गांधी घराण्यातल्या चार लोकांनी आजवर अमेठीचं प्रतिनिधीत्व केलंय. सर्वात पहिल्यांदा संजय गांधी, त्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि 2004 पासून राहुल गांधी हे इथले खासदार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून स्मृती इराणी यांनी इथे राहुल गांधींना आव्हान द्यायला सुरुवात केली, पण त्याआधीही अनेक दिग्गजांनी अमेठीत गांधी घराण्याला टक्कर द्यायचा प्रयत्न केलाय. त्यात शरद यादव, काशीराम यांच्यासह मेनका गांधी यांचाही समावेश आहे. संजय गांधी यांच्या निधनानंतर आपला दावा नाकारला गेल्यानंतर मेनका गांधींनी 1984 मध्ये राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती. तसं पाहायला गेलं तर संजय गांधी यांनीच इथून पहिल्यांदा निवडणूक लढवली. संजय गांधींचा मतदारसंघ असूनही जर मेनका गांधी इथे जिंकू शकल्या नाहीत, तर स्मृती इराणी राहुल गांधींना हरवून तो चमत्कार करतील का असाही प्रश्न आहे. गांधी हा भारतीय राजकारणातला एक ब्रँड आहे. आणि त्याची ताकद, जादू अमेठीवर अजूनही नक्कीच पाहायला मिळते. अमेठीला जे काही मिळालं ते गांधी घराण्यामुळे, अमेठीची ओळखच त्यांनी देशभरात निर्माण केली. अशा प्रतिक्रिया इथे पावलापावलावर ऐकायला मिळतात, एक प्रतिक्रिया तर भलतीच…"विकास का क्या हैं, वह तो होता रहता हैं, और अगर नहीं भी हुआ तो चलेगा, लेकिना गांधी फॅमिली का और अमेठी का रिश्ता बना रहना चाहिए."
वायनाडमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर राहुल गांधी घाबरुन पळाले आहेत असा प्रचार भाजपनं सुरु केला. पण प्रत्यक्षात अमेठीत त्याची उलटी प्रतिक्रिया उमटल्याचं दिसतंय. गांधी आता आपल्याला सोडून जाणार की काय, अमेठीला त्यांनी सोडलं नाही पाहिजे अशी प्रतिक्रिया अमेठीत ऐकायला मिळतेय. लोकशाही व्यवस्थेत अशा पोरकेपणाची भावना निर्माण होणं हे काही चांगलं लक्षण नाहीये. पण अमेठीचं आणि गांधींचं नातं असं बनलंय खरं. स्मृती इराणी पराभवानंतरही इथून हटल्या नाहीत. त्या इथे येत राहिल्या ही बाब चांगलीच आहे. पण अमेठीतल्या जाणकारांशी बोलताना जाणवलं की खरंतर त्यांनी एक चांगली संधी गमावली. केंद्रात मंत्री असताना त्यांच्या त्यांच्या खात्यातून अमेठीसाठी बरंच काही त्यांना करता आलं असतं. राहुल गांधींनी 15 वर्षात काही केलं नाही असा आरोप करताना 5 वर्षात अमेठीला आम्ही हे दिलं असा प्रचार त्यांना करता आला असता. पण याऐवजी यूपीएच्या काळातले काही नियोजित प्रकल्प कसे इथे रुजू दिले नाहीत याचीच चर्चा ऐकायला मिळते. शिवाय त्यांच्या कार्यशैलीबद्दल भाजपमध्येही नाराजी असल्याचं ऐकायला मिळालं. स्मृती इराणी यांनी अमेठीतल्या भाजपमध्ये गटतट निर्माण केलेत. एका विशिष्ट गटालाच ताकद दिल्यानं पक्षांतर्गत नाराजी आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातले भाजपचे दोन आमदार त्यामुळे फार मनापासून काम करत नसल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली. अमेठीत मागच्या वेळी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदींनी सभा घेतलेली होती. 2014 पर्यंत साधारण संकेत असा होता की विरोधी पक्ष नेता अमेठी, रायबरेलीत येऊन प्रचार करायचा नाही. पण भाजपनं आपल्या आक्रमकपणाची झलक दाखवत थेट या बालेकिल्यातच आव्हान दिलं. यावेळी शेवटच्या टप्प्यात मोदी फिरकले नसले तरी ती कसर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भरुन काढली. रोड शोच्या माध्यमातून सगळ्या अमेठी शहराला भगवामय करुन टाकण्याचा प्रयत्न भाजपनं केला. काँग्रेसच्या प्रचाराचा भर छोट्या छोट्या सभांवर होता. लढाई राहुल गांधी यांच्याविरोधात असली तरी प्रचारात स्मृती इराणी विरोधात प्रियंका गांधी यांचेच खटके अनेकदा उडाले. अमेठीमध्ये इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपचं एक सुसज्ज कार्यालयही उभारण्यात आलंय. निवडणूक जाहीर झाल्यापासून स्मृती इराणी यांनी अमेठीतल्या गौरीगंज परिसरात एक बंगला भाड्यानं घेतलाय. या बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांची सतत रीघ लागलेली असते. उत्तर प्रदेशातल्या या दोन्ही मतदारसंघात ज्या पद्धतीनं गांधी घराण्याचा प्रचार होतो, ते पाहून विशेष वाटलं. सभेच्या ठिकाणी अतिशय साधा मंडप घातलेला असतो. कुठलाही भपकेबाजपणा, बॅनरबाजी स्टेजवर नसते. साऊंड सिस्टीमही अगदी साधी. आपल्याकडे कारखान्याच्या निवडणुकांमध्येही यापेक्षा चांगला मंडप पाहायला मिळेल. प्रियंका गांधी येणार म्हणून कार्यकर्ते हार घेऊन ओळीने मंडपाच्या खाली उभे होते. त्यांचं आगमन झाल्यानंतर घोषणाबाजी सुरु होते. हारतुरे स्वीकारत प्रियंका गांधी स्टेजवर येतात. पण अगदी क्षणापुरत्याच. मग माईक हातात घेऊन त्या थेट जनतेत मिसळतात. किती वाजल्यापासून थांबलाय तुम्ही, मला यायला उशीर झाला त्याबद्दल माफी मागते असं करुन संवादाला सुरुवात होते. मग अमेठीत आपल्याला काय काय करायचं आहे, इथे एम्स आणण्यामध्ये हे सरकार असं आडकाठी करतंय हे त्या जनतेला सांगायला सुरुवात करतात. त्यातही एम्स हा शब्द या लोकांना कळेल की नाही हे जाणवून एक बडासा हॉस्पिटल, जहाँ पे सारी सुविधा हो असं सुलभीकरणही करुन टाकतात. शेवटच्या दिवशी भाजपनं रोड शोवर भर दिला तर प्रियंका आणि राहुल यांनी महिला बचत गटांच्या एका मोठया मेळाव्यात संवाद साधला.
अमेठीत मागच्या वेळी राहुल गांधी यांना 4 लाख 8 हजार मतं मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना 3 लाख मतं मिळाली. पण मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळची स्थिती आणखी बदललीय. यावेळेस कुमार विश्वास रिंगणात नाहीत. जरी कुमार विश्वास यांना फारशी मतं मिळाली नसली तरी विरोधी वातावरण करण्यात त्यांच्या इमेजचा खूप फायदा झाला होता. सपा-बसपानंही आपला उमेदवार इथे दिलेला नाहीये. अमेठीतली जनता विकासाच्या मुद्द्याला अधिक महत्व देणार की आपली व्हीआयपी मतदारसंघाची ओळख हरवू नये यासाठी भाविनकतेनं मतदान करणार यावर इथली समीकरणं अवलंबून असतील.