रक्तदानाचा तुटवडा ही तर दरवर्षीची बातमी ती सुद्धा विशेष करून 'मे-जुन' महिन्यात उन्हळ्यात सर्वच वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर येत असते. कारण या काळात बहुतांश महाविद्यालये बंद असतात आणि बऱ्यापैकी नागरिक उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे पर्यटन किंवा आपआपल्या गावी गेलेले असतात त्यामुळे या काळात सर्वसाधारण रक्तदान कमी प्रमाणात होते. त्यानंतर परिस्थिती सुरळीत असल्याचे चित्र दिसत असते. मात्र यावर्षी डिसेंबर महिन्यात सुद्धा रक्ताची मोठी टंचाई राज्यात जाणवत असल्याचे भासत असून राज्यात फक्त ५-६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे आणि त्याकरिता रक्तदान करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ही परिस्थिती उद्भवण्याचे एकमेव कारण म्हणजे कोरोना हा आजार. या आजराची लागण ' रक्तदान शिबिराला ' झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या कोरोना काळात रक्तदान शिबिरांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.


ऑक्टोबर महिन्यातही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मध्यंतरी रक्त दान करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केला होते, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक दात्यांनी रक्त दान केले होते. विशेष म्हणजे गणेशोउत्सवात अनेक मंडळांनी तर रक्त दान शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित केली होती. मात्र एकंदरच या कोरोनाच्या वातावरणात काही दातेही रक्तदान करताना दोनदा विचार करत असल्याचे दिसत आहे. गृह विभागाने सावर्जनिक नवरात्र उत्सवानिमित्त ज्या काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये, त्यांनी रबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे (उदा. रक्तदान) राबविण्यास प्राधान्य द्यावे असे सूचित करण्यात आले होते. त्याशिवाय राज्यातील या सर्व रक्त पेढ्याचे कामकाज व्यवस्थितपणे पार पडावे याकरिता देखरेख करण्याकरिता जी राज्य रक्त संक्रमण परिषद आहे त्यांनी सर्व रक्तकेंद्र प्रमुखाना पत्र पाठवून नवरात्र उत्सव काळात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या .


तीन दिवसापूर्वी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यानी कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन केले आहे. कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट आणि मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. या पार्श्वभुमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


गेल्यावर्षी, २०१९ मध्ये राज्यात १७ लाख २३ हजार युनिट रक्त संकलन करण्यात आले होते. रक्त संकलन करण्यात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक घोषित करण्यात आला होता. ज्या पद्धतीने रक्त संकलित होते त्या प्रमाणावर ते वापरलेही जाते. रक्ताचा वापर शस्त्रक्रिया, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण, थॅलेसेमिया बाधित रुग्ण, त्यानंतर काही नैसर्गिक आपत्ती, मोठ्या दुर्घटना - अपघात यावेळी रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात लागत असते. तसेच काही शस्त्रक्रिया असतात, त्यावेळी अचानपकपणे रक्तस्त्राव झाल्यामुळे रक्ताची मोठी मागणी निर्माण होत असते. अनेक वैद्यकीय उपचारात परिस्थितीनुसार रक्ताची गरज भासत असते. अनेक रुग्णालये नातेवाईकांना रक्त देण्यास सांगतअसतात, जर नातेवाईकाकडे कुणी ओळखींमध्ये दाता उपलब्ध असेल तर ठीक नाही तर त्या रुग्णाच्या कुटुंबियांना धावपळ करावी लागते. हल्लीच्या काळात सोशल मीडियामुळे एक फायदा झाला आहे कि कुणाला रक्ताची तात्काळ गरज पडली तर त्या सोशल मीडियाद्वारे अनेक वेळा आवाहन आपण पाहत असतोच अमुक एका रुग्णाला अमुक एक गटाचे रक्त हवे आहे. त्यामुळे कुणी जर उपलब्ध असेल तर रक्त मिळतेही पण प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही. काही तरुणांनी तर चक्क व्हाट्स ग्रुप तयार करून ठेवले आहेत, कुणालाही काही गरज लागली तर ह्या व्हाट्स अँप वर जाऊन त्या रुग्णाची गरज ओळखून आवाहन केले जाते.


यावर्षी २०२० मध्ये आतापर्यंत झालेलं रक्तदान अशाप्रमाणे आहे, जानेवारी - १ लाख ६८ हजार १४४, फेब्रुवारी - १ लाख ४५ हजार २८९, मार्च - १ लाख १० हजार ४३७, एप्रिल - ५३ हजार ६३०, मे - ९१ हजार १३७, जुन - ९९ हजार ६५८, जुलै - ६० हजार ७५०, ऑगस्ट - ६२ हजार ००१, सप्टेंबर - ६३ हजार ८८८ इतके आहे. कोरोना काळाचा विचार करता ही परिस्तिथी चांगली असली तरी आपली गरज मोठी आहे. राज्यात एकूण ३४४ खासगी आणि शासकीय रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी ७६ रक्तपेढ्या या शासकीय असून बाकिच्या या खासगी आहेत. या कोरोना काळात काही रक्तपेढ्यांमध्ये कर्मचारी कमतरता असल्यामुळे ७०-८० रक्तपेढ्यानी किती रक्त संकलन याची आकडेवारी शासनाकडे पाठविलेली नाही.


ऑक्टोबर १६ ला, ' रक्तदान शिबिरांना कोरोनाचा खो ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, रक्तदानाचं महत्तव आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. रक्तदान करण्यात महाराष्ट्र तसा अग्रेसर ही असतो. मात्र विशेष करून या आरोग्यच्या आणीबाणीच्या काळात रक्त मिळविण्याच्या बाबतीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसत आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण लोकसंख्येच्या १ % रक्त संकलन होणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त रक्तदान आपल्या राज्यात होत आले आहे. गेल्यावर्षी रक्तसंकलनात संपूर्ण देशात राज्याचा पहिला क्रमांक होता. राज्यातील बहुतांश रक्तपेढ्याना रक्त मिळविण्यासाठी रक्तदान शिबिरांवर अवलंबून राहावे लागते. यंदाच्या या कोरोना काळात मात्र जे रक्तदात्यांकडून रक्त मिळविण्याचे मुख्य स्रोत होते तेच आटले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी, कॉर्पोरेट ऑफिसेस या काळात बंद असल्याने सगळी मदार फक्त सामाजिक संस्थांवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या राज्याची गरज पाहता येत्या काळात नियमित शस्त्रक्रिया सुरु झाल्या असल्यामुळे रक्ताची नितांत गरज भासणार आहे. त्यामुळे आता फक्त रक्तदान करा असे बोलण्यापेक्षा गृहसंकुलात रक्तदानाची शिबिरे आयोजित करण्यावर भर देण्याची गरज आहे. कारण रक्ताची टंचाई महाराष्ट्र सारख्या राज्याला परवडणारी नाही कारण कुशल डॉक्टर्स आणि आधुनिक वैद्यकीय यंत्रणा असलेल्या आपल्या राज्यात रुग्णालये मोठ्या प्रमाणात असून बाहेरच्या राज्यातूनही रुग्ण आपल्या राज्यात वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येत असतात.


अजूनही कोरोनाच्या या वातावरणामुळे राज्यात काही निर्बंध आहेत. महाविद्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेसचे वर्क फ्रॉम होम सुरूच आहे. मुंबई मध्ये लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच आहे. नागरिकांच्या मनातील भीती हळू हळू दूर होत आहे. रक्तदानाला अजून तरी दुसरा पर्याय उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे रुग्णाला रक्त लागल्यास त्याला रक्तच द्यावे लागते हे लक्षण ठेवून सामजिक बांधिलकी जोपासत जे तरुण रक्त देऊ शकतात त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. रक्तदान दिल्याने कुणाचा तरी जेव वाचविण्यात छोटासा का होईना हा प्रयत्न शक्य त्या सगळ्यांनीच करायला हवा. कोरोनाचे मळभ दूर झाल्यावर रक्ताची टंचाई भासणार नाही हे नक्की असले तरी आज तुमची समाजाला गरज आहे या भावनेने पुढे रक्तदान करणे अपेक्षित आहे.