उद्धव ठाकरेंनी यावेळेस विधानसभा निवडणुकीनंतर वेगळी भूमिका घेतल्याने भाजपच्या गायपट्टयातल्या हिंदीभाषिक उच्चवर्णीय हिंदुत्ववादी पुरुषप्रधान राजकारणाला महाराष्ट्रात यावेळेस पाय पसरता आले नाहीत. सांस्कृतिकरित्या आणि आर्थिक दृष्टीने भारताचे दोन मोठे विभाग आहेत, विंध्य पर्वताच्या वरचा उत्तर भारत आणि महाराष्ट्रापासून खालचा दक्षिण भारत. उत्तर भारतातले काश्मीर, पंजाब आणि ईशान्य भारत हा भाग सोडला तर उरलेला भाग म्हणजे गायपट्टा आहे. उत्तरेतला गायपट्टा आणि दक्षिण भारत या दोन्ही भागांमध्ये असणारी संस्कृती आणि आर्थिक घडामोडी वेगळ्या स्वरूपाच्या आहेत.


शिक्षण, व्यवसाय, व्यापार, उत्पन्न, स्त्रियांचे स्वातंत्र्य, सामाजिक एकता, आधुनिक विचार याबाबतीत महाराष्ट्रापासून खालचा दक्षिण भारत अत्यंत पुढारलेला आहे. याउलट धार्मिक-जातीय विद्वेष, अशिक्षा, बेरोजगारी, गुन्हेगारी, सामाजिक मागासलेपणा याबाबतीत गायपट्टा आघाडीवर आहे. भारताच्या आर्थिक सर्वेक्षणांचे, NCRB तल्या गुन्ह्यांचे आकडे पाहिले तर हा फरक अगदी सहजपणे दिसून येतो. दुर्दैवाने भारताच्या एकूण लोकसंख्येत गायपट्टा सगळ्यात मोठा भागीदार आहे आणि म्हणूनच संसदेच्या बहुतांश जागा याच गायपट्टयातून निवडल्या जातात, आणि इथेच खरी गोची होते.


गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजप केंद्रात सत्तेत आहे याला कारण विकास वगैरे अजिबात नाहीये, तर त्यांनी गायपट्टयातल्या हिंदीभाषिक राज्यात उच्चवर्णीय, हिंदुत्ववादी आणि पुरुषसत्ताक राजकारणाचा जुना राग नव्याने आळवायला घेणे आणि जिथे हे शक्य नव्हते तिथे स्थानिक पक्षांशी युती करून बेरजेचे राजकारण करून स्वतःच्या जागा वाढवणे. देशाचा आर्थिक विकास दक्षिणेकडून होतो पण देशाच्या राजकारणावर चष्मा उत्तर भारतीय राजकारणी लोकांचा आहे. भाजपचे शक्तीस्थळ हा गायपट्टा आहे आणि त्यांचे ध्येय हेच आहे की गायपट्टयातली संस्कृती (?) महाराष्ट्राकडून दक्षिण भारताकडे सरकवत नेऊन समस्त देश हिंदुराष्ट्र बनवणे.


भाजपच्या या हिंदुत्ववादी विस्तारात कधीकाळी स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या शिवसेनेनेच यावेळेस खोडा घातला. राज्यातली सत्ता तर गेलीच, वरून "राजकारण आणि धर्म यांची मिसळ करणे ही आमची चूक होती" हे प्रांजळपणे मान्य करणारे उद्धव ठाकरेंचे शांत आणि संयमी नेतृत्वही लोकमान्य झाले. शिवसेना बाळ ठाकरेंच्या उत्तरार्ध मार्गाने न जाता, त्यांच्या पूर्वार्ध मार्गाने प्रबोधनकार ठाकरेंची भाषा बोलायला लागली आणि महाराष्ट्र भाजपच्या पायाखालची वाळू सरकली. सत्ता जाण्यापेक्षाही उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आजोबांच्या मार्गाने जाणे भाजपच्या प्रतिगामी राजकारणाला महाराष्ट्रात सुरुंग लावणारे ठरले.


ह्याच कारणाने गेले कित्येक महिने कोरोनाच्या संकटकाळातही महाराष्ट्र भाजपचे नेते उद्धव ठाकरेंना रचनात्मक विरोध न करता अंधपणे विरोध करते झाले. त्यासाठी नसलेले मुद्दे बनवले गेले. पालघरमध्ये अफवेतून घडलेल्या दोन गोसाव्यांच्या हत्याकांडात एकही मुस्लिम सहभागी नसताना त्याला हिंदू मुस्लिम रंग दिला गेला. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनारुपी भाजप एजंटकडून सुशांतला बिहारचा सुपुत्र वगैरे बनवून मुंबईची तुलना POK शी केली गेली, एवढंच काय जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखवला गेला. अर्णबसारखे विकाऊ पत्रकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकेरीत आव्हान देऊ लागले. रवीकिशनसारखे लोक मुंबईच्या सिनेसृष्टीला, बॉलिवूडला गटार म्हणाले.


महाराष्ट्र, मुंबई, इथली सिनेसृष्टी आणि इथले सरकार यांच्यावर देशभरातील गोदी मीडियाने, कंगनासारख्या भाजप एजंटनी काहीही कारण काढून गेले 3 महिने रात्रंदिवस टीकेची झोड उठवली. आणि या निर्लज्ज टीकेला इथले भाजपाई पाठिंबा देत राहिले कारण त्यांना सत्तेत यायची अपार घाई झालेली आहे. सत्तेचं राजकारण मीही समजू शकतो, पण ते इतकं खालच्या थराला जाऊ नये की त्यासाठी या महान आणि मंगल राज्याला, तिथल्या कर्तव्यदक्ष पोलिसांना, सुसंस्कृत राजकीय व्यवस्थेला कुणी बट्टा लावावा. आज प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे जर हयात असते तर त्यांना महाराष्ट्र भाजपमधल्या आजच्या नेत्यांची नक्कीच लाज वाटली असती, कारण त्यांनी कधीही विरोधात असताना महाराष्ट्राशी द्रोह केला नाही.


महाराष्ट्र आज ज्या ठिकाणी आर्थिक सुबत्तेने, कायदा सुव्यवस्थेने उभा आहे त्यामागे छत्रपती शिवाजी, शाहू, फुले, गांधी, आंबेडकर, नेहरू, प्रबोधनकार ठाकरे, गाडगेबाबा, सानेगुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महान लोकांचे विचार आणि इथे केलेले कार्य आहे. हा महाराष्ट्र धार्मिक-जातीय विद्वेषाला थारा देऊ शकत नाही, स्त्रियांना बांधून ठेवू शकत नाही, भीक मागण्याचे उदात्तीकरण करू शकत नाही. सत्तेच्या राजकारणासाठी कुणी इथल्या सुबत्तेला, शांततेला, स्थैर्याला, व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा महाराष्ट्रद्रोह करू नये. बाकी महाराष्ट्र भाजपच्या ज्या नेत्यांना बिहार निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सुशांतसिंग राजपूत हा एकमेव बिहारचा सुपुत्र दिसतोय, त्यांनी लॉकडाऊनमध्ये रस्त्यांवर बायकापोरांसह अनवाणी, उपाशी चालत गेलेले लाखो बिहारी आठवावे, आणि स्वतःच्या केंद्रातील सरकारला बिहारच्या त्या लाखो बिहारी लेकरांची आठवण करून द्यावी. केंद्र सरकारकडे त्यांची माहिती नाहीये म्हणे!


डॉ. विनय काटे यांचे आणखी काही ब्लॉग


BLOG | आमच्या देशात रॉकस्टार का निर्माण होत नाहीत?


BLOG | दिल्लीचा Serological Survey काय सांगतो?


भारतीय जनतेचं संज्ञान असंतुलन - 'मोदी व गांधी'