पुण्यातून जाताना पिरंगुटचा छोटेखानी घाट उतरून किंचितस पुढे असलेल्या लवळे फाट्यावर असलेल्या श्रीपादमधे जाणं म्हणजे माझ्यासाठी घरच्या किचन मध्ये जाऊन खादाडी करण्यासारखं असतं. गंमत म्हणजे ही भावना माझ्यासारखीच अनेक खवैय्यांची असते.

पुण्यातून घोटवडे फाट्याला एखाद्या कंपनीत, लवासा सिटीला किंवा ताम्हीणी घाटातून कोकणात उतरायचं असुदे, नाहीतर सायकल, मोटरबाईकवर ताम्हीणी घाटात राईडला जायचं असुदे. सगळ्याच पदार्थांचा सातत्याने टिकवलेला दर्जा, उत्तम सर्व्हिसमुळे जातायेता श्रीपादमध्ये थांबून खाण्याची संधी माहीतगार लोक सहसा सोडत नाहीत. ह्याबाबतीत मी त्यांची तुलना पूर्वीच्या पळस्पे फाटा किंवा एक्स्प्रेस वे वरच्या दत्तशी करेन.

फूडफरिस्ता : पिरंगुटचं 'श्रीपाद'


श्रीपाद सुरु झाल्यापासून म्हणजे साधारण २००१ पासून मी वरच्यावर जातोय. त्यावेळी फारतर वीसेक माणसांचीच बसायची सोय, चारी बाजूनी हिरवी शेडनेट लावलेलं छोटेखानी कॅंटीन आता शेसव्वाशे माणसांच प्रशस्त हॉटेल झालंय. पण लांबून बघताना विटकरी रंगावर वारली पेंटिंग केलेला बाहेरील डेकॉर मनातून, "खेड्यामधले घर कौलारू" ची आठवण करुन देतो.



पिरंगुटमध्ये चांगली मिसळ, भजी, वडापाव आणि घरगुती जेवणाची सोय करून देणारं श्रीपाद, कै. दिलीप पाटील ह्यांनी सुरु केलं. त्यांच्या पत्नी माधवी पाटील ह्यांनी आजूबाजूच्या इंडस्ट्रियल इस्टेट मधे जेवणाचे डबे देऊन त्यांना बरोबरीने साथ दिली.मी स्वतः त्याचा एक साक्षीदार आहे.

कै. दिलीप पाटील ह्यांच्यानंतर गेल्या ८ वर्षांपासून त्यांचा मुलगा ओजसच्या देखरेखीखाली श्रीपाद मोठं होत गेलं.जागेबरोबरच हॉटेलचा मेन्यूही वाढत गेला.नेहमीच्या पदार्थांबरोबरच तिथे दिवसभर थालीपीठ लोणी,पंजाबी भाज्या,वीकेंडला स्पेशल मुगभजीही ‘सर्व्ह’ व्हायला लागली.



सकाळी ८ पासून पोहे,उपमा,मिसळ,भजी बनवून श्रीपादच्या किचनची सुरुवात होते.विशेषतः शनिवार-रविवारी सकाळी लवकर कोकणात जाणाऱ्या गाड्यांना किंवा आसपास इव्हेंट्स करता जाणाऱ्या गृप्सना, 'प्रिऑर्डरवर पॅक नाश्ता' देणं,हे इथलं एक मुख्य काम  असतं.

मिसळ तर सतत भरलीच जात असते आणि दुपारी  आसपासच्या भागात असणाऱ्या कंपनीज मधे येणाऱ्या लोकांची जेवणाच्या थाळीसाठी,पंजाबी डिशकरता गर्दी होते.संध्याकाळपर्यंत वडापाव बरोबर सँडवीचेस ज्यूस,शेक,कोल्ड कॉफीही (मस्त आहे ) सुरु असतेच.कोणत्याही हॉटेलमधे येवढा भरगच्च मेन्यू ठेवणं आणि तो दिवसभर हसतमुखाने सर्व्ह करत रहाणं कितपत अवघड आहे,ह्याची कल्पना कोणत्याही हॉटेलवाल्यांना चटकन येईल.



श्रीपादमधे खाण्यासाठी माझा चॉइस मटकी,वाटाण्याच्या उसळीबरोबर उकडलेला बटाटा घातलेल्या रस्स्याची मिसळ.त्यावर नेहमीच्या शेव फरसाण बरोबर हॉटेलात सहसा न दिसणारा स्पेशल मका चिवडा असतो.त्याची किंचीतशी गोडी मिसळीच्या तिखटाची चव थोडी ‘न्युट्रल’ करते.त्यामुळे दिसायला ही मिसळ, लालभडक दिसली तरी सर्वसामान्य जनतेला खाता येईल इतपत माफक तिखट बनून जाते.मी मालकाला लग्गा लाऊन मिसळीबरोबर ‘वैच’ तिखट रस्सा मागवतो, हात पुसण्यापुरताच एखादा पाव घेतो.



उन्हाळ्यात मिसळीबरोबर नारळाच्या सोलकढीचा ग्लास आणि त्याच्या जोडीला कांदाभजी.भजीचा तुकडा मीठ लावलेल्या तळलेल्या तिखट मिरचीबरोबर खाताना मिसळीची लज्जत अजून वाढत जाते.श्रीपादमधे कुरकुरीत तळलेल्या भजीवर थोडी बारीक शेव भुरभुरून मिळते,हे ‘कॉम्बो’ही झकास आहे. पावसाळ्याच्या दिवसात मिसळ झाल्यावर ओजस आणि त्याची पत्नी साईलीबरोबर गरमागरम कॉफीचे घोट घेत गप्पा मारत वेळ फार चटकन निघून जातो.



पिरंगुटसारख्या आता पुण्याचं उपनगरच झालेल्या, गजबजलेल्या औद्योगिक भागात असलेल्या 'श्रीपाद'ची ख्याती आता फक्त पुण्यातच नाही तर अनिवासी भारतीयांमुळे परदेशातही पसरलीय.

आसपासच्या कंपनीत कामानिमित्त येणारे, कोकणात ट्रिपला जाणारे-येणारे,सायकलिंग,मोटरबाईक राईड्स करणारे तर इथे आवर्जून थांबतातच.

मधे एकदा श्रीपादमधे बसलो असताना,जवळच्याच PVPCOA च्या हॉस्टेलच्या इथे नेहमी येणाऱ्या काही विद्यार्थ्याचा ग्रुप भेटला.त्यांच्या ऑर्डरची रेंज तर थाळी,मिसळ पासून,वडापाव,चीज थालीपीठ,चीज सँडवीच विथ कोल्ड कॉफीपर्यंत होती.“इथे रोज जेवलं तरी कधी पोटाचा त्रास होत नाही”त्यांची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी बोलकी होती.एक व्हेज फॅमेली हॉटेल,हॉस्टेलच्या ‘पोरांना’ घरच्यासारख वाटणं ही मला श्रीपादच्या घवघवीत यशाची ही सगळ्यात मोठी पावती वाटते.तशीही घरच्या जेवणाची किंमत बाहेर राहणाऱ्यांना (किंवा बाहेर राहिल्यावर) जास्त समजते.



निघताना श्रीपाद मधल्या जाहिरातीच्या बोर्डवरच्या ओळींवर लक्ष जातं."श्रीपाद आता एक हॉटेल राहिलेलं नाही, तर एक मोट्ठं कुटुंब झालय". इथे नेहमी येणाऱ्या लोकांबरोबर कधी बोललं तर त्या जाहिरातीतल्या ओळी नाही, तर आपलंच मनोगत वाटतं.

अंबर कर्वे यांचे याआधीचे ब्लॉग वाचण्यासाठी क्लिक करा