्यासाठी देखील आता पावसाचं आगमन गरजेचं होतं आणि त्यासाठीही आता मेघाचं स्वागत प्रेमानं करणं आवश्यक होतं. ती हसली आणि झेपावून उडी घेत बैलाच्या पाठीवर स्वार झाली.
बैल वेगाने दौडत निघाला, त्याच्या दौडण्याचा आवाज सर्वदूर पसरला. तो शेतांमधून, रानावनातून, डोंगरदऱ्यांमधून... जिथून जिथून जात होता तिथं तिथं मुसळधार पाऊस कोसळू लागला. मातीत पडलेल्या भेगा पावसाच्या पाण्यानं भरून गेल्या. सुकलेले ओढे, नद्या, झरे, धबधबे पुन्हा नव्यानं वाहू लागले. पावसानं पृथ्वीची कन्या तर नेली, पण वधूदक्षिणा देऊन तिला समृद्ध केलं.
लोक आजही सावुरीची आठवण काढतात आणि पाऊस आला की, त्याच्यासोबत तीही माहेरपणाला येईल म्हणून वाट बघतात.
प्रेम आणि लैंगिकता, प्रेम आणि कामकाज, प्रेम आणि जगणं, प्रेम आणि पाऊस म्हणूनच अनेकदा वेगळे करून पाहता येत नसावेत. फक्त त्या मेघावर स्वार होऊन जगभर दौडत जाण्याचं मनमुक्त धैर्य दाखवावं लागतं.
फोटो सौजन्य: कविता महाजन