Fallen Leaves (2023) : पहिल्या डेटला 'झोंबी' मुव्ही बघायला कोण जातं? फिनिश डायरेक्टर अकी कौरस्किमीचे अन्सा आणि होलोप्पो ही 'पात्रं' जातात. ते थोडे वियर्ड आहेत हे दिसत असतं. पण आता खात्री पडते. सिनेमा संपल्यावर तो घरी सोडू का असं तिला विचारतो. ती म्हणते मी जवळच राहते. नंतर भेटुच. आपला नंबर देते. थेट निघून जाते. तो खिशातून सिगरेट काढतो, सुलगावतो आणि विरुध्द दिशेने लावायला लागतो. तिचा नंबर लिहिलेला कागद खिश्याबाहेर पडतो. उडून जातो. आता हे दोघे कसे भेटणार याचं उगाच टेन्शन प्रेक्षकांना येतं. दोघे मिसफिट आहेत. काय करतील याचा नेम नाही.
अन्सा आणि होल्लापो तिशीत आहेत. एकटे आहेत. ती सुपर मार्केटमध्ये काम करते. तो कारखान्यात. तो बेवडा आहे. ती एकटी. दोघंही कामगार आहेत. हाच त्यांच्यातला कॉमन फॅक्टर आहे. काम आणि नोकऱ्या सतत बदलतायत. दिल बहलाने के लिए एखाद मित्र-मैत्रिण आहे. त्यांच्यासोबत बारमध्ये जातात. पण तिथंही एकटेच असतात. अश्याच एका संध्याकाळी एकमेकांना पाहतात. हे लव एट फर्स्टसाइट समजण्याची गफलत करु नये. तो एक जाणिवपुर्वक घेतलेला मॅच्युअर्ड निर्णय असतो. तिला तो हवाय पण दारू न पिणारा. त्याला कुणी ऑर्डर दिलेलं आवडत नाही. थेट तिच्या घराबाहेर पडतो. काही क्षणात वाईल्ड बेड सीनची कल्पना करणाऱ्या प्रेक्षकांचा केएलपीडी होतो.
पण अकी कौरस्किमी सिनेमॅटिक 'मॅचमेकर' आहे. तो दोघांना सिनेमाभर इकडे तिकडे भटकवतो. भांडायला लावतो. शेवटी एकत्र आणतोच. आता तिच्यासोबत चॅप्लिन असते. तिच्या कारखान्याबाहेरची सोडलेली भटकी कुत्री. ती चॅप्लिनवरही प्रेम करते.
अकी कौरस्किमीचा हा कामगार वर्गावरचा तिसरा सिनेमा आहे. अन्साची भूमिका अल्मा पॉइस्टीने केलीय. जसी वेटनन होलोप्पो बनलाय. करोनाच्या आधी अकी दोघांना भेटला. गोष्ट सांगितली. स्क्रिप्ट या भेटीच्या वर्षभरानंतर मिळाली. 20 दिवस शुटींग चाललं. कान फिल्म फेस्टिवलमध्ये फॉलन लिव्स ज्युरी अवार्ड मिळालं. मे 2023 मध्ये. तेव्हापासून अल्मा आणि जसी फॉलन लिव्स (2023) बद्दलच बोलतायत.
अन्सा आणि होपोल्लो एकटे राहतात. एकटेपणा घालवण्यासाठी अन्सा रेडिओ ऐकते? रेडियोवर सतत युक्रेन-रशिया युध्दाच्या बातम्या आहेत. तो कॉमिक्स वाचतो. ते कित्येकदा वाचलंय. शरीर आणि मनाच्या गरजा दोघेही नाकारत नाहीत. सिनेमाभर एकमेकांना शोधत असतात. पुढे ते शेवटपर्यंत एकत्रच राहतील याची शाश्वती नाही. पण इथंवरचा प्रवास भारीय. मिसफिट्सचं मनोमिलन चांगलंय. शेवटी वसंत येणारेय. त्याआधी पानगळती होणारच.