चित्रपटसृष्टीतील लोकांवर आरोप करणे फार सोपे असते. तसेच आरोप केल्यानंतर काही दिवस तरी संपूर्ण देशभर चर्चेत राहाण्याची संधी मिळते आणि रोज एखाद दुसऱ्या वृत्त वाहिनीवर मुलाखती देण्याची संधी मिळते. परंतु माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की, जे आरोप केले जातात ते संपूर्णपणे खोटे असतात. आरोप खरेही असू शकतात परंतु ते सिद्ध करणे फार कठिण असते. एक तर जे आरोप केलेले असतात ते एकांतातील असतात आणि त्याचा पुरावाही नसतो. मात्र अशा आरोपांमुळे ज्याच्यावर आरोप होतो तो आणि त्याचा परिवार काही काळ तरी तणावात असतो. जेव्हा अशा एखाद्यावर आरोप होतो तेव्हा त्याचे विरोधकही याचा फायदा घेतात आणि आपल्या मनातील मळमळ बाहेर काढतात. अशा आरोपांच्या निमित्ताने दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांशी भिडताना दिसतात. अनुराग कश्यप आणि पायल घोषच्या निमित्ताने हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोप करणाऱ्याला न्याय मिळतोच असे नाही आणि ज्याच्यावर आरोप होतात त्याला शिक्षा होतेच असेही नाही. मग अशा आरोपांनी मिळते तरी काय? केवळ काही दिवसांची प्रसिद्धी की आणखी काही?
एखाद्या दिग्दर्शकावर असे आरोप करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. वाचकांना प्रीति जैन नाव कदाचित आठवणार नाही. प्रीती जैनने 2004 मध्ये प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर वर बलात्काराचा आरोप केला होता. हे संपूर्ण प्रकरण जवळ-जवळ आठ वर्ष न्यायालयात होते. २०१२ मध्ये न्यायालयाने मधुरला बलात्काराच्या आरोपातून मुक्त केले. त्यावेळीही काही जण मधुरच्या बाजूने तर काही जण प्रीतिच्या बाजूने उभे राहिले होते. यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मधुर सेटलमेंट करण्यास ऐकत नाही हे पाहिल्यानंतर प्रीती जैनने अरूण गवळीचा सहकारी नरेश परदेशी याला सप्टेंबर 2005 मध्ये मधुर भांडारकरची ह्त्या करण्याची सुपारी दिल्याचे समोर आले होते. यासाठी प्रीतिने नरेश परदेशीला 75 हजार रूपयांची सुपारी दिल्याचेही उघड झाले होते. नरेशने कामगिरी पूर्ण न केल्याने प्रीती त्याच्याकडे पैसे परत मागत होती. ही गोष्ट अरूण गवळीला समजली आणि त्यानेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतरच हे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर पोलिसांनी प्रीती जैनविरोधात गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी प्रीतिला तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती.
2011 मध्ये रिना गोलन नावाची एक इस्रायलची मॉडेल मुंबईत अभिनेत्री बनण्यासाठी आली होती. काम मिळवण्यासाठी तिने अनेक निर्माता दिग्दर्शकांची भेटही घेतली होती. बॉलिवुडमधील आपल्या अनुभवांवर आधारित तिने ‘डियर मि. बॉलीवुड. हाऊ आय फेल इन लव विथ इंडिया, बॉलीवुड अँड शाहरुख खान’ नावाने एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात तिने प्रख्यात निर्माता दिग्दर्शक सुभाष घई, दिग्दर्शक अनिस बाजमी, भजन सम्राट अनूप जलोटा यांच्यावर शोषणाचे आरोप केले होते. अर्थात या सगळ्यांनी आरोप फेटाळले, पण रिनाला प्रचंड पब्लिसिटी आणि ज्यांच्यावर आरोप झाला त्यांना मात्र प्रचंड मनस्ताप झाला. या पुस्तकात रिनाने ऐश्वर्या राय आणि सुभाष घई यांच्याबाबतही लिहिले होते. काही दिवस याची चर्चा झाली नंतर हे सर्व प्रकरण थंड झाले.
दोन वर्षांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता नेही नाना पाटेकर आणि डांस डायरेक्टर गणेश आचार्य यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. 2008 मध्ये राकेश सारंग दिग्दर्शित हॉर्न ओके चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणप्रसंगी लैंगिक शोषण झाल्याचा आरोप तिने दहा वर्षानंतर केला होता. नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि नाना पाटेकर यांच्यावरच तिने आरोप केले होते. बॉलिवुडमधील मी टू मोहिमेत अनेक नायिकांनी त्यांना आलेले मी टूचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले होते. ट्विंकल खन्ना, सोनम कपूर अशा काही नायिकांनी तनुश्रीला समर्थन दिले होते. पोलीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाना पाटेकर यांना मदत करीत असल्याचा आरोपही तनुश्रीने केला होता. नाना पाटेकर यांनी तनुश्रीला प्रत्युत्तर न देता थेट न्यायालयात धाव घेतली होती. नाना पाटेकर यांना क्लिन चीट मिळाली आणि एक वर्षाच्या आतच हे प्रकरण संपुष्टात आले.
अधे मधे अशी प्रकरणे उद्भवतात आणि काही काळ बॉलिवुड ढवळून निघते. पुढे मात्र काहीही होत नाही.