खान्देश खबरबात : खान्देश होणार मेडिकल हब !
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2017 08:24 AM (IST)
ब्लॉग लेखक : पत्रकार दिलीप तिवारी
राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे वैद्यकिय शिक्षणमंत्रीही आहेत. महाजन यांना मंत्रिपद दोन-अडिच वर्षांपूर्वी मिळाले आहे. मात्र, विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करीत असताना महाजन यांनी विधीमंडळ परिसरात स्वतःची ओळख आरोग्यदूत म्हणून निर्माण केली आहे. याचे कारणही असे की, महाजन यांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील सुप्रसिद्ध इस्पितळांमध्ये मतदार संघातील गरजू रुग्णांवर मोफत उपचार तथा शस्त्रक्रिया करण्याचे विधायक मार्ग शोधून काढले आहेत. त्यांच्या या सुविधांची चर्चा झाल्यानंतर तेव्हाच्या काँग्रेस आघाडीतील मंत्रीही आपापल्या मतदार संघातील गरजू रुग्णांना महाजन यांच्या सहकाऱ्यांकडे पाठवित असत. या कार्यपद्धतीमुळे महाजन यांची आरोग्यदूत म्हणून ओळख अधिक गडद होत गेली. राज्यात भाजप नेतृत्वातील देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाजन यांचा मत्रिमंडळातील प्रवेश उशिराच झाला. महाजन यांना जलसंपदा आणि वैद्यकिय शिक्षण मंत्रालय मिळाले. यासोबत नाशिक व नंदुरबारचे पालकमंत्रीपदही मिळाले होते. वैद्यकिय शिक्षण मंत्रीपद हाती आल्यानंतर महाजन यांनी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात गरजू रुग्णांसाठी आरोग्य महाशिबीरे आयोजित केली. नंदुरबारचे पालकमंत्रीपद महाजन यांच्याकडून जयकुमार रावल यांच्याकडे नंतरच्या काळात गेले. मात्र, महाजन यांनी अलिकडेच नंदुरबार येथेही आरोग्य महाशिबीर घेऊन तेथील गरजू रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन दिल्या. महाजन यांच्या नेतृत्वात मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनीही बीड येथे आरोग्य महाशिबीर घेतले. याशिवाय, जामनेर मतदारसंघ हा मोतिबिंदू मुक्त करण्याचा आणि जळगाव जिल्ह्यात एकही गरजू रुग्णांवर महागडी शस्त्रक्रिया करण्याचे राहू नये असा संकल्प महाजन यांनी केला आहे. आपली आरोग्यदूत ही लोकउपाधी सार्थकी ठरविण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांनी जळगावात वैद्यकिय शिक्षण संकूल (मेडिकल हब) सुरु करण्याचे महत्वाकांक्षी स्वप्न बाळगले आहे. पहिल्या टप्प्यात या संकुलाच्या उभारणीस राज्याच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या संकुलासाठी सुमारे 1250 कोटी 60 लाख निधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. हे वैद्यकिय शैक्षणिक संकूल खान्देशातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या संकुलामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय यांचा समावेश असेल. या संकुलासाठी मिळणाऱ्या निधीतून बांधकामे, वेतन, उपकरणे याचा खर्च होईल. याशिवाय कर्मचाऱ्यांची आवश्यक पदनिर्मिती होणार आहे. या वैद्यकिय शैक्षणिक संकुलासाठी मौजे चिंचोली शिवारातील 46.56 हेक्टर जमीन उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या संपूर्ण संकुलास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांच्या अनुषंगाने एकूण 12 एकर जागा हवी आहे. सन 2017 च्या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकिय अभ्यासक्रम सुरू होतील असे नियोजन आहे. यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढवून वापर केला जाणार आहे. मुंबई, पुण्यानंतर सध्या जळगाव शहरात खासगी वैद्यकियसेवा अत्यंत प्रगत मानली जाते. जळगावात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची संख्या वाढते आहे. शिवाय जळगावातील काही डॉक्टरांनी एकत्र येवून बहुविध सेवांची रुग्णालये सुरु केली आहेत. मात्र, जळगाव हे खासगी वैद्यकिय सेवांसाठी द्याव्या लागणाऱ्या चढ्या शुल्कांमुळे बदनाम झालेले आहे. कट प्रॅक्टीस हा शब्द वैद्यकिय सेवेत परवलीचा झाला आहे. अशा वातावरणात शासकिय वैद्यकिय संकुलामुळे खासगी सेवांचे दर रुग्णांना परवडणाऱ्या पातळीवर येतील अशी अपेक्षा आहे. जळगाव येथे शासकिय वैद्यकिय शिक्षण संकुलाचा विषय मार्गी लागत असताना नंदुरबार येथे पूर्वी मंजूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचा विषय सुद्धा चर्चेत आला आहे. नंदुरबार येथे आरोग्य महाशिबीराच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्यांनी नंदुरबारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सुरू करण्यासंदर्भात सुतोवाच केले. म्हणजेच जळगाव पाठोपाठ आता नंदुरबारचा विषय सुद्धा मार्गी लागू शकतो. नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित हे काँग्रेस आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी सन 2013 मध्ये नंदुरबारसाठी वैद्यकिय महाविद्यालयाला मंजुरी मिळविली होती. परंतु आवश्यक तांत्रिक बाबींची तेव्हा पूर्तता झाली नाही. तेव्हा सलग 12 एकर जागाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे वैद्यकिय महाविद्यालय सुरु झाले नाही. नंदुरबार हा आजही आदिवासी बहुल वस्तीचा जिल्हा आहे. तेथील आदिवासी डोंगर-दऱ्यांत राहतात. बालमृत्यू, कुपोषण, साथींचे आजार, सिकलसेल ऍनिमिया असे या भागातील गंभीर आजार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सरकारी आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी वैद्यकिय महाविद्यालय उपयुक्त ठरले असते. डॉ. गावित हेही वैद्यकिय शिक्षणमंत्री होते. तेव्हा त्यांनी नंदुरबारसह बारामती, अलिबाग, चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणी वैद्यकिय महाविद्यालये मंजुर केली होती. मात्र, या महाविद्यालयांची फाईल पुढे सरकली नाही. नंदुरबार येथे वैद्यकिय महाविद्यालय करायचे तर किमान 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात 200 खाटा आहेत. 100 खाटांचे महिला रुग्णालय बांधले जात आहे. वर्षभरात तेही सुरू होईल. आयुष विभागाचे 50 खाटांचे रुग्णालय मंजूर आहे. वैद्यकिय महाविद्यालय होण्यासाठी अजून 150 खाटांचे रुग्णालय हवे. अपवाद म्हणून किंवा आदिवासी भाग म्हणून 300 खाटांचे रुग्णालय असले तरी तेथे वैद्यकिय महाविद्यालय सुरु होवू शकेल. पर्याय असा काहीही काढला तरी पुरेशा जागेची अडचण आजही आहे. यासाठी एमआयडीसी परिसरात टोकरतलाव रस्ता, कृषी महाविद्यालयाच्या मागील बाजूस आणि तंत्रनिकेतनची जागा हे पर्याय आहेत. जळगाव प्रमाणेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयातही महाविद्यालय सुरु करता येवू शकते. वैद्यकिय शिक्षण मंत्री स्वतः महाजन असून जळगावसाठीची अडचण ते ज्या प्रमाणे सोडवतील त्याच प्रमाणे नंदुरबारचीही अडचण सुटू शकते. भाजपत अशी चर्चा आहे की, आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार झालाच तर डॉ. विजय गावित यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या जर-तर च्या गोष्टी लक्षात घेवूनच जळगावसह नंदुरबारचाही वैद्यकिय शिक्षण संकुलाचा प्रश्न मार्गी लागू शकतो असे दिसत आहे. तसे झाले तर खान्देश हे वैद्यकिय शिक्षण व उपचारांच्या दृष्टीने मेडिकल हब होईल.