देश स्वतंत्र झाल्यानंतर फाळणीमुळे अनेक जण पाकिस्तानातून भारतात आले. यात जसे राजकारणी, व्यावसायिक होते तसेच कलाकारही होते. या कलाकारांनी येथे येऊन देशातील जनतेच्या मनावर राज्य केले. चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांनी जे स्थान मिळवले आणि आजही अबाधित ठेवले ते स्थान आजवर कोणत्याही कलाकाराला मिळवता आलेले नाही आणि हेच त्यांचे यश म्हणावे लागेल. संवेदनशील अभिनेता असल्याने त्यांना ट्रॅजेडी किंग म्हणूनही ओळखले जाते. आज त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेले काही दिवस त्यांना सतत हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी काल रात्री ट्विट करून दिलीप कुमार यांची प्रकृती सुधारत असून ते लवकर घरी यावेत अशी प्रार्थना करा असे म्हटले होते. परंतु दिलीपकुमार यांची प्रकृती आणखी खालावली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले.


दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद या त्रयीने अनेक दशके प्रेक्षकांवर गारूड केले होते. स्वातंत्र्यानंतर  देशाच्या बदलत्या रुपाचे दर्शन या कलाकारांनी चित्रपटातून घडवले. राज कपूरने प्रेक्षकांना एका मोहमायेच्या दुनियेत नेले तर दिलीप कुमार यांनी सामान्य माणसाच्या जीवलनातील ट्रॅजेडीला पडद्यावर अत्यंत उत्कृष्टपणे साकारले होते. या कलाकारांना भेटणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हे माझे स्वप्न होते. राज कपूर यांना भेटण्याची संधी मिळाली नाही मात्र दिलीप कुमार आणि देव आनंद यांना मात्र भेटण्याची संधी काही वेळा मिळाली. दिलीप कुमार यांच्याशी पहिली भेट 30वर्षांपूर्वी कलिंगा चित्रपटाच्या दरम्यान झाली होती. आणि दिलीप कुमार, दिलीप कुमार का आहे याची प्रचिती आली होती. समोरच्यावर आपल्या प्रतिमेचा दबाव येऊ नये याची ते पूर्ण काळजी घेत त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलताना आपण एका सुपरस्टारबरोबर बोलत आहोत असे वाटतच नसे.


11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानातील पेशावर येथे जन्म झालेल्या दिलीप कुमार यांचे खरे नाव युसूफ सरवर खान. फाळणीनंतर ते मुंबईत आले आणि आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळू लागले. परंतु वडिलांशी वाद झाल्याने त्यांनी घर सोडले आणि पुण्याला जाऊन कँटीनचा व्यवसाय सुरु केला. मात्र हे कंत्राट संपल्यानंतर ते पुन्हा मुंबईला आले आणि काम शोधू लागले.  मुंबईत एकदा त्यांची भेट त्यांचे कौटुंबिक मित्र असलेल्या डॉक्टर मसानी यांच्याशी झाली. डॉ.मसानी त्यांना घेऊन देविका रानी यांच्याकडे गेले. बॉम्बे टॉकिजच्या मालकीन, अभिनेत्री देविका रानी यांनी यूसूफ खानकडे पाहिले आणि हा आपल्या नव्या चित्रपटातील नायक म्हणून शोभून दिसतो असे त्यांना वाटले. लगेचच त्यांची स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि महिना 1250 रुपयांवर साईन करण्यात आले. युसूफ खानला त्यांनी नायक तर बनवलेच तसेच त्या काळात कुमारांची चलती असल्याने त्यांनी त्यांचे दिलीप कुमार असे नामकरणही केले. 1944 मध्ये प्रदर्शित झालेला ज्वार भाटा हा दिल्पी कुमार यांचा पहिला चित्रपट.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नाही परंतु बॉलीवुडला एका नवा स्टार मिळाला. ज्वार भाटा ते 1998 मध्ये आलेल्या किला चित्रपटापर्यंत त्यांनी जवळपास 65चित्रपटात काम केले आहे.


दिलीप कुमार यांनी अनेक चित्रपटाचे घोस्ट दिग्दर्शन केल्याचे म्हटले जाते. परंतु अधिकृत दिग्दर्शक म्हणून कलिंगा हा त्यांचा पहिलाच चित्रपट. दिलीप कुमार यांनी स्वतः लिहिलेल्या कथानकावर (बी. आर. चोप्रा यांनी त्यांना ही कथा ऐकवली होती असेही म्हटले जाते.) आधारित या चित्रपटात दिलीपकुमार दिग्दर्शनाबरोबरच मुख्य भूमिकाही साकारीत होते. चित्रपटाची निर्मिती करीत होते सुधाकर बोकाडे. मात्र दुर्देव असे की जवळ-जवळ ९० टक्के तयार झालेला हा चित्रपट पूर्ण होऊन प्रदर्शित होऊ शकला नाही. याच चित्रपटासंदर्भात त्यांच्याशी काही भेटी झाल्या होत्या. धर्मेंद्र जेव्हा चित्रपटसृष्टीत आले तेव्हा त्यांचा आदर्श दिलीप कुमारच होते. आणि वेळोवेळी त्यांनी ही गोष्ट बोलूनही दाखवली आहे. आपल्या मुलाने सनीने दिलीप कुमारबरोबर काम करावे असे त्यांना वाटत होते. सुधाकर बोकाडे यांच्या कलिंगामध्ये धर्मेंद्र काम करू इच्छित होते. परंतु त्यांच्यासाठी योग्य भूमिका नसल्याचे दिलीप कुमार यांनी सांगताच त्यांनी सनीला घेण्याबाबत सांगितले. सनीशी चर्चाही झाली तारखा न जुळल्याने नव्या कलाकाराला घेण्यात आले. मशाल चित्रपटाच्या वेळीही असेच घडले आणि सनीऐवजी अनिल कपूरला संधी मिळाली.


त्यानंतर दिलीपकुमार यांची पुन्हा एकदा भेट 1998 मध्ये किला चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान झाली होती. रेखा आणि त्यांच्यावर एका गाण्याचे चित्रिकरण सुरु असताना त्यांनी गप्पा मारल्या होत्या. नंतर मात्र त्यांच्याशी बोलण्याची संधी कधी मिळाली नाही. मात्र ज्या काही भेटी झाल्या त्यात ते एक सुसंस्कृत, सभ्य, वाचनाची आवड असलेले व्यक्तिमत्व असल्याचे जाणवलेच तसेच त्यांना गॉड ऑफ अॅक्टिंग का म्हणतात याचीही प्रचिती याची देही याची डोळा पाहाण्याची संधीही मिळाली होती.


साहित्य आणि संगीतात दिलीप कुमार यांना प्रचंड रुची आहे. प्रत्येक चित्रपट ते विचार करूनच स्वीकारतात मात्र काही वेळा त्यांचे हे निर्णय चुकलेही होते. खरे तर त्यांनी चित्रपटांचे शतक आरामात पार केले असते परंतु त्यांनी चित्रपटांची संख्या वाढवण्याऐवजी दर्जेदार चित्रपटांवर भर दिला होता. देवदास हा त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड मानला जातो. प्रेमासाठी दारुच्या आहारी गेलेल्या तरुणाची भूमिका अनेकांना भुरळ घालणारी ठरली. केवळ धर्मेंद्रच नव्हे तर अमिताभ बच्चन, शाहरुख खानसुद्धा दिलीप कुमार यांचे फॅन असून त्यांच्याप्रमाणे अभिनय करण्याचा प्रयत्न करतात. मुगले आजम, शहीद, अंदाज, आन, नया दौर, मधुमती, राम और श्याम, लीडर, मेला, यहूदी, पैगाम, गंगा-जमना असे विविध भूमिका असलेले चित्रपट त्यांनी केलेले आहेत.


दिलीप कुमार हे दुस-या कलाकारांचाही आदर करीत असत हे नया दिन नई रात चित्रपटाच्या निमित्ताने समोर आले होते. दिग्दर्शक भीष्म सिंह त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट घेऊन गेले आणि मुख्य भूमिका साकारावी अशी गळ घातली. परंतु दिलीप कुमार यांनी ही भूमिका माझ्यापेक्षा संजीव कुमार जास्त चांगल्या प्रकारे करील असे सांगत संजीवकुमार यांना घेण्यास सांगितले. संजीवकुमार यांनी ती भूमिका केली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी तर ठरलाच संजीव कुमारच्या कारकिर्दीतर मैलाचा दगडही ठरला होता. आज अशा घटना दुर्मिळ आहेत आणि म्हणूनच दिलीप कुमार दिलीप कुमार आहे. 


दिलीपकुमार यांना एबीपी माझाची भावपूर्ण श्रद्धांजली.