फ्रान्स जिंकला आणि क्रोएशिया हरली. रशियातल्या फिफा विश्वचषकाचा फ्रान्सच्या बाजूनं ४-२ असा लागलेला निकाल जगभरातल्या करोडो फुटबॉलरसिकांना पटलेला नाही. कारण क्रोएशियानं विश्वचषकाच्या फायनलआधी आणि प्रत्यक्षात फायनलमध्येही कमालीची कामगिरी बजावली, तरीही नशिबानं फ्रान्सलाच साथ दिली. त्यामुळं ह्यूगो लॉरिसच्या फौजेनं वीस वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकावर फ्रान्सचं नाव कोरलं.


फ्रान्सचा कर्णधार ह्यूगो लॉरिसनं फिफाचे अध्यक्ष इन्फान्टिनो यांच्या हातून विश्वचषकाचा बहुमान स्वीकारला आणि मॉस्कोच्या ल्युझिनिकी स्टेडियममधून थेट पॅरिसच्या शॉज एलिजेवर फ्रेन्च चाहत्यांच्या सेलिब्रेशनला उधाण आलं. ‘विव ला रिपब्लिक, विव ला फ्रान्स’च्या घोषणा आसमंतात निनादल्या. आर्क द ट्रॉयम्फच्या साक्षीनं सारा परिसर फ्रेन्च तिरंग्यांनी भरून गेला. राष्ट्रप्रेमानं भारावलेल्या त्या वातावरणात फटाक्यांच्या आतषबाजीनं आणखी जोश भरला.


खेळाच्या मैदानातला एक विश्वविजय देशातलं वातावरण कसं भारून टाकू शकतो याचा अनुभव आपल्यालाही १९८३, २००७ आणि २०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकांनी दिला आहे. फ्रान्सचा दिग्विजय तर क्रिकेटपेक्षाही कितीपरी पटीनं मोठ्या असलेल्या फुटबॉलमधला आहे. खेळांचा राजा असलेल्या फुटबॉलमधला आहे. फिफा विश्वचषकाचा आहे.


फ्रान्सनं याआधी १९९८ साली डिडियर डेशॉच्या नेतृत्त्वाखाली फिफा विश्वचषक पहिल्यांदा जिंकला होता. पण फ्रान्सला दुसऱ्या विश्वचषकासाठी तब्बल वीस वर्षे प्रतीक्षा करावी लागली. या वीस वर्षांत फ्रान्ससाठी खूप काही बदललं आहे. वरवर पाहायचं झालं तर १९९८ सालचा फ्रान्सचा सोनेरी केसांचा राजपुत्र डिडियर डेशॉ आता रुपेरी केसांचा झाला आहे. तेव्हा कर्णधार असलेला डेशॉ आज फ्रान्सचा प्रशिक्षक आहे. करिम बेन्झामासारख्या गुणी, पण उपद्रवी फुटबॉलवीराला संघातून बाहेर ठेवण्याची हिंमत याच डेशॉनी दाखवली. म्हणूनच विश्वचषकाच्या महायुद्धात फ्रान्स जिंकला. पण फ्रान्समधल्या दहशतवादी उपद्रवाचं काय? गेल्या काही वर्षांत दहशतवाद्यांनी वारंवार फ्रान्सकडे वाकड्या नजरेनं पाहिलं. त्यांनी फ्रान्समधल्या वैभवसंपन्न जीवनशैलीला पुन्हा पुन्हा गालबोट लावलं. ह्यूगो लॉरिसच्या फ्रेन्च फौजेनं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून दहशतवाद्यांच्या त्या 'अॅक्ट ऑफ वॉर'ला चोख प्रत्युत्तर दिलं... तुमच्या दहशतीसमोर आम्ही कधीच झुकणार नाही. फ्रेन्च नागरिकांनी पॅरिसच्या शॉज एलिजेवर उतरून केलेलं भव्य सेलिब्रेशन हे दहशतवादाची भीती झुगारून दिल्याचंच प्रतीक होतं.


फ्रान्सच्या विश्वचषक विजयाला आणखी एक सामाजिक किनार आहे ती त्या देशात कोणताही भेदाभेद अमंगळ असल्याचं जाणवून देणारी. फ्रान्सच्या संघात तेवीसपैकी तब्बल दहा शिलेदार कृष्णवर्णीय आहेत. ही मंडळी केवळ कृष्णवर्णीय आहेत, असं नाही तर त्यांचं कूळ आणि मूळही परक्या देशातलं आहे. या दहाही मुलांच्या आईवडिलांना आपल्या आणि आपल्या लेकराबाळांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी फ्रान्सच्या आश्रयाला यावं लागलं होतं.


फ्रान्सचा तिसरा गोल झळकावणाऱ्या पॉल पोग्बाचे जन्मदाते हे मूळचे पश्चिम आफ्रिकेतल्या गिनीचे. फ्रान्सच्या चौथ्या गोलची नोंद करणाऱ्या किलियान एमबापे वडील कॅमेरूनचे, तर आई अल्जेरियाची आहे. फ्रान्सच्या बेल्जियमवरच्या विजयाचा शिल्पकार सॅम्युअल एमटिटीचा जन्मच कॅमेरूनमधला आहे. तो दोन वर्षांचा असताना साऱ्या उमटिटी कुटुंबानं फ्रान्समध्ये स्थलांतर केलं होतं.


हीच गोष्ट एनगोलो कान्टे, मॅट्युडी, डेम्बले, मेण्डी, सिडिबे, किम्पेम्बे आणि मण्डाण्ड यांच्याबाबतीतही पाहायला मिळते. पण विश्वचषकाच्या मोहिमेत त्यांच्यामधला एकोपा आणि त्यांच्यातली संघभावना हेच दाखवत होती की, ते सारेजण आपलं कौशल्य निव्वळ फ्रान्सच्या अस्मितेसाठीच पणाला लावत होते. म्हणूनच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांनी विजयीवीरांना समान न्यायानं आलिंगन देऊन शाबासकीची थाप दिली. क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षा कोलिण्डा ग्राबर कितोराविच यांनीही मग मॅक्रॉन यांचंच अनुकरण केलं.


फ्रान्सचा सामाजिक आदर्श आणि दहशतवादाविरोधातली फ्रान्सची लढाई लक्षात घेऊनच विश्वचषक फायनलच्या रणांगणात नशिबाची साथ कदाचित त्यांना लाभली असावी. कारण क्रोएशियानं पूर्वार्धात कितीतरी पटीनं सरस खेळ करूनही, मध्यंतराला २-१ अशा गोलफरकाचं चित्र फ्रान्सच्या बाजूनं झुकलं होतं. क्रोएशियाच्या मानझुकिचनं केलेला स्वयंगोल असो किंवा मग पेरिसिचच्या चुकीनं अॅन्टॉईन ग्रिझमनला मिळालेली पेनल्टी किक आणि त्यावर त्यानं सवयीनं केलेला गोल या फ्रान्सला लागलेल्या दोन लॉटरीच होत्या. त्या दोन लॉटरींनीच फ्रान्सचं नशिब खुललं, पण क्रोएशियाचं नशिब रुसलं ते रुसलंच. त्यामुळंच ल्युका मॉडरिच्या फौजेनं रशियातला विश्वचषक आणि अगदी फायनल गाजवूनही क्रोएशियाच्या जगभरातल्या चाहत्यांना फ्रान्सच्या आनंदोत्सवावर समाधान मानावं लागलं.