नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी म्हणून राज ठाकरे दिल्लीत येत आहेत असं कळल्यावरच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवरुन राज सातत्याने टीका-टिप्पण्णी करत असले, तरी दिल्लीत त्यांचं येणं दुर्मिळ असतं. मागच्या वेळी ते दिल्लीला आले होते 2005 साली. म्हणजे तब्बल 14 वर्षांपूर्वी. बाळासाहेबांच्या फोटोबायोग्राफीचं उद्घाटन करण्यासाठी वाजपेयींना निमंत्रित करण्यासाठी. त्यानंतर इतक्या वर्षांत ते काही दिल्लीकडे फिरकले नव्हते.

आता अचानक त्यांनी दिल्लीला मोर्चा का वळवला, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सगळे डोकं खाजवत होते. राज ठाकरे यांनी सोमवारी सव्वाबाराच्या सुमारास निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांच्या या दिल्ली भेटीमागे नेमकं काय आहे, याचा अंदाज लावण्यात सगळे मग्न असतानाच राज ठाकरेंनी दुसरा मोठा धक्का दिला, थेट सोनिया गांधी यांची भेट घेऊन. ठाकरे आणि गांधी... राजकारणातले हे दोन ध्रुव एकत्र येतात, तेव्हा ती सर्वसामान्य घटना नक्कीच नसते.

या भेटीचे तपशील, त्याचे परिणाम कळायला अजून काही काळ लागेल, पण ही भेट नव्या समीकरणांना आकार देणारी ठरणार यात शंका नाही. अर्थात, ठाकरे आणि गांधी परिवारातील व्यक्ती भेटण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. याआधी बाळासाहेब ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचीही भेट झालेली होती. बाळासाहेबांनी आणीबाणीचं जाहीरपणं समर्थन केल्याची पार्श्वभूमी या भेटीला होती.

राज ठाकरे सोनिया गांधींना भेटले, राहुल गांधींना नाही, ही बाबदेखील लक्षणीय आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा जो घोळ सध्या सुरु आहे, त्यामुळे या भेटीचा मेसेज गांभीर्याने पोहचवण्यासाठी राज ठाकरेंना राहुल यांच्याऐवजी सोनियाच योग्य व्यक्ती वाटल्या असाव्यात.

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते या पदावर राहणार नाहीत हे उघड आहे. अशात राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली असती, तर उगीच दुसऱ्या मुद्द्यांचीच चर्चा अधिक झाली असती. सोनिया गांधी सध्या उघडपणे पक्षात कार्यरत दिसत नसल्या तरी त्यांचा संघटनेतला प्रभाव कमी झालेला नाही. शिवाय सोनियांची ओळख Queen of Alliances अशी आहे. अनेक राजकीय पक्षांना काँग्रेससोबत आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. देशातल्या अनेक राजकीय नेत्यांना सोनियांशी जुळवून घेणं तुलनेनं अधिक सोपं जातं. शिवाय ठाकरे आणि गांधी यांची भेट म्हटल्यावर त्याची चर्चा कशी होणार याचा अंदाज राज ठाकरेंना असावा.

राज ठाकरे यांच्या या भेटीनंतर आता विधानसभेत महाआघाडीला स्थान मिळणार का? याची चर्चा सुरु होणं साहजिक आहे. पण हे इतकं सोपं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापनाच मुळात एक पर्याय म्हणून झालेली होती. राज ठाकरेंना आजवरचं सर्वात मोठं यश मिळालं ते 2009 च्या निवडणुकीत, जेव्हा त्यांनी 'एकला चलो रे'चा बाणा अवलंबला होता. सोनिया यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी एक राजकीय जोखीम नक्कीच पत्करली आहे. कारण या भेटीमुळे त्यांच्यावर एका कळपात शिरल्याचा शिक्का बसू शकतो. राज ठाकरेंना हे माहिती असूनही का करावं लागतंय?

याची अनेक कारणं असू शकतात. एकतर सध्या मोदी-शाह ज्या पद्धतीचं राजकारण करत आहेत, त्यात राज ठाकरेंच्या पक्षासाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचं पंतप्रधानपदासाठी जाहीर समर्थन करुनही त्याची किंमत मनसेला राज्यात मिळाली नाही. शिवाय जो शहरी मध्यमवर्गीय राज यांचा समर्थक होता, तोच मोदींच्या मागे गेलाय. भाजप किंमत देत नसताना आपला मतदार राज यांना पुन्हा मिळवायचा असेल तर तो मोदींच्या बाजूला उभं राहून नव्हे तर मोदींच्या विरोधात उभं राहूनच मिळू शकतो.

लोकसभेला राज ठाकरेंनी झंझावाती प्रचार करुनही ते युतीच्या जागांना सुरुंग लावू शकले नाहीत. स्वत:चा पक्ष मैदानात नसतानाही स्टार प्रचारकाची भूमिका त्यांनी बजावली. आता त्याचं काय बक्षीस त्यांना विधानसभेला मिळणार हे पाहावं लागेल. विधानसभेला थेट आघाडीत सहभागी करुन घेतलं जाणार की काही जागांवर मनसे स्वतंत्र लढून त्याबाबत पडद्यामागे काही गणितं केली जाणार? लोकसभेला एकही जागा न लढणारे राज ठाकरे त्यामुळे आता विधानसभेला किती जागांवर लढणार, विधानसभेला ते कसा झंझावाती प्रचार करणार, आणि त्याचं फळ त्यांना नुसत्या गर्दीनं मिळणार की मतांच्या रुपानं या सगळ्या प्रश्नांची उत्सुकता असेल.

राज आणि सोनिया यांच्या या भेटीबाबतचा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही भेट घडवली कुणी? या दोघांना भेटवण्यात सर्वात महत्वाची भूमिका कुणाची? भेट काँग्रेस हायकमांडची असली तरी महाराष्ट्रातला कुठला काँग्रेस नेता यात सहभागी दिसला नाही. शिवाय महाराष्ट्राच्याच काँग्रेसमध्ये सध्या इतकी अनिश्चितता आहे की, त्यांच्यात चर्चा करायची म्हटल्यावर कुणाशी करायची हा प्रश्न पडतो. राज्यात कुणाशी चर्चा करत बसण्यापेक्षा थेट हाय कमांडशीच भेटून राज यांनी हा प्रश्न सोडवला असावा. या भेटीमागे कोण असावं याचा विचार केला तर जी सर्वात दाट शक्यता दिसते ती शरद पवार यांची.

लोकसभा निवडणुकीआधीही पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत होत्या. विधानसभेच्या दृष्टीनं राज यांना सोबत ठेवणं पवारांना महत्वाचं वाटत असल्यानं त्यांनी या भेटीत काही भूमिका बजावली असावी अशी दबकी चर्चा ऐकायला मिळत आहे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे, त्यामुळे सोमवारी शक्यतो पवार दिल्लीत असतात. पण या दिवशी नेमके ते तिवरे धरणफुटीतल्या पीडितांची भेट घ्यायला महाराष्ट्रात थांबलेले होते.

राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा हा तीन दिवसांचा होता. या दौऱ्याचा कार्यक्रम तपशीलवारपणे पाहिल्यावर या दौऱ्याचा मुख्य अजेंडा निवडणूक आयोगाची भेट हा होता की सोनिया गांधींची भेट? असाही प्रश्न पडू शकतो. रविवारी संध्याकाळी ते दिल्लीत आले. दुसऱ्या दिवशी दुपारी सव्वाबारा वाजता त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मुख्य आयुक्तांची भेट घेतली. त्याच दिवशी दुपारी ते सोनिया गांधी यांना भेटले आणि सोमवारी दुपारी ते मुंबईत परतले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा आहेत हे स्वत: राज यांनीच पत्रकारांना बोलताना सांगितलं. फक्त एक फॉर्मलिटी म्हणून आपण हे निवेदन सोपवलं, असं त्याचं म्हणणं होतं. ईव्हीएमबद्दलचे त्यांचे आक्षेप गंभीर आहेत, पण आयोगाची ही भेट ही केवळ औपचारिकता होती. त्यामुळेच आयोगाची भेट हे कारण दाखवून त्यांनी या निमित्तानं दिल्लीतली महत्वाची भेट करुन घेतली असावी. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात मनसेच्या दुसऱ्या फळीतला एकही नेता सोबत नव्हता.

सोनिया यांची भेट ईव्हीएमच्या मुद्द्यावर आणि देशातल्या सध्याच्या राजकीय परस्थितीबाबत झाली असं राज ठाकरेंनीच नंतर माध्यमांशी अनौपचारिक गप्पांमध्ये बोलताना सांगितलं. सध्या देशात जी परिस्थिती आहे, त्याला केवळ निवडणुकीतून नव्हे तर व्यापक आंदोलनातून उत्तर देण्याची गरज आहे अशी भूमिकाही त्यांनी सोनियांसमोर मांडली. मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये शिवसेना आणि मनसे एकाच बाजूला असल्यासारखे दिसत होते. दोघांनाही मोदींनी भाव दिला नाही. राज्यात विस्तारासाठी आक्रमक भाजपनं या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला होता. त्यामुळे दोन्हीही पक्ष मोदींवर तुटून पडत होते. आता मात्र दोन्ही दोन टोकाला गेलेत. एक ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोदींच्या वळचणीला जाऊन बसलेत, तर दुसरे राजकीय अपरिहार्यता म्हणून महाआघाडीच्या जवळ जाणार का याची उत्सुकता असेल. प्रादेशिक अस्मितेच्या नावानं महाराष्ट्रावर राज्य करण्याचं स्वप्न पाहणारं हे दोन ठाकरे आता दोन वेगवेगळ्या राजकीय ध्रुवांवर जाताना दिसताहेत.