मुंबई हे असं शहर आहे, ज्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करण्याकरता डॉक्टरांची चिठ्ठी लागत नाही. नागरिक कोरोनासारखी काही लक्षणं दिसल्यास थेट लॅबमध्ये जाऊन चाचण्या करत आहे. त्याशिवाय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन झाल्यावर खात्री करण्याकरिता रिपोर्ट निगेटिव्ह आलाय की नाही याची चाचणी करून पाहत आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर पुन्हा थोड्याफार प्रमाणात निराश होऊन मन घट्ट करून नागरिक उपचार घेत आहे. मात्र पुन्हा चाचणी करून रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचा आनंद मात्र गगनात मावल्याशिवाय राहत नसल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसत आहे. दहावी-बारावीचे निकाल लागले, विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र सध्या रोजच सुरु असलेल्या कोरोनाच्या परीक्षेत सर्वच जण पास होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या परीक्षेत तुमचा निकाल म्हणजे तुमची कोरोना चाचणी निगेटिव्ह येणे अपेक्षित आहे. मात्र हा निकाल मनासारखा आल्यावर रुग्ण आणि त्यांचे सर्वच नातेवाईक आनंदित होताना दिसत आहे. विशेष म्हणजे पहिला हा निकाल संबंधित कौटुंबिक आणि मित्राच्या व्हॉट्सअॅपला जात असून, लागलीच समोरून एकच 'रिस्पॉन्स' अभिनंदन काळजी घे. काही ठिकणी एक विशिष्ट कालावधी रुग्णालयात घालवल्यानंतर म्हणजे सात-आठ दिवसांनी रुग्णाला जर कोणतीच लक्षणे नसतील तर चाचणी न करता 10-12 दिवसांनी घरी सोडण्यात येत आहे. मात्र रुग्णच अनेक वेळा खात्री करण्याकरिता टेस्टची मागणी करताना दिसत आहेत.


आजही नाही म्हटलं तरी काही प्रमाणात का होईना शिकल्या-सवरल्या लोकांमध्ये कोरोनाला घेऊन किंवा कोरोना झाला तर त्यावर शंका-कुशंका, अपराधी आणि लाज वाटत असल्याची भावना असल्याचं जाणवत आहे. हे काही दांभिक लोक उघडपणे नाही पण दबक्या आवाजात को होईना त्याला/तिला कोरोना झाला असल्याची चर्चा चवीने करत आहेत. खरंतर कोरोनाचे आगमन होऊन सहा महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला आहे. लोकांमध्ये या आजाराबद्दलची बऱ्यापैकी जनजागृती निर्माण झाली आहे. लोकांना आता नेमकं माहिती आहे की कोरोना झाला तर कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची, आरोग्य यंत्रणेला कुठे संपर्क साधायचा. तरीही या आजाराबद्दल अजूनही काही जणांच्या मनात अस्पृश्यतेची भावना आहे. आपल्याकडे यापूर्वी काही माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनाही घडल्या आहेत, काहीवेळा कोरोनाबाधित कुटुंबियांना वाळीत टाकले गेले आहे. कोरोनाबाधित डॉक्टरांना मृत्यूनंतर शेवटच्या अंत्यविधीला विरोध केला गेला आहे. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना हाऊसिंग सोसाट्यांमध्ये राहण्यावरून विरोध केला गेला आहे. काही महाभाग असे आहेत त्यांना आजारातून बरे होईपर्यंत डॉक्टर देव वाटत असतो, मात्र एकदा का उपचार घेऊन झाले की त्या व्यक्तीची डॉक्टरांसंबंधी असणारी भावना वेगळीच होऊन जाते, असे अनेक प्रकारचे अनुभव डॉक्टरांना आले आहेत.


सध्याच्या घडीला देशात आतापर्यंत 10 लाख 94हजार 374 जण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत दोन लाख 56 हजार 158 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे 60.68% इतके झाले आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असली तरी त्याचबरोबर टेस्टिंगचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाबाधित मृत्यूची संख्याही वाढत आहे, ती आटोक्यात आणणे याकरिता प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला आणखी काही प्रयत्न करता येतील का याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. राज्यातील काही शहरात/जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात आहे तर काही ठिकाणी ती वेगात वाढत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते आणखी काही काळ अशाच पद्धतीने आकडे खाली वर होत राहणार आहे. साथीचा आजार नेमका कधी आटोक्यात येईल हे सांगणे मुश्किल असते. तसेच काहीसे कोरोना या आजाराबाबत घडले आहे, आतापर्यंत अनेक तज्ज्ञांनी कोरोनाबाबत भविष्य वर्तविले होते. कोरोनाची साथ अमुक महिन्यात आटोक्यात येईल रुग्णसंख्येत इतकंही वाढ होईल, किंवा पावसाळ्यात रुग्णसंख्या फारशी राहणार नाही, हे सर्व दावे कोरोनाच्या बाबतीत चुकीचे ठरलेले सगळ्यांनीच बघितले आहे.


काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाबतची भीती कमी झाली आहे असे वाटत असले तरी अनेक लोक आजही घराच्या बाहेर उतरायला घाबरत आहे. एक गोष्ट सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. रुग्णसंख्येच्या वाढीवरून हे सगळ्यांच्याच लक्षात येत असेलच. मात्र जी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळाली आहे त्याचा वापर सुरक्षिततेचे नियम पाळून सगळ्यांनीच केला पाहिजे. राज्याच्या काही भागात आजही नागरिक मास्क लावत नाहीत किंवा सोशल डिस्टनसिंगचे पालन करताना दिसत नाहीत. कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर सुरक्षिततेचे नियम पाळलेच पाहिजे असे अनेकवेळा सर्वच तज्ज्ञांनी ओरडून ओरडून सांगितले आहे. अनेक नागरिक विनाकारण आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांशी नियमांवरून हुज्जत घालत असतात. नागरिकांनी त्यांच्यावरील कामाचा ताण लक्षात घेऊन त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.


"हे मान्य केलंच पाहिजे की आजही काही नागरिकांच्या डोक्यात कोरोनाला घेऊन तुच्छतेची भावना आहे. ते आजही एखाद्याला हा कोरोनाचा आजार झाला तर त्याने कोणता तरी मोठा गुन्हा केला आहे अशा अविर्भावात त्या रुग्णाशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी वागत असतात. लोकांच्या डोक्यातून हा सगळा प्रकार काढून टाकणे गरजेचं आहे. कोरोना हा आजार संसर्गजन्य जरी असला तरी तो बरा होण्याचे प्रमाण फार मोठं आहे. आजही देशाची आणि राज्याची रुग्ण बरे होण्याची आकडेवारी पाहिली तर आपल्या लक्षात येईल. नागरिकांनी अशा काळात एकमेकांना मदत करून पुढे जाण्याची गरज आहे. लवकरच या आजारावर आपण विजय मिळवू, चांगले दिवस लवकरच येतील ही आशा मनात बाळगून पुढे जात राहिले पाहिजे. या सगळ्या परिस्थितीत घाबरून न जात दक्ष राहण्याची गरज आहे. सर्वच ठिकाणी सकारात्मक वातावरण तयार करण्याची गरज आहे. " असे डॉ. अनिल पाचनेकर सांगतात, डॉ. पाचनेकर इंडियन मेडिकल असोसिशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.


कोरोनाचा रिपोर्ट जसा निगेटिव्ह आलाय त्यावर अभिनंदन करतो, त्याचप्रमाणे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर त्या रुग्णाच्या कुटुंबियांना धीर येईल असे प्रेमाचे चार शब्द बोलून, काही होणार नाही उपचार घेऊन 8-10 दिवसात रुग्ण बरा होऊन घरी येईल असे बोलण्याची प्रथा आणखी रूढ झाली पाहिजे. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक यांना काही प्रमाणात को होईना या कोरोनाविरोधात लढायला बळ प्राप्त होईल. आनंदात सगळेच सामील असतात, मात्र दुःखात सामील झाल्यावर समोरची व्यक्ती कितीही त्रासात असेल तरी त्या व्यक्तींमध्ये जगण्याची नवीन उमेद निर्माण होते. त्यामुळे अशा कोरोनाच्या काळात नागरिकांनी माणुसकी ठेवून एकमेकांशी चांगलं वागले पाहिजे. आज श्रीमंत असो की गरीब असो प्रत्येक जण आपापल्या विवंचनेत आहे, उद्याच्या चिंतेत आहे, काही जण तर अक्षरशः दडपणाखाली जगत आहे. या काळात कुणी मदत मागितली नसली तरी मदतीची अपेक्षा सगळ्यांनाच असते. त्यामुळे शक्य त्या पद्धतीने या काळात मदत करून काही लोकांच्या चेहऱ्यवार हसू आणण्याचं तुम्हाला निम्मित बनता आलं तर नक्की बना!