अविश्वास ठरावाने नेमकं काय साध्य केलं? बारा तासांच्या चर्चेनंतर फलकावर सरकारच्या बाजूने 325 विरोधकांच्या बाजूने 126 असे आकडे झळकल्यानंतर मोदी सरकार मजबूत आहे, त्यांना यत्किंचितही धोका नाही हे स्पष्ट झाले. पण अविश्वास ठरावाचं यश केवळ आकड्यांमध्ये मोजत नाहीत. अनेकदा सरकारला एक पाऊल मागे घ्यायला लावण्याची, खिंडीत पकडण्याची संधी त्यानिमित्ताने विरोधकांना मिळते. त्यामुळे हा अविश्वास ठराव आणून विरोधकांनी चूकच केली, उलट मोदींचे हात आणखी बळकट झाले असा दावा जो सुरु आहे तो शुद्ध बावळटपणाचा आहे. हा अविश्वास ठराव संसदेच्या इतिहासातला 27 वा अविश्वास ठराव होता. वाजपेयी आणि मोरारजी देसाई यांचे अपवाद सोडले तर बाकीच्या अविश्वास ठरावाने कुठल्याच सरकारला धोका पोहोचला नव्हता. अविश्वास ठराव जिंकला म्हणजे विरोधक हरले असं राजकारणात होत नाही, आकड्यांमध्ये ते हरणार हे त्यांनाही माहिती असतं. पण असा ठराव हे संसदीय राजकारणातलं एक आयुध आहे आणि ते वापरल्याने या प्रक्रियेत विरोधकांच्या हातातही काही गोष्टी गवसतात.

अविश्वास ठरावातील भाषणाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा बदललेला अवतार विरोधकांना गवसला असं म्हणायला हरकत नाही. राहुल गांधी बोलायला उभे राहिल्यावर अगदी कुचेष्टेच्या स्वरात 'अब भूकंप आनेवाला है' अशी भाजपच्या खासदारांनी सभागृहात हेटाळणी सुरु केली. त्यांनी इंग्लिशमध्ये सुरुवात केल्यावर 'हिंदी, हिंदी' असा हेकाही सुरु केला. भाजपच्या खासदारांची व्यवस्थित शाळा घेतली गेल्याने त्यांनी अगदी संधी मिळेल तशी राहुल गांधींची हुर्रे उडवणं चालू ठेवलं होतं. पण दहाव्या मिनिटानंतर राहुल गांधींनी जसा गिअर बदलला तसं भाजपचा हा चेष्टेचा स्वर लालबुंद रागात रुपांतरित झाला. ज्या क्षणाला त्यांनी अमित शाह यांचे पुत्र जय शाहांचं नाव घेतलं, पाठोपाठ राफेल डीलचा सनसनाटी गौप्यस्फोट केला. त्या वेळी तर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. भूकंपाचा पहिला धक्का बसला तो इथेच. इतके दिवस ज्यांना आपण कागद न धरता बोलून दाखवा असं हिणवत होतो, ते राहुल गांधी हेच आहेत का, असा प्रश्न भाजपच्या खासदारांना पुढचे 35 मिनिटे पडला असेल. काय वेगळं होतं या भाषणात? या भाषणात पांडित्यपूर्ण आव नव्हता, आकडेवारीचं जंजाळ नव्हतं. थेट नाव घेऊन बिनधास्त आरोप होते, सामान्यांना कळेल अशी भाषा होती. राफेल असो शेतकरी कर्जाचा मुद्दा असो की मॉब लिचिंग...प्रत्येक मुद्द्यावर अगदी तीन चारच वाक्य ते बोलले. पण ही वाक्य शैलीदार होती, त्यात आरोपांचा दारुगोळा ठासून भरलेला होता. शिवाय या प्रत्येक आरोपावर चवताळून उठणा-या भाजपने आक्रमक प्रतिक्रिया देऊन राहुल गांधींच्या भाषणाला योग्य ते पार्श्वसंगीत पुरवत पिक्चर हिट व्हायला मदतच केली.

या भाषणानंतर राहुल गांधींनी मारलेली मिठी हा चर्चेचा विषय ठरली. ही मिठी बालिश नव्हती, पण ती तशी वाटली असावी कारण मोदी जागेवरुन उठलेच नाहीत. दुसरं म्हणजे राहुल गांधी ही मिठी मारायला का गेले याबद्दल झालेली प्रचंड गफलत. 'जादू की झप्पी' असं या मिठीला सगळ्यांनी नाव देऊन टाकलं. आता ही 'जादू की झप्पी' म्हणजे एखाद्याबद्दल वाटणारं प्रेम, आदर व्यक्त करणारी असते. पण राहुल गांधींनी मोदींना मिठी मारली ती हिंदू असण्याचा अर्थ समजावून दिल्याबद्दल. याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत, असं भाषणाच्या शेवटी म्हणून ते मिठी मारायला गेले. एकप्रकारे ही तिरकस मिठी होती. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला या प्रेमाच्या कृत्याने लाज वाटावी हा त्यामागचा हेतू होता. राहुल गांधींच्या मिठीचा खरा अर्थ हा आहे. या मिठीनंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून सुरु झाल्या, 2014 ला साऱ्या देशाने मोदींना मिठी मारली, राहुल गांधी यांना आज अक्कल आली. त्यांनी आधीच मिठी मारायला हवी होती. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या मिठीचा खरा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे. मोदींनी त्यांच्या उत्तरात तर कहरच केला. आपल्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरुन उठवायला ते कसे आले होते, हे अगदी 'उठो,उठो' चे हावभाव करुन त्यांनी ऐकवलं. खरंतर राहुल गांधींच्या मिठीपेक्षा मोदी हा असला थिल्लरपणा करताना जास्त बालिश वाटत होते.

दुसरी गोष्ट राहुल गांधी यांनी डोळा मारल्याची. आधी मोदींना मिठी मारली आणि त्यानंतर डोळा मारला. म्हणजे राहुल गांधी यांच्याच मनात कशी खोट आहे, त्यांनी आपल्याच कृत्यावर कसं पाणी फेरलं यावरुन दिवसभर चर्चा घडल्या. मिठीचा योग्य अर्थ माहित नसल्याने हा पुढचा बाष्कळपणा होणार हे साहजिकच आहे. मुळात राहुल गांधी यांनी त्यादिवशी फक्त मोदींना मिठी मारल्यानंतरच डोळा मारला नव्हता. आपल्या भाषणातच त्यांनी दोनवेळा डोळा मारुन मिश्किलपणाची झलक दाखवली होती. राहुल गांधी यांचं भाषण पुन्हा पाहा. तुम्हालाही कळेल.

आम्ही पराभव स्वीकारु शकतो, पण मोदी-शाह हे जरा वेगळ्या पद्धतीचे राजकारणी आहेत. ते पराभव पाहूच शकत नाहीत. हे सांगण्याआधी राहुल गांधींनी 'मोदीजी, आता जे मी सांगणार आहे ते खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही एन्जॉय कराल' असं सांगून आपल्या सहकाऱ्यांकडे बघून दोनवेळा डोळा मारला होता. पण लोकसभा टीव्हीने हुशारीने टिपलेल्या क्लोजअपमधल्या एकाच आंख मिचौलीची चर्चा जास्त झाली. बरं, मिठीनंतर मारला परत डोळा तर त्यात असं काय झालं की त्यावरुन एवढा गदारोळ व्हावा. त्या कृत्यात, 'काय आली की नाही मज्जा?'हाच भाव होता. पण याही कृत्याचा सोयीस्कर विपर्यास झाला. ‘आँखो की बात करने वालों की आँखो की चोरी पकडी गयी’ हे ही मोदींनी साभिनय सादर करुन दाखवलं... बालिशपणेच.

मोदींनी केलेला तिसरा विपर्यास म्हणजे डोळ्याला डोळा भिडवू शकत नाही या विधानाचा. राफेलचं कंत्राट पंतप्रधानांनी एका अशा जवळच्या उद्योगपतीला दिलं, ज्याला एकही विमान बनवण्याचा अनुभव नाही. आधीच 35 हजार कोटींचं न भरलेलं कर्ज असताना, 45 हजार कोटींचा फायदा मिळवून दिला. हे सांगितल्यावर राहुल म्हणाले, की मला माहितीये हे ऐकताना मोदी वरुन हसतमुख राहायचा प्रयत्न करत असले तरी आतमध्ये ते आता प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. माझ्या नजरेला नजर मिळवत नाहीत. ते इकडे तिकडे बघतायत. हा राहुल गांधीचा टोमणा होता. राफेलबद्दलच्या या आरोपानंतर कामकाज स्थगित झालं. त्यानंतर परत आल्यावर राहुल गांधींनी म्हटलं की मोदीजी जे बघायचे ते साऱ्या देशाने पाहिलं. त्या क्षणाला तुमच्यात नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती. थोडक्यात तुमच्या एका जवळच्या खास उद्योगपतीबद्दल इतके थेट आरोप झाल्याने तुम्ही अस्वस्थ आहात. हे आरोप करताना तुम्ही माझ्या डोळ्यात पाहायला कचरताय हे राहुल गांधी यांचं म्हणणं होतं. पण यावरही मोदींनी आपल्या अतिशय नाटकीय स्वरात, तुम्ही तर नामदार, मी एक गरीब बिचारा कामदार. माझी काय हिंमत तुमच्या डोळ्याला डोळ्या भिडवण्याची असं सांगून विषय भलतीकडेच नेला.

अविश्वास ठराव दाखल टीडीपीने केलेला असला तरी अपेक्षेप्रमाणे मोदी विरुद्ध राहुल असंच रुप या लढाईला प्राप्त झालं. खरं तर अशा अविश्वास ठरावाच्या वेळी अतिशय दर्जेदार भाषणांची परंपरा संसदेत आहे. यावेळी मात्र हा दर्जा खालावला अशी अनेकांची टीका आहे. मोदी, राहुल गांधी वगळता त्यांच्या पक्षाकडून दुसरा एकही वक्ता हे मैदान गाजवू शकला नाही. त्या तुलनेत कमी वेळ मिळालेल्या छोट्या पक्षांमध्ये असदुद्दीन ओवैसी, 'आप'चे भगवान मान यांनी कमी वेळात बहार आणली. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर काँग्रेसकडून आणखी काही टोकदार अपेक्षित असताना खर्गेंचं शैलीहीन, रटाळ भाषण ऐकावं लागलं. त्यांचा वेळ कमी करुन ओवेसी, मान यांना थोडा जास्त वेळा दिला असता तरी विरोधकांचा हल्ला धारदार झाला असता अशी एक खोचक टिपण्णी संसदेतल्या पत्रकार दालनात ऐकायला मिळाली.

बाकी या अविश्वास ठरावाच्या प्रक्रियेत सगळ्यात जास्त कुणी गमावलं असेल तर ते शिवसेनेने. चर्चेतच सहभागी न होणारी सेनेची तटस्थता ही बिनकामाची, पळपुटेपणाची होती. एरव्ही सामनात दंड थोपटतात, पण जेव्हा दिल्लीत प्रत्यक्ष आखाडा सजला तेव्हा लंगोटीवरच गायब झाले मल्ल. अविश्वास प्रस्तावाच्या दोन दिवसांत सेनेच्या भूमिकेवरुन प्रचंड संभ्रम पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी संजय राऊत यांनी माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली, त्यात ते म्हणत होते, अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांना त्यांची बाजू मांडायची संधी मिळतेय. सगळेच बोलतील. हम भी बोलेंगे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पक्षाच्या कार्यालयात खैरेंनी काढलेला व्हीप मीडियाकडे पोहोचला. त्यातली शेवटची ओळ होती, 'अनिवार्य रुप से उपस्थित रहकर सरकार के पक्ष का समर्थन करें'. इतक्या लवकर आपली भूमिका अशी उघड झालीये म्हटल्यावर मग वेगळाच सूर लावला सेनेने. काय तर म्हणे आम्ही व्हिप काढलाच नाही. कुणीतरी खोडसाळपणा केला. दुसऱ्या दिवशी मग चर्चेतच सहभाग घ्यायचा नाही असा निर्णय झाला. तटस्थता दाखवायची तर भाषण करुन, सरकारविरोधातले मुद्दे मांडून सेनेला सभागृहातून वॉकआऊट करता आला असता. पण हा पळपुटेपणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. आता या निर्णयामागे उद्धव ठाकरेंची अमकी आणि ढमकी रणनीती होती असं कुठलंच तुणतुणं ‘सामना’तून वाजवू नये. जनतेचा आवाज मांडण्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय. ती वेळ आल्यावर शेपूट घालून आता सामनांच्या मुलाखतीत गुरगुरण्याला काहीही अर्थ नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेची ही रणांगण सोडून पळण्याची कृती पुढच्या निवडणुकीच्या वेळी विसरु नये. कुठल्यातरी एका बाजूला ठामपणे उभं राहायला शिवसेना घाबरते, हे बाळासाहेबांच्या सेनेला शोभणारं नाही.

बाकी राहुल गांधींच्या भाषणातून हे स्पष्ट झालं की 2019 ची लढाई भाजपसाठी सोपी राहिलेली नाही. मागच्या वेळी त्यांनी जाणूनबुजून विकलेला 'पप्पू ब्रँड' पुन्हा त्यांच्या कामाला येईल असं वाटत नाही. राजकारण हा प्रतिमांचा खेळ आहे. मोदी या खेळातले मास्टर राहिलेले आहेत. जनतेची नाडी पकडण्यासाठी काय करायचं हे त्यांना अचूक माहिती आहे. संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकणं वगैरे सगळं त्यांनी केलेलं आहे. विरोधकांना चकीत करणं मोदींना आवडतं. राहुल गांधींनीही आता तेच केलंय. 'नौटंकी का जवाब नौटंकी से' इतकं साधं हे सूत्र आहे. तुम्ही पप्पू ब्रँड विकलात तर आता काँग्रेसही तितक्याच समर्थपणे 'गप्पू' हा ब्रँड विकू शकते हेच या अविश्वास ठरावांना दाखवून दिलंय.

(वाचक आपल्या प्रतिक्रिया थेट लेखकापर्यंत पोहोचवू शकतात. त्यासाठी एबीपी माझाचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ईमेल आयडी : pshantkadam@gmail.com)