इस देश में दो भारत बसते है! ह्या अमिताभसाहेबांच्या एका चित्रपटातल्या वाक्याची सत्यता मला भारतातल्या अनेक शहरात फिरताना वारंवार जाणवत आली आहे .आमचं पुणंही त्याला अपवाद नाही.


आताच्या पुण्याच्या उपनगरात महाराष्ट्रातल्या अनेक गावांची, देशातल्या अनेक प्रांतांच्या संस्कृतींची सरमिसळ झाली असेल तरी जुनं पुणं जवळपास 50% मराठी भाषिकांसह आपलं अस्तित्व टिकवून आहे.



इथे सदाशिव, शनिवार, नारायण पेठींच्या ‘स्वतंत्र बाण्याचं’ एक पुणे 30 आहे. ज्याचं 2.0 व्हर्जन आता एकतर कोथरुड, बाणेर परिसरात तरी सापडतं किंवा थेट सिअॅटल,सॅन होजे वगेरे वगेरेत तरी, यूसी?

पलीकडच्याच  गुरुवार, शुक्रवार पेठेचं एक बिनधास्त, बेधडक पुणं आहे, जे तुम्हाला पुण्यातच नाही तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात सापडलं तरी तेवढ्याच टेचात वावरताना आढळेल.

पिढ्यानपिढ्या व्यापारी असलेल्या रविवार, भवानी पेठांचं एक हिशोबी पुणं आहे. दुकानांच्या चोपड्यांयेवढा जगात फारच कमी गोष्टीना वेळ देणाऱ्या ह्या पेठा. गणेश, नाना, गंज (आता महात्मा फुले पेठ) ह्यांचं आसपासच्या दुध भट्टीवर, हार्डवेअरच्या दुकानात, ऑटोमोबाईल गॅरेजमध्ये राबणारं पुणंही त्यांच्याच शेजारी गुण्यागोविंदाने रहातं.



पुण्यात नवीन आला असाल तर, एकमेकांच्या शेजारी रहात असलेले दोन शेजारी, जेवढे म्हणून भिन्न असू शकतात; ते इथे एकाच शहरात फारच थोडक्या अंतरात दिसेल.

थोड्या ब्रेकनंतर ब्लॉग नव्या स्वरूपात सुरु करताना एक प्रयत्न आहे तो; मी पाहिलेल्या, वावरलेल्या पुण्याच्या पेठांच्या ह्या अतरंगी संस्कृतीशी आणि इथल्या खाद्यविश्वाची जमेल तेवढी ओळख करून द्यायचा. पुण्यातल्या पेठात डोळे उघडे ठेऊन आणि मोकळ्या मनानी फिरलात तर तुम्हालाही ते नक्कीच गवसेल. एकदा ते गवसलं की मग त्रिखंडात फेमस असलेला पुण्याचा जाज्वल्य वगेरे अभिमान आयुष्यभर ‘ऑटोमॅटिक’च उफाळून येत राहील.



आज सुरुवात करतोय गणेश पेठेत आपल्या झणझणीत खाद्यसंस्कृतीचा वारसा अभिमानाने जपणाऱ्या, पुण्यातल्या एकुलत्या एक भंडारी हॉटेल ‘नेवरेकर हेल्थ होम’ पासून.

माझ्यासाठी कुठल्याही हॉटेलमधल्या जेवणाचं बरंचसं ‘लव्ह अॅट फस्ट साईट’ सारखं असतं. पण ते ‘लव्ह’ हॉटेलच्या बाह्यरूपापेक्षाही पदार्थाच्या चवीवर अवलंबून असतं. हॉटेलचं बाह्यरूप जेवढं साधं तेवढी तिथल्या चांगल्या चवीची खात्री जास्ती, हे मानणाऱ्यापैकी मी एक. कदाचित महागड्या उग्र वासाच्या ‘डिओ’वर भाळण्यापेक्षा, मोगऱ्याच्या साध्या पांढर्याशुभ्र गजऱ्यावर फिदा होणाऱ्या कदाचित शेवटच्या पिढीचा प्रतिनिधी असणे हे असेल.



डिशचे प्रेझेन्टेशन छान असेल तर उत्तमच पण डिश समोर आल्यावर, त्या पदार्थाचा दरवळ पहिल्यांदा नाकात शिरायला पाहिजे, ही माझी सामान्य समजूत असते. त्यानंतर मग पदार्थ बनवणाऱ्यांना जर आपली दाद मिळाली तर तिथे पुढची व्हिजीट पक्की. नेवरेकर हेल्थ होम ह्या कसोटीला उतरलेलं पुण्यातलं एक जुनं नाव.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर तीनच वर्षात १९५० साली कृष्णाजी नेवरेकरांनी  ‘नेवरेकर हेल्थ होम’ची सुरुवात केली. ६८ वर्षापूर्वीच्या पुण्यात मुळात हॉटेल्सचीच संख्या कमी, त्यातून १००% नॉनव्हेज हॉटेल्स एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच असतील. त्यात स्वतःची खासियत असलेले कोकणी भंडारी पद्धतीचे घरगुती मसाले वापरुन, ती चव पुणेकरांच्या पसंतीला उतरवायचं काम कृष्णाजी नेवरेकर ह्यांनी पहिली काही वर्षे स्वतः केलं. पुढे आपल्या श्री.जयवंत आणि दिनानाथ ह्या मुलांच्या हातात हॉटेलचा कारभार सोपवला. सध्या त्यांची तिसरी पिढी श्री.सुनील नेवरेकर हॉटेल सांभाळतात.



सुरुवातीला चिकन, मटणाच्या 10-12 डिशपासून सुरु केलेली पदार्थांची यादी काळाच्या ओघात वाढत गेली आहे. आता त्याबरोबर अंडी, बांगडा, सुरमई सारखे मासे करीमध्ये आणि फ्राय करून मिळतातच पण पाया, कलेजी तसेच पुण्यात इतर हॉटेलात चुकुनही न दिसणारे वजडी, गुडदा, कपुरासारखे ‘ऑड’ पदार्थही इथे मिळतात. बदल झाला नाहीये तो, हॉटेलच्या स्वरूपात आणि पदार्थांच्या पारंपारिक चवीत.



माझ्यामते ह्याचे कारण आहे उखळात केलेले ताजे मसाले आणि त्याच्या मागे असलेली त्यांच्या गृहलक्ष्मीचे हात. आजही हे सगळे पदार्थ घरी केलेल्या मसाल्यातच बनवले जातात. मग ते अंडी, चिकन, मटण असो किंवा मासे.



नेवरेकरांकडे कुठल्याही रस्याची डिश घ्या, पहिल्याच घासाला रस्यातल्या खोबऱ्याची चव तर लागते पण ती जिभेवरचा भंडारी मसाल्याचा तिखटपणा न घालवता. त्या चवीचा पुरावा नाकातून, कानामागे येणारी पाण्याची एखादी चुकार धार पुसत, आपली डिश कधी संपते ते समजतही नाही.



माझी इथली पसंती भंडारी पद्धतीच्या चिकन आणि भेजाला. सोबतीला काहीतरी पाहिजे म्हणून एखादा बांगडा फ्राय. पूर्वी दुपारच्या वेळी कधी गेलो आणि नशीब जोरावर असेल तर क्वचित गुडदा, कपुराही मिळून जायचा. झणझणीत रस्सा खाताना घडीची पोळी/चपातीपेक्षा मी शक्यतो भाकरी घेतो. एक-दोन ज्वारी किंवा तांदुळाच्या भाकरी घ्यायच्या. रस्स्यात कुस्करून खालेल्या एकेक घासागणिक रस्याची चव जास्तीतजास्त वाढत जाते. पण त्यावर समाधान न मानता इथे थोडी भूक शिल्लक ठेवायला लागते ती ‘चिनॉय राईस’ मागवायला. लोखंडी कढईमध्ये अंडे आणि खिमा ह्यावर गरम मसाला घालून परतलेला अर्धा-ओलसर भात आपल्या समोर येतो. गरज वाटली तर त्यावर अजून थोडा रस्सा ओतून हा ‘चिनॉय राईस’ खाल्ला की “तबियत खुश हो जाती है जानी”!!



ऐन व्यापारी पेठेत असल्याने फॅमेलीज पेक्षाही एकट्यादुकट्याची गर्दी इथे जास्ती. पटकन खा आणि कामाला जा हा इथला सर्वसाधारण खाक्या. त्यामुळे रेंगाळणारे पब्लिक इथे अभावानीच दिसेल. आसपासच्या ऑफिसेसमध्ये, घरात इथल्या १०-२० रुपयात मिळणाऱ्या रस्याच्या पार्सलची मागणीही कायम असते.



नव्वदच्या दशकापासून गणेश, रविवार पेठ भागात येणेजाणे असल्याने नेवरेकरांच्या ‘हेल्थ होम’ मधे जेवायचा योग अनेकदा आलाय. तिथे खाल्लेल्या प्रत्येक डिशबद्दल ती चव पुण्यात इतर कुठल्याही हॉटेलात मिळणार नाही हे मी हॉटेल क्षेत्रातला एक अभ्यासक म्हणून खात्रीने सांगू शकतो. आता माहिती नाही पण पूर्वी मुंबईला फोर्टमध्ये अनेक भंडारी हॉटेल्स होती. ती चव पुण्यात देणारे दुसरे हॉटेल माझ्या माहितीत तरी नाही. त्यामुळे भंडारी पद्धतीचे जेवण पुण्यात खायचे असेल तर मी तडक ‘नेवरेकर हेल्थ होम’चा रस्ता धरतो.

अंबर कर्वे

फूडफिरस्ता

नेवरेकर हेल्थ होम पत्ता

लक्ष्मी रस्ता, डुल्या मारुतीजवळ, गणेश पेठ, पुणे 2 (साप्ताहिक सुट्टी-शनिवार)