मृत्यू शाश्वतच आहे आणि व्यक्ती कितीही पुण्यवान किंवा पापी असेल तरीही शेवटचा श्वास सुरू असताना म्हणे, यमदूताशी आत्मसंवाद सुरू असतो म्हणे! त्यासमयी, "मी फक्त कुटुंबासाठीच जगले नाही तर कर्तव्यदक्ष राहून ईमानाने राष्ट्रीबांधणी करण्याचेच कार्य केलेय" हे नीला सत्यनारायण यांनी यमदूताला अन् भारतमातेला दिलेलं उत्तर असावं...!


नुकताच राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे. 71 वर्षीय नीला सत्यनारायण या मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजाराने अगोदरच ग्रस्त होत्या. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचे झालेले निधन उभ्या महाराष्ट्राला चटका लावून गेले. खरं तर त्यांचे उदाहरण मी MPSC/UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक वेळा दिले आहे. स्टडी सर्कल व स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात डॉ. आनंद पाटील यांनी गणेश क्रीडा कला स्वारगेट पुणे या विशाल सभागृहात छत्रपती शिवरायांचे प्रशासन आणि सकारात्मकता या विषयावर संबोधित करण्यास मला निमंत्रित केले होते. खरं म्हणजे आजवर राहुरी कृषी विद्यापीठ, नागपूर, अमरावती, मुंबई आदी ठिकाणी लाखो विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे. त्यातील अनेक जण उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा माझ्याशी आजही संपर्क असतो.

मुंबईत 5 फेब्रुवारी 1949 ला मराठमोळ्या मांडके कुटुंबात जन्मलेल्या नीला सत्यनारायण ह्या, 12000 हृदयशस्त्रक्रिया (शिवसेनाप्रमुखांच्या हार्टसर्जरीसह) यशस्वीपणे केलेल्या डॉ. नितु मांडके यांच्या चुलत भगिनी, 1972 बँचच्या आयएएस होत्या. त्यांच्या आईवडीलांच्या संस्काराचा पाया मजबूत होता, परिणामी गृह, महसूल, ग्रामविकास, वन अशा महत्त्वाच्या खात्यात त्यांनी काम केले.
आपण IAS झालोय तेच मुळी सामान्य गोरगरीब आणि ज्यांचे कोणीच नाही त्यांना शासकीय पदाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी, फक्त पगारावरच जगायचं, इमानदारीने काम करायचं, सिस्टीम मध्ये इतर लोक भ्रष्टाचार करतात म्हणून आपणही त्या सिस्टीमचा भाग बनण्यापेक्षा आपलं अंगण स्वच्छ ठेवायचं हाच ध्यास आणि धारणा होती.


नीलाजींनी सेवानिवृत्त होईपर्यंत लाखों सामान्य रयतेचा स्वच्छ प्रशासन देऊन आशीर्वादच घेतला. एवढंच नाही तर 13 पुस्तके आणि 3 कविता संग्रह, त्यांच्या कथेवर आधारीत बाबांची शाळा यासह इतर 2 हिंदी आणि मराठी चित्रपटाला संगीत दिग्दर्शनही केलं. नीलाजींच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीचं एकच उदाहरण इथे देतो, त्या IAS झाल्याबरोबर त्यांची ZP CEO म्हणून नियुक्ती झाली आणि शिक्षकांची भरती निघाली होती. तिथल्या प्रथेप्रमाणे एका राजकारणी घराण्याने शिफारस केलेली यादीच त्यापूर्वीचे CEO नियुक्त करायचे.


त्या शिरस्त्याप्रमाणे तशीच शिक्षकांकडून आर्थिक देवाणघेवाण झालेली वशिल्याची यादी त्यांच्याकडे राजकारणी व्यक्तीकडून आली. ती यादी नीला सत्यनारायण यांनी फाडून कचराकुंडीत टाकली आणि स्वतः मुलाखती घेत, गुणवत्ता हा एकमेव निकष लावत सर्व शिक्षकांना नियुक्त केले. जर त्या ठिकाणी त्यांच्या ऐवजी दुसरा भ्रष्टाचारी अधिकारी असता तर मिलीभगत करून वशिल्याचे शिक्षक नियुक्त केले असते. पैसे देऊन भरती झालेल्या शिक्षकांनी सुद्धा आयुष्यभर शाळेवर पाट्याच टाकल्या असत्या. याउलट एक पै ही न देता, गुणवत्तेमुळे निवड झालेल्या शिक्षकांनी मात्र तळमळीने विद्यार्थी घडविले असतील.


म्हणजे एक अधिकारी एक दिवसांत एवढं राष्ट्र उभारणीचे व बांधणीचे कार्य करू शकतो हे नीलाजींनी दाखवून दिले. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्या निवृत्त झाल्या. कोणतेही नियमबाह्य काम करायचेच नाही, हा त्यांचा खाक्या असल्याने त्याची कारकीर्द कायम गाजली. आज सुनील केंद्रेकर, गो. रा. खैरनार, प्रवीण गेडाम, चंद्रकांत गुडेवार, आय.पी.एस. जावेद अहमद, आयपीएस विरेश प्रभू, डॉ. छेरिंग दोरजे मनोज शर्मा, सदानंद दाते आणि अजूनही असे काही चांगले अधिकारी आहेत. ज्यांच्या स्वच्छ आणि सुप्रशासनाची उदाहरणे देता येतील. अशी बोटावर मोजण्या इतकेच अधिकारी आज महाराष्ट्रात आहेत. नाहीतर दुसऱ्या बाजूला 95% अधिकारी भ्रष्टाचारीच आहेत. राष्ट्राला लुटण्याचे काम ते निवृत्त होईपर्यंत करीत असतात.


भ्रष्टाचारी अधिकारी देशद्रोहीच


उस्मानाबाद येथे शोभा राऊत या निवासी उपजिल्हाधिकारी होत्या. त्या मुळच्या नगर जिल्ह्यातील. पूर्वी त्या प्राथमिक शिक्षिका होत्या. हलाखीच्या परिस्थितीतून त्या उप जिल्हाधिकारी बनल्या होत्या. हाय वे मध्ये गेलेल्या भूसंपादनात फळबागांची नुकसान भरपाई म्हणून सरकारचे अनुदान आले होते. त्यात 5 टक्के टक्केवारी घेतल्याशिवाय शेतकऱ्यांना चेक दिले जात नव्हते. बिचारा शेतकरी अगोदरच कायम संकटात असतो. त्यात भयाण दुष्काळ, परिणामी आत्महत्या खूप होत होत्या. शेवटी काही शेतकऱ्यांनी ACB कडे तक्रार केली आणि दिनांक 27 फेब्रुवारी 2014 ला रंगेहाथ 39200 रूपयेची लाच घेताना उपजिल्हाधिकारी शोभा राऊत यांना लाचलुचपत अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांच्या घरी धाडी पडल्या. घरात 88 लाख रूपये रोख सापडले. शेवटी कोर्टात 17 जुलै 2017 ला केस सिद्ध झाली आणि त्यांना 8 वर्ष कैदेची शिक्षा झाली. त्यांना बडतर्फ व्हावे लागले आणि सर्वस्व गमावल्याच्या धास्तीने तुरुंगात त्या गंभीर होत्या.


लाच घेताना अनेक अधिकाऱ्यांना अटक झाली त्यात परभणीत तिथल्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, शेषराव घुगे सुद्धा असेच ट्रॅप झाले होते. त्यांच्याकडे सुद्धा अशीच बेहिशोबी करोडोंची संपत्ती जप्त केल्या गेली. दरम्यानच पाटबंधारे घोटाळ्यात सतीश चिखलीकर, दीपक देशपांडे असे बरेच अभियंते सापडले, यांच्याकडे तर करोडों सापडलेच परंतु तालुक्या~तालुक्यातील लॉकरमध्ये किलोने सोनं सापडलं. सामान्यांना लुटून राष्ट्रद्रोह केला होता, किती भयंकर हे, ही हिमनगाचे टोके आहेत. तलाठी ग्रामसेवकांपासून सचिव, आमदार खासदार, मंत्री बरीच मोठी साखळी! साधा 7/12 उतारा असू देत की फेर ओढायाचा असू देत. सामान्यांचीच पिळवणूक ठरलेली. हे राष्ट्र ! राजकारण्यांपेक्षाही नोकरशाहीच्या भ्रष्ट कारभाराने पोखरलं जातंय, यात आशेचा किरण म्हणजे बोटावर मोजण्याइतकी प्रामाणिक अधिकारी आणि न्यायव्यवस्था यावरच लोकांचा विश्वास उरलाय. असे अनेक अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. गलेलठ्ठ पगार, नोकरचाकर, बंगला, गाडी, मानपान सर्व असतानाही प्रत्येक कामात टक्केवारी घेतल्या शिवाय कामच करत नाहीत. त्यांच्यासाठी भ्रष्टाचार जणू शिष्टाचार झालाय.


आज सकाळी विष्णुपुरी नांदेडचा प्रवीण पंडीतराव हंबर्डे या MPSC अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा माझ्याशी संवाद झाला. त्याला काही आठवड्यापूर्वीच अधिकारी झालाच तर नीला सत्यनारायण आणि इतर प्रामाणिक अधिकाऱ्यांसारखं हो! असं बोललो होतो. तो आज नीलाजींच्या निधनाने हळवा झाला होता. त्याची एकाच वाक्यात सांत्वना केली,
"तू उपजिल्हाधिकारी किंवा DySP हो परंतु फक्त पगारावरच जग आणि छत्रपती शिवरायांचं प्रशासन दाखवून दे !" प्रसंगी सामान्य रयतेच्या घराघरात, गोरगरिबांच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ दे! आयुष्यात भ्रष्टाचार कधीच करू नकोस, हीच नीला सत्यनारायण यांना खरी श्रद्धांजली ठरेल! असे सांगितले. त्यानेही मला आश्वस्त केले. अधिकारी झाल्यास स्वतः चे जीवन तर एका उंचीवर जातेच. परंतु, पगार घेऊन सेवानिवृत्त होईपर्यंत. खूप लोकांचे आशिर्वाद घेऊन मोठी राष्ट्रबांधणी करता येते, अनेक अधिकाऱ्यांनी हे पुण्य पदरात पाडून घेतलंय आणि काही आजही चांगलं काम करीत आहेत.


दिनांक 28 फेब्रुवारी 2020 ला, मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी घाटकोपर मुख्यालय मैदानात शिवचरित्रातून राष्ट्रनिर्माण हे व्याख्यान आयोजित केले होते, त्यांनी अनेक सुधारणावादी कामे तिथे केली त्यापैकी एकच सांगतो, रेल्वेतून चोरांनी जे दागिने चोरून नेले होते, ते जप्त करून नव्याने अनेक क्लिष्ट गुन्हे उकल तर केलेच. परंतु, दागदागिने त्यांनी भाऊबीजेला अनेकांच्या घरी पोहोच केली. परत मिळण्याची आशा सोडून दिलेल्या अनेक मायभगिनी ढसाढसा रडल्या. अशा कामामुळे लोकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढतो,हे फार महत्त्वाचे आहे, रेल्वे पोलिसांसमोर बोलताना मी अनेक उदाहरणे दिली होती, त्यापैकी एक, मासेविक्री करून रेल्वेत प्रवास करणाऱ्या एखाद्या कोळी मायभगिनीच्या गळ्यातील सोन्याचा दागिना कोणत्या स्टेशन दरम्यान चोरीला गेलाय यावरून तो कोणत्या टोळीने चोरला हे पोलिसांना पक्के ठाऊक असते. फक्त ठराविक हफ्ता पोलिसांपर्यंत पोहोच होतो आणि मग त्याच कमाईतून एखादा पोलीस बायकोला दागिना घेतो तो त्या कोळीणीच्या शापाचा असतो.


पुराणकथेत वाल्याने चोरीतून आणलेल्या कमाईच्या पापात वाटेकरी व्हाल का? असा प्रश्न बायका पोरांना विचारला तेंव्हा सर्वांनी नकार दिला तिथंच वाल्याच्या वाल्मिकी होण्याची सुरुवात झाली, मी व्याख्यानात म्हटलं.. पोलीस हो! जरी आजवर भ्रष्टाचार केला असेल तरीही या क्षणापासून ठरवा की सेवानिवृत्तीपर्यंत उर्वरित आयुष्य ईमानाने जगेल." शासकीय अधिकाऱ्यांसमोर किंवा स्पर्धा परीक्षार्थींसमोर व्याख्यान देताना अजून एक उदाहरण मी कायम देत असतो, ते म्हणजे नोव्हेंबर 2009 मध्ये काश्मीरमध्ये हिमदरड, लष्कराच्या मजबूत वाहनावर कोसळून 26 सैनिक दबून ठार झाले होते, खरं म्हणजे दरडीच्या पडलेल्या दगडांच्या वजनाने दबून झालेला मृत्यू लष्करासाठी धक्का होता कारण दरडी कोसळल्यानंतर कोणीही सैनिक दबून मरू नये यासाठी लष्कराने हे वाहन खास संशोधन करून तयार केलेले होते. म्हणून या दुर्घटनेवर चौकशी समिती बसविली तर त्याचे धागेदोरे महाराष्ट्रातील अहमदनगर येथे असणारी व्ही.आर.डी.ई. म्हणजेच वेहिकल रिसर्च डेव्हलपमेंट पर्यंत आले आणि याच संस्थेत नोकरी करून निवृत्त झालेले वाहन गुणवत्ता नियंत्रण वैज्ञानिक अधिकारी फय्याजुद्दीन अय्याजूद्दीन, (वय 61), ए.जे.पवार (वय 59), ए. प्रभाकरन, (वय 59) या तिघांना दिनांक 10 फेब्रुवारी २2010 रोजी अटक केली.


हिमाच्छादित प्रदेशात दरडी कोसळून वाहन दबून, सैनिक मरू नयेत म्हणून वाहनांच्या सांगाड्यात 40 किलो वजनाच्या साखळ्या, मूळ संशोधनात प्रमाणित केल्या होत्या. त्या साखळ्या पुण्यातील शर्मा एंटरप्राइजेस या कंत्राटदाराने, वरील तीन भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून, 40 किलोच्या जागी 18 किलोच्याच वजनाच्या साखळ्या, काही लाखांची लाच देऊन वरील अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेतल्या, परिणामी काश्मीरमध्ये 26 सैनिकांना प्राण गमवावे लागले, कल्पना करा, काही लाखांची लाच स्विकारताना या अधिकाऱ्यांनी फक्त तात्पुरता स्वार्थी विचार केला. परंतु, 26 जणांपैकी कोणी वृद्ध मातापित्यांची वृद्धापकाळातील एकमेव काठी होती, तर कोणी बहिणीने हक्काने राखी बांधायचं एकमेव मनगट होतं, तर कोणाचे लहान लहान चिमुकले, ज्यांना मृत्यू म्हणजे काय असतो याची कल्पना नव्हती ते निरागस चेहऱ्याने धडधडत्या चितेकडे एकटक बघत होते. तारुण्यात कपाळाचं कुंकू अकाली गमविल्याने उरलेलं आयुष्य कसं जगायचं या चिंतेने मोठमोठ्याने टाहो फोडणाऱ्या त्या वीरपत्नी आणि छाती बडवून, तळतळाट देत असलेले ते वृद्ध मातापिता!


माझी नम्र विनंती आहे, भ्रष्टाचार करताना स्वार्थी लालसेमुळे बुद्धीवर आवरण चढतं आणि मग एखादा अभियंता पैसे घेतो तेंव्हा त्याला याची कल्पनाही नसते की लाच घेऊन, गुणवत्ता नसतानाही, निकृष्ट दर्जाला प्रमाणित केल्याने, काही वर्षांनंतर तो पूल अकाली कोसळतो आणि अनेकजण मरतात. एखादा कृषी अधिकारी बोगस खते, बी बियाणांना भ्रष्टाचार करून डोळेझाक करतो आणि बियाणे पेरूनही उगवत नाही, तेंव्हा बैल नाहीत म्हणून तिफनाचे जू, शेतकरी आपल्या खांद्यावर घेऊन, बायको पेरणी करते. आणि उगवत नाही तेंव्हा जमिनीत घाम पडलेल्या शेतकऱ्यांचा तळतळाट आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या!


बोगस इंजेक्शन, गोळ्या याबाबत अन्न प्रशासन विभागातील भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांना लाच आणि हफ्ता घेताना, बुद्धीवर आवरण चढल्याने पुढे अनेक जीवांचा होणारे मृत्यू! एकुलता एक मुलगा आय.सी.यु.मध्ये अट्रोपिनचे अनेक इंजेक्शन देऊनही वाचला नाही, मरण पावला, तेंव्हा डुप्लिकेट औषधीचं मोठं रॅकेट आणि माफियाविरुद्ध लढलेला मेहता नावाचा त्या मुलाचा बाप मात्र, या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध अजूनही लढतोय पण..सर्वत्र अंधार!


दुभती जनावरे घरात नसतानाही सिंटेक्स टाक्यामध्ये कृत्रिम दूध तयार करणारे तसेच स्वतःच्या कारखान्यातील प्रक्रिया न करता, अत्यंत घातक केमिकल असणारे पाणी एखाद्या नदीनाल्यात सोडून अनेकांच्या किडनी लिव्हर डॅमेज करून त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलतात तेंव्हा प्रदूषण महामंडळ किंवा अन्न व औषधी प्रशासनातील अधिकाऱ्यांना भ्रष्ट पैशाच्या रूपाने मिळणाऱ्या पाकिटाचं पडलेलं असतं आणि स्वतःची किंवा स्वतःच्या बायकापोरांचे लिव्हर किडनी फेल होईपर्यंत त्याचे गांभीर्य समजलेलेच नसते!


रेप करून खून केलेल्या कित्येकांना मोठी लाच घेऊन पोलीस अधिकारी, आरोपींना वाचवितो तेंव्हा शरीराचे लचके तोडून खून केलेल्या प्रेतासमोर असहाय्यतेने विलाप करणारी माता किंवा एखाद्या बालकाची पैशासाठी अपहरण करून किंवा जादूटोण्यात नरबळी म्हणून कोवळ्या जीवाला मारलं जातं किंवा चाईल्ड ट्रॅफिकिंगच्या अनेक प्रकारात केवळ अल्पवयीनांचे शारीरिक शोषणच नाही तर अवयव काढून विकली जातात तेंव्हाही कित्येक ठिकाणी पोलिसांनी लाच रूपाने पैसे घेऊन मूळ गुन्हेगाराला वाचविलेले असते, आणि हेच अधिकारी जेंव्हा दुर्दैवाने त्यांच्याच मुलाचा किंवा मुलीचा एखाद्या अपघातामुळे किंवा आजारात आय.सी यू.मध्ये भरती होऊन गंभीर परिस्थिती उद्भवते तेंव्हा कासावीस आणि भावनिक होतात कारण स्वतःच्या पोटचा गोळा असतो म्हणून! आणि भ्रष्टाचार करून प्रकरण मिटविण्यासाठी मॅनेज होतात तेंव्हा लोकांच्या पोटचा गोळा असतो ना! तिथं कसल्या भावना नि कसल्या संवेदना! असे खूप खूप उदाहरणे माझ्या व्याख्यानात मी देत असतो.


हे प्रबोधन केवळ पोलिसांसाठी नाही तर प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे, अगदी आरोग्य केंद्रावर ड्युटी न करता खाजगी प्रॅक्टिस करणारे मेडिकल ऑफिसर, रुग्णांची प्रतारणा करणारे, सरकारी औषधी बाहेर विकणारे, तसेच राशनचे धान्य बाहेर विकणारे, कागदोपत्री योजनांचे पैसे खाणारे, अशा प्रकारचे सर्व क्षेत्रात आढळतात हे सगळे राष्ट्रद्रोहीच!अशा धूसर वातावरणात सुनील केंद्रेकर किंवा चंद्रकांत गुडेवारांसारखी खमके अधिकारी भ्रष्ट राजकारण्यांची पर्वा न करता, सामान्यांना वेळोवेळी न्याय देऊन शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात आणि प्रशासनावरचा विश्वास वृद्धिंगत करतात, प्रवीण गेडाम सारखे आय.ए.एस.आपल्या कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी, कणखर सुप्रशासन देत असतात, तुळजाभवानी मंदिरात भक्तांनी दान केलेल्या रकमेपासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत लूट करणाऱ्याचा बंदोबस्त करून, पारदर्शकता आणली परिणामी भ्रष्टाचाराला आळा बसला, एवढेच काय तर जळगावात घरकुल घोटाळ्यातील आरोपींना दिनांक 31 ऑगस्ट 2019 ला कोर्टाने माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना 100 कोटी दंड आणि 7 वर्ष कैद आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना, दंडासाहित 5 वर्षांचा तुरुंगवास आणि इतर आरोपींनाही दंड आणि 7 वर्षे तुरुंगवास आणि इतरांना तुरुंगात पाठविले, या शिक्षेमुळे, हजारों कोटींचा घोटाळा केल्यावरही, आम्ही अधिकारी आणि न्यायव्यवस्था यांना खिशात टाकू शकतो आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही ही आमदार, मंत्र्यांची मस्ती गेडामसाहेब आणि चौकशी अधिकारी आय.पी.एस. ईशु सिंधू सारख्या कायद्याच्या रक्षकांनी जिरविली.


असे झाले तरच कायद्याचा धाक निर्माण होऊ शकेल, त्यासाठी प्रामाणिकतेसोबतच निधड्या छातीचे अधिकारी असले पाहिजेत! आणि कोणाचाही मिंधा नसणारे अधिकारीच हे पाऊल उचलू शकतात. फक्त अशा अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील भूमीपुत्रांनी सुद्धा कर्तव्यदक्षता आणि राष्ट्रनिर्माणाचा ध्यास घेऊन कार्याचा जोरदार ठसा उमटवित असलेले रेल्वेत उच्चपदस्थ अधिकारी IRS सुशील गायकवाड मूळ बार्शीचे, झारखंड राज्यात कार्यरत IAS रमेश घोलप, उपळाई ता. माढा येथील सध्या तामिळनाडूत कार्यरत असलेल्या IAS रोहिणी भाजीभाकरे आणि महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातीलही अनेक अधिकारी आपला राष्ट्रबांधणी कार्याचा ठसा उमटवित आहेत. मी अनेक प्रामाणिक अधिकाऱ्यांना बोललो तेंव्हा "स्वच्छ राहिलं की दहाव्या मिनिटात पाठ टेकल्या बरोबर झोप लागते, कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि समाधान कायम झळकते, आणि उत्तम शिक्षण आणि संस्कार देऊन पुढची पीढी पायावर उभी राहण्याइतपत आपण फक्त पगारावर करू शकतो, मग काय गरज आहे भ्रष्टाचार करण्याची!

खरं सांगू !! कर्तव्यदक्ष आणि भ्रष्टाचार न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बायकामुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा प्रामाणिकतेचे तेज दिसते, आणि तेच अधिकारी ठामपणे स्वतःच्या मुलांना बजावू शकतात की, नाही मिळणार तुला ऍपलचा मोबाईल तुला सॅमसंगच्याच मोबाईलवर भागवावं लागेल, आणि बायकोलाही निक्षून सांगतात की एवढ्या महागाची सोन्याची दागिने घेऊन देऊ शकत नाही." एकच सांगू इच्छितो,अधिकाऱ्यांनो! आपल्या मुलाबाळांच्या समोर स्वतःची नजर झुकणार नाही असंच प्रामाणिक वागा अन्यथा घरातच तुमचा पराभव असेल!भ्रष्टाचारी मायबाप लेकरांच्या लक्षात येतात.


95% बहुतांश अधिकारी हे गरिबीतून आलेले शेतकरीपुत्र असतात, पण निवड झाल्यावर खुर्चीवर बसल्यावर ते भूतकाळ विसरतात आणि सामान्यांचीच पिळवणूक करतात. एक कळत नाही की भ्रष्टाचार करून बेहिशोबी संपत्ती कोणासाठी गोळा करतात? पुढच्या पिढीसाठी? आजवर भ्रष्टाचार करून बेहिशोबी संपत्ती ज्या मुलाबाळांसाठी गोळा केलेली असते ते बिघडलेले, व्यसनी आणि कर्तृत्वशून्य निघतात. या अधिकाऱ्यांचा उत्तरार्ध भयानक असतो. त्यांना हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या आजाराने सारखं सारखं ऍडमिट व्हावं लागतं. भ्रष्टाचाराचे अमाप पैसे, लोकांचे शाप घेऊन, तळतळाट घेऊन मिळविलेले असल्याने ते पचत नाहीत. आयुष्यात एकाकीपणा वाट्याला येते. पुढे पोरं ही किंमत देत नाहीत, हाल हाल होऊन अनेकांचा मृत्यू झालाय. अगदी ज्या पुढच्या पिढीसाठी त्यांनी वाकड्या मार्गाने राष्ट्र लुटलेले असते त्यापैकी ते मरताना पाणी पाजायलाही कोणी नसतं ही वस्तुस्थिती मी बघितली आहे. रोज चार चार गोळ्या घेऊनही झोप न येणारे, कॅन्सर, किडनी लिव्हर, हृदय अशा बऱ्या न होणाऱ्या आजाराने तडफडून आयुष्यातील भोग भोगत असलेले आणि मृत्यू पावलेले अनेक अधिकारी व त्यांची नावे मला माहिती आहेत.


MPSC/UPSC द्वारे नियुक्त झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की लाखोंच्या संख्येने परीक्षेत बसणाऱ्यापैकी ईश्वर तुमची निवड करतो. ती लोकसेवेची आणि राष्ट्रसेवेची संधी समजून राष्ट्र भ्रष्टाचारमुक्त आणि बळकट करावं. फक्त पगारावरच जगून, पुढच्या पिढीला स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभं केलं तर राष्ट्र उभं राहिल! मी जाणतो की आकाश खूप फाटलं आहे, परंतु भ्रष्टाचाररुपी अंधार दूर करायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या वाढविणे हाच प्रकाश, अंधाराला दूर करू शकेल आणि स्वित्झर्लंड प्रमाणे आपला भारत सुद्धा कधी ना कधी भ्रष्टाचारमुक्त सुप्रशासन असणारा आणि खऱ्या अर्थाने स्वच्छ भारत होईल,माझ्या एकट्याने काय होईल? हा विचार न करता, प्रामाणिकतेने कर्तव्यदक्षतेने आणि फक्त पगारावरच जगणार या संकल्पाचा आरंभबिंदू प्रत्येकाने व्हावं!आणि अधिकाऱ्यांनो आणि स्पर्धा परीक्षार्थींनो तुम्हीच ठरवा! नीला सत्यनारायण होऊन सत्कर्म करून पुढच्या पिढीचे दीपस्तंभ व्हायचे की, शोभा राऊत होऊन दुष्कर्म करून राष्ट्रद्रोह्यांच्या यादीत जायचं?


मृत्यू शाश्वतच आहे आणि व्यक्ती कितीही पुण्यवान किंवा पापी असेल तरीही शेवटचा श्वास सुरू असताना म्हणे, यमदूताशी आत्मसंवाद सुरू असतो म्हणे! त्यासमयी, "मी फक्त कुटुंबासाठीच जगले नाही तर कर्तव्यदक्ष राहून ईमानाने राष्ट्रीबांधणी करण्याचेच कार्य केलेय" हे नीला सत्यनारायण यांनी यमदूताला अन् भारतमातेला दिलेलं उत्तर असावं...! ही संधी प्रत्येकाला येऊ शकते, म्हणून प्रत्येकाने ठरवावं की जाताना राष्ट्राला काय देऊन जाणार?