हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातलं आणखी एक कारण ठरले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. मविआ सरकार बनत असताना आणि सत्तेत आल्यावर ज्यांनी किल्ला लढवला, भाजपवर अखंड तुटून पडण्यात संजय राऊत यांच्यासोबत नबाव मलिक सुद्धा हे नाव सुद्धा अग्रेसर होतं. त्यामुळे भाजपने सुद्धा मलिकांवर हल्ले करणं सोडलं नाही. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली, जवळपास दीड वर्ष ते तुरुंगात होते. देशद्रोह्यांशी, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींशी, दाऊद इब्राहीमशी-अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. नवाब मलिकांच्या पैशाचा ट्रेल, टेरर फंडिंगचा अँगल त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत पोटतिडकीने महाराष्ट्राला समजावून सांगितला होता. 


चारच महिन्यापूर्वी नवाब मलिक तब्येतीच्या कारणावरुन अंतरिम जामिनावर बाहेर आले. मधल्या काळात राज्यात बऱ्याच उलथापालथी झाल्या. अजितदादांनी वेगळी चूल मांडत भाजपसोबत घरोबा केला अन् थेट सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे नवाब मलिक दादांसोबत की काकांसोबत हा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्याचं क्लिअर कट उत्तर आज मिळालं. देशद्रोह्यांशी संबंध असल्याचा...टेरर फंडिंग केल्याचा आरोप असलेले नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात थेट सत्ताधारी बाकांवर दिसले. काही महिन्यापूर्वी मलिकांची पाठराखण करणारी उद्धव ठाकरे गटातील नेते मलिकांवर टीका करताना दिसले. तर मलिकांच्या टेरर फंडिगचं गणित महाराष्ट्राला समजावून सांगणारे देवेंद्र फडणवीस आज मलिकांमुळे होत असलेल्या टीकेला उत्तर देताना दिसले. 


फडणवीसांनी तत्कालीन मविआ सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. या सगळ्या गोंधळात चित्र असं उभं राहिलं की ते नवाब मलिक सोबत असल्याचंही समर्थन करत आहेत. कदाचित हीच बाब लक्षात आल्याने दिवस सरताना फडणवीसांचं एक ट्विट आलं. त्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेलं पत्र होतं. नवाब मलिक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती, त्यांना महायुतीत सामावून घेणे योग्य ठरणार नाही, सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे या अटलबिहारी वाजपेयींच्या वाक्यांचाही फडणवीसांच्या पत्रात उल्लेख केला होता. खरं तर हे सगळं फडणवीस अजितदादांना खाजगीत सुद्धा सांगू शकले असते, पण त्यांनी सार्वजनिक प्लॅटफार्मचा वापर केला, त्यामुळे सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावल्या. सकाळची चूक लक्षात आल्यामुळेच उपरती म्हणून हे पत्र लिहिलं आहे असा आरोप विरोधकांनी केला. या पत्रामुळे अजितदादांची काही प्रमाणात तरी अडचण होणार हे नक्की. फडणवीसांनाही सत्ता येते जाते वगैरे लक्षात यायला संध्याकाळ उजाडावी लागली हे सुद्धा विशेष. 


काही दशकांपूर्वी (माझ्या लहानपणी) गो. वि. करंदीकरांचा म्हणजे विंदा करंदीकरांचा एक धडा अभ्यासक्रमात होता, त्याचं नाव होतं -आतले आणि बाहेरचे- गाडीच्या बाहेरचे प्रवासी डब्यात शिरायला मिळेपर्यंत किती जोर लावतात, काय विचार करतात, आतले लोक त्यांना किती विरोध करतात आणि एकदा का बाहेरच्यांना डब्यात शिरायला मिळालं की ते कसे आतल्यांना मदत करत बाहरेच्यांना थोपवायला सरसावतात. याच फार छान वर्णन त्या धड्यात करंदीकरांनी केलं आहे.


आपल्या राजकारणाची सध्याची परिस्थिती पाहिली की - आतले आणि बाहेरचे - या धड्याचीच आठवण येते. राणेंपासून, विखेंपर्यंत, वाघांपासून राठोडांपर्यंत आणि शिंदेंपासून पवारांपर्यंत अनेक नेते जोवर भाजपच्या बाहेर होते तोवर त्यांची भाजपबद्दल आणि भाजपची त्यांच्याबद्दल काय भाषा, काय विचार होते.. आणि ज्याक्षणी ते भाजपमध्ये किंवा भाजपसोबत आले तत्क्षणी सगळ्यांचीच भाषा, विचार कसे बदलले ते आपण पाहात आहोत. तीच गोष्ट आज नवाब मलिकांच्या बाबतीत होताना दिसत आहे. कालपर्यंत मलिकांवर थेट देशद्रोह्यांशी संबंध आहेत म्हणून आरोप भाजपने, फडणवीसांनी केले, आज त्याच मलिकांबाबत फडणवीसांना सभागृहात उभं राहून बोलावं लागलं.  त्यामुळे आज आदित्य ठाकरेंच्या एसआयटीची मागणी केली जात आहे पण उद्या आदित्य भाजपसोबत आलेच तर हे चित्र तीनशे साठ (360) अंशात बदलणारच नाही याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही.


'आतले' हे वर्तमानकाळावर स्वार असतात तर 'बाहेरचे' हे भविष्याकडे आशाळभूतपणे पाहात असतात. सर्वसाक्षी निसर्ग आपल्या गूढ प्रेरणेप्रमाणे या बाहेरच्यांचे आतल्यात आणि आतल्यांचे बाहेरच्यात रुपांतर करण्याचा खेळ अखंड खेळत असतो, असं करंदीकर का म्हणतात त्याचा अंदाज आपल्याला राज्यातील सध्याचं राजकारण पाहून येऊ शकतो. आतले कधी बाहेरचे होतात, बाहेरचे कधी आतले होतात या खेळाकडे आपलं लक्ष असणार आहे.