केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने जी माहिती दिली त्यात ऑक्सिजन अभावी भारतात एकही मृत्यू झाल्याची नोंद झाली नसल्याचे म्हटले आहे आणि ते वास्तवात खरे आहे. कारण कोणत्याच राज्याने देशाच्या आरोग्य मंत्रालयाला आमच्याकडे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे कळवलेले नाही. मग त्यांचे मृत्यू इतर आजाराने किंवा कोरोनामुळे झालेले आहेत. ही सरकारी लाल फितीतील भाषा योग्य असली तरी वास्तव नाकारून चालणार नाही. काही रुग्णांना ऑक्सिजन टंचाईमुळे रुग्णालयातच दाखल करून घेतले नाही ते रुग्णालयाच्या धावा करता करता त्यांची इतकी दमछाक झाली की त्यांचे रस्त्यातच मृत्यू झाले. मग ह्या मृत्यूचे कारण काय असावे? मुळात मृतांच्या मृत्यू दाखल्यावर त्याचा मृत्यू कुठल्या आजारामुळे  झाला हा लिहिण्याचा प्रघात आहे, काही अपवाद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुणीही आतापर्यंत ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू झाला असे नमूद केलेले नाही. तरीही, ऑक्सिजन अभावी उडलेला अभूतपूर्व  गोंधळाची संपूर्ण देशातील जनता साक्षीदार आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी केलेली 'मारामारी' कायमच लक्षात राहील. जलमार्ग, हवाईमार्ग, लोहमार्ग आणि रस्त्याच्या वाहतुकीने ऑक्सिजन आणून देशातील विविध राज्यातील पोहचवला गेला होता, हे मात्र कदापीच विसरता येणार नाही. तांत्रिक कारणामुळे वास्तव बदलू शकत नाही.

  


देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी कोणाचाही मृत्यू झाला नाही असा अहवाल राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिला असल्याचं केंद्र सरकारने संसदेत जाहीर केलं. मंगळवारी संसदेत विरोधी पक्षांने विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना केंद्र सरकारने हे स्पष्ट केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचंही केंद्र सरकारने सांगितलं. केंद्र सरकारच्या या उत्तरावर आता सर्व स्तरातून टीका होताना दिसत आहे. 


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण रस्त्यांवर आणि रुग्णालयात मृत पावले का असा प्रश्न काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांनी संसदेतील प्रश्नोत्तराच्या तासाला विचारला. त्यावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना सांगितलं की, "आरोग्य हा राज्यांच्या अख्यत्यारितील विषय आहे. केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झालेल्या मृतांच्या आकडेवारीची माहिती देण्यासाठी सांगितलं होतं. त्यामध्ये ऑक्सिजनच्या अभावी रुग्ण मृत पावला असं कोणत्याही राज्याच्या आणि केंद्र शासित प्रदेशाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं नाही."


वैद्यकीय दृष्टीने ऑक्सिजनभावी मृत्यू झाला नाही हे उत्तर योग्य असले तरी सामाजिक दृष्ट्या या विषयांवर विविध अंगाने चर्चा होण्याकरता बराचसा वाव आहे. मृत्यू होण्याचे कारण ऑक्सिजन न मिळणे, हे एक कारण असू शकते मात्र ते एकमेव असू शकत नाही. कारण प्रत्येक मृत्यूमागे विविध कारणे आणि त्याला अनेक पैलू असतात. वैद्यकीय शास्त्रात आजपर्यंत कोठेही ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून रुग्ण दगावला असे मृत्यू दाखवल्यावर लिहिले गेलेले ऐकिवात नाही. उदाहरणार्थ, रुग्णाला श्वसनाचा त्रास असल्यामुळे तो दगावला असेल तर श्वसन व्यवस्थेतील बिघाड (रेस्परेटरी फेल्युर), रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प असणे (हायपॉक्सिया ) शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित न होणे (असफेक्जीया) ही विविध कारणे मृत्यू दाखल्यावर दिली जातात. 


एप्रिल आणि मे महिन्यात ज्यावेळी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची टंचाई महाराष्ट्रात आणि देशातील इतर राज्यात भासत होती. त्यावेळी अनेक रुग्ण ज्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. ते रुग्ण आणि नातेवाईक ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी शहर पालथे घालत होते विविध हॉस्पिटलांना भेटी देत होते. मात्र त्यांना केवळ ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये अपेक्षित  प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे दाखल करून घेत नसल्याच्या काही  घटना घडल्या आहेत. अनेक वेळा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहिल्यामुळे वेळेत ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे  काही रुग्णांचा मृत्यू झाला असल्याच्या घटना घडल्या आहेत. जवळ जवळ देशातील सर्वच वृत्तपत्रात, वृत्तवाहिन्यांवर, सामाजिक माध्यमांवर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचे वृत्तांकन करण्यात आले होते.     


याप्रकरणी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, "पहिली गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे की आपल्याकडे कोरोनाच्या आजाराने मृत्यू होणाऱ्या कुठल्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची पद्धत नाही, किंबहुना ते  करू नये अशा सूचना आहे. त्यामुळे मृत्यूचे अचूक निदान करणे अवघड असल्याने मृत्यू दाखल्यात कोरोनाने निधन एवढंच लिहिले जात असल्याने ऑक्सिजनभावी मृत्यू असे लिहिण्याचे कारणच नाही. त्यामुळे यामध्ये राज्य सरकारची चूक नाही आणि केंद्र सरकारने माहिती जी दिली यामध्ये काही चूक नाही. मात्र कागदोपत्री एखादी गोष्ट असणे आणि वास्तवात एखादी गोष्ट असणे यामध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जी गोष्ट कागदोपत्री असते तोच पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. देशातील अख्या नागरिकांना माहित आहे की ऑक्सिनजची देशात टंचाई मोठ्या प्रमाणात होती. या तांत्रिक अडचणीत न राहता मोठ्या दिलाने केंद्र सरकाने जे काही उत्तर दिले आहे त्याचा खुलासा केला पाहिजे असे डॉक्टर आणि जनतेला वाटते, असे माझे  स्पष्ट मत आहे. 


ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात टंचाई अख्या देशात होत असल्यामुळे देशाचे पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील युद्धात सैन्यदलानी सहभाग घ्यावा म्हणून सूचना केली होती. त्यानुसार नौदलाने या मोहिमेत युद्धनौका पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांड येथील पाच युद्धनौका आणि अन्य नौदल तळावरील दोन अशा सात  युद्धनौका बाहेरच्या देशातून ऑक्सिजन आणण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या. बहारीन, कतार या आखाती देशातून हा ऑक्सिजन आयात केला गेला होता.  त्याशिवाय भारताला लागणाऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी मदतीचा हात पूढे केला होता. युनिसेफच्या माध्यमातून हजारो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्यात आले होते. या मोठ्या अडचणीच्या काळात विविध जगातील विविध देशातून भारताला मदत पुरविण्याचे काम केले गेले. या सगळ्या मदतीत विशेष करून ऑक्सिजन कसा मोठ्या पद्धतीने प्राप्त होईल यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूची टंचाई असल्यामुळे रेल्वेची मदत घेऊन इतर राज्यातून लिक्विड ऑक्सिजनचे टॅंक आणण्यात आले होते, त्या गाडीला ऑक्सिजन एक्सप्रेस नावाने ओळखले जात असून देशातील अनेक भागात या ऑक्सिजन एक्सप्रेस तर्फे ऑक्सिजन पुरविण्याचे काम करण्यात आले होते.


त्याचप्रमाणे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजनच्या अनुषंगाने सामाजिक माध्यमाद्वारे केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून नवीन तंत्रज्ञान विकसित मराठवाड्यात घनसावंगी तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवणार, लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याचे शुद्धीकरण करत 25 ते 100 खाटांच्या रुग्णालयासाठी वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याचे नमूद केले होते.  


जागतिक आरोग्य परिषदेच्या निर्देशानुसार अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या 15% रुग्णांना कोरोनाच्या उपचारात ऑक्सिजनची गरज भासत आहे. एस पी ओ 2, या चाचणीद्वारे शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. या आणि अन्य मापदंडानुसार डॉक्टर रुग्णाला कृत्रिम ऑक्सिजन द्यायचे की नाही ते डॉक्टर ठरवतात. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारात प्राणवायू हा उपचाराचा भाग म्हणून मोठे योगदान देत आहे. कारण या कोविड-19 या विषाणूमुळे होणाऱ्या आजरात घशावाटे फुफ्फुसांवर हल्ला होत असतो. यामुळे अनेक रुग्णांना श्वसनाच्या विकाराना सामोरे जावे लागत आहे. फुफ्फुसाच्या शेवटच्या भागाला असणारा भाग त्याला शास्त्रीय भाषेत अल्वेओलाय (वायुकोश) असे संबोधले जाते. या भागाद्वारेच आपण जो नैसर्गिक दृष्ट्या बाहेरच्या वातावरणातील प्राणवायू घेतो आणि तो शरीरातील रक्ताला पुरवठा केला जातो. जर याच भागाला इजा झाली तर मग श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग अनेकवेळा रुग्णाला कृत्रिम प्राणवायूची गरज भासते. कोरोनाबाधित काही प्रमाणातच रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज लागते. कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम  माणसाच्या श्वसन संस्थेवर हल्लाबोल करतो.  त्यामुळे  त्याची कार्यक्षमता मंदावते, आणि श्वास घ्यायला त्रास होतो.  त्यामुळे वैद्यकीय तज्ञांना कोरोनाबाधित रुग्णांच्या फुफ्फुसांवर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागते. कोरोनाच्या आजारात ज्या रुग्णाला फुफ्फुसाच्या व्याधीची अडचण दूर होते तो रुग्ण अर्ध्यापेक्षा जास्त बरा झालेला असतो.  वैद्यकीय तज्ञांसाठी रुग्णाच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष असते.


विशेष करून एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात उत्पादित होत असलेला 100 टक्के ऑक्सिजनचा उपयोग वैद्यकीय कारणांसाठी होत होता. 29 एप्रिल रोजी, महाराष्ट्रात एका दिवसात संपूर्ण राज्यात 1433.03 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर रुग्णांकरता करण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अन्न औषध प्रशासन तर्फे देण्यात आली होती. ज्या पद्धतीने रुग्णसंख्या वाढतच आहे त्यापद्धतीने ऑक्सिजनचा हा वापर मोठ्या प्रमाणात वाढत होता. 


मे 2 रोजी 'ऑक्सिजनसाठी, काय पण!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते.  त्यामध्ये, कोरोनाच्या या वैश्विक महामारीत सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे तो ऑक्सिजनचा! देशातील अनेक भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ऑक्सिजन मिळविण्यासाठी आणि त्याच्या निर्मितीसाठी अख्या देशात प्रयत्न केले जात आहे. मिळेल त्या मार्गाने आणि पद्धतीने ऑक्सिजन मिळविण्यासाठी जंग जंग पछाडले जात आहेत. देशात आरोग्याची आणीबाणीची वेळ असताना ऑक्सिजन आणण्यासाठी हवाई वाहतूक, जलवाहतूक, रेलवाहतूक आणि रस्ते वाहतूक या  मार्गाने ऑक्सिजन देशात आणून विविध राज्याला पुरवण्यासाठी देश झटत आहे. या भयावह संकटातून देश मार्गक्रमण करत असताना आजही ' राजकारण ' मात्र तितक्याच जोमाने सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिक मुकाट्याने हा सर्व प्रकार पाहत आहे. त्यांना या सर्व प्रकारची किळस वाटत आहे. त्यांना सध्या फक्त त्याच्या रुग्णांना वेळेत योग्य उपचार कसे मिळतील? ह्या प्रश्नाने छळले आहे. तसेच या आजारातून संरक्षित कसे राहता येईल यावर त्यांचा भर आहे. देशावर आलेल्या या संकटाचे रौद्र स्वरूप पाहता अजून किती दिवस ऑक्सिजनसाठी अन्य देशावर अवलंबून राहावे हे येणारा काळच ठरवणार आहे. ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट टाकून त्यातून ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. कधी कुणी स्वप्नात विचारही केला नसेल, की रुग्ण ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे मरतील. ऑक्सिजनला कायमच 'हलक्यात'  घेण्यात आले होते.


या सगळ्या एकंदर केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरानंतर सर्वच स्तरावर रोष व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र होतं. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. अनेकांना तर हॉस्पिटलमध्ये बेडही उपलब्ध होऊ शकले नाहीत, त्यांनी रस्त्यावरच आपला जीव सोडला, असं असताना केंद्र सरकार म्हणतंय की ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झाला नाही. त्यांच्या या उत्तरानंतर काही महिन्यापूर्वी या देशात खरंच श्वास 'कोंडला'  गेला होता का? हा प्रश्न उपस्थित होतो.