महाराष्ट्रात कोरोनाचे जनुकीय बदल (म्युटेशन) होऊन दोन नवीन स्ट्रेन सापडल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये या नवीन स्ट्रेनबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. ज्या पद्धतीने गेल्या काही आठवड्यात गर्दी वाढत आहे, त्यामुळे आता या संसर्गाला थांबविण्यासाठी शासनाला कोणत्या स्वरूपाचे आणखी कठोर निर्बंध आणले तर हा प्रसार थांबेल याबाबत नक्कीच तातडीने विचार करावा लागणार आहे. अंशतः लॉकडाऊन राज्यातील बहुतेक भागात लावावा लागणार आहे, तर खासगी कार्यालयांना पुन्हा एकदा 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश जारी करावे लागणार आहेत. असं चित्र सध्या मुंबईसह राज्याच्या विविध भागात झालं असून अशीच रुग्णवाढ राहिली तर परिस्थिती भयावह होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्यात राज्यात कोरोनाच्या ज्या दोन स्ट्रेन आढळल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या इतकी झपाट्याने वाढत आहे का? याचा आरोग्य विभागाला अभ्यास करण्याची गरज आहे.
कोरोनाचे भविष्यातील वर्तन कसे राहील यावर कुणीही सांगू शकत नाही. कारण आजपर्यंत अनेकांनी कोरोनाच्या बाबतीत केलेलं भाकीत खरे ठरलेलं नाही. कोरोना वाढीची कारणे वेगवेगळी असली तरी लवकरच त्याचं उत्तर शोधून वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्याकरिता प्रशासनाला महत्त्वपूर्ण पावले उचलावी लागणार आहेत.
यापूर्वीही भारतात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड येथील स्ट्रेन सापडले होते. मात्र, यावेळची परिस्थिती जरा वेगळी आहे, इन्साकॉग संस्थेने राज्यात दोन कोरोनाचे स्ट्रेन आढळून आल्याचं म्हटलं आहे. इन्साकॉग ही संस्था विषाणूतील जनुकीय बदल ह्या विषयावर काम करीत असून ते देशातील आणि राज्यातील विविध नमुने गोळा करून काही विषाणूमध्ये जनुकीय बदल आहेत का याचा अभ्यास या संस्थेत सुरु असतो. त्यांनी काल जी माहिती दिली त्यापैकी राज्यासाठी असलेली महत्त्वाची माहिती म्हणजे राज्यात कोरोनाचे दोन नवीन स्ट्रेन सापडले आहेत. त्यांची वर्गवारी किंवा नामकरण E484Q, L452R असं आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा लागणार आहे. या नवीन स्ट्रेनमुळे रुग्णवाढ वाढ झाली आहे का? याबाबत मात्र कुठेही स्पष्टता करण्यात आलेली नाही. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या रोज नवे विक्रम करून उच्चांक गाठत आहे. बुधवारी राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाच्या अनुषंगाने जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार, राज्यात एका दिवसात 31 हजार 855 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे, तर 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 15 हजार 098 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. हा आकडा खूप मोठा आणि काळजी करायला लावणारा आहे.
राज्य कोरोना विशेष कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "ज्या पद्धतीने कोरोना झपाट्याने वाढत होता त्यावेळीच हा विषाणूचा जनुकीय बदल असलेला प्रकार आहे अशी अटकळ बांधलीच होती. त्यावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. पहिलं म्हणजे आपण एक लक्षात घ्यायला हवं की हा काही कोरोनाचा नवीन विषाणू नाही, आहे त्याच विषाणूत बदल झाला आहे. यामध्ये हा वेगाने पसरत असून याचा संसर्ग झपाट्याने होतो. त्यामुळे सध्याच्या काळात लसीकरण सुरु आहे ते अधिक वेगानं होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सध्या आपण पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कांत आलेल्यांना घरी विलगीकरणात ठेवत असून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावं लागणार आहे. ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर दिला पाहिजे. सध्या डॉक्टरांनी जी उपचार पद्धती विकसित केली आहे ती सध्या योग्य आहे कोणतेही बदल करण्याची गरज नाही. लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, बाकी जे सुरक्षिततेचे नियम आहेत त्याचं काटेकोर पालन केले पाहिजे."
वैद्यकीय तज्ञांच्या मते, कोरोनाचा संसर्ग पुन्हा होण्याचे दोन प्रकार असू शकतात. त्यामध्ये एक म्हणजे ज्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला आहे आणि पुन्हा कोरोनाची चाचणी पॉजिटीव्ह आली आहे आहे. त्या व्यक्तीच्या नमुन्यात ज्या आधीच्याच विषाणूपासून कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकीच एखादा जुना विषाणू शरीरात कुठेतरी आतड्यांमध्ये राहिला असेल आणि त्याने पुन्हा डोकं वर काढले असेल तर त्या संसर्गाला जुना संसर्ग उफाळून येणे (रीऍक्टिव्हेशन) असे म्हणतात, याच्या आणखी काही शक्यता असू शकतात. तर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना झाला असे म्हणायचे असेल तर त्याला अगोदर झालेल्या कोरोनाचा विषाणू आणि आता पुन्हा चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतरचा विषाणू वेगळा असणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्या विषाणूत काही जनुकीय बदल आढळून आले असतील तर त्या व्यक्तीला पुनर्संसर्ग (रीइन्फेक्शन) झाले आहे असे म्हणतात. मात्र, हे माहित होण्याकरिता त्या व्यक्तीच्या नमुन्याचा विशेष तपास करणे गरजेचे असते. त्यास विषाणूचे जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) असे म्हणतात. या तपासात विषाणूचे जनुकीय बदल पाहिले जातात. विषाणूचे जनुकीय बदल हे होत असतातच, त्याला घाबरण्याची गरज नाही. मात्र, सुरक्षिततेचे उपाय जे आखून दिले आहे ते पाळल्यास कोरोनाच्या या आजारापासून दूर राहण्यात यश मिळते. बेंबीच्या देठापासून ओरडून, प्रेमाने, वेळप्रसंगी रागावून, करवाई करून सांगितले की सुरक्षिततेचे नियम पाळा. मात्र, आजही काही नागरिक हे नियम धाब्यावर बसवून आपले दैनंदिन व्यवहार करताना आढळून येत आहेत. सध्या कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात पुन्हा कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. राज्यातील एकूणच सध्याची परिस्थिती पाहता कुणालाही लॉकडाउन नको असला तरी नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागेल की काय असं वाटण्यासारखे कोरोनाबाधितांचे आकडे रोज वाढत आहेत.
पुणे येथील श्वसन विकारतज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी यांच्या मते, "याचा अर्थ परिस्थिती गंभीर आहे, हे नागरिकांनी आता समजून घेतलं पाहिजे. या विषाणूच्या जनुकीय बदलामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे असं मानलं तरी अजून अचूक निदान झालेलं नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार विषाणूचे दोन नवीन स्ट्रेन सापडले आहेत, हे खरे जरी असले तरी याबाबत आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. यावरून नागरिकांनी 'कोरोनाच्या अनुषंगाने जो वावर' असणे अपेक्षित आहे, त्यावर लक्ष केंद्रित पाहिजे. कारण अशा पद्धतीने नवीन स्ट्रेन सापडणे नवीन नाही. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहायला गेले तर विषाणूमध्ये काही कालांतरानंतर असे जनुकीय बदल घडत असतात. यामध्ये नवीन असे काही नाही. हा नवीन स्ट्रेन सध्या अस्तित्वात आहे तरी तीच उपचारपद्धती चालेल अशी अपेक्षा आहे. मात्र, रुग्ण संख्या ज्या झपाट्याने वाढत आहे, त्याला हे दोन स्ट्रेनच जबाबदार आहेत का यासाठी आणखी माहिती गोळा करणं आवश्यक आहे. या दोन स्ट्रेनमुळे सध्या जी लस दिली जात आहे, तिच्यावर काही परिणाम होईल का हे लगेच सांगणे उचित होणार नाही. मागे जे नवीन स्ट्रेन सापडले होते, त्यावर केंद्र सरकाने भाष्य केले होते. त्या विरोधात लस प्रभावीपणे काम करेल."
डिसेंबर 24 ला, 'जुना विरुद्ध नवा कोरोना!' या शीर्षकाखाली करण्यात आलेल्या लिखाणात, कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता या नवीन प्रजातीचा कोरोना निर्माण झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवली आहे. सध्याच्या या परिस्थितीत जो जुना कोरोना अस्तित्वात होता त्याच्यामुळे लाखो नागरिक या संसर्गजन्य आजाराने बाधित झाले तर हजारोच्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला. त्या कोरोनाबद्दल सध्या फार कुणी बोलताना दिसत नसून नव्या कोरोनाच्या प्रजातीभोवती सर्वच यंत्रणा फिरत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे जुना विरुद्ध नवा कोरोना असे चित्र सध्या जगभरात दिसत आहे. आजही आपल्याकडे रोज जुन्या कोरोनाच्या विषाणूमुळे नवीन निर्माण होणारे रुग्ण आढळत आहेत तर त्यापासून होणाऱ्या मृत्यूची संख्याची मोठी आहे. नव्या कोरोनाबद्दल तो वेगाने पसरतो यापेक्षा कोणतीही नवीन माहिती अद्याप कुणाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकारात जुन्या कोरोनाच्या विषाणूला न विसरता सगळ्यांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. दोन्ही कोरोनाचे विषाणू हा संसर्गजन्य आजाराचाच भाग आहेत, असं मत मांडण्यात आलं होतं.
कोरोनाबाधितांचे रोजचे वाढते आकडे पाहून नागरिक, अरे बापरे एवढे वाढले का? परत लॉकडाऊन तर करणार नाही ना? एवढ्या संवादापुरती ही चर्चा सिमीत राहत असल्याचे चित्र सध्या सगळीकडे पाहावयास मिळत आहे. मात्र, खरंच रुग्णवाढीचा दर असाच राहिला तर मात्र भविष्यात रुग्ण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होऊ शकतो, आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडू शकतील. त्यामुळे नागरिकांनी आता 'कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षित वावर' ठेवला पाहिजे. या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात प्रशासनाला सहकार्य करून सर्व लस घेण्यासाठी पात्र नागरिकांनी लसीकरण करून घेतले पाहिजे. लस सुरक्षित तर आहेच. मात्र, त्यामुळे या आजारापासून संरक्षणही मिळते. केंद्र सरकारने आता लसीकरणासाठी असलेली वयाची आता काढून टाकावी आणि ज्याला हवी त्याला लस हे धोरण लवकरच स्वीकारले पाहिजे.