नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महाजन यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वात सिंहस्थ २०१६ पार पडला. त्याचेही उत्तम नियोजन महाजन यांनी केले. यानिमित्ताने नाशिकमधील काही विकास कामे मार्गी लागली. त्यावेळी मनपात बहुमत नसलेल्या मनसेची सत्ता होती. राजकीय पक्षात आयाराम-गयाराम सुरू होते. नाशिककर या खेळामुळे वैतागलेले होते. अशावेळी जे सोबत आहे त्यांना घेऊन आणि पक्षातील विरोधकांना गोंजारत पालकमंत्री महाजन यांनी काम सांभाळले. मनपा निवडणूक तोंडावर आली तेव्हा इतर पक्षातून आलेल्या अनेकांना प्रवेश देण्याचे कामही महाजन यांनी पार पाडले. तसे घडत असले तरी भाजपचा फारसा प्रभाव पडेल की नाही अशी शंकास्पद स्थिती होती. उमेदवारीसाठी लाखभर रुपयांची मागणी होत असल्याच्या क्लिपही राज्यभर फिरल्या. पक्षाची बदनामी झाली. या सर्व गदारोळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही जाहिरसभा फसणार असे चित्र होते. मात्र, फडणवीस–महाजन यांच्यातील गहिऱ्या मैत्रीचा फायदा नाशिककरांना मिळाला. फडणवीस यांनी भाषणात नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केले. आयाराम-गयाराम, जनाधार हरवलेली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भ्रमनिरास, शिवसेनेतील गटबाजी, मनसेकडून अपेक्षाभंग अशा वातावरणात नाशिककरांनी फडणवीस यांचे पालकत्व स्वीकारणारा कौल दिला. महाजन यांच्या पालकमंत्री पदावर यशाचा तुरा खोवला गेला. नाशिक जिल्हा परिषदेतही भाजपने दोन अंकी संख्या पार केली आहे.
गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीतही पहिल्यापासून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. अर्थात, या प्रक्रियेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा सहभाग हा महाजन यांच्यापेक्षा थोडा जास्त आहे. खडसे हे प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे पहिल्या टप्प्यातील नियोजनातून लांब होते. त्यांच्या स्नुषा खासदार रक्षाताई खडसे यांनी एकनाथ खडसेंची अनुपस्थिती भरुन काढली. महाजन, खडसे कुटुंबीय व भाजपच्या इतर आमदारांनी एकत्रित प्रयत्न करीत जि. प. च्या एकूण ६७ पैकी ३३ जागा निवडून आणल्या. शिवाय १५ पैकी ९ पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती होतील असे बहुमत मिळाले आहे.
जळगाव जिल्हा भाजपत तूर्त महाजन व खडसे यांचे दोन गट आहेत. ही बाब लपून राहिलेली नाही. त्यामुळे खासदार रक्षाताई खडसे यांच्या रावेर मतदार संघातील तालुक्यांवर खडसे कुटुंबियांनी लक्ष दिले. यात जामनेर हा महाजन यांचाही तालुका होता. जामनेर तालुक्यात जि. प. च्या ७ पैकी ५ आणि पंचायत समितीच्या १४ पैकी १० जागा भाजपने जिंकल्या. हे यश मंत्री महाजन यांचे आहे. खडसे कुटुंबीयांच्या नेतृत्वात मुक्ताईनगर तालुक्यात जि. प. च्या ४ पैकी ४ आणि पंचायत समितीच्या ८ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या. बोदवड तालुक्यात जि. प. च्या २ पैकी २ आणि पंचायत समितीच्या ४ पैकी ४ जागा भाजपने जिंकल्या. या दोन्ही तालुक्यावर एकनाथ खडसेंचे लक्ष होते. खासदार रोहिणी खडसेंनी चोपडा व रावेर तालुक्यात चमत्कार केला. जि. प. च्या ६ पैकी ३ आणि पंचायत समितीच्या १२ पैकी ५ जागा भाजपने जिंकल्या. या तालुक्यात शिवसेनेचे आमदार आहेत. रावेर तालुक्यात जि. प. च्या ६ पैकी ४ आणि पंचायत समितीच्या १२ पैकी ८ जागा भाजपने जिंकल्या. यावल तालुक्यात आमदार हरिभाऊ जावळे व भुसावळ तालुक्यात आमदार संजय सावकारे यांनी पंचायत समित्या भाजपकडे राखल्या.
जळगाव मतदार संघातील अमळनेर तालुका पंचायत समितीत सध्या भाजपला बहुमत मिळाले आहे. चाळीसगाव व पाचोरा येथे एकूण संख्येच्या निम्मे संख्याबळ भाजपकडे आहे. बहुमतासाठी एक–एक मताची गरज पडेल. जळगाव मतदार संघातून जिल्हा परिषद सदस्यही कमी संख्येत निवडून आले. भाजपच्या एकूण ३३ पैकी २२ सदस्य हे रावेर मतदार संघातील आहे. तेथे खासदार रक्षाताई खडसेंचे नेतृत्व आहे. मात्र, जळगाव मतदार संघातून भाजपचे केवळ ११ सदस्य निवडून आले. या मतदार संघातील तालुक्यांच्या प्रचारातून खासदार ए. टी पाटील गायब होते. उमेदवारांची निवड करताना खासदार पाटील तसेच चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी गटबाजी केल्याचा फटका भाजपला बसला असे सांगण्यात येते. अमळनेर हा वाघ यांचा तालुका आहे. तेथील पंचायत समिती भाजपने जिंकली, पण तालुक्यातील उमेदवारांचा विजय हा पक्षा पेक्षा व्यक्तिगत पातळीवर महत्त्वाचा आहे.
जळगाव जिल्हा परिषद आता एक हाती भाजपच्या ताब्यात असेल. मावळत्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचा टेकू होता. त्यामुळे वातावरणही अस्थिर होते. ते आता असणार नाही. जर राज्यस्तरावर भाजप–शिवसेना युती झालीच तर जिल्ह्यात महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य पर्व सुरू राहिल. मंत्री महाजन यांच्या वर्तुळातील समर्थकांनी जि. प. अध्यक्ष होता येईल आणि मंत्री पाटील यांच्या पूत्राला सभापती होता येईल.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीने राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णतः उद्धवस्त केले. काँग्रेस मृतप्राय अवस्थेत आहे. ती आता पूर्णतः कोमात गेली. या दोन्ही काँग्रेसने आताचे जिल्हास्तर विद्यमान पदाधिकारी घरी पाठवायला हवेत. मागील पालिका निवडणुका, विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणूक व जि. प. सह पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अपयशी ठरलेले हे पदाधिकारी किती दिवस पुढे धकवायचे हा दोन्ही पक्षांसमोर प्रश्न आहे.
शिवसेनेचे लढवय्ये नेते तथा राज्यमंत्री पाटील हे जळगाव व धरणगाव तालुक्यात बऱ्यापैकी प्रभाव पाडू शकले. मात्र, पाचोऱ्यात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व चोपड्यात आमदार चंद्रकांत सोनवणे यांना वर्चस्व निर्माण करता आले नाही.
आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हा व नाशिक जिल्ह्यात आपला प्रभाव सिद्ध केला आहे. चारही निवडणुकीत यशाचा तुरा मस्तकी खोवला आहे. त्यांचे हे कौशल्य लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाजन यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्याची गरज आहे. तसे झाले तर जिल्ह्याचे स्थानिक विषय लवकर मार्गी लागतील