झाडांच्या विविध लोककथांमधली माझी आवडती कथा गारो या आदिवासी जमातीतली आहे. निबा जोंजा नावाचा एक माणूस गारो टेकड्यांच्या प्रदेशात सुखाने आपल्या कुटुंबासह नांदत होता. एके दिवशी एका नरमांसभक्षक वाघाची क्रूर नजर त्याच्या घराकडे वळली. रोज संध्याकाळ झाली की वाघ त्याच्या घराच्या आसपास दाट झुडुपांमध्ये दडी मारून बसायचा आणि रात्र वाढली की संतापून त्याच्या घराभोवती फेऱ्या मारायचा. जोंजा, त्याची बायको, मुलंबाळं सगळीच घराबाहेर पडायला घाबरू लागली. फार काळ असं घरात अडकून पडून चालणार नव्हतंच. काय करावं हे जोंजाला सुचेना, तेव्हा त्याने गरुडाला सल्ला विचारला. गरुडाने त्याला एक दुर्मिळ वनस्पती आणून घराच्या कुंपणाजवळ लावून दिली आणि सांगितलं की, “घरात एखादं असं लाकूड जळत ठेवा, ज्याचा वास घरभर असा भरून राहील की बाहेरच्या त्या वनस्पतीचा सुगंध घरात अजिबात येता कामा नये. कारण त्या सुगंधाने झोप यायला लागते.”

जोंजाने त्याप्रमाणे केलं. काळोख दाटू लागताच वाघ आला, पण कुंपणापासून काही अंतरावर असतानाच त्याला त्या वनस्पतीच्या वासाने गुंगी येऊ लागली आणि जेमतेम चार पावलं चालून तो वाटेतच गाढ झोपून गेला. सकाळी उन्हं आल्यावर त्याची गुंगी उतरली, पण रात्री पुन्हा तसंच झालं. अखेर वाघाने हार पत्करली आणि जोंजाला खाण्याचा विचार रद्द करून तो दुसऱ्या दिशेला निघून गेला.



पण त्या वनस्पतीने निरुपद्रवी असलेल्या बाकी निशाचरांनाही त्रास व्हायला लागला. ते दिवसाउजेडी बाहेर पडू शकत नसत आणि रात्री वनस्पतीच्या सुगंधाने झोपून जात; त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. यावर काहीतरी मार्ग शोधायचा ठरलं. दिवसा ती वनस्पती कोणती आहे हे कुणालाच ओळखू येत नसे आणि रात्री कुणीच तिच्यापर्यंत पोहोचू शकत नसे. मग ससाणा समोर आला. त्याची नजर तीक्ष्ण होती आणि वेग प्रचंड. रात्री आभाळातून त्याने त्या वनस्पतीचा वेध घेतला आणि वेगात सूर मारून ती उपटून काढली आणि ती नष्ट करण्यासाठी तो दूर उडून जाऊ लागला. एका दरीतल्या अजगराच्या ते ध्यानात आलं. त्यानं ससाण्यावर विषारी फुत्कार सोडले. त्याक्षणी ससाण्याने ती वनस्पती खाली टाकून दिली. ती आजही त्या दरीत आहे आणि अजगर आजही तिचं रक्षण करतात.
ही बाकी कथा काल्पनिक म्हटली, तरी ही सुगंधी वनस्पती मेघालयातल्या गारो टेकड्यांच्या विभागात मुन्नी दाफ्राम नामक जागी अस्तित्वात आहे. मुन्नी दाफ्राम या शब्दाचा अर्थच गोपनीय जादुई स्थळ असा होतो. या लोककथेवरून शोध घेत ज्या ज्या लोकांनी त्या दरीत उतरून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना विशिष्ट अंतरापर्यंत जाताच तीव्र सुगंधाने विलक्षण गुंगी येऊन झोप लागे. आजतागायत ती दरी आणि तिथली वनस्पती व जीवसृष्टी माणसांसाठी दुर्गम, खरंतर अनुल्लंघनीयच राहिली आहे.
या वनस्पतीचं नाव मला समजलं नाही, पण अफू – गांजा इत्यादी झुडुपं त्यामुळे आठवली; ती सौम्य म्हणावीत इतकी ही वनस्पती तीव्र क्षमतेची असणार की जिच्या नुसत्या सुगंधानेच गुंगी येते. अफू-गांजाशी संबंधित काही लोककथा आहेत का याचा यानंतर शोध सुरू केला. अजून स्वतंत्र कहाणी सापडली नाही, पण राजस्थानातल्या ढोला-मारू यांच्या प्रेमकथेत अफूची करामत आढळली. मनुहार म्हणजे प्रेमादरानं स्वागत करण्यासाठी राजस्थानात तळव्यावर अफू ठेवून तो समोर करण्याची आणि समोरच्याने ती स्वीकारेपर्यंत हात थरथरताही कामा नये अशी पद्धत होती. लग्नात हुंड्याच्या चीजवस्तूंमध्ये अफूही असे आणि गावात मोठे बखेडे झाले तर ते सोडवताना पंच दोन्ही बाजूंच्या लोकांना एकमेकांना अफू द्यायला लावून समेट करत.
ढोला–मारुची कथा अशी आहे – तीन वर्षांचा साल्हकुमार ( ढोला ) आणि दीड वर्षांची पूंगल राजकुमारी मारवणी ( मारू ) यांचा विवाह झाला. नवरी मोठी झाली की सासरी पाठवायची या प्रथेमुळे मारू माहेरीच होती. साल्हकुमार तरुण झाल्यावर त्याचं दुसरं लग्न करून दिलं गेलं, त्याला आपला बालविवाह झाल्याचं आठवतही नव्हतं. मारू त्याला संदेश पाठवायची, तो दुसरी पत्नी त्याच्यापर्यंत पोहोचूच देत नसे. मग तिचा पिता, पिंगल राजाने एक ढोली म्हणजे गायक शोधला. तो राजपुत्रापर्यंत पोहोचला. त्याने मारुचं नाव गुंफलेलं आर्त गीत ऐकवलं. ते नाव ऐकताच राजपुत्राला सगळं आठवलं. गायकाने तिचं वर्णन गाण्यातून असं काही केलं की भूल पडून तो तिच्याकडे गेला आणि तिला घेऊन परत निघाला. उमरसुमरा पिंगल राजकुमारीच्या प्रेमात पडलेला होता. त्याने डाव रचला. साल्हकुमारला वाटेत ‘मनुहारा’साठी रोखलं. पण गायकाने मारूला सावध केलं आणि ढोला बचावला. अन्यथा अफूच्या नशेत तो झोपून राहिला असता आणि उमरसुमराने मारूला पळवून नेलं असतं.



या कथेचे अनेक पोटभेद आहेत. अकराव्या शतकातल्या या लोककथेत मागाहून इतकी उपकथानकं मिसळली आहेत, की मूळ ओळखू येऊ नये. आजही ही कथा गाऊन सादर केली जाते आणि आदर्श प्रेमी जोडप्याला ‘ढोला-मारू’ची उपमा दिली जाते. या कथेतलं मारूचं वर्णन फार सुंदर आहे. गायक म्हणतो, “नम्र, गुणवती, गंगेच्या प्रवाहासारखी उजळ गोरी, सूर्यासारख्या तेजस्वी चेहऱ्याची मारू सुकोमल आहे. तिची कटी सिंहासारखी, चाल गजासारखी आहे. केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या, माणकासारखे ओठ व हिऱ्यांसारखे दात, चंद्रकोरीसारख्या भिवया आहेत. झिरमिर वस्त्रांमधून तिचा देह सोन्यासारखा झळाळतो. हे राजकुमारा, तुझ्या विरहाने रडून तिचे डोळे लाल झालेत. अश्रूंनी भिजलेली वसनं पिळून तिच्या हातांना फोड आलेत. सारस पक्ष्यांच्या लालस पिलांप्रमाणे क्षणाक्षणाला ती तुझी आठवण काढतेय...”
मेघालयातल्या एका गोष्टीतून मी राजस्थानातल्या दुसऱ्या गोष्टीपर्यंत आले. एका गोष्टीतून दुसरी गोष्ट आठवते. दुसरीतून तिसरी. तिसरीतून चौथी. इतक्या अमाप लोककथांचा वारसा आपल्याकडे चालत आलेला आहे की एकवेळ प्रवास संपेल, पण गोष्टी संपणार नाहीत. अगदी शंभर वर्षं जगलं आणि रोज रात्री एक गोष्ट ऐकली तरी केवळ ३६५०० गोष्टी होतील केवळ. याहून अधिक संकलित लोककथांचा खजिना म्हैसूरच्या लोककथा संग्रहालयात आहे. ना सुगंधी वनस्पतीची गरज; ना मनुहाराची... आपल्या डोळ्यांमध्ये अजूनही झोप आणते ती गोष्टच. फक्त ती ऐकण्याइतकं मन निरागस असलं पाहिजे. मला आत्ता शमशेरबहादुर सिंह यांच्या ओळी आठवताहेत...

निंदिया सतावे मोहे सँझही से सजनी।   
दुअि नैना मोहे
झुलना झुलावें
सँझही से सजनी।     


( चित्रं : कविता महाजन )

‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :


 

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


 घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…  


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई