बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima) असे म्हणतात. आज गौतम बुद्धांची 2586 वी जयंती साजरी केली जात आहे. भगवान बुद्धांना भगवान विष्णूंचा शेवटचा आणि 9वा अवतार मानलं जातं. 

Continues below advertisement


जगभरात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. चीन, जपान, श्रीलंका, दक्षिण कोरिया, बर्मा, थायलंड ही बौद्ध राष्ट्रे आहेत.  त्यापैकी थायलंडमधल्या बँकॉकच्या 'वाट ट्रेमिट' या बौद्ध विहाराला काही दिवसांपूर्वी आम्ही भेट दिली. हे विहार 'गोल्डन बुद्धा' म्हणून ओळखलं जातं. अतिशय भव्य-दिव्य आणि तितकीच सुंदर या विहाराची रचना आहे. नावाप्रमाणेच या विहारात गौतम बुद्धांची सुवर्ण मूर्ती आहे.


गौतम बुद्धांच्या या विहारातील मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर, त्यांच्या शांती आणि संयमाच्या शिकवणीची प्रचिती आपोआप येते. गोल्डन बुद्धा म्हणून ओळख असलेल्या मूर्तीची खास वैशिष्ट्ये पाहा... 



  •  गौतम बुद्धांची ही जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती आहे.

  • या मूर्तीचं वजन तब्बल 5,500 किलो इतकं आहे. 

  • विकाऊ नसली तरी बाजारभावानुसार, तब्बल 19 अब्ज इतकी मूर्तीची किंमत सांगितली जाते. 

  • ही मूर्ती 9.8 फूट उंचीची आहे.   

  • ही अतिप्राचिन मूर्ती असून अनेक वर्ष जगापासून ही मूर्ती सोन्याची आहे, ही बाब लपून होती.  


इतिहास नेमका काय?


ही मूर्ती नेमकी कधी तयार करण्यात आली याबद्दल ठोस पुरावे नाहीत. पण काही अभ्यासकांच्या अंदाजाने 13व्या ते 14व्या शतकात सुखोथाई राजवंशाच्या शैलीत ही मूर्ती तयार झाली.  1767 दरम्यान म्यानमारमधून थायलंडवर आक्रमण केलं जात होतं. या आक्रमणांपासून मूर्तीचं संरक्षण व्हावं आणि मूर्ती पळवून नेली जाऊ नये,  म्हणून त्यावर प्लास्टर लावण्यात आलं. काही वर्षांनंतर 1954 साली, बँकॉकमधील नवीन बांधण्यात आलेल्या  बौद्ध विहारात ही मूर्ती  हलवण्यात येत असताना ती पडली आणि या मूर्तीचं खरं वास्तव जगासमोर आलं.


थायलंड बौद्ध राष्ट्र असल्याने गौतम बुद्धांचे अशा प्रकारच्या अनेक वैशिष्टयपूर्ण विहार इथे आहेत. ‘Wat Pho , Wat Arun, Wat Phra Kaew’ ही काही त्यांचीच उदाहरणं आहेत. 


अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणार्‍या गौतम बुद्धांना आजच्या दिवशी विनम्र अभिवादन!!