न्यूड हा शब्द ऐकला की, मला प्रथम आठवते ती उर्मिला सिरूर यांची याच शीर्षकाची एक लहानशी कथा; जगभरातल्या महान कलावंतांची गाजलेली न्यूड चित्रं – छायाचित्रं त्यानंतर एकेक आठवू लागतात. अट्टल वाचक असल्याचा हा दुष्परिणाम. चित्रकला महाविद्यालयात शिकत असताना, ऐन विशीतल्या वैचारिक गोंधळाच्या काळात ही कथा मी वाचली. तिनं दोन-तीन पानाच्या कथेनं दृष्टी बदलून टाकली. खूप उचापती करून वयाच्या पन्नाशीत त्यांचा फोननंबर मिळवला आणि बोलले. न्यूड पेंटिंग ही कल्पना चित्रकार नसलेल्या व्यक्तींना थरारक वाटत असली, तरी चित्रकलेच्या विद्यार्थ्यांचा मात्र सुरुवातीला कसा थरकाप उडवणारी असते, हे त्या विद्यार्थी’दशे’तून गेलेली असल्यानं मला नीटच ठाऊक होतं.


मॉडेलच्या अंगावर कपडे असले की सुमार विद्यार्थी एखादा सोपा अँगल निवडत आणि चितारायला नीट न जमणारे अवयव कपड्यांखाली दडवून टाकत. हाफ् न्यूड पासून बिचाऱ्यांची फरफट सुरू होई आणि सरांनी अॅनॉटॉमी शिकवण्यासाठी घसा कोरडा केला होता, पण चित्रकलेत वैद्यकविषयांची गरज काय म्हणून आपण कसे वैतागलो होतो हेही त्यांना आठवे. हाडांचे सापळे, त्यावर चढलेले दाट सुंदर स्नायू, रक्तवाहिन्यांचं देखणं जाळं, कातडी... त्या एका कातडीत किती रंगांच्या छटा! शाळेत स्मरणचित्र काढलं की प्रत्येक व्यक्तीचे केस काळ्या रंगाने रंगवून टाकणं सोपं होतं... पण इथं पहिल्यांदा समजायचं की कोणते रंग लावले तर केस काळे असल्याचा आभास निर्माण होऊ शकेल! नुसते ओठ रेखाटताना ज्यांची थरथर व्हायची, त्यांना स्तन, मांड्या, गुप्तांगे रेखाटायची म्हटल्यावर प्रचंड ताण यायचा. ही मॉडेल कुणी सुदृढ, घट्टमुट्ट देहाचे स्त्री-पुरुष असत असंही नव्हतं... कुणीतरी गरजू माणसं असायची ती.

उर्मिला सिरूर यांच्या कथेत दोन देशांमधले टोकाचे निराळे अनुभव मांडले होते. १९७५ साली ती कथा ‘सत्यकथे’त प्रकाशित झालेली. आपल्यातलीच वाटणारी प्रसन्न मॉडेल्स, खुलं वातावरण, भरपूर नैसर्गिक उजेडात दिसणारे रंग आणि उत्साही विद्यार्थी असं परदेशातल्या स्टुडीओतलं चित्र; तर आपल्याकडे कुजबुज-खुसफुस करणारे दबलेले अस्वस्थ व एकमेकांकडेही पाहायचं टाळणारे विद्यार्थी, वातावरणात असहजता व ताण, कृत्रिम उजेड, जगण्याच्या संघर्षात थकलेली – निर्विकार चेहऱ्याची मॉडेल्स असं आपल्याकडचं चित्र. एकूण देशाच्या एका लहान तुकड्यात अवघ्या देशाचं प्रतिबिंब दिसावं, तसंच हे.

एकीकडे खजुराहो आपल्या देशात असल्याचा अभिमान आणि दुसरीकडे हे अतोनात संकोच. एकीकडे देशातल्या पोर्न साईट्सवरील गलिच्छ – गचाळ व्हिडीओ दर तीन सेकंदाला एक या गतीने अपलोड होतात... अगदी संसदेत मंत्री मोबाइलवर पोर्न पाहताना सापडतात आणि दुसरीकडे रवि जाधवच्या नव्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळलं जातं. मुंबईतील चित्रकला महाविद्यालयात न्यूड मॉडेल म्हणून काम करत असलेल्या एका स्त्रीचा जीवनसंघर्ष रवि जाधव यांच्या ‘न्यूड’ या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे.



उर्मिला सिरूर यांनी ही कथा लिहिल्याला आता ४२ वर्षं झालीत आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये ‘न्यूड स्टडी’चे वर्ग सुरु झाले त्याला आता तब्बल ९८ वर्षं पूर्ण झालीत. २०११ साली ‘चिन्ह’ या मासिकाने ‘नग्नता विशेषांक’ प्रकाशित केला, त्यात अनेक चित्रकार, लेखकांनी या विषयावर गांभीर्याने लेखन केलं; आर्टपेपरवर छापलेल्या या देखण्या अंकात अनेक उत्कृष्ट न्यूड पेंटींग्ज, अगदी काही चित्रकारांची सेल्फ पोर्टेटसही आहेत; पहावा, वाचावा, अभ्यासावा, संग्रही ठेवावा असा हा उत्कृष्ट अंक आहे. इतका काळ इतक्या चर्चा झाल्या, पण नग्नता आणि अश्लीलता यातला भेद आपल्याला अजून कळायला तयार नाही; किंबहुना अधिकाधिक अडाणी होण्याची स्पर्धाच सुरू असावं तशा एकेक घटना घडताहेत. गोव्यात या महिन्याअखेर होणाऱ्या इफ्फी २०१७ चं ओपनिंग रवि जाधव यांच्या ‘न्यूड’ या चित्रपटाने होणार होतं; तसं जाहीरही झालं होतं आणि महोत्सवाला खूप कमी दिवस राहिलेले असताना अचानक केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार नसल्याचं जाहीर केलं. या चित्रपटासोबतच सनलकुमार ससिधरन दिग्दर्शित ‘सेक्सी दुर्गा’ नावाचा मल्याळम चित्रपट देखील वगळण्यात आला. निवड समितीने पाहूनच हे चित्रपट महोत्सवासाठी निवडलेले होते; त्या समितीच्या मतांची काही सपाट डोक्याच्या सरकारी माणसांकडून अशी वासलात लावण्यात आली. संस्कृती नावाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक. यांचा संस्कृतीचा – इतिहासाचा धड अभ्यास नाही आणि उचित, तर्कशुद्ध विचार करण्याची कुवतही नाही; केवळ दुटप्पीपणा यांच्यात ओतप्रोत भरलेला आहे. ‘न्यूड’ या शीर्षकालाच बिचकून चित्रपट न पाहताच हा निर्णय घेतला गेला असण्याची शक्यताच जास्त वाटतेय... यांचे रिकामे मेंदू असे कधीतरी उघडे पडतातच.



“बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाला IFFIच्या ओपनिंग चित्रपटाचा बहुमान प्राप्त झाला असता. असो, वाईट त्या परीक्षकांचे वाटते. इतका वेळ देऊन प्रत्येक चित्रपट काळजीपूर्वक पाहून जर त्यांचा निर्णय अंतिम नसेल तर त्यांचा वेळ मुळात का वाया घालवला? चित्रपट कोणासाठी करायचा? प्रेक्षकांसाठी की मंत्रालयासाठी? तो बघायचा की नाही हे कोण ठरवणार? प्रेक्षक की मंत्रालय?” असे प्रश्न उपस्थित करत रवि जाधव यांनी याबाबत फेसबुकवरून आपला निषेध व्यक्त केला.

निवड समितीतील एक ज्युरी अपूर्वा असराणी यांनी म्हटलं आहे की, “हा चित्रपट वगळल्याचं मला कालपर्यंत माहीत नव्हतं. फेडरेशनकडे मी यासंदर्भात लेखी नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटातील स्त्रीचं चित्रण तिला सन्मान व आदर देणारं आहे. मंत्रालय  आपल्या निर्णयाचा फेरविचार करून ज्युरींचा निर्णय कायम ठेवेल, अशी आशा वाटते.”

उमेश कुलकर्णी यांनी #thisisnotdone हा हॅशटॅग वापरून कलावंतानी जाहीर निषेध व्यक्त करावा असं आवाहन केलं. अनेक कलावंतानी, लेखकांनी, पत्रकारांनी व चित्रपट रसिकांनीही  सरकारच्या या विचित्र निर्णयाबाबत उपरोधाने लिहिलं. सगळे असे उत्स्फूर्त एकमताने सोबत आलेत, याचं समाधान आहेच, मात्र अशा कारणांस्तव सुमारांशी झगडण्यात कोणत्याच चांगल्या कलावंतांची उर्जा वाया जाऊ नये, असं मनापासून वाटतं. सेन्सॉरच्या तावडीतून सुखरूप सुटून लवकरच हा चित्रपट महोत्सवाबाहेरही सर्वत्र तुम्हाआम्हांला पाहण्यास मिळो!