मरने के बाद आदमी का क्या रह जाता है? अमृता प्रीतम यांच्या कोरे कागज पुस्तकातली पहिली ओळ..


आर.आर.पाटील अर्थात आबा गेल्यानंतर पहिल्यांदा आठवली.. ‘मरने के बाद आदमी का क्या रह जाता है?’

शांतपणे विचार केल्यानंतर समजलं बरंच काही राहून जातं.

आबा मूळचे अंजनीचे. जन्म 1957 सालचा. 4 एकर शेती. तीसुद्धा त्या काळात कोरडवाहूच. घरची गरीबी. किती टोकाची..?

“तर आबांचा शर्ट फाटला होता. सुई-दोरा घेऊन ते आईकडे गेले, आणि म्हणाले की हा शर्ट कसातरी शिऊन दे. शर्टची अवस्था बघून आई म्हणाली आता कुटं शिवायचा? एकच शर्ट असल्यानं अंगावर काय घालायचं हा प्रश्न होताच. तेवढ्यात सहज आबांची नजर वर गेली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कपडे गाठोड्यात बांधून ठेवले होते. जुने कपडे आबांनी टेलरकडे नेले. गावातल्या टेलरनंही हे कपडे आबांच्या वडिलांचे असल्याचं लगेच ओऴखलं. त्याच्याकडून आबांनी सगळे कपडे आल्टर करुन घेतले. आपल्याकडे मेलेल्या माणसाचे कपडे खरंतर घालत नाहीत. पण देवाघरी गेलेल्या वडिलांचे कपडे घालून आबा घरात आले, तेव्हा आईला डोळ्यातलं पाणी रोखता आलं नाही. त्याही परिस्थितीत मुलांनी शिकावं म्हणून आई आग्रही होती”

( मी कसा घडलो.. या आबांच्या जीवनचरित्रातून )

इतकी टोकाची गरीबी असतानाही आबा शांतीनिकेतन कॉलेजातून बीए झाले. पुढं एलएलबी झाले. याच काळात म्हणजे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी आबांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी आबांच्या अंगावर ना नीट कपडे होते, ना पायात चप्पल. पण प्रामाणिक स्वभाव, स्वच्छ चारित्र्य आणि गोरगरिबांविषयीची तळमळ या एकाच धाग्यामुळं आबा पुढं 12 वर्ष सावळज गटातून झेडपीवर निवडून जात होते.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि झेडपी त्यातही सांगली जिल्ह्यातलं पाणीदार राजकारण ज्याला माहिती आहे, त्याला हे किती महाकठीण काम आहे, याची कल्पना येईल.

आबांनी राजकारण केलं, पण तेही घरंदाज पद्धतीनं. छक्केपंजे, काटाकाटी, कटकारस्थानं या वाटेला न जाता आबा प्रामाणिकपणाला चिटकून राहिले. त्यामुळं वसंतदादांनी आणि त्यांच्या पश्चात शरद पवारांनी आबांना कधीही अंतर दिलं नाही.

पुढं 1990 साली आबा पहिल्यांदा विधानसभेवर गेले. तेव्हाही दोन जोडीपेक्षा जास्त कपडे आबांकडे नव्हते. पण आपण गरीब आहोत, म्हणून आबांनी कधी स्वत:ला कमी लेखलं नाही. गरीबी आणि प्रामाणिकपणा ही आबांची ताकद होती. गमावण्यासारखं काही नसल्यानं आबांवर कधी खजिल होण्याची वेळ आली नाही. पण संधी मिळाली तेव्हाही  कधी ओरबाडण्याचा मोह झाला नाही. इथं त्यांच्यावरच्या संस्कारांचा पाया किती मजबूत आहे हे दिसतं.

मुख्यमंत्रीपदावर जोशी असोत की राणे किंवा आणखी कुणी.. आबा सरकारच्या चुकांवर बोट ठेवत राहिले. पण तसं करतानाही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर आबा घसरले नाहीत. विरोधकांवर टीका करणं आणि त्यांना अपमानित करणं यातला फरक त्यांनी कायम राखला.

आजकाल पंचायत समितीवर गेलेल्यांच्या दारात वर्षभरात इनोव्हा आणि फॉर्च्युनर उभी राहते. आणि कालपर्यंत चहाला महाग असलेले नेते करोडोशिवाय बोलत नाहीत त्यांनी जरा आबांकडे बघायला हवं.



आबा पहिल्यापासून व्याप असलेला माणूस, कलंदर, डोक्यात कायम चक्री चालू. त्यामुळंच ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केलं. म्हणजे 1999 साली. मोदींच्या आधी जवळपास 15 वर्ष. त्यातून आबांचा गाढा अभ्यास आणि व्हिजन दिसलं. गावागावात चैतन्य संचारलं. गावं हागणदारीमुक्त झाली. उकीरडे गावाबाहेर गेले. रोगराई हद्दपार झाली. बिडी-काडी-दारु बंद झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकीचं बळ गावांमध्ये दिसू लागलं. महाराष्ट्रात जे गेल्या 50 वर्षात झालं नव्हतं ते आबांनी करुन दाखवलं. केंद्रानंही ही योजना पुढं उचलून धरली.

2004 ला आबांवर पवारांनी उपमुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी टाकली. त्या काळात डान्सबार अर्थात छमछम जोरात सुरु होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिकवरुन तरुण पोरं संध्याकाळी गाड्या करुन पनवेल, मुंबईला यायची. रात्रभर धुडगूस घालून, पैसे उधळून सकाळी पुन्हा गावात. यामुळं कित्येकवेळा अपघात व्हायचे. पोरं अकाली जायची. बारमधल्या पोरींच्या नादी लागून अनेकांचे संसार उध्वस्त व्हायचे. आबांकडे शेकडो तक्रारी आल्या. शेवटी आबांनी सगळा विरोध झुगारुन डान्सबारबंदीचा कायदाच केला. जीवानिशी मारण्याच्या धमक्या आल्या. कोर्टकचेऱ्या झाल्या. पण आबा बधले नाहीत. महाराष्ट्रातल्या हजारो आया-बायांचे संसार आबांनी वाचवले.

राजकारण म्हटलं की उन्नीस-बीस, थोडं खाली थोडं वर आलंच. त्यामुळंच सर्वात वजनदार खात्यावर (गृह) आल्यावर आबांना पक्षातल्या मित्रांनीही बराच त्रास दिला. सांगली जिल्ह्यातही आबांना खाली खेचण्याचे, त्यांचं राजकारण धोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. पण आबांनी त्याला कधीही आक्रस्ताळेपणानं उत्तर दिलं नाही. ना कधी आदळआपट केली अथवा मीडियासमोर भडक विधानं करुन ड्रामा केला. आबा शांत राहिले. लोकांमध्ये राहिले. ज्यांच्यामुळं ते इतक्या मोठ्या पदावर पोहोचले त्यांच्याच हातात आबांनी स्वत:ला सोपवलं. त्यामुळंच विरोधकांनी पैशाचा पाऊस पाडला, स्वकियांनी हातमिळवणी केली, तरी आबांना पाडणं काही त्यांना जमलं नाही.

मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस मराठ्यांचा, सरंजामशाही नेत्यांचा, पैशेवाल्यांचा, भ्रष्टाचाऱ्यांचा, कंत्राटदारांचा, गुंडांचा पक्ष अशी प्रतिमा तयार झाल्यानंतरही आबा मात्र त्या चिखलात कमळासारखे वेगळे राहिले. अगदी बाबा आमटेंनीही आबांची स्तुती केली. अण्णा हजारेंनी तर आबांचा जाहीर प्रचार केला. तो आबांच्या स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक प्रतिमेचा गौरव होता.

“मुंबई हल्ल्यानंतर बडे बडे शहरो में छोटी छोटी बाते होती रहती है”  या वादग्रस्त वक्तव्यानं संताप उसळला. आबांना राजीनामा द्यावा लागला. त्याच दिवशी आबा सरकारी बंगला सोडून थेट अंजनीला आले. 15 वर्षात आबांनी कधीही आपल्या कुटुंबाला मलबार हिलची हवा लागू दिली नाही. आबा लोकांसाठी मुंबईत झटत राहिले. आणि त्यांची आई-पत्नी शेतात राबत राहिल्या. मुलं झेडपीच्या शाळेत शिकत होती. ठरवलं असतं तर मुंबईत कुठंही सी-फेसला वगैरे आबांना टोलेजंग फ्लॅट-बंगला घेणं शक्य होतं. पण तो मोहसुद्धा आबांना झाला नाही.

आबांनी ना कुठला कारखाना विकत घेतला, ना कुठली शिक्षण संस्था काढली, ना कुठं कंत्राटं घेतली. ना बिल्डरांसोबत पार्टनरशिप केली. नाही म्हणायला तासगावात एक सूतगिरणी सुरु केली. तीसुद्धा लोकांना रोजगार मिळावा म्हणून.

आबा राजकारणात UNFIT होते. त्यांनी राजकारण केलं ते गरजेपुरतं. एरवी कार्यकर्त्यासारखे राहिले.

आज आबा गेल्यानंतर अर्थात ‘मरने के बाद’ काय शिल्लक राहिलं..? तर साधेपणा हा यूएसपी असू शकतो हा विश्वास, गरीबी कमजोरी नव्हे तर ताकद आहे याची जाणीव,

प्रामाणिकपणाचा दर्जा पैसा-पदापेक्षा मोठा आहे यातलं सच्चेपण, ग्रामीण भागातील लाखो गोरगरीब कुटुंबातील तरुणांच्या मनावर कायमचं ठसलं.. स्विस बँकेतल्या वजनदार बँक अकाऊंटपेक्षा आबांचं अकाऊंट मरने के बाद जास्त आबाद आहे..  यापेक्षा आणखी काय राहायला हवं?