अकोला : तो आहेच मुळात लढवय्या.. सहजासहजी हार न मानणारा.. त्याच्या या लढवय्या चिवटपणासमोर नियतीलाही अखेर त्याला 'अजिंक्य' घोषित करावं लागलं. अन् त्यानं कोरोनासह नंतर झालेल्या प्रकृतीच्या समस्यांना परास्त करीत हे आयुष्याचं 'अजिंक्यपद' पटकावलं आहे. अन् तो ठरलाय खऱ्या अर्थानं 'मृत्यूंजय'. ही गोष्ट आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातील देवानंद सुरेश तेलगोटे या तरूणाची. त्याचा मागच्या पाच महिन्यांतील संपुर्ण जगण्याचा संघर्ष अन् त्यावरचा विजय हे जगातील माणुसकी, मैत्री अन् संवेदनशीलता या मुल्यांचा विजय आहे. 


देवानंद तेलगोटे हा अतिशय प्रतिभावंत असलेला तरूण. त्यानं मुंबईतील पवईच्या आयआयटीमधून 'केमिकल इंजिनिअरींग'चं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची ऑगस्टमध्ये 11 तारखेला मुलाखत होती. मात्र, त्यावेळी त्याच्यावर सुरू असलेल्या उपचारांमुळे ही मुलाखत देणं शक्य झालं नव्हतं. कोरोनामुळे देवानंदची फुफ्फुसं निकामी झाल्याने त्याच्यावर हैद्राबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्यावर अद्याप फुफ्फुस प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया झाली नाही. मात्र, सध्या प्रकृती चांगली असल्याने तब्बल 135 दिवस रूग्णालयात काढल्यानंतर त्याला सुट्टी झाली आहे. 


कोरोना आणि त्यानंतरचा संघर्ष देवानंदच्या लढवय्या वृत्तीची 'गाथा' : 
देवानंद सुरेश तेलगोटे हा तरूण अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातला. त्याचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. तर शालेय शिक्षण तेल्हारा शहरात. बारावी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला देवानंदची पुढील शिक्षणासाठी देश आणि जगभरातील नामवंत संस्था असलेल्या मुंबईतील पवईतल्या 'आयआयटी'मध्ये निवड झाली. त्याने पवईतून 'केमिकल इंजिनियरींग'चा अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. पुढे त्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली गाठली. अतिशय होतकरू अन् हुशार असलेल्या देवानंदने अलिकडेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परिक्षा उत्तीर्ण केली आहे. देवानंदचे वडील सुरेश तेलगोटे हे सैन्यातून सेवानिवृत्त झालेत. ते कुटुबियांसह तेल्हारा येथे राहतात. 




दिल्लीत झाली होती कोरोनाची लागण :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेचा निकाल लागल्यानंतर मे महिन्यात अंतिम मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर झाले होते. 5 मेला देवानंदची मुलाखत असल्याने तो एप्रिलमध्येच तयारीसाठी दिल्लीला गेला होता. अन् तिथेच त्याला कोरोनानं गाठलंय. तिथे योग्य उपचार मिळत नसल्याने तो अकोल्यात परत आला होता. अकोल्यात त्याच्यावर उपचारही सुरू झाले होते. मात्र, त्याची प्रकृती ढासळत गेली. अन् यातच कोरोनामुळे त्याची फुफ्फुसं ऐंशी टक्के निकामी झाल्याची बाब वैद्यकीय अहवालात पुढे आली. त्याला पुढील उपचारासाठी हैदराबादच्या के.आय.एम.एस. रूग्णालयात हलवायचं होतं. सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांनी पोराच्या उपचारासाठी आयुष्याची पुंजी पणाला लावली. मात्र, या पैशात उपचार शक्य नव्हतेच. अन् यातूनच समाज, संवेदना अन् माणुसकीला मदतीची हाक देण्यात आली. अन् येथूनच जगभरात देवानंदसाठी सुरू झाला माणुसकीचा महायज्ञ. 


'हेल्पींग हँड्स फॉर देवा' चळवळ जभरातील माणुसकी-संवेदनेचा गहिवर :
कोरोनानंतर देवानंदची प्रकृती अधिकाधिक बिघडत गेली. अकोल्यात उपचारासाठी मर्यादा येत असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी हैदराबादला हलवावे लागणार होते. यासाठी लागणारा खर्च हा करोडोंच्या घरात होता. त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी परत देश आणि जगाला मदतीची साद घातली होती. देवानंदला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी समाज माध्यमांवर 'हेल्पींग हँड्स फॉर देवा' या नावाने एक 'कँपेन' चालविलं. या 'कँपेन'च्या मदतीला जगभरातील माणुसकी धावून आली. 'हेल्पींग हँड्स फॉर देवा' या 'सोशल मीडिया'वरील  'कँपेन'ला जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. यासाठी काम करणाऱ्या 'मिलाफ' या संस्थेच्यासोबतच हा मदतीचा ओघ सुरू झाला. जगभरात विखुरलेले आयआयटीएन्स, त्याच्यासोबत युपीएससीचा अभ्यास करणारे मित्र, अकोल्यातील मित्र आणि नातेवाईक यांच्या मदतीतून जवळपास आधी एक कोटींचा आणि नंतर फुफ्फुस प्रत्यारोपण उपचारांसाठी 70 लाखांवर निधी उभा झाला देवानंदसाठी जमा झाला. या य कँपेन'ला आतापर्यंत राज्य, देश आणि जगभरातून दहा हजारांवर लोकांनी मदत केली आहे. 




'एअर अँब्युलंस'ने पुढील उपचारांसाठी हलविले हैदराबादला :
पहिल्या एक कोटींचा निधी जमा झाल्यानंतर त्याला 15 मेला पुढील उपचारांसाठी एयर अँब्युलंसने अकोल्यावरून हैद्राबादला हलविण्यात आलं होतं. यासाठी सर्व सोपस्कार पुर्ण करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची प्रकृती सुधारत होतीय. यातच त्याने 25 मेला रूग्णालयात आपल्या वाढदिवसही साजरा केला होता. मात्र, त्यानंतर त्याची प्रकृती कमालीची नाजूक झाली होती. डॉक्टरांनी यासाठी त्याच्यावर फुफ्फुसं प्रत्योरोपनाची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचं मत दिलं आहे. सध्या देवानंदवर ही शस्त्रक्रिया व्हायची आहे. आरोग्यविषयक सर्व गोष्टी जुळून आल्यानंतर ही शस्त्रक्रिया होणार आहे.


देवानंदला वाचविण्यासाठी मित्रांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा :
 तेलगोटे परिवार आपल्या मुलाच्या कोरोना आजाराने पार सैरभैर होऊन गेला होता. यातच आयुष्याची अख्खी पुंजीच त्यांनी देवानंदला वाचविण्यासाठी लावली आहे. मुलाचा आजार कमी होत नाही, पैसे संपले अशा परिस्थितीत या परिवाराच्या मदतीला धावून आलेत देवानंदचे मित्र. अन् त्यांनीच देवानंदला वाचविण्यासाठी गेल्या साडेचार महिन्यांपासून स्व:ताला अक्षरश: झोकून दिलं आहे. या मित्रांनी अनेक व्हॉट्सअप गृपवरून देवानंदच्या मदतीसंदर्भातील मदतीचे मॅसेजेस फॉरवर्ड केलेत. 'हेल्पींग हँड्स फॉर देवा' हे 'कँपेन' त्याच्या मित्रांच्या माध्यमातून जगभर राबविले गेले. यासोबतच हे सर्व मित्र त्याच्या कुटूबियांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने धडपड केली आहे.




पोलीस आयुक्त महेश भागवत मदतीला धावलेत :
कुटुंबाला हैदराबादमधील रचाकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांच्याकडून मदत मिळाली. त्यांनी 'केआयएमएस हॉस्पिटल'मध्ये बेडची व्यवस्था केली. त्यांनी काही आयपीएस अधिकाऱ्यांची मदत घेऊन देवानंदला उपचारांसाठी काही प्रमाणात आर्थिक मदत केली. नागरी सेवांसाठी कोचिंग घेणारे काही मित्रही देवानंदच्या समर्थनार्थ आले. पोलीस आयुक्त भागवत यांनी काही दात्यांकडून निधी गोळा त्यांना मदत केली. हॉस्पिटल व्यवस्थापनानेही त्याच्या उपचारासाठी 20 लाख रुपये माफ केले आहेत.


केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुलाखतीची मुदत वाढवत केला देवानंदच्या प्रतिभा आणि संघर्षाचा सन्मान :
कोविडच्या संसर्गाविरूद्ध साडेचार महिन्यांची, जीवघेणी लढाई जिंकल्यानंतर, अकोल्याचे देवानंद तेलगोटे नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास तयार आहेत. प्राथमिक आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर पास झाल्यानंतर त्याला कोविड 19 चा संसर्ग झाला होता. त्यामुळे मुलाखत फेरी किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी उपस्थित होण्याच्या सर्व आशा त्याने गमावल्या होत्या. या संसर्गामुळे त्याच्या फुफ्फुसांना 80 टक्के नुकसान झालं होतं. यामुळे ऑगस्ट महिन्यातील मुलाखत त्याला देता आली नाही. त्याच्या मुलाखतीची तारीख वाढवत त्याच्या विशेष मुलाखतीच्या परवानगीसाठी देवानंदचे कुटूंबिय आणि मित्रांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे विनंती केली. त्यांच्या या विनंतीला मान देत केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्याला मुलाखतीची संधी दिली आहे. यूपीएससीने देवानंद तेलकोटे यांची विशेष मुलाखत घेण्यास सहमती दर्शवली. त्यांनी मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. 


कोरोनानं आपल्या जगण्याचे संदर्भ पार बदलवून टाकलेत. कोरोना काळात माणुसकीची अनेक विपरीत रूपही पहायला मिळालीत. मात्र, देवानंदच्या निमित्तानं माणुसकीचं एक संवेदनशील रूप जगाला पहायला मिळालं आहे. देवानंदला या मुलाखतीसह पुढील यशासाठी 'एबीपी माझा'च्या शुभेच्छा!