खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीनही जिह्यात सध्या अवैध धंदेवाल्यांचे ‘ऑल इज वेल’ सुरू आहे. दळणवळण आणि जनसंपर्काची विविध साधने झपाट्याने वाढत असल्यामुळे वेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीसह अवैध धंद्यांचे क्षेत्रही बदलून गेले आहे. जळगावसह धुळे, नंदुरबारची भौगोलिकस्थिती ही वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीसाठी पूरक असल्याने देशातल्या इतर राज्यांशी खान्देशी गुन्हेगारी थेट जोडली गेली आहे.
महामार्गामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद या महानगरांसह मध्यप्रदेश, गुजरात खान्देशशी जोडले गेले आहेत. रेल्वेमुळे जळगाव हे गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रसह थेट पंजाब, जम्मू काश्मीरशी जोडले गेले आहेत. ही भौगोलिकस्थिती गावठी किंवा विनापरवाना दारू विक्री, अमली पदार्थ विक्री, पेट्रोल-डिझेल-रॉकेल इंधनासह रसायन चोरी, दुचाकी-चारचाकी वाहन चोरी, माल वाहतूक करणाऱ्या वाहनातून चोरी, गुटखा विक्री, भंगार चोरी अशा अवैध धंदे करणाऱ्यासाठी अत्यंत पूरक व लाभदायी आहे. या सर्व व्यवसायांच्या जोडीला सट्टा बेटींग, पत्त्यांचे क्लब हेही सर्रास सुरू असतात. नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या लगत असलेल्या सातपुडा पट्टीत गावठी पिस्तुले तयार करण्याचेही अड्डे आहेत.
खान्देशातील वाढत्या अवैध धंद्यांविषयी लोकप्रतिनिधींनी थेट पोलीस प्रशासनाच्या विरोघात नाराजी व्यक्त केल्याच्या दोन ठळक घडना अलिकडे घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे आमदार अमरिश पटेल यांनी गावठी दारूच्या विरोधात मोर्चा काढला. या शिवाय, धुळे शहरात अवैध धंद्यांचे सर्वच प्रकार सुरू असून पालकमंत्री दादाभुसे यांच्या समोरच अवैध धंदे करणाऱ्यांचा वाद झाल्याचा प्रकारही घडला आहे. जळगाव येथे सर्व पक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेटून अकार्यक्षम जिल्हा पोलीस अधीक्षकांचीच बदली करण्याची मागणी केली. याला भाजपचे आमदार सुरेश भोळे व आमदार चंदुलाल पटेल या दोन आमदारांनी व महापौर नितीन लढ्ढा यांनी सुद्धा पाठींबा दिला. नंदुरबामध्ये वेगळी स्थिती आहे. जी मंडळी अवैध धंद्यात गुंतलेली आहे तीच बहुतांशवेळा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अवती भोवती असतात. अशा प्रकारे खान्देशात तीनही जिल्ह्यात अवैध धंदे हे दिवसाढवळ्या व मिलीभगतने सुरू असल्याचे आढळते.
जळगावमध्ये सट्टा बेटींगच्या ठिकाणी छापा टाकल्यानंतर संबंधित पेढी चालकाने थेट पोलीस ठाणे गाठून माझा हप्ता परत द्या अशी मागणी केली. त्यापूर्वी ट्राफीकच्या दोन हवालदरांनी परप्रांतिय वाहनचालकाकडून ५ हजारांची लाच घेतल्याची व्हीडीओ क्लिपच व्हायरल झाली. या दोन्ही प्रकारांमुळे पोलिसांची अब्रु चव्हाट्यावर आली.
शिरपूर येथेही गावठी दारू विक्रीच्या प्रकारातून एका भट्टीच्या ठिकाणी स्फोट होवून छापा मारायला गेलेल्या पथकातील पोलिसाचाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गावठी दारुमुळे वादविवाद वाढल्याने आमदारांना रस्त्यांवर यावे लागले. धुळ्यात आमदार अनिल गोटे हेही अधुनमधून पोलिसांच्या नाकर्तेपणावर टीका करीत असतात.
धुळे, जळगाव व नंदुरबार परिसरातून लहान-मोठ्या वाहनांच्या चोरीचे प्रकार वाढले आहे. यात सर्वांत वाईट हेच की, चोरीचे वाहन अवघ्या दोन तासात मोडून तोडून त्याचे भंगार करणाऱ्या यंत्रणा कार्यरत आहेत. याची पाळेमुळे थेट मुंबई, सुरत पर्यंत पोहचली आहेत. जळगावात तरुणी वाहने चोरी करीत असल्याचे आढळून आले आहे.
धुळ्यात सध्या मोटारसायकलवरून येणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जळगावमध्ये घरफोडीचे सत्र बारमाही झाले असून काही ठिकाणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याच्या ऐवजी दोन घरफोडी एकत्र करुन गुन्हे संख्या कमी करण्याकडे लक्ष दिले आहे. नंदुरबारमध्ये सट्टा हा रोजीरोटीचा धंदा आहे. जळगाव व धुळ्यात सट्ट्याच्या धंद्यात राजकारणी मंडळींचीच पार्टनरशीप असल्याची चर्चा आहे. आता पोलिसांनी रस्त्यावर सीम कार्ड विकणाऱ्यांकडून हप्ते घेण्याचा नवा प्रकार सुरू केला आहे. तो इतर जिल्ह्यातही आहे. यासोबत अवैधपणे वाळू व डबर वाहतुकीचे प्रकार तीनही जिल्ह्यात आहेतच.
जळगाव जिल्ह्यातील अवैध धंद्यासाठी ५० कोटी रुपयांची बोली पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोरच उघडपणे लावली गेली. या संदर्भातील सर्व प्रकारचे वृत्तांकन नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक चौबे यांच्यापर्यंतही पोहचले आहे. सध्या नाशिक पदवीधर व जळगाव जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आचार संहिता सुरू असल्याने कोणत्याही अधिकाऱ्यास सरकार हात लावू शकत नाही.
अवैध धंद्यांवर पोलीसांचा वचक असतो. त्यासाठी पोलिसिंग किंवा पोलिसगीरी हा शब्द वापरला जातो. मात्र, खान्देशातील तीनही जिल्ह्यात सध्या पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यांचे असल्यामुळे पोलीस अधीक्षकांची यंत्रणा दौऱ्यापुरती मंत्र्यांच्या दिमतीला असते. त्यानंतर महसूल, पोलीस व जिल्हा परिषद प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारीच जिल्ह्याचे मालक असल्यासारखे वागतात. हे चित्र सर्वत्र आहे. गृह खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. ते स्वतः कधी गृह खात्याचा आढावा घेतात की नाही याविषयी शंका आहे. मुख्यमंत्र्यांनी कधी राज्यातील गुन्हेगारीविषयी आकडेवारी दिल्याचे आढळलेले नाही. अशाच प्रकारची उदासिनता ही गृह खात्याच्या कार्यक्षमतेचा आलेख खालच्या बाजुने झुकवतो आहे. त्याचे वास्तव व कलंकीत चित्र सध्या खान्देशात अनुभवता येत आहे.
‘खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :
खान्देश खबरबात : पालकत्व हरवलेले तीन जिल्हे
खान्देश खबरबात : खान्देशातील आरोग्य यंत्रणा सुधारणार
खान्देश खबरबात : वाघुर, अक्क्लपाडा प्रकल्पांची कामे गती घेणार
खान्देश खबरबात : खान्देशात भूजल पातळीत वाढ
खान्देश खबरबात : खान्देशच्या औद्योगिक विकासाकडे लक्ष हवे!
खान्देश खबरबात : जळगाव, धुळे मनपात अमृत योजनांचे त्रांगडे
खान्देश खबरबात : कराच्या रकमेत धुळे, जळगाव मनपा काय करणार?
खान्देश खबरबात : करदाते वाढवण्यासाठी गनिमीकावा
खान्देश खबरबात : खान्देशात पालिका निवडणुकांत खो खो…
खान्देश खबरबात : ‘उमवि’त डॉ. पी. पी. पाटील यांची सन्मानाने एन्ट्री
खान्देश खबरबात: उसनवारीच्या पालकमंत्र्यांमुळे प्रशासन खिळखिळे… !!!
खान्देश खबरबात: मुख्यमंत्री जळगावसाठी उदार झाले…
खान्देश खबरबात: खान्देशात डेंग्यूचा कहर
खान्देश खबरबात : सारंगखेडा फेस्टिव्हल
खान्देश खबरबात : जळगावच्या राजकारणात अस्वस्थ खामोशी!
खान्देश खबरबात : खान्देशी काँग्रेस गलितगात्र
खान्देश खबरबात : गाईंना कत्तलखान्यात पाठवणारे कोण असतात?
खान्देश खबरबात : पोषण आहार घोटाळ्याचे रॅकेट
खान्देश खबरबात : वैद्यकीय सेवा महागणार, IMA चा इशारा
खान्देश खबरबात : पर्यटन विकासाला संधी
खान्देश खबरबात : पावसाची पाठ, शेतकरी चिंतेत
खान्देश खबरबात : अवैध धंद्यांसाठी खान्देश नंदनवन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Jan 2017 08:45 AM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -