Cassandro 2023 : अमेरिकेतले प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हिमन स्पॉटनिट्स यांचं एक पुस्तक आहे. ‘द वंडरफुल हस्बंड’. या पुस्तकात त्यांनी विवाहबाह्य संबंधांवर लिखाण केलंय. त्यांच्या मते, विवाहित पार्टनर ( नवरा किंवा बायको) व्यतिरिक्त शारीरिक संबध ठेवणं हे अमेरिकन कल्चरचा भाग बनलंय. डॉ. हिमन यांनी 1948 मध्ये मोठा सर्व्हे केला. या सर्व्हेनुसार 50 टक्क्यांपेक्षा पुरुष आणि 25 टक्क्यांपेक्षा जास्त महिला कमीत कमी एकासोबत विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवतात. डॉ. अल्बर्ट एलीस यांनी रॅशनल इमोव्हेटिव्ह बिहेव्हेरियल थेरपी (REBT) मांडली. ती मांडताना त्यांनी काही पुस्तकं लिहिली. त्यात ‘ द सिव्हिलाइज कपल्स गाईड टू एक्स्ट्रामॅरिटल एडव्हेंचर’ हे महत्त्वाचं पुस्तक आहे. या पुस्तकात हिमन यांच्या संशोधनाचा संदर्भ आहे. या पुस्तकात अल्बर्ट एलीस यांनी वैवाहिक जोडप्यांच्या विवाहबाह्य संबंधांचं विवेचन केलंय. पुरुष आणि महिला या दोघांचा विवाहेतर शारीरिक संबंधांबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट केलाय. एलीस लिहितात, महिलांना विवाहेतर शारीरिक संबंध एन्जॉय करताना त्रास होतो. ते सेक्स आणि प्रेमाकडे एकसंध पॅकेजसारखं पाहतात. इथंच गफलत होते.
कॅसॅन्ड्रो (2023) सिनेमात हेच घडतं. साऊलची (गेल गार्सिया बर्नल) आई योकास्टा (पेर्ला दे रोसा) अश्याच एका संबंधातून गर्भवती राहते. ती अविवाहित आहे. तिच्या बॉयफ्रेंडची फॅमिली आहे. त्यात तिला जागा नाही. तो तिला वाऱ्यावर सोडत नाही. पण पत्नीचा दर्जाही मिळत नाही. संबंधांला सामाजिक मान्यता अर्थात व्हॅलिडेटही करत नाही. ते व्हावं यासाठी ती आयुष्यभर झटते. तिचा अनावरस मुलगा साऊल समलैंगिक आहे. कधीतरी घरी येणारा हा 'बाप' त्याला Lucha Libre (मुखवटे घालून केलेली WWF स्टाईल कुस्ती) पाहायला लावतो. तो त्याचा आवडता खेळ आहे. बापाकडून मुलगा म्हणून व्हॅलीडेशन (मान्यता) मिळण्याच्या नादात साऊल लुचा लिब्रे पैलवान बनतो. बापाच्या व्हॅलिडेशनसाठी झगडत राहतो. अगदी शेवटपर्यंत. कॅसॅन्ड्रोची ही गोष्ट मॅक्सिको-अमेरिकेच्या सीमा भागात घडते. ही जगप्रसिध्द समलैंगिक लुचा लिब्रे रेसलर साऊल अर्मेडॅरीझ याची खरीखुरी गोष्ट आहे. जगातला पहिला समलैंगिक लुचा लिब्रे रेसरल म्हणून त्याची ओळख आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला समलैंगिक रेसलर बनला. साऊलनं पुढे LGBTQ+ समुदायासाठी जे मोठं काम केलं. ते या सिनेमातून दाखवण्यात आलंय. आज जगभरात LGBTQ+ समुहासाठी साऊल अर्मेडॅरीझ रोल मॉडेल बनलाय.
अल्बर्ट एलीस यांनी आपल्या पुस्तकात दोन भिन्न लिंगी व्यक्तींच्या प्रेमाची गोष्ट सांगितलेय. प्रेमाचा विचार करता मानवी भावनाविश्व समान असतं. मग ते स्त्री-पुरूष संबंध असो किंवा मग समसैंगिकता. चिंता, असुरक्षितता, अतिकाळजी किंवा त्यातून येणारी भीती हे समलैंगिक संबंधात जास्त असतं. कॅसॅन्ड्रो (2023) सिनेमाचा कालखंड हा ७० आणि ८० च्या दशकातला आहे. हा काळ अमेरीका आणि मॅक्सिकोतल्या स्थित्यंतराचा होता. समलैंगिक संबंधांकडे बघण्याचा दृष्टीकोन तेव्हढा साफ नव्हता. अशा काळात साऊल अर्मेडॅरीझ लुचा लिब्रे स्पर्धेतला एक-एक खिताब जिंकत होता. आईसारखा साऊल ही इमोशनल होता. त्यालाही आपला पार्टनर पूर्ण हवा होता. त्याचं व्हॅलीडेशन हवं होतं. सुरुवातीला फक्त पैसे मिळवण्यासाठी त्याने लुचा लिब्रे खेळायला सुरूवात केली. तो रिंगणात आल्यावर त्याच्यावर वाईट अश्लिल कमेंट केल्या जायच्या. त्याकडे तो दुर्लक्ष करायचा. त्याच्या आईनं त्याला आहे तसं स्विकारलं. त्याचे समलैंगिक पार्टनर कसे असावेत यावर दोघे चर्चाही करत.
कॅसॅन्ड्रो (2023) सिनेमात मॅक्सिकन लोकांच्या अमेरिकन ड्रिमला ही जागा आहे. सीमाभागातल्या या कथानकात अमेरिकेत जाण्यासाठी झटणाऱ्या मॅक्सिकन निर्वासितांचे संदर्भ आहेत. इथं ही व्हॅलिडेशनचा प्रश्न पुढे येतो. हा सिनेमाच मुळात वेगवेगळ्या व्हॅलिडेशन अर्थात मान्यता या संकल्पनेभोवती फिरतो. अभिनेता गेल गार्सिया बर्नलनं या सिनेमाची निर्मिती केलीय. गेल गार्सिया बर्नल हे स्पॅनिश सिनेमातलं मोठं नाव आहे. असं असताना ही सिनेमा रिलीज करताना त्रास झाला. सुरूवातीच्या थिएट्रीकल रिलीजनंतर ओटीटीवर आणण्यासाठीही भरपूर खटाटोप करावा लागला.