Blog : दिल्लीत असतानाची गोष्ट. साहित्य अकादमीनं ट्रान्सजेन्डर कविता हा कार्यक्रम ठेवला होता.  इथं आलेल्या प्रत्येकीनं  कवितेतून आपलं भावविश्व उलगडून सांगितलं. आपण कोण आहोत याची त्यांची त्यांना झालेली ओळख, त्यावेळी घर आणि समाजाकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक, आपली आयडेंटीटी जपण्यासाठी केलेली धडपड, घराबाहेर पडल्यानंतर आलेले अनुभव, हेळसांड, हे सर्व काही कवितेतून व्यक्त झालं. यापेक्षा ही महत्त्वाचं होतं स्वत:चा स्वत:शी असलेला स्ट्रगल. तिथं आलेल्या अनेकींनी जेंडर चेन्ज शस्त्रक्रिया केल्या होत्या. काही त्या प्रक्रियेत होत्या. सध्या तंत्रज्ञान इतकं बदललंय की ही शस्त्रक्रीया तेवढी कठीण राहिलेली नाही. पण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्या शस्त्रक्रियेला आणि त्यानंतर होणाऱ्या हार्मोनल थेरपीला ते साथ देईलच याची शाश्वती नाही. मग एखाद्या वेळी ऋतूपर्णो घोष सारखं घडतं. जागतिक सिनेमाच्या क्षेत्रात एव्हढं मोठं नाव कमावणारा हा दिग्दर्शक अचानक गेला. हार्मोनल ट्रिटमेन्टनंतर शरिरातल्या कॉम्प्लिकेशनशी लढा देऊ शकला नाही. ऋतूपर्णो गेला त्याला आता आठेक वर्षे होतील. तो भारतातल्या एलजीबीटी कम्युनिटीचा चेहरा झाला होता. गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये जागतिक पातळीवर आणि भारतात ही एलजीबीटी कम्युनिटीसंदर्भात अनेक नियम आणि कायद्यात बदल झाले. भारतासारख्या रुढी परंपरा आणि सामाजिक बंधनांमध्ये अडकलेल्या समाजात ही गे मॅरेज, ट्रान्सवुमन आणि होमो तसंच लेस्बियन संबंधांबद्दल खुलेपणानं चर्चा झाली. मोर्चे निघाले. जाहिरपणे गे आणि लेस्बीयन लग्न ही झाली. आत किती ही क्लिष्ट असलं तरी वरवर त्यांचं जग बदललं असं वाटत असलं तरी स्ट्रगल संपलेला नाही. पण काहीतरी सुरुवात झाली याचा आनंद आहे. 


हे नाव गेल्या एक महिन्याभरात सर्वांच्या तोंडी आहे. मिस युनिव्हर्स हरनाज संधूनं जो डिजायनर ड्रेस घालून किताब मिळवला तो शायशानं डिजाईन केला होता. तिचं जगभरातून त्याबद्दल कौतुक झालं. सायशा सेलिब्रेटी होतीच पण ती नव्यानं लाईमलाईटमध्ये आली. सायशा ट्रांसवुमन आहे. आधीची स्वप्निल म्हणजेच आताची सायशा. वर्षभरापूर्वी स्वप्निलचा सायशा झाली. आता ती फॅशन इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वप्निलचा सायशा होताना नक्की काय काय घडलं याबद्दल खुप इमोशनल आणि प्रचंड प्रभावी इंस्टापोस्ट सायशाने शेअर केली आहे. 


वर्ष सरताना सायशानं केलेली पोस्ट फक्त ट्रान्सजेन्डरलाच नव्हे तर माणूस म्हणून जन्माला आल्याला प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. आपल्या पोस्टमध्ये सायशा म्हणते, ''स्वप्निलला नेहमीच आपल्या शरीराबद्दल न्यूनगंड होतं. तो मस्क्युलर नाही म्हणून तो नेहमी टिशर्ट घालून स्विमिंगपूलमध्ये उतरायचा. मग भिजलेल्या अंगाला टिशर्ट चिटकायचं, त्यातून आपलं स्त्रियांसारखं उभारलेलं शरीर दिसू नये म्हणून तो मग फक्त डोकंच पाण्याबाहेर काढायचा. त्यामुळं पूल पार्टी किंवा मग पूल ही संकल्पनाच नकोशी वाटायची. प्रत्येक स्विमिंगपूलवाला टिशर्ट घालून पाण्यात उतरु देईलच असं नव्हतं. त्यामुळं हे आनंदाचे क्षण इच्छा असूनही अनुभवायला मिळायचे नाहीत. नुकतिच मी स्विमिंगपुलमध्ये उतरली. शायशा म्हणून पहिल्यांदाच. माझं शरीर ‘मापा’त होतं असं नाही. पण ब्रा आणि डेनिम घालून एकदम कसं सुटसुटीत वाटलं. माझी ब्रेस्ट, माझं पोट सर्व काही दिसत होतं. माझ्या मनात लाजरेपणाची किंवा असुरक्षेची भावनाच आली नाही. ट्रान्सजेन्डर वुमन होऊ वर्षे झालं. आता मी मुक्तपणे श्वास घेऊ शकते. मी सर्वांचे आभार मानते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वताला थँक्यू म्हणावसं वाटतंय.''


सायशाची ही पोस्ट त्या असंख्य पुरुषांच्या शरीरात अडकलेल्या तिच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. नेटफ्लिक्सला नुकताच एक सिनेमा पाहिला. चंडीगड करे आशिकी (2021). आयुषमान खुराना आणि वाणी कपूर आहेत त्यात. वाणी कपूर यात ट्रान्सवुमन झालीय. पंजाब-हरियाणासारख्या राज्यांमधल्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा बननं हेच मोठ्ठ काम झालंय.


दिग्दर्शक अभिषेक कपूर हा सिनेमा आणि स्वप्निलचा शायशा होणं हे एकाच वेळी येणं याला योगायोग म्हणता येणार नाही. सिनेमा, साहित्य, नाटक ही माध्यमं आसपास होणाऱ्या बदलांना नेमकं टिपत असतात. जग खरंच बदलतंय, ‘नजर बदलो दुनिया बदलेगी’ असं सांगतंय. 'कपूर एँड सन्स (2016) असो किंवा मग 'अलीगढ' (2015). भारतीय सिनेमात आलेला एलजीबीटी समुदायाचा विषय असो किंवा  आता तर जेम्स बॉन्डचं गे कनेक्शन असो, एकूणच ट्रान्स या विषयाकडे जगाचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचे संकेत मिळतायत. ही एक पॉझिटीव्ह गोष्ट आहे.