'दिल ही दिल मे' नावाचा एक सिनेमा कधी आला आणि कधी गेला ते कळलंच नाही. त्या सिनेमातल्या दोनच गोष्टी प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रेहमानची गाणी. त्या सिनेमातली रहमानची गाणी मात्र अजूनही अनेकांच्या ओठांवर रुळली आहेत. त्या सिनेमात एक 'ए नाजनी सुनो ना' नावाचं गाणं आहे. गाणं ऑस्ट्रेलियामधल्या 12 Apostles या अप्रतिम ठिकाणी शॉट केलेलं आहे. या गाण्याच्या ओपनिंग शॉटला एका लॉंग शॉट मध्ये एक सौंदर्यवती ब्लॅक गाऊन मध्ये दिसते. त्या मनोहारी निसर्गदृश्याइतकीच मनोहर दिसणारी. खरं तर किंचीतच जास्त सुंदर. तिच्या मागून कुणाल (देव त्याच्या आत्म्याला शांती देओ, त्याने नैराश्यातून अवघ्या तिशीत असताना आत्महत्या केली.) येतो आणि त्याच्या दृष्टीतून आपल्याला सोनाली बेंद्रे दिसते. आणि ब्लॅक गाऊनमधल्या सोनाली बेंद्रेला बघून प्रेक्षक घायाळ होतो.


सोनाली बेंद्रेचं सौंदर्य हे उग्र नव्हतं. ते आक्रमक आव्हान करणार सौंदर्य नव्हतं. तिच्या सौंदर्यात काहीतरी निर्मळ थंडावा होता. सोनाली बेंद्रेचं नाव जेंव्हा कुणी घेत तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर तरी तिचं ते सात्विक सौंदर्य, तिची काही अप्रतिम गाणी येतात आणि मग तिसऱ्या क्रमांकावर तिच्या अभिनयाचा लेखाजोखा येतो.



सोनाली बेंद्रे अगोदर 'लगान' ग्रेसी सिंगने केलेली भूमिका करणार होती. 'सरफरोश' मध्ये आमिर सोबत काम केल्याने ती त्याच्या 'गुडबुक' मध्ये होती . पण दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचं मत असं पडलं की सोनालीचं दिसणं आणि शारीरिभाषा 'पाश्चात्य' आहे. त्यांना 'भारतीय' लुक्स असणारी नायिका हवी होती. त्यामुळे सोनालीच्या हातून असा एक चांगला प्रोजेक्ट गेला जो ती आपल्या फिल्मोग्राफीमध्ये अभिमानाने मिरवू शकली असती.

सोनालीने तिच्या कारकिर्दीत  फार ब्लॉकबस्टर हिट्स दिले आहेत किंवा पाथब्रेकिंग सिनेमे केलेत अशातला भाग नाही. पण सोनालीला अप्रतिम संगीत असणारी गाणी मिळाली हे मात्र खरं. अजय देवगणच्या 'दिलजले' मधली सगळीच गाणी भारी आहेत . पण सेकंड लिड मध्ये असणाऱ्या परमित सेठीच्या तोंडी असणार 'सोच रहा हुं किससे पुछु उस लडकी का नाम' हे  गाणं कळस आहे. लष्करी अधिकारी असणारया परमितला सोनाली बेंद्रे दिसते आणि प्रथमदर्शनीच तो तिच्या प्रेमात पडतो. तिच्या सौंदर्याचं वर्णन करणार हे गाणं आहे. त्या गाण्यातले शब्द सोनालीवर चपखल बसतात.

रंग है सोना, रुप है चांदी, आँखे है नीलम 



होठ है कलिया, दात है मोती, जुल्फे है रेशम 



जैसे गजल है, जैसे कंवल है, जैसे छलकता जाम 


 

सोनालीच्या अप्रतिम सौंदर्याचं अप्रतिम वर्णन. सोनालीचं आवडणार अजून एक गाणं म्हणजे 'दहक' सिनेमामधलं 'सावन बरसे तरसे दिल' सिनेमामधलं गाणं . एका हिंदू मुलाच्या आणि मुस्लिम मुलीच्या प्रेमाची कहाणी सांगणारा हा सिनेमा. मुंबईतला पहिला पाऊस सुरु झाला आहे. मुंबईची एकच धांदल उडाली आहे. आणि प्रियकर-प्रेयसीला एकमेकांना भेटायची ओढ लागली आहे. पण अस्ताव्यस्त विस्कळीत मुंबई त्यांच्या भेटीत अडथळे आणते. पण सगळ्या अडथळ्यांवर मात करून प्रियकर प्रेयसी भेटतात. त्यांच्या भेटीची छानशी गोष्ट या तितक्याच छान गाण्यात उलगडत जाते. या गाण्यात सोनाली मुंबईच्या पहिल्या पावसाइतकीच मोहक दिसते. या गाण्याच्या अप्रतिम टेकिंग बद्दल दिग्दर्शक लतीफ बिन्नीला पैकीच्या पैकी गुण द्याला हवेत.

'सरफरोश' मधलं पहिल्या कोवळ्या प्रेमाची महती सांगणार 'होश वालो को खबर क्या' हे जगजित सिंग यांनी गायलेल गाण्याचं टेकिंग पण दिग्दर्शक जॉन मॅथ्यून फार अप्रतिम घेतलं आहे. दिल्लीच्या सुख देणाऱ्या हिवाळ्यातली आळसावलेली रोमँटिक सकाळ या गाण्यात दिसत राहते. अशा रोमँटिक वातावरणातली एका कॉलेज कॅम्पसमधली सकाळ जितकी सुंदर दिसू शकते, तितकीच सोनाली या गाण्यात सुंदर दिसते. तिचे या गाण्यातले विभ्रम कुठ्ल्याही तरुणाला बेहकावण्यासाठी पुरेसे आहेत. 'मेजर साब' मधल्या 'कहेता है पल पल तुमसे' या गाण्यात पण सोनाली अफाट सुंदर दिसते. 'हम साथ साथ है' मध्ये तिचं सौंदर्य दिग्दर्शकाने टॅप केलं होतं.



खरं तर एखाद्या अभिनेत्रीबद्दल लिहिताना तिच्या सौंदर्यावर आणि गाण्यांवर लिहिणं म्हणजे तिच्या अभिनयाचा थोडा अपमान होतो. पण स्वतः सोनालीने स्वतःमधल्या अभिनेत्रीला वाव मिळेल असे रोल केले आहेत असं दिसत नाही. पडद्यावर नायकासमोर दुय्यम भूमिका करण्यात तिने धन्यता मानली.

पडद्यावर छान छान दिसायचं, झुडपाभोवती गाणी म्हणायची, एखाद दुसऱ्या प्रसंगात अश्रू गाळायचे हा तिच्या बहुतेक भूमिकांचा गाळीव अर्क आहे. 'जख्म' सारख्या अतिशय इंटेन्स विषयावर बनलेल्या गंभीर सिनेमात सोनालीच्या अभिनेत्री म्हणून मर्यादा उघडकीस येत्यात. समोर अजय देवगण सारखा अभिनेता असल्यामुळे अभिनयातली छिद्र अजूनच जाणवतात. कदाचित सोनाली ज्या नव्वदच्या दशकात कार्यरत होती, त्या काळाची पण ही मर्यादा असेल. त्या काळात अभिनेत्रींना डोळ्यासमोर ठेवून कथानक लिहिली जात नसत.

अभिनेत्रींच्या क्षमतांना वाव देणारे रोल फारसे नसत. पण आपल्या कारकिर्दीतली ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न सोनालीने केला 'अनाहत' या सिनेमामधून. आपल्या लैंगिक गरजांच्या पूर्तीसाठी बंड पुकारणाऱ्या बंडखोर राणीची गोष्ट हा अमोल पालेकरांचा सिनेमा सांगतो. या सिनेमात एका राणीचा आब आणि रुबाब सोनालीने फार छान दाखवला आहे. हा सिनेमा बघून सोनालीने अमोल पालेकरांसारख्या दिग्दर्शकांसोबत जास्त करायला हवं होत, असं प्रकर्षाने वाटून जातं.

बॉलिवूड सेलिब्रिटी असून पण सोनाली कधीही कुठल्या स्कँडलमध्ये अडकली नाही. बाष्कळ वादविवादांपासून नेहमीच दूर राहिली. कुठल्याही नायकासोबत तिचं नाव जोडलं गेलं नाही. कारकिर्दीच्या एका टप्प्यानंतर गोल्डी बहेल या दिग्दर्शक निर्मात्यासोबत लग्न करून तिने संसार थाटला. सोनालीची इमेज कितीही ग्लॅमरस असली तरी, एकदा पॅक अप झाल्यानंतर सोनाली इतर स्त्रियांसारखीच असते. तिला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे. तिने दक्षिण मुंबईमध्ये एक बुक क्लब चालवला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत चांगली पुस्तक पोंचवण्याचा तिचा प्रयत्न आहे .

नव्वदच्या दशकामध्ये तरुण झालेल्या प्रत्येकाचा सोनाली बेंद्रेवर क्रश होताच. पण मराठी असून पण मराठी माध्यमांमध्ये तिच्याबद्दल फारसे लिखाण झाल्याचा दाखला नाही. या सोज्वळ सौंदर्याच्या सोज्वळ नायिकेची नोंद घेण्याचा हा छोटासा प्रयत्न .

संबंधित ब्लॉग

ब्लॉग : 'घायल' आणि 'घातक' : तत्कालिन भारतीय असंतोषाचे प्रतीक