रेमेडीसीवर औषध दिले तरच रुग्ण बरा होतो किंवा त्याचा जीव वाचतो हा भ्रम आधी रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोक्यातून काढून टाकला पाहिजे. गेला आठवडाभर मुंबई शहरासह अनेक भागात रुग्णांचे नातेवाईक 'रेमेडेसिवीर' या औषधाचं प्रिस्क्रिप्शन घेऊन हे औषध मिळविण्याकरिता पायपीट करताना दिसत आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांना याबाबत विचारले असता ह्या औषधांबाबतची शास्त्रीय आधारावर उपयुक्तता अजून ठरायची आहे. अजूनही हे औषध दिल्यानंतर रुग्ण बरा होतोच असे कुणीही खात्रीलायक सांगू शकत नाही. ह्या औषधाबाबत चर्चा नव्हती किंवा हे औषध बाजारात उपलब्ध नव्हते त्यावेळीही गंभीर रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरांना यश आलेले आहे. विशेष म्हणजे हे औषध आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात केव्हाही उपलब्ध नव्हतेच, त्यामुळे तुटवडा असण्याचा संबंधच येत नाही. ते केवळ विशेष बाब म्हणून या औषधाच्या काही वायल्स उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. काही रुग्णांमध्ये हे औषध वापरून बघितल्यानंतर त्याचा उपयोग झाला आहे, मात्र ते औषध मिळवण्यासाठी सुरु असलेली अगतिकता पाहून हे औषध मिळालं नाहीच तर मोठा अनर्थ होईल, ह्या मानसिकतेतून नागरिकांनी बाहेर पडणे गरजेचं आहे.



आपल्याकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्यासाठी राज्याच्या कोरोनाविषयक कृती दलाने काही उपचारपद्धती आखून दिली आहे. त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक असणारी औषध ती किती प्रमाणात कोणत्या प्रसंगी द्यावी हे सांगण्यात आले आहे. सध्या डॉक्टर ज्या उपचारपद्धतीचा वापर करत रुग्णांना उपचार देत आहेत, त्याने नक्कीच रुग्णांना फायदा होत असल्याचं दिसत आहे. अमेरिकेतील गिलियाड सायन्सेस या औषध कंपनीकडे ‘रेमडेसिवीर या औषधाचे पेटंट आहे. अनेक देशातील औषध कंपन्या या औषध निर्मितीसाठी गिलियाड सायन्सेसच्या संपर्कात आहेत. रेमडेसिवीर हे औषध प्राथमिकरीत्या इबोला, सार्स या आजारांकरिता बनवलं गेलं होतं. मात्र या कंपनीने हे औषध कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर चांगलं काम करत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाच्या चाचण्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर तेथील औषध नियंत्रकांनी यास परवानगी दिली होती.



पुणे येथील के ई एम रुग्णालयातील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी सांगतात की, "कोरोनाबाधित गंभीर रुग्णांमध्ये जी काही प्रचलित उपचारपद्धती उपलब्ध आहे ती खूप फायदेशीर ठरताना दिसत आहे. त्यामध्ये, ऑक्सिजन, रुग्णांना काही काळ पोटावर झोपविणे त्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते, शिवाय डेक्सामेथासोन किंवा मेथीलप्रेडीनीसोलोन ही उत्तेजक , व्हिटॅमिन्स, ताप आल्यानंतर आपण जी प्राथमिकरीत्या औषध घेतो अशा स्वरुपाची उपचारपद्धती आहे. अगदी विशेष प्रसंगी टॉसिलीझूमाब औषध दिले जाते, तेही सरसकट नाही. या औषधासाठी योग्य रुग्णांची निवड करणे गरजेचे असते. मी आतापर्यंत जवळपास कोरोनाबाधित शेकडो रुग्ण बघितले असून त्यावर उपचारही केले आहेत. त्यापैकी 4 रुग्णांना हे औषध दिले आहे. त्यासोबत बाकीची औषधं पण दिली आहेत. ते चार रुग्ण रेमडेसिवीर या औषधानेच बरे झाले आहेत हे मला सांगणे आता कठीण आहे. कारण अजून यावर अभ्यास होणे बाकी आहे. या औषधाव्यतिरिक्त इतर औषधांना चांगला गुण येत असल्याचे काही महिन्याच्या उपचारपद्धतीवरून लक्षात येत आहे. त्यामुळे नातेवाईकांनी उगाच जास्त धावपळ करू नये.

डॉ. कुलकर्णी पुढे असेही सागंतात की, "हल्ली काय झालंय, सध्याच्या काळात डॉक्टरांपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकांची मागणी जास्त असते की आमच्या रुग्णाला रेमडेसिवीर देऊन बघा, हे सध्याचं वास्तव आहे. प्रत्येक डॉक्टर त्यावर कशा पद्धतीने व्यक्त करतो हे त्यावर अवलंबून आहे. आम्ही रुग्णांना समजावून सांगितले पाहिजे, मग रुग्णही ऐकतात. हे रेमेडेसिवीर औषध रुग्ण अतिदक्षता विभागात गेल्यावर ते 24-36 तासात दिले गेले तर फायदेशीर ठरतं, यावर अशा पद्धतीची डॉक्टरांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे सरसकट हे औषध सर्वच रुग्णांना द्यावं लागत नाही.



अनेक सामाजिक माध्यमांवर सध्या अनेक गरजू नातेवाईक या डॉक्टरांनी दिलेल्या 'प्रिस्क्रिप्शनचा' फोटो काढून हे औषध मिळेल का याची विचारणा करताना दिसत आहे. त्याशिवाय अनेक मेडिकलमध्ये जाऊन हे औषध मिळेल का यासाठी वणवण करत आहेत. ही परिस्थिती अगदीच गंभीर आहे. शासनाने खरंतर पुढे येऊन या औषधाची किती उपयुक्तता आहे आणि असेल तर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला काय अडचणी आहेत ते व्यवस्थितपणे सांगितलं पाहिजे. ज्या पद्धतीने औषधाची गरज निर्माण केली जात आहे त्याचप्रमाणे ते काळ्या बाजारात चढ्या भावाने विकले जात आहे हा सगळाच किळसवाणा प्रकार आहे. डॉक्टरांनीसुद्धा हे औषध बाजारात उपलब्ध नाही हे कळल्यावर नातेवाईकांना हे औषध आणण्यास सांगू नये. या औषधाचा काळाबाजार करताना काही जणांना अटक केली गेलीय. नातेवाईक आपला रुग्ण वाचविण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा गैरफायदा समाजातील काही लोकं घेताना दिसत आहेत.

"मला तर कळत नाही कशासाठी या औषधांकरिता एवढी धावपळ चालू आहे. आपल्याकडे मुबलक प्रमाणात असणारे सगळ्यांना परवडेल असे डेक्सामेथासोन किंवा मेथीलप्रेडीनीसोलोन औषध उपलब्ध आहे. ज्याचे निकाल आपल्याला माहीत आहेत. मग या महागड्या औषधाकरिता ही अनाठायी पळापळ का सुरू आहे. या औषधाने रुग्ण बराच होईल असे कुठल्याही वैद्यकीय तज्ज्ञाने सांगितलेले नाही, तर डॉक्टर त्या औषधाचा वापर करून घेताना दिसत आहे. मात्र ते औषध नाही मिळालं तर काही अघटित होईल ही नागरिकांच्या मनातील भीती दूर करणं गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी या औषधाच्या चिठ्ठ्या देण्यापेक्षा त्यासंबंधित रुग्णालयाने हे औषध उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्ने केले पाहिजेत." असे डॉ. प्रदीप आवटे सांगतात, ते राज्याच्या आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी कार्यरत आहेत.



कोरोनाच्या या काळात अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत, त्या शास्त्रीय सिद्धांतावर किती टिकतात हे पाहणं गरजेचं आहे. अजूनही अनेक देश या आजारावर औषध बनवत आहे काही काळाने ते सुद्धा आपलं औषध हे कोरोनासाठी गुणकारी असल्याचा दावा करतील. यामध्ये सर्वसामान्य नागरिक फक्त या औषधाची माहिती गोळा करून आपल्या रुग्णांसाठी हेच अमुक औषध द्यावं म्हणून मागणी करतील. त्यावेळी डॉक्टरांनी नेमकं काय करायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण होईल. सरकारने रेमडेसिवीर औषध केव्हा द्यावं यावर काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्यामध्ये हे औषध, अशा रुग्णांना दयावं की ज्यांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे (एच एफ एन ओ - हाय फ्लो नेजल ऑक्सिजन), नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन-एन आय वी ज्यामध्ये रुग्णांना ऑक्सिजन देण्याकरिता ट्यूब टाकण्याची गरज भासत नाही आणि जे रुग्ण व्हेंटिलेटर असतात आणि अतिदक्षता विभागात असतात.



खार येथील हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे सांगतात की, "हे औषध अगदी गरजवंत रुग्णालाच दिलं गेले पाहिजे. सध्या मध्य स्वरुपाच्या लक्षणाकरिता आपण हे औषध वापरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या औषधाची मागणी वाढली आहे आणि तुटवडा जाणवत आहे. हे औषध आपल्याकडे विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही डॉक्टरांच्या मते या औषधाला रुग्ण चांगला प्रतिसाद देत आहे असे सांगत असले तरी या औषधामुळे मृत्यू दर कमी होतो असे शास्त्रीयदृष्ट्या कुठेही आणि कुणीही सिद्ध केलेलं नाही. हे औषध केवळ गंभीर अवस्थेतील रुग्णांनाच दिले पाहिजे असे माझे मत आहे. याचा गैरवापर होता काम नये आणि सरसकट ते वापरता कामाच नये. डॉक्टरांनी योग्य रुग्णाची निवड करूनच ते औषध देणे अपेक्षित आहे. सध्या जे काही अॅक्टिव्ह रुग्ण आहेत त्यापैकी 10-15 टक्के लोकांनाच ह्या औषधाची गरज भासते."