कोरोनाच्या भीतीने संपूर्ण भारत देश हादरून गेला असताना, दिवसेंदिवस माणसांच्या जमावर निर्बंध आणले जातायत.  महाराष्ट्रातील राज्य शासन तर गर्दी कमी नाही झाली तर मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल बंद करण्याच्या  विचारात आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शक्यतो सर्व कडक पावलं शासन उचलीत आहे. या सर्व प्रकारातून गेल्या दोन दिवसापासून कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना सोशल डिस्टन्ससिंग ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र सर्वसाधारपणे कधीही जनतेला परिचित नसलेल्या या नागरिकांना सोशल डिस्टन्ससिंग बद्दल खरंच माहिती आहे का?

आपल्या भरमसाट लोकसंख्या असलेल्याला राज्यात खरंच लोक याचं पालन करतील का? हा मोठा प्रश्नच आहे. त्याहूनही आपल्या शहरात किंवा राज्यातील परिस्थती याला साजेशी आहे का? राज्य शासनाचा इरादा खरोखरच चांगला आहे आणि याची अंमलबजावणी खरंच होणे गरजेचं आहे. जर जगातील इतर देशात बघितलं तर लक्षात येतं कि सोशल डिस्टन्ससिंग हे गरजेचं आहे. म्हणूनच सरकारने कॉर्पोरेट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा बैठका घेऊन चर्चा करून शक्य तेवढ्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचा सल्ला दिला. बऱ्यापैकी कंपन्यांनी शासनाच्या या आवाहनाला साथ देत कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा आदेशही दिला. काही कंपन्यांनी तर काही दिवसांकरिता कार्यालय बंद करण्याचा निर्णयही घेतला.

जागतिक आरोग्य संघटना, यांच्या मते सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे नागरिकांनी 1 मीटर किंवा 3 फुटांचं अंतर एकमेकांमध्ये ठेवलं पाहिजे, जेणे करून जर समोरची एखादी व्यक्ती खोंकली किंवा शिंकली तर त्यांच्यातून निघणाऱ्या द्रव्याचा तुम्हाला संसर्ग होणार नाही. शासन सध्या सोशल डिस्टन्ससिंग करावं यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे कारण त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होऊ शकते. विविध गोष्टी बंद करण्यामागे, किंवा सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलण्यामागे सोशल डिस्टन्ससिंग करणं हे एकमेव कारण आहे. सोशल डिस्टन्ससिंग केल्याने जास्त लोंक एकमेकांच्या संपर्कात येत नाही आणि त्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होऊ शकते.

त्याचप्रमाणे, राज्यातील विविध प्रसिद्ध देवळं यांच्या प्रशासनाने सुद्धा गर्दी टाळण्याच्या दृष्टीने मंदिरं काही कालावधी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा आणि कॉलेजेस बंद आहेत, राज्यातील काही भागात तर हॉटेल्स, बार, दुकान बंद ठेवण्यात आली आहे. यामागे एकाच उद्देश होता कि गर्दी होऊ नये. जास्त नागरिक एकमेकाच्या संपर्कात येऊ नये. अनेक मंगल कार्यलयांना 31 मार्च पर्यंत कोणतेही लग्नसोहळ्याचे कार्यक्रम घेऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र आज सकाळीच मुंबई मिरर चे वरिष्ठ छायाचित्रकार सचिन हरळकर यांची फेसबुक पोस्ट निदर्शनास आली. त्यामध्ये त्यांनी मुंबईतील एका झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयाला रांगेत उभे असलेल्याला नागरिकांचे छायाचित्र टाकले आहे. या छायाचित्रावरून मन विचलित होऊन वाटतं खरंच ह्या लोकांना सोशल डिस्टनसिंग माहिती आहे का? जर माहिती असेल तर त्यांचा अवलंब ते शौचाला जाण्याकरिता उभ्या असणाऱ्या रांगेदरम्यान करू शकतील काय? त्यांचाकरीता सोशल डिस्टन्ससिंग गेलं चुलीत पाहिलं पोट साफ करणे ही गरज आहे. अशा परिस्तिथीमध्ये या नागरींकांना समुपदेशन क्रमप्राप्त आहे. परंतु त्या समुपदेशनाचा फायदा तो काय, ज्याला सकाळी उठून रोज कामावर जायचय तो तरी किती वेळ वाट बघत बसणार.कारण हजारोंच्या संख्येने झोपडपट्टीत राहत असणाऱ्या नागरिकांना, जेमेतेम 8-10 संडास बांधण्यात आलेले आहे. बरं ही विदारक परिस्तिथिती फक्त कुणा  एका झोपडपट्टीतील नाही तर संबंध देशातील आणि राज्यातील झोपडपट्टीतील चित्र हे सारखचं आहे. तुम्हीचं सांगा, यांनी सोशल डिस्टन्ससिंग कसं अंमलात आणायचं.



एकीकडे झोपडपट्टीतील नागरिकांना सार्वजनिक शौचालयाला रांगेत उभे राहावे लागत आहे. तर दुसरीकडे परदेशातून आलेले चौघे मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये प्रवास करताना आढळून आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चौघांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. शिकली सवरलेली सुजाण माणसं जर असं करायला लागली तर राज्यात आणि  देशात कोरोनचा आकडा वाढू शकतो.

यामध्ये राज्य शासनाला काही दोष देण्याचं कारण नाही, ही परिस्तिथी आज उद्भवलेली नाही वर्षानुवर्षे अशीच आहे. यावर उपाय काढला जावा एवढी मात्र माफक अपेक्षा आहे.

शासनाने विविध आस्थापना बंद करून सुट्ट्या जाहीर केल्या असून तो प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्या सुट्ट्या आनंद घेण्याकरिता दिल्या नसून आपण आपल्या घरी थांबून  कुटुंबाची काळजी घेणे अपेक्षित आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या आपण दुसऱ्या स्टेज मध्ये आहोत म्हणजे, स्थानिक लागण सुरु झाली आहे. शासन आपण तिसऱ्या स्टेज मध्ये जाऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. तिसरी स्टेज म्हणजे समाजात या विषाणूचा प्रादुर्भाव होतो. शासनाने केलेल्याला अथक  प्रयत्नामुळे सध्यातरी परिस्तिथी नियंत्रणात आहे.

कोरोनाचा लढा ही केवळ सरकारची जबाबदारी नसून यामध्ये प्रत्येक नागरिकांच सहकार्य अपेक्षित आहे. ज्या कुणाला सोशल डिस्टन्ससिंग कळत नसेल त्याला सांगण्याची तसदी आपण घेतली तर एक प्रकारे ती जनजागृती होईल. त्यामुळे कुणाला सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय हा प्रश्न पडणार नाही. अजूनही उशीर झालेला नाही, कोरोनाबद्दल जनजागृती करा.

संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा