क्रिकेटचं फास्ट फूड अर्थात ट्वेन्टी-20 क्रिकेटचं फेस्टिव्हल पुन्हा एकदा सुरु झालंय. चौकार-षटकारांवर ताव मारण्याचे दिवस परत आलेत. निमित्त अर्थातच कोरोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचं. स्पर्धेमध्ये टीम इंडियाची नांदी होतेय ती सुपरहिट मुकाबल्याने. अर्थात भारत-पाकिस्तान मॅचने. आपल्या गटात न्यूझीलंड, अफगाणिस्तानसारखे संघही आहेत. तसंच स्कॉटलंड, नामिबियासारख्या नवख्या टीम्सही. त्यामुळे सेमी फायनलची मुख्य रेस भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या तीन जायंट्समध्येच आहे. अर्थात टी-ट्वेन्टी हे इतकं लहरी क्रिकेट आहे की, इथे हीरोचा झीरो आणि झीरोचा हीरो व्हायला एक चेंडूही पुरेसा आहे. म्हणजे एखादा नो-बॉल पडला, पुढे फ्री हिट, त्यावर षटकार किंवा चौकार. अशी स्थितीही एखाद्या संघाचं नशीब आणि सामन्याचा निकाल दोन्ही फिरवू शकते.
आपल्या गटापुरता विचार केला तर भारतीय संघाने सराव सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्सना धूळ चारत शस्त्र परजलीत. आयपीएलचा उत्तरार्धही नुकताच पार पडल्याने खेळाडू टचमध्ये आहेत. त्याच वेळी ते थोडे थकलेलेदेखील आहेत का? याचं उत्तर काळाच्या ओघात मिळेल. पण, आपण पॉझिटिव्हच विचार करु. अर्थात टी-ट्वेन्टीची लढाई ही साडेतीन तासांची असते. त्यामुळे दोन सामन्यांच्यामध्ये शरीर आणि मनाला रिकव्हर होण्यासाठी पुरेसा अवधी असतो. सो थकवा वगैरे तितका मॅटर करायला नको. टीम इंडियाबद्दल बोलायचं झाल्यास विराटचा टी-ट्वेन्टी कर्णधार या नात्याने हा अखेरचा वर्ल्डकप आहे. आपण या फॉरमॅटचं कर्णधारपद सोडत असल्याचं त्याने आधीच जाहीर केलंय. तसंच कोहलीच्या नावावर एक नकोसा विक्रम आहे तो, एकही आयसीसी ट्रॉफी त्याच्या कलेक्शनमध्ये नसल्याचा. या स्पर्धेत ही कोरी पाटी स्वच्छ पुसून तो त्यावर विजेतेपदाचा टिळा लावत सन्मानाने कर्णधारपदाचं शिवधनुष्य खाली ठेवण्यास उत्सुक असेल.
त्याच्याकडून एक्स्ट्रा एफर्ट पाहायला मिळू शकतो. तो चॅम्पियन प्लेअर आहे, यात काही शंका नाही. पण, अश्विन आणि त्याच्यामध्ये झालेल्या कुरबुरीसंदर्भातल्या बातम्या, यानंतर अश्विनचं टीममध्ये झालेलं सिलेक्शन, अलिकडचा कोहलीच्या फॉर्ममधील चढउतार या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर ड्रेसिंग रुमचं वातावरण किती हेल्दी आहे, यावर परफॉर्मन्सची तब्येत अवलंबून असेल. अर्थात हे सारे प्रोफेशनल खेळाडू आहेत. त्यामुळे याचा फार परिणाम व्हायला नको, किंवा न होणं अपेक्षित आहे.
कोहली, राहुल आणि रोहित या तीन बॅटिंग पॉवर हाऊसवर टीम इंडियाचं भवितव्य बऱ्याच अंशी अवलंबून आहे. हे तिघेही एकहाती मॅचविनर आहेत, हे आधीच सिद्ध झालंय. अर्थात टी-ट्वेन्टीचं मैदान असल्याने सुरुवातीला पडझड होऊनही संघ सावरतात आणि विजय पताका फडकवतात. त्यात आपल्याकडे पंत, पंड्या, इशान किशन, सूर्यकुमार अशी तगडी फळी आहे, जी तरुणही आहे आणि किशनचा अपवाद वगळता बऱ्यापैकी अनुभवीदेखील. गोलंदाजीत बुमरा, भुवनेश्वर, शमी, शार्दूल ठाकूर, ही वेगवान चौकडी आहे. तर, अश्विन, जडेजा, राहुल चहर, चक्रवर्तीची फिरकीची बाजू सांभाळतील. अपोझिशनमधील फलंदाजीचा जीव, त्यांच्याकडे असलेलं लेफ्टी-राईटी कॉम्बिनेशन हे सारं लक्षात घेऊनच प्लेईंग इलेव्हन सिलेक्ट होईल. ज्यामध्ये अर्थातच बऱ्यापैकी फलंदाजी, उत्तम क्षेत्ररक्षण हा निकष लावला जाईल. आपला संघ समतोल आहे. फक्त प्रेशर सिच्युएशन जो जास्त चांगला हँडल करेल, तोच बाजी मारेल. या फ्रंटवर आपल्याला उपयुक्त ठरणार आहे तो अर्थातच महेंद्रसिंग धोनी उर्फ मेन्टॉरसिंग धोनी. त्याने नुकत्याच आपल्या ट्रॉफीच्या कलेक्शनमध्ये आयपीएलची आणखी एक झळाळती ट्रॉफीही जमा केलीय. त्याला नुसतं जिंकणं माहीत नाहीय, तर प्रचंड मोठ्या दबावाच्या निखाऱ्यांवर चालत थंड डोकं ठेवून मॅचेस जिंकणं त्याला अंगवळणी पडलेलं आहे. बर्फालाही लाजवेल इतका कूलनेस, त्याच वेळी प्रतिस्पर्ध्याला सरप्राईज करण्यासाठी लागणारं अनप्रेडिक्टेबल थिंकिंग ही त्याची गुणवैशिष्ट्ये. (2007 चा वर्ल्डकप आठवतोय का? पाकविरुद्धच्या फायनलमध्ये अखेरची ओव्हर त्याने थेट जोगिंदर शर्माला दिली होती, किंवा 2011 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये इन फॉर्म युवराजच्या जागी त्याने स्वत:ला चौथ्या नंबरवर प्रमोशन दिलं होतं.) या दोन्ही मॅचचा निकाल आपण सारेच जाणतो.
धोनीचा आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे तो तसा अलिकडेच निवृत्त झालेला असल्याने या संघातील बहुतेक खेळाडूंची मानसिकता, गुणवत्ता, क्षमता तो जाणून आहे. कोहलीसह सर्वच खेळाडूंच्या मनात धोनीबद्दल असलेला प्रचंड रिस्पेक्ट हाही आपल्या टीमसाठी एक्स फॅक्टर ठरु शकतो. धोनीचा नुसता ड्रेसिंग रुम प्रेझेन्स परफॉर्मन्सची नेक्स्ट लेव्हल गाठून देऊ शकतो. टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये आक्रमकता ही महत्त्वाचीच असते. त्याच वेळी तिला संयमाची महिरप लावली तर विजयाच्या ताटावर बसायची वेळ पुन्हा पुन्हा येते. बेशिस्त आक्रमकता तुम्हाला उपाशी ठेवू शकते. हे सारं लक्षात घेतच टीम इंडियाचा खेळ होईल, यात काही शंका नाही.
अर्थात ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही टीमला कमी लेखणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारणं नव्हे तर कुऱ्हाडीवर पाय मारण्याइतकं अवसानघातकी आहे. वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडिया फेव्हरेट असली तरीही त्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना प्रत्येक पायरीवर घाम गाळावाच लागेल.
दिवाळी काहीच दिवसांवर आहे, फायनल ज्या दिवशी आहे तोपर्यंत दिवाळी होऊनही जाईल. सध्या कोरोना काळातून आपण सारेच जात असल्याने प्रदूषण कऱणारे फटाके वाजवण्यापेक्षा डोळ्याला आणि मनाला सुखावणारे फटाके टीमने मैदानात वाजवावेत, असं त्यांना सांगूया. दिवाळीचा फराळ आणखी गोड लागेल आपल्याला, काय वाटतं तुम्हाला?