आता पुणं भले कितीही लांबवर पसरले असेल तरी लक्ष्मी रस्ता ही आजही पुण्याच्या व्यापाराची मध्यवाहिनी म्हणता येईल.कँपापासून सुरु होऊन टिळक चौकात विसर्जित होणाऱ्या लक्ष्मी रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या व्यापारी पेठा गेले अनेक वर्ष आपापले व्यवहार निमूटपणे करत आल्यायत.सोने-चांदी,कापड आणि अगदी होलसेल दुधापासून ते इंडस्ट्रीजना अत्यावश्यक हार्डवेअर,नव्या-जुन्या आणि अनेक दुर्मिळ गाड्यांच्या स्पेअर पार्टस,पेट्रोलपर्यंतचा व्यापार एकाच रस्त्यावर करणारी बाजारपेठ निदान माझ्या पाहण्यात तरी दुसरी नाही. (उल्लेख न केलेले काही व्यवसाय मुद्दाम टाळल्याची नोंद जाणत्या पुणेकरांनी घेतली असेलच,ह्याची खात्री आहे.)


आपण जेव्हा नाना पेठमार्गे पुणे शहरात प्रवेश करतो,तेव्हा पुण्यातल्या पुरातन मंदिरांच्या नावांना जागणारं रस्त्यावरचं पहिलंच मंदिर दिसतं ते डुल्या मारुतीचं.मराठे पानिपताची लढाई हरल्याची बातमी पुण्यात सर्वप्रथम थडकली,त्यावेळी ही हनुमानाची मूर्तीही दुखा:ने काही काळ हलत असल्याची आख्यायिका सांगितली गेल्ये.खरेखोटे तो अंजनीसुत आणि रामराणाच जाणोत.

ह्याच डुल्या मारुतीच्या अगदी पाठीला टेकून,श्री. गजानन जनार्दन मोहरेंच्या परिवाराचे गेली 50 वर्ष परंपरा असलेले ‘हरिओम’ ज्यूस आणि नीरा विक्री केंद्र आहे.नाना पेठ आणि रविवार पेठ भागात हार्डवेअर,स्पेअर मार्केट मध्ये कामानिमित्त नियमित येणाऱ्या लोकांकरता ‘हरिओम’ म्हणजे तहान भागवण्याची चविष्ट खात्री.

लहानपण अतिशय कष्टात काढलेल्या श्री.गजानन मोहरेंनी 1968 साली सर्वप्रथम आपल्या बोलण्यानी जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगमधल्या नीरा विक्री अधिकाऱ्यांची मने जिंकत सहजशक्य नसलेली नीरा विक्रीच्या स्टॉलची परवानगी मिळवली.गर्दी नसलेल्या मार्केटमधे पहिली तब्बल 10-12 वर्ष चिकाटीने व्यवसाय करणे हे नीरा पिण्याएवढे सोपे काम नक्कीच नसणार.पण आपल्या गोड बोलण्याने येणाऱ्या ग्राहकांचीही मने जिंकत गजानन मोहरेंनी नीरा विक्री चिकाटीने सुरूच ठेवली.मदतीला त्यांचे वडील आणि बंधू शिवाजी आणि बाळासाहेब मोहरे हेही असायचे.

इथे नेहमी येणाऱ्या सामान्य आर्थिक परिस्थितीतल्या ग्राहकांना नीरेबरोबर स्वस्त दरात आसपास न  मिळणारा फळांचा रस देता आला,तर हा व्यवसाय अजून पुढे नेता येईल ह्या विचाराने गजानन मोहरे आणि त्यांच्या बंधूंनी ताज्या फळांचे शेक तयार करून विकणे सुरु केलं.तेव्हापासून आजपर्यंत ‘सिझनल शेक’ ही ‘हरिओम’ची स्पेशालिटी आहे.

खरतर ह्या दुकानाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावर असलेलं हे एकमेव नीरा विक्री केंद्र.त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून इथे नीरा प्यायला येणाऱ्या ग्राहकांची सुरुवात होते.दुपारनंतर निरेची जागा हळूहळू 'फ्रूट ज्युस आणि शेक्स’नी घेतली जाते.संध्याकाळी नीरा विक्री थांबवल्यावर रात्री 11.30 पर्यंत सिझनल आणि इतर फळांचे शेक ह्यांची विक्री सतत सुरु असते.

दुकान बघाल तर छोटंसंच पण क्वालिटी अनेक नामवंत हॉटेल्सपेक्षाही उत्तम,दर्जेदार माल असूनही रास्त भाव आणि ‘सर्व्हिस’ एकदम फास्ट.हार्डवेअर किंवा नाना पेठेतल्या मार्केटमधल्या खरेदीनंतर काही वेळ जरासा स्वस्थपणा पाहिजे असेल,तर डुल्या मारुती चौकात जावं.पाराखालाच्या निराविक्री आणि ज्युस सेंटर मध्ये डोकावावं.आमच्या रामभाऊंना हरिओम म्हणावं.उगाचच भरमसाठ नसलेल्या तर मोजकीच यादी असलेल्या मेन्यूकार्डवर ओझरती नजर टाकत पाहिजे त्या फ्रुट शेकची ऑर्डर द्यावी.कितीही गर्दी असेल तरी दोनपाच मिनिटात हातात येणारा काचेचा ग्लास घेऊन दुकानावर छत्रछाया धरलेल्या झाडाच्या सावलीत उभं राहून किंवा पारावर जरा विसावून ज्यूस,शेकचा आस्वाद घ्यावा.

डुल्या मारुतीच्या पाया पडावं आणि त्याच्या पाठीला टेकून असलेल्या ‘हरिओम’ मध्ये फ्रुट शेकचा आस्वाद घ्यावा ही हनुमान भक्तांचीही जुनी परंपरा आहे.हिंदकेसरी कै.मारुती माने,हरिश्चंद्रमामा बिराजदार ह्यांच्यासारख्या पैलवानांनी पूर्वी इथे हजेरी लावल्ये.सध्याचे महाराष्ट्र केसरी अभिजित कटके तसेच शिवरामदादा,गोकुळ वस्तादचे पैलवान दुध प्यायला,फ्रुट शेककरता इथे आजही हजेरी लावतात.फक्त आसपासची माणसं आणि पैलवानच नाही तर खेड,तळेगावपर्यंतची भाजी विकायला पुण्यात येणारी लोकं,इथे आवर्जून फळांचा रस प्यायला येतात.

डेअरीचे ताजे दुध आणि फळांच्या दर्जेदार पल्पवर क्रीम पसरलेले इथले ‘सिझनल्स’ आंबा,अंजीर,सिताफळ क्रीम हे सिझनल शेक्स माझे स्वतःचे फेव्हरेट.दुकानात गर्दी नसताना कधी गेलात तर हरिओम स्पेशल ड्रायफ्रुट क्रीम मिल्क घेऊन बघा,पैसा वस्सूल.

आज वय वर्ष 83 असलेले श्री.गजानन मोहरेकाका वयोमानामुळे आता दुकानात नियमित येत नसले तरी व्यवसायाबद्दल आणि जुनी माणसे,तपशिलांबाबतची माहिती त्यांच्या तोंडावर आजही तयार असते.

मराठी परिवारात लुप्त होत चाललेली बंधूभावाची परंपरा मोहरे परिवाराने,रामभाऊ (रामचंद्र) गजानन आणि त्यांचे बंधू विकास गजानन मोहरे ह्यांनी सुरु ठेवल्ये.त्यांच्या बरोबरीने त्यांची मुलं स्वामीराज विकास मोहरे आणि घनश्याम रामचंद्र मोहरे ही चौथी पिढी ही परंपरा पुढे नेत आहेत.ह्या सगळ्यांच्यात समान गुण म्हणजे हे सगळेजण कामगारांच्या बरोबरीने सगळी कामे करत असतात.

फळांचे शेक्स विकायला सुरुवात करूनही आता तब्बल 38 वर्ष झाल्याने लोकं त्यांना ‘फ्रुटशेकवाले हरिओम’ म्हणून ओळखतात.असे असले तरी आसपासचे जुने लोक मात्र त्यांना अजूनही 'नीरावाले' म्हणून ओळखतात.आपल्या व्यवसायाच्या ओळखीचा अभिमान,रामभाऊंच्या चेहऱ्यावर झळकतो.

असा अभिमान मला आत्तापर्यंत फक्त कष्टाने व्यवसाय करणाऱ्यांच्याच चेहऱ्यावरच पाहायला मिळालाय.
फूडफिरस्ता सदरातील आधीचे ब्लॉग

फूडफिरस्ता : हरवलेल्या पुण्यातला सरदारचा ढाबा

फूडफिरस्ता : पुण्यातील अमृततुल्य चहा

फूडफिरस्ता : राजा आईसेस

फूडफिरस्ता - नेवरेकर हेल्थ होम

खादाडखाऊ : पुणे ते पुणे व्हाया पाबे घाट

खादाडखाऊ : पुण्यातील सर्वात बेस्ट 'ठक्कर' दाबेली