पावसाविषयीच्या अक्षरश: शेकडो पुराकथा, सृष्टीकथा, लोककथा जगभर प्रचलित आहेत. जुन्याकथा ढग, पाऊस, पूर, विजांचा कडकडाट यांविषयी कुतूहल व भय असलेल्या आहेत; तर शेतीचा शोध लागल्यानंतरच्या काळातल्या कथा पावसाची प्रतीक्षा, दुष्काळाचं भय, अन्नधान्याची कमतरता यांतून आलेल्या आहेत. पाऊस पडावा म्हणून केले जाणारे विधी, त्यांच्याशी निगडित कथा, गीतं, नृत्यं, नाट्यं असं पुष्कळ काही सापडत जातं. पृथ्वी ही माता, आकाश हा पिता आणि पाऊस हे रेतस् / वीर्य ही कल्पना तर खूप कथांमधून आढळते. वीर्य आणि जल या गोष्टी एकमेकांशी निगडित केल्याने घाम, थुंकी, अश्रू या ‘जलां’नाही अनेक कथांमधून वीर्य मानलं जातं.
मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते, अशा मिथ्स आपल्याकडे दिसतात.

या कथांपैकी एक माओरी कथा माझी आवडती आहे. गोष्टीतलं नवल, चमत्काराचा धक्का यातून माणसाच्या कल्पनाशक्तीचे इतके नमुने पाहायला मिळतात की, दरवेळी या कथा ऐकता-वाचता-सांगताना काहीतरी नवं मिळालंय असं वाटत जातं.

ब्रह्मांड, विश्वाचे अंडे अशा कल्पना जिथं आहेत; तिथं त्या अंड्याची दोन शकलं होऊन वा केली जाऊन पृथ्वी आणि आकाश वेगळे बनल्याच्या कथा आहेत. त्यांना विभक्त राखण्यासाठी केले गेलेले प्रयत्न देखील या कथांमध्ये आढळतात. माओरी कथेत याहून पुढची गोष्ट येते, ती पावसाची आहे.



ऱ्हान्गी म्हणजे आकाश आणि पाह्पा म्हणजे पृथ्वी हे जोडपं एकमेकांच्या अखंड मिठीत होतं. त्यांना सत्तर मुलं झाली, तरीही त्यांनी मिठी विलग होईना. मुलांना प्रकाश मिळेना, हालचाल करता येईना, मोकळा श्वास घेता येईना. जगलोच नाही, तर वाढणार कसे, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. घुसमट सहन न होऊन मुलं बाहेर पडण्याच्या मार्गाचा विचार करू लागली. अखेर त्यांनी एकत्र येऊन विचारविनिमय सुरू केला. एकेकाचे प्रयत्न विफल होत गेले. मग जंगलदेव वा वृक्षदेव असलेल्या तूहनेहने त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. हा वृक्षदेव म्हणजे देखील आकाश-पृथ्वीचाच एक पुत्र; पण नाईलाजाने त्यानं आपल्या आईवडिलांना एकमेकांपासून दूर करून सर्व भावंडांना वाचवण्याचं आव्हान स्वीकारलं. त्यानं आपली मुळं आईच्या पोटात रोवली मस्तक पित्याच्या पोटावर ठेवून त्याला दूर सारण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावायचं ठरवलं. शांत चित्तानं आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्यानं हळूहळू विलग करायला सुरुवात केली. अखेर आपल्या प्रयत्नात तो यशस्वी झाला आणि तेव्हापासून आकाश व पृथ्वी कायमचे विलग झाले. प्रकाश, हवा मिळाल्यामुळे मुलांनी हुश्श केलं.



पुढे पृथ्वी मुलांचं रक्षण, जतन करण्याच्या व्यापतापात गुंतून गेली; आकाश मात्र एकटं पडलं. त्याच्या सत्तर मुलांपैकी एकटा ताव्हिरी, म्हणजे वाराच असा होता, ज्याचं आईहून वडिलांवर अधिक प्रेम होतं. तो आकाशाजवळ जास्त राहू लागला. पृथ्वीच्या विरहाचं त्याच्या मनातलं दु:ख वाढतच गेलं. आपले उष्ण नि:श्वास त्याने ढगांमध्ये साठवून ठेवायला सुरुवात केली.



त्या दु:खात आकाश स्फुंदायचं, तेव्हा पृथ्वीवर कधी दवबिंदू दिसत; हमसून रडायचं तेव्हा पाऊस कोसळू लागे; मुलांच्या विश्वासघाताने संतापून आक्रोश करी तेव्हा गडगडाट होऊन इतका मुसळधार पाऊस कोसळे की मोठमोठाले वृक्ष मुळांपासून उखडून निघत आणि नद्यांना आलेल्या पुरात वाहून जात. अश्रूंनी हळूहळू विश्व धूसर होई आणि त्याला पृथ्वीच दिसेनाशी होई, तेव्हा कुठे ते आपलं रडू आवरतं घेई.

अखेर तूहनेहनं आपल्या वडिलांची क्षमा मागितली आणि विचारलं की, “जे घडलं ते तर अपरिहार्य होतं, पण आता मी तुमच्यासाठी काय करू सांगा?”



ऱ्हान्गीला त्यानं सोनेरी सूर्य दिला, त्यामुळे त्याची निळी वस्त्रं सुंदर झळाळू लागली. त्याला एक लाल घड्याळ दिलं, ज्यामुळे त्याला वेळ समजू लागली. सूर्य उगवताना आणि मावळताना ते घड्याळ बाकी सगळ्यांना दिसतं. रात्रीसाठी त्यानं त्याला चंद्रचांदण्या दिल्या. त्यामुळे रात्रीही त्याला एकाकी वाटेनासं झालं. तरीही मध्येच कधी आकाशाचं दु:ख जागृत होतं. ते पुन्हा अश्रुपात करू लागतं. पृथ्वी आकाशाच्या अश्रूंनी ओली होते. मौनात शिरते. तूहनेहला मनातून अपराधी वाटतं. मग तो तिला हिरवाई पांघरून शांत करतो. तिला आभाळ सलग दिसणार नाही, इतके उंच आणि दाट वृक्ष वाढवतो. मंजुळ गाणी गाणारे सुंदर रंगीत पक्षी त्या झाडांमधून उडत आकाशाची
प्रेमगीतं पृथ्वीसाठी गात गात वातावरण भारून टाकतात.

हे जंगल, या नद्या, हे प्राणीपक्षी यांचं रक्षण करायला; यांचं सौंदर्य अनुभवायला कुणीतरी हवं असं तूहनेहला वाटलं आणि पृथ्वीकडून थोडी माती घेऊन त्यानं एक स्त्री निर्माण केली. तिच्यात जीव फुंकला आणि मग तिच्याशी विवाह केला. त्यांच्या संबंधातून पृथ्वीवरचा पहिला पुरुष जन्मला आणि मानवाचा वंश इथून सुरू झाला.

गोष्ट इथं संपत नाहीच, माणसाच्या दृष्टीने ती खरी इथूनच सुरू होते. पण मला पुढची गोष्ट आज आठवायचीही नाहीये आणि सांगायचीही नाहीये... पावसात फक्त पाऊस आठवावा!

घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :


घुमक्कडी : (46) चिमूटभर मिठाच्या समुद्राएवढ्या गोष्टी!


घुमक्कडी (45) : समुद्राचं पाणी खारं का झालं?


घुमक्कडी (44) : कोळ्याच्या जाळ्यात पृथ्वी!


घुमक्कडी (43) : बिघडलेलं दुरुस्त करणारे जादूगार बैगा


घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार


घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल


घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं


घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु


घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं


घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा


घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना


घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !


घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!


घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…


घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…


घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!


घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…


घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस


घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा


घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो


घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय


घुमक्कडी (25): साकाचं बेट


घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ


घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय


घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!


घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो


घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू


घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!


घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं


घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ


घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे


घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे


घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!


घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे


घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!


घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!


घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 


घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी


घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये


घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण


घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना


घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!


घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी


घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना


घुमक्कडी : (2) सीतेची तहान


घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई