आठवडा झाला फ्रान्स धुमसतंय. हिंसक आंदोलनांमुळे देशांत अशांतता पसरलीय. एका अल्पवयीन मुलावर पोलिसांनी गोळी झाडल्यानंतर फ्रान्स अक्षरश: पेटलंय. पण हा प्रक्षोभ केवळ एका मुलाला पोलिसांनी जीवे मारल्याचा नाही तर वंशवादावरून केल्या भेदाविरुद्ध असल्याचं वास्तव आहे.


फ्रान्समध्ये नक्की काय घडलं?


27 जून रोजी फ्रान्समध्ये अघटीत घडलं. पोलिसांनी 17 वर्षांच्या मुलावर गोळी झाडली. त्या मुलाचं नाव होतं नाहेर आणि ही घटना घडली पॅरिसमधील नॅनतेरे या उपनगरात. काय घडलं, या बाबतही खूप काही सांगितलं जातंय. पिवळ्या रंगाची मर्सिडिज चालवणाऱ्या नाहेरकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही म्हणून पोलिसांनी त्याला गोळी झाडल्याची चर्चा आहे. तर नाहेर सिग्नल तोडून पळून जात असल्याने त्याला गोळी झाडल्याचं पोलीस सांगतात. या संदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन पोलीस चालकाच्या बाजूला उभे होते आणि त्यांना नाहेरकडून कोणताही धोका नसताना पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली, असं दिसतंय. नंतर असं सांगण्यात आलं की, कार कुणालाही धडक देईल, अशा पद्धतीने तो कार चालवत होता म्हणून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली.


फ्रान्स अशांत


एक गोष्ट नक्की पोलिसांनी अल्पवयीन नाहेरची हत्या केली आणि नाहेर हा अल्जेरियन वंशाचा होता. यात तो अल्जेरियन वंशाचा होता हे खूप महत्त्वाचं. कारण यातच दंगलीची बिजे पेरली गेलीत. या घटनेनंतर फ्रान्समध्ये रातोरात आंदोलन उभं राहिलं. लोक हिंसक झाले. हे आंदोलन इतकं हिंसक झालं की तब्बल 1 हजार 919 वाहनांची जाळपोळ करण्यात आली, तर 493 सरकारी इमारतींचं नुकसान करण्यात आलंय. हे कमी म्हणून की काय हिंसक झालेल्या आंदोलकांनी रविवारी थेट कार पेटवून तिची धडक पॅरिसच्या महापौराच्या घराला धडक दिली. देशात उसळलेल्या या हिंसक आंदोलकांवर नियंत्रण मिळवताना 249 पोलीस जखमी झालेत. पोलिसांनी आतापर्यंत 667 दंगलखोरांना अटक केलीय तर तीन हजार लोकांना ताब्यात घेतलंय. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फ्रान्समध्ये तब्बल 40 हजार पोलीस तैनात आहेत, तर एकट्या पॅरिसमध्ये आजही पाच हजार पोलीस डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत आहेत.


वंशभेदाचा परिणाम


फ्रान्समध्ये अनेक जाती धर्मांचे लोक राहतात. असं असलं तरी गोऱ्यांव्यतिरिक्त इतर लोकांना नेहमी पोलिसांच्या दादागिरीला तोंड द्यावं लागतं, असा सर्वसाधारण आरोप आहे. अनेक मानव अधिकार संघटनांनी पोलिसांवर यापूर्वी वंशभेदाचा आरोप केलाय. आणि यावेळी पोलिसांनी गोळी झाडून हत्या केली तो मुलगा अल्जेरियन वंशाचा होता. यात बरंच काही येतं.दंगलीमुळे फ्रान्समधील सर्व आंदोलनांवर बंदी घालण्यात आलीय. अगदी प्रवासावरही निर्बंध घालण्यात आलेत.


अध्यक्ष मॅक्रॉन यांना झटका


फ्रान्समधील दंगलीमुळे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन अस्वस्थ झालेत. कारण दंगल चिघळल्याचा ठपका अप्रत्यक्ष का होईना त्यांच्यावर पडलाय. या वर्षाच्या सुरुवातालीलाच पेन्शन सुधारणाविरोधात फ्रान्समध्ये आंदोलन पेटलं होतं. पेन्शन सुधारणा करताना निवृत्तीचं वय 62 वरून 64 केल्यामुळे देशात संतापाची लाट उसळळी होती.  हे आंदोलन अगदी मार्च-एप्रिलपर्यंत सुरू होतं. त्यामुळेच आताचं आंदोलन कुठल्याही परिस्थितीत चिघळू न देण्याचं मोठं आव्हान मॅक्रॉन यांच्यासमोर होतं. यासाठी मॅक्रॉन यांनी ब्रुसेल्समधील नियोजित युरोपीयन काउन्सील परिषदेचा गेल्या आठवड्यातील दौरा रद्द केला. विशेष म्हणजे 2005 मध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हा लपू पाहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी मारलं होतं. त्यानंतर तीन आठवडे फ्रान्स दंगलीत होरपळत होता.


नाहेरच्या आजीचं आवाहन


फ्रान्स पेटलेलं असताना नाहेरच्या आजीनं दंगल थांबवण्याचं आवाहन केलंय. गोळी झाडणाऱ्या पोलिसाला दोष देताना सरसकट सर्व पोलिसांवर राग का काढायचा, अशी समजूतदारपणाची भूमिका नाहेरच्या आजीने घेतलीय.