पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यापैकी पंजाब, मणिपूर आणि गोव्यातील निवडणुकांचा धुरळा बसलाय तर उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्याचं आणि उत्तराखंडमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशचं सरकार कायम ठेवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे त्यापेक्षा जास्त राष्ट्रपतीपद कायम ठेवण्याचं आव्हान आहे. भाजपचे संख्याबळ अगोदरच कमी झालंय त्यात जर उत्तर प्रदेश निवडणूक काही कमी जास्त झाले तर भाजपसाठी ती मोठी नाचक्की असेल.


ही गोष्ट लक्षात आल्यानेच आता विरोधी पक्षांनी भाजपला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. देशात भाजपविरोधात आघाडी तयार करण्याचा प्रयत्न प्रादेशिक पक्षांकडून सुरु करण्यात आलाय. यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. खरे तर या अगोदर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरु केला होता. पण काँग्रेसबरोबर त्यांचा वाद असल्याने आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसविना आघाडी होणार नाही असे स्पष्ट केल्याने आता ममतांनी तो प्रयत्न सोडला तर त्यांची जागा के. चंद्रशेखर राव घेत असताना दिसत आहेत. त्यासाठीच राव यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.


त्यानंतर लगेचच विरोधी पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे चित्र दिसू लागले आहे. जुलै महिन्यात राष्ट्रपतींची निवडणुक होणार आहे. विरोधकांनी एकी करून नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाच्या मैदानात उतरवण्याचे ठरवल्याचे समजते. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून याची सुरुवात केल्याचे सांगितले जातेय. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपचा मित्र असलेल्या नितीश कुमार यांना मैदानात उतरवून नवी राजकीय समीकरणं जुळवण्याचे प्रयत्न विरोधकांनी सुरु केल्याने भाजपपुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.


राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट यश मिळवायचे असेल तर उत्तर प्रदेशात गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी खासदारांप्रमाणेच आमदारांची संख्याही मोठ्या प्रमाणावर लागते.  2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने अनेक राज्यांमध्ये सत्ता गमावली असल्याने त्यांच्या आमदारांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली आहे. त्यातच भाजपचे मित्र पक्ष असलेल्या महाराष्ट्रातील शिवसेना, आणि केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीने भाजपपासून फारकत घेतली आहे. आंध्रच्या तेलुगु देशम पार्टी आणि पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलानेही भाजपशी संबंध तोडलेत. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत भाजपचं संख्याबळ खाली आलेय.


राष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 आहे. लोकसभेत भाजपची ताकद चांगली आहे. 545 पैकी 334 खासदार भाजप आणि मित्र पक्षांचे आहेत. तर राज्यसभेतील 232 खासदारांपैकी 116 खासदार भाजप आणि मित्र पक्षांचे आहेत. आमदारांच्या मताचे मूल्य त्या-त्या राज्याच्या एकूण आमदारांच्या सख्येवर अवलंबून असते. देशात उत्तर प्रदेशमधील आमदारांच्या मताचे मूल्य हे 208 आहे. हे सगळ्यात जास्त आहे. सिक्किममध्ये एका आमदाराच्या मताचे मूल्य फक्त 7 आहे. देशभरातील 4033 आमदारांपैकी भाजप आणि मित्र पक्षांच्या आमदारांची संख्या 1764 आहे. परंतु ज्या राज्यात आमदारांच्या मताचे मूल्य जास्त आहे त्या राज्यात भाजप ताकदवान नसल्याचे दिसत आहे. तामिळनाडूमध्ये आमदाराच्या एका मताचे मूल्य 176 आहे तर पश्चिम बंगालमध्ये 151, झारखंडमध्ये 176 आणि महाराष्ट्रातील आमदारांच्या मताचे मूल्य 175 आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने भाजपच्या एकूण मतमूल्यांची संख्या कमी झाली आहे.


चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीनेही एनडीए उमेदवाराला पाठिंबा दिला होता. टीएसआरचे 103 आमदार आणि 16 खासदार आहेत. त्यांच्या मतांचे मूल्य 13596 आहे. ही मते आता विरोधी पक्षाच्या उमेदवाराला जाऊ शकतात.


देशातील काही राज्यांमध्ये जवळपास 30 जागा रिकाम्या आहेत. तर राज्यसभेतील 15 ते 20 खासदार राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे उपलब्ध खासदार आणि आमदारांमधूनच राष्ट्रपतींची निवड केली जाईल


सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रपती निवडणुकीसाठी उपलब्ध असलेली मते 10 लाख 87 हजार 683 असून त्यापैकी 5 लाख 43 हजार 062 मते भाजपकडे आहेत. या आकडेवारी नजर टाकल्यास स्पष्ट होते की भाजपकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण 49.95 टक्केच मते आहेत. म्हणजेच बहुमताच्या आकड्यापासून 0.05 टक्के मत कमी आहेत. आता ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत त्या राज्यांमध्ये राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण 1 लाख 3 हजार 756 मते आहेत. याचाच अर्थ जवळ जवळ 10 टक्के मते या पाच राज्यातून येणार आहेत. आणि विशेष म्हणजे यापैकी जवळ जवळ 80 टक्के म्हणजेच 83 हजार 824 मते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. पंजाबमध्ये आमदारांच्या मताचे मूल्य 116 आहे पण तेथे भाजपची ताकद नाही. तर ज्या गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे तेथे आमदारांच्या मताचे मूल्य अनुक्रमे 20, 18 आणि 64 आहे.


पाच राज्यांमधील आमदारांच्या मताच्या मूल्याचे आकडे पाहाता भाजपला उत्तर प्रदेशमध्ये जास्त जागा जिंकणे आवश्यक आहे. पंजाबमध्ये ज्या जागा मिळतील त्या बोनस असतील. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या ताब्यात 306 आणि अपना दलच्या 11 अशा 317 जागा आहेत. या पाच राज्यांमध्ये भाजपच्या जागा जर आता आहेत त्यापेक्षा कमी झाल्या आणि विरोधी पक्षाने एकजूट दाखवली तरच राष्ट्रपती निवडणुकीत भाजपचा पराभव होऊ शकेल.