या काळात मृत्यू होणे म्हणजे त्या नातेवाईकांना एका प्रकारची कठोर शिक्षाच असते याचा प्रत्यय राज्याच्या विविध भागात पाहायला मिळत आहे. सध्याच्या या कोरोनामय परिस्थितीत जर कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्या मृताच्या कुटुंबातील सदस्यांना विविध संघर्षांचा सामना करावा लागतो. त्याची सुरुवात होते ती मृतदेह नेण्याकरिता लागणाऱ्या शववाहिनीच्या उपलबद्धतेवरून, नशीब बलवत्तर असेल आणि ओळख असेल तर रुग्णवाहिका मिळाली तर तो मृतदेह ताब्यात घेणे, बिलाचं सेटलमेंट, इन्शुरंसच्या बारा भानगडी, खासगी रुग्णालयांने 'कधी' अनाठायी बिल जास्त लावलं असेल तर त्यावरून होणारे वाद, त्यानंतर मृतदेह घेऊन स्मशानभूमीत जायच्या आधीची कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, त्यानंतर तो मृतदेह विदयुत वाहिनीतअंत्यसंस्कारासाठी असणाऱ्या प्रतीक्षायादीच्या आधारावरून चार-पाच तास थांबायचं हा कालावधी कितीही असू शकतो, कसे बसे ते अंत्यसंस्कार आटपायचे आणि सुटलो बुवा एकदाचे असे हुश्श करून बाहेर पडायचे. या सुटकेमध्ये दोघांची सुटका झालेली असते ती म्हणजे ताटकळत असणाऱ्या मृतदेहाची आणि कुटुंबातील सदस्यांची.


राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये, समाजमाध्यमांवर अंत्यविधीसाठी लागणाऱ्या प्रतीक्षेची कैफियत अनेक ठिकाणी मांडण्यात आली आहे. प्रत्येक कोरोनाबाधित मृत्यूनंतरची कहाणी वेगळी आहे, काहींना कुठलाच त्रास झाला नसेल असे काही असतीलही. मात्र जी काही उदाहरणे पुढे येत आहेत त्यात केवळ मरणानंतरच्या यातना त्या मृताच्या कुटुंबातील सदस्यांच्या वाट्याला येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मृतांचा आकडाच एवढा वाढत आहे की त्या विद्युतदाहिनी कमी पडायला लागल्या आहेत. अनेक मृतांच्या कुटुंबियांना अंत्यसंस्कारासाठी ताटकळत बसावे लागत आहे. विद्युतदाहिनीची डागडुजी हा एक दुर्लक्षित विषय आहे. अनेक वेळा यापूर्वी कोरोना यायच्याआधी विद्युतदाहिनी बंद असल्याचे सांगितल्यावर नागरिक निमूठपणे लाकडांवर मृतदेह ठेवून अग्नी देऊन अंत्यसंस्कार करीत होते. मात्र कोरोनाने विद्युतदाहिनीतच 'अंत्यसंस्काराची' अट घातल्यावर या विद्युतदाहिनीची व्यवस्था ठेवणाऱ्यांची धावपळ उडाली आहे. प्रशासन शक्य ते प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये आरोग्य व्यवस्थापनाचा गलथानपणा अनेकवेळा पाहायला मिळत आहे.


मृतांचा आकडा वाढत आहे, राज्यात दिवसाला 300-350 कोरोनाबाधितांचे मृत्यू होत आहेत. त्याप्रमाणे स्थानिक महानगरपालिकांनी - नगरपालिकांनी आपल्या हॉस्पिटलशी समन्वय साधून कोणत्या वेळी मृतदेह रुग्णांच्या ताब्यात दिल्यास त्यांच्यावर तात्काळ अंत्यसंस्कार केले जातील याची व्यवस्था करावी लागणार आहे. यामध्ये महापालिका, रुग्णालय आणि स्मशानभूमी व्यवस्थापनाचा समन्वय असल्यास हा प्रश्न निकालात निघू शकतो. त्यासाठी माणसे लागतील, पण त्याची व्यवस्था करणे शक्य आहे. अन्यथा अनेक नागरिकांना अनेकवेळा मृतदेह शववाहिनीत ठेवून ताटकळत बसावे लागत आहे. काहीवेळा नातेवाईकांना मृतदेह एका स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारासाठी वेळ लागणार आहे म्हणून दुसऱ्या स्मशानभूमीत जावे लागते, या सर्व घटना वेदनादायी आहेत.


राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या 11 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाख 15 हजार 681 झाला असून आतापर्यंत 28 हजार 724 जणांचा मृत्यू झाला आहे, तर त्यापैकी एकट्या पुणे परिसरात दोन लाख 23 हजार 710 रुग्ण बाधित झाले असून असून चार हजार 693 जण मृत पावले आहेत. राज्याची आरोग्य यंत्रणा या आजाराला आळा घालण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत राज्यातून सात लाख 15 हजार 023 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. अशा या रोगट वातावरणात आजारी पडू नये म्हणून प्रत्येक जण स्वतःची काळजी घेत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण अशा वेळी आजारी पडू नये अशी स्थितीच आहे.


आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघितलं असेल की, अनेक नागरिकांनी म्हणजे मुलाने आपल्या आईचा अंत्यविधी मोबाईल मधील व्हिडिओ कॉलद्वारे बघून जिथे आहे त्या ठिकाणावरून श्रद्धांजली वाहिली. ही केवळ एक नाही देशात अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. आजारी आई-वडिलांना , त्यांची मुलं सध्या या महाभयंकर परिस्थितीत मोबाईलवरूनच विचारपूस करताना आढळत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याच्या भेटण्यावर कडक निर्बंध आहेत. तसेच किती लोकांनी अंत्यविधीला उपस्थित राहायचे यावर अंकुश ठेवण्यात आला आहे, अंत्यविधी करणे अवघड झाले आहे. जगण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जितक्या वेदना होत नसतील तितक्या वेदना त्या मृत्यूनंतर त्या देहाला आणि त्याच्या कुटुंबियांना होत असतील.


आपण कायम म्हणत असतो किंवा तुम्ही हे अनेकांकडून ऐकलं असेल, एखाद्या वेळेस आपण जवळच्या व्यक्तीच्या आनंद सोहळ्याला जाऊ नये पण दुःखाच्या प्रसंगी कायम हजेरी लावावी. जर एखादा मित्र किंवा कुटुंब परिवारातील निधनाची बातमी ऐकली किंवा कुणी आजारी असेल तर आपण क्षणांचाही विलंब न लावता त्या ठिकाणी सांत्वन किंवा आपल्या जवळच्या त्या व्यक्तीचं मनोबल उंचवण्यासाठी हजर राहतो. मात्र कोरोनासारख्या या जाली दुश्मन ठरलेल्या  आजाराने या सगळ्या नात्या-गोत्यावर पाणी फेरलंय. अगदी घरच्या व्यक्तीच्या आजरपणात किंवा दुर्दैवी निधनात सगळ्यांना दूर ठेवणारा हा आजार जगाच्या पाठीवर अनेक पिढ्यांनी पहिल्यांदाच अनुभवला असेल.


21 एप्रिलला ' त्या 'डॉक्टरांना' मरणाने छळले होते ' या शीर्षकाखाली कोरोनाच्या काळात ज्या डॉक्टरांनी रुग्णांना सेवा दिली आणि त्यांनाच कोरोना होऊन शेवटी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपला जीव गमवावा लागला होता. मात्र त्यांच्या अंत्यविधीला स्थानिक लोकांनी खूप विरोध केला होता. त्याची सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली होती.


कोरोनाचा प्रादुर्भाव देशातील काही जणांचे बळी घेतोय, तर मोठी रुग्ण संख्या वाढवतोय यावर आपली आरोग्य यंत्रणा त्याचा सक्षमपणे मुकाबला करून त्यावर लवकर विजय मिळवेल यामध्ये दुमत नाही. परंतु हा कोरोना माणसांमध्ये विषमतेची बीज पेरतोय त्याला मात्र नागरिकच आवर घालू शकतात. एप्रिल महिन्यात देशाच्या विविध प्रांतातील तीन डॉक्टर आपले कर्तव्य बजावत असताना धारातीर्थ झाले. रुग्णांना उपचार देत असतं त्यांना या रोगाची लागण झाली असून त्यांचे निधन झाले, मात्र या तीन डॉक्टरांच्या अंत्यविधीला समाजातील काही समाजकंटकांनी अडथळे निर्माण केले. हे तीनही डॉक्टर राज्यातील देशातील विविध भागातील होते. आंध्रप्रदेश येथील डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी (60), तामिळनाडू येथील 55 वर्षीच्या न्यूरोसर्जन डॉ. सिमॉन हर्क्युलस, मेघालय येथील 69 वर्षीय डॉ. जॉन एल सायलो रायनाथथिंग. पोलिसांची मदत घेऊन त्यांचे विधी पार पाडण्यात आले ही घटना केवळ निंदनीय नसून या घूर्णस्पद कृत्याचा निषेध समाजातील सर्वांनीच करायला हवा.


डॉक्टरी पेशातील लोक संपूर्ण आयुष्य रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी वेचत असतात, अनके वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाची परवा न करता रुग्णांना उपचार द्यायचे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकाने उपचार झाल्यानंतर 'थँक यु' म्हटल्यावर डॉक्टरांना हत्तीचं बळ येतं. मात्र जेव्हा कोरोनासारखी वैश्विक महामारीचं संकट उभं ठाकल्यानंतर जीवाची बाजी लावतो आणि रुग्णांना उपचार देतो तेव्हा त्याचं अभिनंदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण देश करतो. आज त्या डॉक्टरांच्या वाट्याला मरणानंतरही छळलं यापेक्षा काय मोठी शोकांतिका असावी. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी कोरोनाच्या या लढाईत डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस यांची गणना 'योद्धे' म्हणून केली आहे. या योध्याच्या नावाने देशभरात थाळ्यांचा आवाज करून अभिवादनही केले होते, त्या थाळ्याचा निनाद हवेत कोठे विरून गेला तेच काळत नाहीए.


मागच्या एका लेखात या ओळींचा वापर केला होता आज त्याची आठवण पुन्हा झाली, आज कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात. जर ते आज हयात असते तर त्यांना या घटनांनी नक्कीच व्यथित केले असते आणि त्यांनी त्यांच्या कवितेत 'मरणानेही छळले होते' असा बदल केला असता.


"इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते"


खरं तर कवी सुरेश भटांनी दुर्दम्य आशावाद ठेवून त्यांच्या या कवितेत लिहून ठेवलय की माणसाला जगात असताना ज्या यातना भोगाव्या लागल्यात किमान त्या यातना त्याला मरण पावल्यावर त्याच्या वाट्याला येणार नाहीत. परंतु ज्या पद्धतीने राज्यातील कोरोनाबाधितांचे मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधी करत विविध दिव्यातून पार पडावे लागत आहे, यापेक्षा वाईट काय असू शकतं...