छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझ्या प्रवासी सामानाच्या बॅगा घेण्यात मी दंग होते. स्क्रिनिंग काऊंटरवरुन माझे सामान पुढे सरकत होते. अचानक कुणी तरी मोठयाने घोषणा दिली, गणपती बाप्पा मोरया! मी लगबगीने पुढे झाले. तिथे काही पोलिस अधिकारी उभे होते. त्यांनी माझ्याच सामानातील एक बॉक्स अलगद हाती ठेवला आणि मला विचारलं, “मॅडम, तुम्ही ही गणपतीची मूर्ती कशी नेणार आहात?”
‘अर्थात केबिन बॅगेजमध्ये’, मी उत्तर दिलं.



तिथून पुढे मी इमिग्रेशन काऊंटरवर येताच तेथील अधिकारी माझा पासपोर्ट आणि विसा पाहून म्हणाले, ‘ओह बोसनियाला निघालात, पण तो तर युद्धप्रभावित देश आहे.’ त्यांचं कुतूहल स्वाभाविक होतं.  
‘होय. माझे पती अविनाश मोकाशी हे तेथील पोलिस दलात नियुक्त आहेत.’ मी त्यांना सांगितलं. आंतरराष्ट्रीय पोलिस कृती दलात (International Police Task Force) संयुक्त राष्ट्रांनी धाडलेल्या शांतीपथकात बोस्निया-हर्जेगोव्हिना देशातील मार्कोनीच-ग्राडच्या पोलिस ठाण्यावर त्यांची नियुक्ती झाली होती. त्या अधिकार्‍यांनी तत्परतेने माझ्या पासपोर्टवर शिक्का मारला. आणि इथूनच आमच्या बाप्पाच्या जागतिक शांततेसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुरवात झाली. आणि गंतव्य स्थान म्हणजे वंशवादाने होरपळून निघालेले मध्य-यूरोप मधील एक छोटंसं राष्ट्र म्हणजे बोस्निया. मुंबई ते बोस्नियाचे सरायेवो विमानतळ हा प्रवास अत्यंत तणावपूर्ण आणि लांब पल्ल्याचा होता. त्यात रात्रभर मी बाप्पाला मांडीवर घेऊन अवघडून बसले होते.  शारीरिक गैरसोयीपेक्षा बाप्पाला सुखरूप घेऊन जाण्याची काळजी जास्त होती.  खरं तर माझ्या बोस्नियातील वास्तव्याची मोठ्ठी जबाबदारी बाप्पाचीच होती. म्हणतात ना देवाक काळजी. 




संपूर्ण प्रवासात माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. प्रश्नांची मालिकाच उभी होती.  नुकत्याच झालेल्या युद्धातून सावरणार्‍या बोस्नियाचा इतिहास आता जगजाहीर होता. एकीकडे सनातनी ख्रिश्चन समुदाय ज्यांना सर्बियन म्हणून ओळखलं जायचं तर दुसरीकडे बोस्नियन मुस्लिम समुदाय यांच्यातील कलहातून युद्धात झालेले रूपांतर. दोन्ही समाजाचे अतोनात नुकसान झालेलं. अशा तणावपूर्ण वातावरणात घरामध्ये दीड दिवसांचा गणपती बसवण्याची कल्पना मला सुरुवातीला फारशी रुचली नव्हती.  परंतु अविनाशचा विश्वास होता की तेथील समुदायाकडून या नावीन्यपूर्ण उत्सवाचे आणि गणपती बाप्पाचे स्वागतच होईल. कदाचित तणावपूर्ण परिस्थितीत देखील हा उत्सव साजरा होऊन समाजात वंशवादाच्या मुद्द्यावरुन होणार्‍या हिंसेला आळा बसेल आणि सामाजिक शांततेच्या प्रक्रियेला चालना मिळेल. विचार करता करता केव्हा डोळा लागला ते कळलेच नाही.  



सरायेवो विमानतळावर आल्यानंतर बॅगेज घेऊन एका हातात गणपतीची मूर्ती असलेला बॉक्स अलगद पकडून कस्टम विभागात आले. स्थानिक भाषा येत नव्हती. त्यामुळे इंग्रजीतून समजावण्याचा निष्फळ प्रयत्न करीत होते. तेवढ्यात मला घ्यायला अविनाश तिथे पोहोचले. त्यांच्याबरोबर एक स्थानिक मुलगी मारा रदाक पण आली होती. तिने कस्टम अधिकार्‍याला त्यांच्या भाषेत समजावलं आणि पासपोर्टवर शिक्कामोर्तब होऊन बाप्पाला शांतता प्रक्रियेत प्रवेश मिळाला. मी बाप्पाला अविनाशकडे सुपूर्त केलं आणि सुटकेचा निश्वास टाकला.  अनेक सूचना, सोपस्कार आणि प्रक्रियेतून अखेर गणपती बाप्पाने बोस्नियातला मंगलमय प्रवास सुरू केला.  सरायेवो ते मार्कोनीच ग्राड हा बसचा प्रवास दोन तीन तासांचा होता.  अजूनही पर्वत रांगांवर पांढर्‍या शुभ्र बर्फांनी आच्छादलेली शिखरे दिसत होती.  अविनाश आणि मारा त्यांच्या परीने मला काही सांगण्याच्या प्रयत्नात होते. परंतु काही वेळातच मी गाढ झोपी गेले.  




जाग आली तेव्हा अविनाश मला चक्क हलवून उठवत होते. मी पाहिले तर आमची बस एका सुनसान रस्त्यावर थांबली होती. आम्ही तिघेच बसमधून उतरलो आणि बस पहाटेच्या धूसर वातावरणात अंतर्धान पावली. एका निमुळत्या बोळीमधून काही अंतर पार केल्यानंतर आम्ही एका मोठ्या बंगल्याजवळ थांबलो. माराने पुढे जाऊन दरवाजाचे कुलूप काढलं. आम्ही बंगल्यात दाखल झालो. देवघरात जाऊन गणपतीची मूर्ती ठेवली आणि मनाला हायसं वाटलं. मारा तिच्या घरी निघून गेली. तो संपूर्ण दिवस अपेक्षेप्रमाणेच जेटलॅग मध्येच गेला. मी झोपेतून उठले, त्यावेळी रात्रीचे 10.30 वाजले होते. अविनाशने साधं वरण- भात आणि लिंबाचं गोड लोणचं वाढूनच ठेवलं होतं. जेवताना अविनाशने मला सकाळच्या कामाविषयी माहिती दिली. आमचे घरमालक दानको स्ताना बोयनीच त्यांची मुलगी राबीया आणि मुलगा रादोवान यांच्याविषयी पण थोडीफार माहिती दिली. 



इथे ज्येष्ठ नागरिक पण खूप कष्टाची कामे करतात, कारण कित्येक घरातील तरुण-तरुणी युद्धात मारली गेली आहेत. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की रस्त्यांनी येता जाता ठिकठिकाणी फोटो लावले होते आणि त्यांच्यासमोर मेणबत्त्या लावलेल्या होत्या. ते फोटो हे वांशिक युद्धात प्राण गमावलेल्या नागरिकांचे होते. खरं तर मी या दीड दिवसाच्या गणपती उत्सवाबाबत साशंकच होते पण अविनाशने मला सर्वकाही समजावून सांगितलं. मग पुढील दोन दिवसात आमचं संपर्क अभियान सुरू केलं. एका संध्याकाळी तेथील स्थानिक नागरिकांना एकत्र बोलावलं. तसंच दुसर्‍या दिवशी पोलिस ठाण्यातील सर्व अधिकार्‍यांना एकत्र बोलवायचं ठरलं. हळू हळू हे पण लक्षात आले की हे एक ‘नो-रॅंक मिशन’ होतं.  म्हणजे येथे काम करणारे सर्व अधिकारी हे समान होते. ना कोणी मोठा ना छोटा. आपआपल्या देशात हे पोलिस अधिकारी कोणत्याही पदावर असले तरी ‘शांतता सेवेत ते कोलोकेटर या नावाने ओळखले जायचे. म्हणजे सगळेच फक्त सहकारी होते.  



दुसरा दिवस जरा उशीराच सुरू झाला. अविनाशला रात्रपाळी असल्याने तो आरामात होता. मी देखील आरामात उठले. खरं तर मारा आली आणि तिने आम्हाला उठविले. तिची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, गणपतीबाबत जाणून घेण्याची. त्यासाठी तिला काय काय करावे लागणार आहे हे ही तिला विचारायचं होते. तिचा आणि माझा संवाद इंग्रजीमधून चालायचा. पण मधूनच ती सिरिलिक भाषेत घसरायची. भाषा कळणं तसं अवघडच होतं. मग ती मला पुन्हा इंग्रजीत समजावून सांगायची.  


आमच्या संवादातून एक बाब माझ्या लक्षात आली की सर्बियन भाषेवर संस्कृत भाषेचा गाढा प्रभाव आहे. मला ही गोष्ट राहून राहून जाणवत होती.  बोलण्याच्या ओघात मध्येच एखादा शब्द परिचित वाटायचा. मायभूमीशी कुठेतरी नाळ जोडल्यासारखा. सर्बियन भाषेत वडिलांना तात म्हणतात तर भावाला चक्क भ्राता. प्रबोधित्सा म्हणजे उठणे अथवा जागे होणे. बोलता बोलटाच माझं प्रबोधन झालं.  प्रबोधनकारांची आठवण पण जागृत झाली. संस्कृतातला एवढा अवघड शब्द भारतीय भाषांमध्ये पण बोलताना सहसा वापरला जात नाही. त्यांची अंक लिपी सुद्धा मूळ संस्कृत भाषेचीच छाया. एक म्हणजे यदन (एकं), द्वा म्हणजे दोन, त्री म्हणजे तीन, चेतरी म्हणजे चार, पेत म्हणजे पाच, शेष्त म्हणजे सहा, सेदम म्हणजे सात, ओसम म्हणजे आठ, देवेत म्हणजे नऊ आणि देसेत म्हणजे दहा. रोजच्या वापरातले काही शब्द अजून आठवणीत राहिले. दोबर दान म्हणजे गुड मॉर्निंग – शुभ सकाळ. दोबर वेच्चे म्हणजे गुड नाइट. मोलीम म्हणजे कृपया तर दा म्हणजे होय. नेमा म्हणजे नाही. 



अल्पावधीतच मारा माझी खूप छान मैत्रीण झाली. पुढील दोन दिवस आम्ही दोघी गावात सकाळ संध्याकाळ फेरफटका मारत होतो. गावातील चर्चेस, शाळा, सरकारी कार्यालये, टेलीफोन एक्सचेंज अशा सर्व जागा पायाखालून गेल्या. आणि हो जिथे अविनाश नेमणुकीस होते ते मार्कोनीच ग्राड पोलिस ठाणे ही मला मारानेच दाखविले. आमच्या भटकंतीत माराने मला बाल्कन प्रदेशचा इतिहास सांगितला. नाटोचे युद्ध, तेथील ख्रिश्चन-मुस्लिम विद्वेषाची कारणे, युद्धात झालेली अतोनात मनुष्य हानी आणि या सर्व परिस्थितीत संयुक्त राष्ट्र परिषदेची मिळणारी मदत अशी सर्व बारीक सारीक माहिती माराने मला अगदी सहज चलता बोलता सांगितली.  मी मात्र गणपतीच्या आरासीसाठी काही सामग्री मिळते का याचा शोध घेत होते. मिळेल ते साहित्य आणि वस्तू खरेदी करीत होते.  



गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, संध्याकाळी विजयकुमार आणि आरबाब हे दोन पोलिस अधिकारी आमच्या घरी आले. अविनाशने त्यांची ओळख करून दिली. तेव्हा कळलं की अरबाब हे पाकिस्तानचे प्रतिनिधी म्हणून आले होते. तर विजयकुमार हे आयटीबीपी हैदराबादचे रहिवाशी होते. त्यानंतर मी फक्त गणपतीची स्थापना कुठे करायची एवढंच संगितलं. पुढील सर्व कामात अरबाब यांनीच पुढाकार घेतला. संपूर्ण आरास अरबाब आणि विजयकुमार यांनीच मांडली.  पाकिस्तानातून आलेला हा अधिकारी आमच्यात इतका छान मिसळला की भारत पाकिस्तान यांच्यातील वितुष्टाचा कुठेही मागमूसही नव्हता. त्यावेळी सहज विचार मनात चमकून गेला की एक पाकिस्तानी मुस्लिम अधिकारी भारतीयाच्या गणेश पूजनाला हातभार लावू शकतो तर मग स्थानिक मुस्लिम व ख्रिश्चनांमध्ये एवढं भयानक युद्ध का व्हावं? धर्माधर्मात फरक असला तरी परस्परांवरील विश्वासातून एक सहजीवनाची परंपरा का तयार होऊ नये? का दोन्ही बाजूची एक संपूर्ण पिढी नष्ट व्हावी? तसंच भारतात देखील हिंदू-मुस्लीम गुण्या गोविंदाने का नाही राहू शकत? असो. प्रश्न अनेक होते आणि त्यांची उत्तरे शोधायला वेळ नव्हता. सर्व तयारी होईपर्यंत रात्रीचे 11.30 वाजून गेले. आम्ही सर्व लगेचच जेवलो.  सकाळी लवकर उठायचे असल्याने वेळ वाया न घालवता झोपण्याच्या तयारीला लागलो.  झालेली दगदग आणि धावपळीमुळे सगळेच थकले होते. झोप केव्हा लागली ते कळलेच नाही. 



गणेश चतुर्थीचा दिवस उजाडला; आम्ही सगळेच लवकर उठलो. सर्व तयारी झाली होती. पण गणपतीच्या मागे लावण्यासाठी योग्य असे वस्त्र अथवा पडद्यासारखे कापड मिळालेच नाही.  तेवढ्यात अरबाबने सुचवले की आपण संयुक्त राष्ट्रांचा ध्वजच लावायचा का? कल्पना फारच सुंदर होती. त्या ध्वजामध्ये सर्व राष्ट्रांचे प्रातिनिधिक ध्वज समाविष्ट आहेत. म्हणजे खर्‍या अर्थाने गणपती बाप्पा बोस्नियाच्या शांतता प्रक्रियेत समाविष्ट झाले. खरं तर सर्बिया बोस्नियाच्या युद्धातील प्रचंड मनुष्यहानी नंतर सुरू झालेल्या या शांतता प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर बोस्नियात गणेशोत्सव ही कल्पनाच धाडसी होती. सर्व प्रथम माराने हजेरी लावली आणि पूजेच्या सर्व विधींमध्ये ती आवर्जून सहभागी झाली. विजय आणि अरबाब दोघेही सर्व पुढाकार घेऊन सर्व कामे करत होते.  हिंदूधर्माच्या पद्धतीने अविनाशने सर्व साग्रसंगीत गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली, अभिषेक केला, आरती मंत्र पुष्पांजली इत्यादी सर्व षोडशोपचार पार पडले.


 


सर्व प्रथम अरबाब आणि विजय कुमार यांनी यथासांग गणपतीचं दर्शन घेतलं आणि हात जोडून नमस्कार केला.  त्यानंतर माराने सर्व विधींबाबत बारीक चौकशी केली. नंतर तिच्या पद्धतीने पूजा केली. येथे एक मजेशीर घटना घडली. आमची लँडलेडी श्रीमती स्ताना बोयांनीच या दर्शनासाठी आल्या होत्या.  त्यांच्यासाठी हे सर्व नवीनच होते.  मूर्ती पुढे येताच त्यांनी अविनाशला विचारलं, “कॅन आई टच योर गॉड?” अविनाशने लगेच उत्तर दिले, “Yes, but if you touch my god, I will have to touch your feet”. याचा संदर्भ आमच्या स्ताना मॅडमला काही लागणं शक्य नव्हतं. आपल्याकडे अशी प्रथा आहे की वारकरी पंढरीची वारी करून येतात, त्यांना नमस्कार केल्यास आपल्यालाही वारी केळ्याचे पुण्य लाभतं.  त्याचप्रमाणे ज्याने प्रत्यक्ष गणपतीचे चरण स्पर्श केले त्याला नमस्कार केल्यास आपल्यालाही बाप्पाच्या चरणस्पर्शाचे पुण्य मिळेल. त्यानंतर लगेचच स्तानाने गणपतीच्या मूर्तीला हात लावून नमस्कार केला व गणपतीला हात लावतानाचा आपला फोटो काढून घेतला. कदाचित तो तिच्या आयुष्यातील सर्वात दुर्मिळ फोटो असावा. त्या फोटोच्या माध्यमाने त्यांच्या घरातील गणपतीच्या वास्तव्याने घरातील वातावरण सदैव मंगलमय, निर्विघ्न राहो हीच सदिच्छा त्या प्रसंगी होती.  यानंतर दिवसभर स्थानिक नागरिक दर्शनासाठी येतच राहिले. सर्वांना गणपतीच्या रुपाबाबत कुतूहल होतं. सर्वांनाच या उत्सवाबाबत आणि त्या अनुषंगाने लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा वापर इंग्रजांविरुद्ध जनजागृती साठी कसा केला आणि तसंच आज गणेशोत्सव कसा साजरा होतो या विषयी माहिती दिली गेली.  



ती संध्याकाळ तर एक सांस्कृतिक संध्याकाळच होती. इंडो-बोस्नियन सांस्कृतिक मिलनाची संध्या. स्थानिक तरुण मुलींनी आवर्जून भारतीय पद्धतीने साड्या नेसल्या, सलवार-कमीज आणि त्यावर भारतीय अलंकार चढवले. फोटो घेण्याची अहमहिकाच लागली. आम्ही काही निवडक स्थानिक नागरिकांना सहभोजनाला बोलावलं होतं.  अस्सल पुणेरी पद्धतीचा स्वयंपाक केला होता. मोदकांचे सर्वांनाच खास आकर्षण होते. बोलता बोलता माराने आम्हाला सांगितलं की बोस्नियात गुळाचा वापर न करता साखर वापरून पोळीमध्ये सारण भरून पोळी करतात त्याला पिता असे म्हणतात. हा देखील कदाचित संस्कृत भाषेप्रमाणेच प्राचीन काळी आलेला व्यंजनाचा प्रकार असावा. जेवताना गप्पा रंगल्या. माराचे भाषांतर चालायचे. शेवटी मी भारतातून नेलेल्या काही भेटवस्तू दिल्या आणि सर्वांचा निरोप घेतला.  जाण्यापूर्वी माराचे वडील लाजो रडाक आणि दानको बोयांनीच यांनी आवर्जून जवळ येऊन संगितले की “आमच्या आयुष्यातलं हे पहिलंच रात्रिभोजन होतं ज्यामध्ये मांसाहार आणि दारूचा समावेश नव्हता.” मनात विचार आला की भारतीय संस्कृतीचा एवढा जरी प्रभाव त्यांच्या मनावर झाला तरीही माझ्या सर्व परिश्रमाना यश आलं असं म्हणता येईल. जातांना प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. जवळ जवळ प्रत्येकाने भारताला एकदा तरी भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. 



दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मार्कोनीच ग्राड पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस अधिकार्‍यांना जेवायला बोलावलं होतं.  त्यांच्या सोबतच पोलिस ठाण्यात नेमणूकीस असलेले दुभाषी (Interpreters) देखील हजर होते. यामध्ये दोन अमेरिकन, दोन ब्रिटिश, दोन इटालियन, ऑस्ट्रियन, जॉर्डन, घाना, नेपाळ आणि पाकिस्तानी पोलिस अधिकार्‍यांचाही समावेश होता. त्यावेळी एक बाब प्रकर्षाने जाणवली ती अशी की प्रत्येक जण आवर्जून गणपतीच्या मूर्तीला आदराने स्पर्श करत होता. अगदी मूर्ती पूजा न मानणारे जॉर्डनचे पोलिस अधिकारी देखील त्याला अपवाद नव्हते. यावेळी हिंदू धर्मात चरण स्पर्शाला एवढं महत्व का आहे याची जाणीव झाली. रात्री उशीरा उत्तरपूजा केली पण विसर्जन दुसर्‍या दिवशी सकाळी करायचे ठरलं. 



सकाळी दोन नेपाळी पोलिस अधिकारी आले. मारा सकाळीच घरी आली होती.  तिला विसर्जनाची कल्पनाच आवडली नाही. तिने मूर्ती पाण्यात विसर्जन न करता त्यांच्या घरी कायम ठेवण्याचा आग्रह धरला. परंतु आम्ही तिला विसर्जनाचं महत्व पटवून दिलं. तेव्हा तिने मान्य केले. परंतु तिने पुढे जो आग्रह धरला त्याचं खास कौतुक करावं वाटतं.  तिने संगितलं की मार्कोनीच ग्राड मधून दोन नद्या वाहतात. त्यापैकी व्रबास नदी ही रिपब्लिका सर्बस्कामध्ये राहाते व दुसरी नदी बॉसना ही वाहात वाहात फेडरशनमध्ये जाते. माराने आग्रह धरला की गणपती व्रबास नदीतच विसर्जन करायचा.  मी तिला कारण विचारलं. तिच्या उत्तराने मी क्षणभर अवाक होऊन ऐकतच राहिली. मारा म्हणाली, ‘गणपती व्रबास नदीत विसर्जन केला तरी त्याचे पावित्र्य आणि आशीर्वाद त्याच नदीत म्हणजे सर्बियन भागातच राहील.’ श्रद्धेचं एवढं महान मूर्तीमंत स्वरूप माझ्या पुढे उभं होतं. माझ्या समोर हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता.



दोन नेपाळी पोलिस अधिकारी, मारा, माराची बहीण जीना यांच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातून गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली. व्रबास नदीत बाप्पांच्या मूर्तीचं मोठ्या थाटामाटात विसर्जन केलं. आम्ही परतलो तेव्हा गलबलून आलं होतं. जणू काही आंतरराष्ट्रीय पोलिस सेनेच्या शांतता प्रक्रियेचा तो एक भागच होता.  त्यानंतर काही महिन्यातच बोस्नियामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि स्थानिक नवनिर्वाचित सदस्यांच्या ताब्यात देशाची धुरा सोपवून शांतता प्रक्रिया पूर्ण झाली. संयुक्त राष्ट्रांचे मिशन पूर्ण झाले.  कुठे तरी बाप्पाने अदृश्य रित्या या प्रक्रियेला आशीर्वाद दिला असावा असं उगाचच मला वाटून गेले. 


(प्रिती मोकाशी या रिटायर्ड पोलिस ऑफिसर अविनाश मोकाशी यांच्या पत्नी असून बोस्नियामधील वास्तव्यात गणेशोत्सवाचे त्यांना आलेले आगळे वेगळे अनुभव त्यांनी इथे मांडले आहेत. अविनाश मोकाशी यांची बोस्नियाला संयुक्त राष्ट्र संघातर्फे Peace Keeping Force मध्ये बोस्निया येथे नियुक्ती झाली होती. त्यांना यूएनच्या Peace Award ने सन्मानित करण्यात आलं होतं.